शिक्षण
म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या शाळा. शाळा म्हटली की मग
आले वर्ग, तास, क्रमिक पुस्तके, आणि चांगले गुण मिळवून पुढे येण्याची
स्पर्धा. या स्पर्धेत अनेकजण मागे राहतात. त्यांची आठवण कोण सहसा ठेवत
नाही. मुळात ते मागे राहतात त्यांच्यात काही कमतरता असते म्हणून नव्हे तर
शिक्षणव्यवस्थेने ठरवलेले सरासरी निकष त्यांना लागू पडत नाहीत म्हणून.
भारतात
प्रामुख्याने रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांनी शांतिनिकेतन व ‘नई
तालिम’मधून शिक्षणव्यवस्थेचा वेगळा विचार रुजविण्याचे प्रयत्न केले. आपल्या
देशात आजही काहीजण शिक्षण व्यवस्थेच्या वेगळ्या वाटेवरून चालण्याचे धाडस
करत आहेत, त्यासाठी प्रवाहाविरुद्ध जाऊन नवीन प्रयोग करीत आहेत.
कुडाळ-मालवण रस्त्यावर धामापूर गावात ‘स्यमंतक’ नावाच्या शिक्षण केंद्रातून
अशीच एक सुप्त क्रांती करण्याचा प्रयत्न चालू आहे.
‘स्यमंतक’
ही ‘शाळा’ आहे, पण इथे वर्ग नाहीत, बसायला बाक नाहीत, फळ्यावर काहीतरी
लिहून माथी मारण्याचा प्रयत्न नाही. परीक्षा घेणे, उत्तीर्ण करणे, पुढच्या
वर्गात प्रोमोट करणे असलाही प्रकार नाही. तज्ज्ञांची पुस्तके प्रमाण मानून
स्वत:ची बुद्धी घडविण्याचे कामही येथे होत नाही... पण तरीही ही एक शाळा
आहे.
या
अस्सल कोकणी गावातील एंटिक वाटणार्या चिरेबंदी घरात तुम्ही प्रवेश करता
तेव्हा येथील मुक्त वातावरण, मुलांचे चालणे-फिरणे, आपापल्या आवडीच्या
वेगवेगळ्या कामांत मग्न असणे हे सर्व पाहिल्यावर वाटते की जणू आपण एका
आश्रमातच आलोय. तेथे चाललेले कृषी-अभियांत्रिकीचे प्रयोग तुम्ही पाहता
तेव्हा वाटते की जणू हा एक वर्कशॉप आहे. ‘स्यमंतक’च्या स्वयंपाक खोलीत
तुम्ही गेला तर वाटते जणू हा एखादा ‘होम सायन्स’चा अभ्यासवर्ग आहे.
चाकोरीबद्ध
शिक्षण कसे बदलता येईल, मुलांमधील बहुआयामीपणा, कौशल्यबहुलता यांचा
समांतरपणे विकास कसा साधता येईल, मुलाला ‘माणूस’ बनण्याचा आणि ‘माणूस’ बनून
आत्मविश्वासाने जगण्याचा विश्वास कसा देता येईल, स्पर्धेत उतरून ती एकटी
बनू नयेत, त्यांच्यात सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याचा संस्कार कसा रुजवता
येईल असे व तत्सम अनेक प्रयोग येथे चालू आहेत.
सहा
वर्षांपूर्वी सचिन देसाई आणि त्यांच्या पत्नी सौ. मीनल यांनी हा प्रयोग
करायचे ठरवले. दोघेही व्यावसायिक. सचिन यांचा बर्यापैकी जम बसवलेला
सॉफ्टवेअरचा व्यवसायही होता. सचिन म्हणतात, ‘‘ज्या प्रकारची शिक्षणपद्धती
लहानपणापासून पाहिली त्यात फारशी रूची राहिली नव्हती. मुलगी मृणाल शाळेत
जायच्या वयाची झाली तेव्हा आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला की जी पद्धत
आम्हाला आवडली नाही त्यात पुन्हा मुलीलाही का म्हणून ढकलून द्यायचं?
