एक उंच, धिप्पाड, दाढीवाली, कुरता- पायजम्यातील व्यक्ती महात्मा गांधी यांच्यासोबतच्या काही छायाचित्रांत आवर्जुन दृष्टीस पडते. सरहद गांधी ऊर्फ खान अब्दुल गफार खान ऊर्फ बादशहा खान अशी त्यांची ओळख इतिहास शिकताना बहुतेकांच्या कानावरून गेलेली असेल. महात्मा गांधींना समकालीन असलेल्या खान यांनी स्वतंत्ररित्या उभारलेली अहिंसेची चळवळ मात्र पुढे बरीचशी विस्मरणात गेली.
‘दि फ्रंटियर गांधी’ या माहितीपटातून कॅनेडियन सिनेनिर्मात्या टी. सी. मॅकलुहन यांनी बादशहा खान यांचे झाकोळले गेलेले व्यक्तीमत्त्व जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. मुळात १० तासांच्या एकुण चित्रीकरणाला आटवून ९२ मिनीटांचा हा माहितीपट बनविण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मॅकलुहन यांना सुमारे २२ वर्षे लागली. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, कॅनडा या देशांत माहितीपटाचे चित्रीकरण झाले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान आय. के. गुजराल, पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई तसेच बादशहा खान यांचे परिवारजन, खुदाईखिदमदगार चळवळीतील (शंभरी ओलांडून गेलेले) सैनिक तसेच तीन्ही देशांतील पत्रकार, उच्च पदस्थ अधिकारी इत्यादींनी खान यांच्याबद्दल आठवणींना दिलेला उजाळा यामुळे हा माहितीपट अधिक वजनदार झाला आहे. शिवाय सरहद गांधी यांच्याविषयीच्या दुर्मीळ ऐतिहासिक ध्यनिचित्रफीतींचा समावेश माहितीपटात आहे.
हिंसेचा एक ज्वलंत इतिहास पाहिलेल्या खैबर खिंडीच्या परिसरात पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमेवर वसलेला पश्तून (पठाण) प्रांत. परंपरागत येथे बंदुका म्हणजे जणू दागिने समजले जात. हिंस्त्र लढाया जेथे जीवनाचा एक भाग होता. भारत ताब्यात घेतल्यावरही ब्रिटीशांना याठिकाणी सशस्त्र फौजेची खास तटबंदी उभारावी लागली होती. तेथे खान यांनी हजारो जणांना अहिंसेची दीक्षा देऊन त्यांना बंदुका सोडायला भाग पाडले. पुढे या सर्व एकेकाळी ’इट का जवाब गोलीसे‘ म्हणणार्या पश्तूनींनी ब्रिटीशांशी अहिंसक मार्गाने लढा उभारला. त्यासाठी ब्रिटीशांकडून होणारे अत्याचार झेलले पण हिंसेच्या मार्गाने पुन्हा कधीच प्रतिकार केला नाही. हे सर्व ऐकताना एखाद्या परीकथेप्रमाणे भासते. पण हे सर्व बादशहा खान ऊर्फ यांनी वास्तवात उतरवून दाखवले होते. हजारो जणांची ‘खुदाईखिदमदगार’ चळवळ उभारणारा हा लढवय्या आणि त्याचा इतिहास पुढे हळू हळू विस्मरणात गेला.
मक्का येथे गेल्यावेळी बादशहा खान यांना शांतीच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा प्राप्त झाली. पुढे पश्तून येथे गेल्यावर या अहिंसक मार्गाचा स्वीकार करण्यासाठी आपल्या जमातीतील इतरांनाही आवाहन केले. त्यावेळी संघटित भारत हा ब्रिटीशांच्या ताब्यात होता (सध्याच्या पाकिस्तानकडील) वायव्य सीमेवर वसलेला पश्तून प्रांत हा हिंसेने लथपथ होता.
‘जो बुंदुकीच्या रणनीतीने लढतो त्याचा विजय हा टिकणारा नसतो व जो शांतीच्या व अहिंसेच्या मार्गाने लढतो तो कधीच पराजीत होत नाही’ हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. त्यातून त्यांनी शस्त्रांचा त्याग करायला लावून हजारो पश्तूनांची ‘खुदाई खिदमदगार’ सेना बनवली व ब्रिटीशांशी अहिंसक मार्गाने लढा उभारला. ‘खुदाई खिदमदगार’ इतके विश्वासार्ह बनले होते की पश्तून फाळणीनंतर पाकिस्तानात समाविष्ट झाला तेव्हा तेथील हिंदू भितीपोटी घरांना कुलूपे लावून लपून बसले होते. पण जेव्हा हे खान यांचे सैनिक त्यांच्या मदतीला आलेत असे कळले तेव्हा ते पुन्हा घराबाहेर पडले होते.