याच
दरम्यान सचिन डॉ. सत्येंद्र कालबाग यांच्या संपर्कात आले. कालबाग यांनी
एका बहुराष्ट्रीय कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पुण्याजवळ ‘ड्रॉप आऊट’
मुलांसाठी एक शाळा सुरू केली होती. ती पाहिल्यावर सचिन यांच्या मनात आपणही
असा वेगळा प्रयोग करावा अशी इच्छा निर्माण झाली. तोपर्यंत सचिन यांचा
महात्मा गांधींची ‘नई तालीम’ शिक्षणपद्धतीशी व ‘गावाकडे चला’च्या
तत्त्वज्ञानाशी बर्यापैकी सूर जुळत चालला होता. पण शिक्षणासंबंधीचा हा
प्रयोग कुठे करावा असा प्रश्न निर्माण झाला. सचिन यांचे धामापूर गावात
वडिलोपार्जित घर होते. तेथे हा प्रयोग करायचा असे त्यांनी ठरवले.
घरच्यांनीही त्याला संमती दिली. आणि मग सचिन आपला इंदौरचा मुक्काम हलवून
कुटुंबासह कायमचा धामापूर गावी राहायला आला.
या
शाळेची पहिली विद्यार्थिनी होती सचिन यांची मुलगी मृणाल. नंतर बालसुधारगृह
व अनाथाश्रमातून सहा मुलांना आणले गेले. सचिन म्हणतात, मुळात आम्हाला
शिकवायचे काहीच नव्हते, फक्त शिकायचे होते. ‘घराची दुरुस्ती’ हा पहिला धडा
ठरला. त्यापासून शिक्षणाची सुरुवात झाली. घराचे प्लंबरिंग, लाइट फिटिंग ही
कामे होती, शिवाय कार्पेंटरी. सचिन व मुलांनी तज्ज्ञाच्या मदतीने ही कामे
शिकून स्वत:ही केली. या घराच्या आजूबाजूला असलेल्या जागेचा उपयोगही
बर्यापैकी करून घेण्यात आला. सेंद्रीय पद्धतीने येथे शेतीचे अनेक प्रयोग
चालतात. यासाठी लागणारे खतही मुले कंपोस्टिंग युनिटच्या माध्यमातून तयार
करतात. छोटीशी गोशाळाही आहे. तेथील शेणाचा वापर करून बायोगॅस प्रकल्पही
चालवला जातो. शिक्षणाची पद्धत येथे वेगळी. कुणी कुणाला अमुकच कर म्हणून
दटावत नाही. आपल्या आवडीनुसार प्रत्येकजण काम घेतो व गरज भासलीच तर
मार्गदर्शन घेतो. मुले सकाळी उठतात व दिवसाच्या कामाची वाटणी करून घेतात.
यात सचिन यांच्या मुलीचाही समावेश असतो. दिवसा विविध उपक्रम झाल्यावर
संध्याकाळी खेळ, चर्चा होतात. आपली मुलगी या सर्व मुलांत मिळूनमिसळून
वाढतेय हे पाहून आनंद होतो, असे सचिन सांगतात.
येथे
मुलांच्या इच्छेचा मान राखला जातो व त्यांच्यातील मोकळेपणा जपला जातो.
सचिन म्हणतात, मुलांना एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी आपण मार्गदर्शन केले
पाहिजे. त्यांची शर्यत लावू नये. शिक्षणादी एखादा विषय शिकवताना तो तुटक न
शिकवता सम्यकपणे शिकवावा. शिक्षण प्रयोगशील झाले पाहिजे. साखर गोड आहे असे
जेव्हा लहान मूल लिहिते त्याआधी साखरेची गोडी त्या मुलाने प्रत्यक्ष चाखली
असली पाहिजे. ‘स्यमंतक’मध्ये मुलांना त्यांची इच्छा असेल तर ‘ओपन
स्कूल’च्या परीक्षेला बसवले जाते. आतापर्यंत अशाप्रकारे परीक्षेला बसलेली
ही मुले ७० टक्क्यांहून अधिक गुण घेऊनच उत्तीर्ण झाली, असेही त्यांनी
सांगितले.