पुढे खान महात्मा गांधींच्या संपर्कात आले व दोघांची छान मैत्री जमली. ती इतकी होती की म्हणे आपला चष्मा सापडेनासा झाला की कुराण वाचताना बादशहा खान कधी कधी महात्मा गांधींच्या चष्म्याचा वापर करीत. महात्मा गांधी १९३८ साली पश्तूनच्या दौर्यावर गेले तेव्हा तेथील अहिंसेची चळवळ पाहून आश्चर्यचकित झाले. आपण भारतात जो अहिंसेचा जो प्रसार केला त्यापेक्षा बादशहा खान यांनी उभारलेली अहिंसेची चळवळ जास्त महत्त्वाची ठरते असे ते म्हणाले होते. कारण भारतात अहिंसा ही अनेकांची जीवनशैली होती शिवाय लढण्यासाठी मुळात शस्त्रेही फार लोकांकडे नव्हती मात्र पश्तूनमध्ये स्थिती उलट होते. तेथे तर हिंसा जणू जीवशैलीचा एक भाग होती व शस्त्रे जणू दागिन्यांप्रमाणे.
आपल्या ९५ वर्षांच्या जीवनातील ३५ वर्षे बादशहा खान यांनी विविध चळवळींमुळे तुरुंगात व्यतीत केली. बहुतेक कैद ही नजरकैद होती. शेवटची कैद त्यांना ९५ व्या वर्षी झाली. दुर्देव म्हणजे ३५ पैकी १५ वर्षे कैद ही स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात भोगावी लागली. पाकिस्तानने त्यांना कधीच आपले मानले नाही. महात्मा गांधी प्रमाणे खान हे सुध्दा फाळणीचे विरोधक होते. भारत स्वातंत्र झाला तेव्हा दोघे दिल्लीत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नव्हते. महात्मा गांधी पश्चिम बंगालमध्ये दंगे मिटवत होते तर खान पश्तून प्रांतात शांती राहावी म्हणून झटत होते.
खान यांनी आपल्या चळवळीत सर्व धर्मीयांना समान स्थान दिले होते. स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिम स्त्रियांना आणण्याचे काम त्यांनी केले. मुलींच्या शिक्षणासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. दुर्देवाने पाकिस्तानने त्यांना आवश्यक तो मान सन्मान दिला नाही. स्वातंत्र्यानंतर आपल्या पश्तून प्रांतात काहीसे उपेक्षित जीवन त्यांच्या वाट्याला आले.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी अफगाणिस्तानात दौरे काडले. तेथे त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ब्रिटीशांना पश्तूंनांना विभक्त करण्यासाठी पाकिस्तान - अफगाणिस्तान सरहद मर्जीप्रमाणे व सोयीप्रमाणे आखली होती. त्यालाही खान यांचा विरोध होता. त्यासाठी आपल्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार अफगाणिस्तान येथील भागात करण्यात यावेत अशी त्यांची इच्छा होती. तसे ते करण्यात आले. त्यावेळी पाकिस्तान-अफगाणिस्तान अशा दोन्हीकडे विभक्त झालेले पश्तून जमातीतील लोक व्हिसा वगैरेचे नियम मोडून त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने सामील झाले होते व आपली एकता त्यांनी जगासमोर आणली होती.
माहितीपटात एकेठिकाणी ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर म्हणतात, महात्मा गांधींभोवती अहिंसेचे ब्रॅण्ड तयार झाले व त्यामुळे बादशहा खान यांचे अहिंसात्मक लढ्याचे स्वतंत्र कार्य झाकोळले गेले. श्रीमती मॅकलूहन हेच खान यांचे स्वतंत्र व्यक्तीमत्त्व शोधतात व त्यांचे इतिहासातील स्थान अधोरेखित करतात. बादशहा खान यांंची बृहन् आशियाई नेता म्हणून प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्नही माहितीपटातून दिसून येतो.
Comments
Post a Comment