शाळेत
एक वाचनालय आणि ब्रॉडबॅण्ड कनेक्शन आहे. प्रयोग करताना मदत लागते तेव्हा
संदर्भासाठी त्यांचा उपयोग केला जातो. येथे टीव्ही नाही, वर्तमानपत्रही येत
नाही. या गोष्टी जाणीवपूर्वकच येथे ठेवलेल्या नाहीत.‘स्यमंतक’मध्ये
आतापर्यंत सुमारे ३५ मुले ‘शिक्षित’ होऊन गेली आहेत. ही सर्व मुले
अनाथाश्रमतील, बालसुधारगृहातील, ‘ड्रॉपआऊट’, मतिमंद ठरवून
शिक्षणव्यवस्थेतून बाद ठरवलेली अशी होती. पण मग अर्थकारणाचे काय?
‘स्यमंतक’सारखी संस्था एक प्रयोग करते आहे हे ठीक आहे, पण आर्थिकदृष्ट्या
ती सस्टेल तर व्हावीच लागेल. त्याचे उत्तर असे- संस्थेचा महसूल हा ६०:४०
अशा प्रमाणात आहे. म्हणजे ‘स्यमंतक’च्या आवारातील कृषी उत्पादने, कंपोस्ट
आदी विकून तसेच येथील मुले आपण कमावलेले कौशल्य वापरून ६० टक्के महसूल
संस्थेत आणतात, उरलेला महसूल हा दात्यांच्या देणगीतून येत असतो.
गेल्या
दोन वर्षांपासून ‘स्यमंतक’मध्ये कृष्णा नावाचा एक मुलगा आहे. पनवेलच्या
एसओएस संस्थेतून तो येथे आला. काही वर्ग शिकल्यानंतर शाळेने तो मतिमंद
असल्याचे सांगितले. नंतर तो काही महिने मतिमंदांच्या शाळेत गेलाही. पण तिथे
त्याचे मन रमले नाही. इतक्यात त्याचा ‘स्यमंतक’शी योग जुळून आला.
सुरुवातीला त्याला डिस्लेक्सियाचा त्रास होता. तुम्ही आज त्याच्याशी बोलाल
तर तुम्हाला सर्वसामान्य मुलांत व त्याच्यात काहीच फरक वाटणार नाही.
स्यमंतक व त्याच्या आवाराची इत्यंभुत माहिती तो तुम्हाला देतो. येथील औषधी
झाडांचे उपयोग, कंपोस्टींग युनिटची सविस्तर माहिती तुम्हाला तो देतो.
अडुळसा काढा व जास्वंदीचे कल्प तयार करण्याची प्रक्रिया त्याने शिकून घेतली
आहे. हे तो स्वत: बनवतो तसेच इतरांनाही खुबीने शिकवतो. या दोन गोष्टींचे
प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्याला हैद्राबाद येथून निमंत्रण आले आहे.
‘स्यमंतक’च्या स्वयंपाकघराची पूर्ण जबाबदारी त्याची आहे. प्रत्येक ताटात
असलेला अन्नपदार्थ तो जोखू शकतो. ताटातील प्रत्येक चपाती किती ग्रॅम पिठाची
बनली आहे ते तो सांगू शकतो.
आतापर्यंत
‘स्यमंतक’मधून ‘उत्तीर्ण’ झालेली मुले आपल्या पायावर उभं राहण्याचा
आत्मविश्वास घेऊन समाजात मिसळली. एक मुलगा अभय बंग यांच्या र्सच संस्थेत
मदतीसाठी गेला. एकाला मुंबईत आयआयटीच्या एका विभागात ‘इन्टर्नशीप’ करायची
संधी मिळाली. असाच एक मुलगा सुरुवातीस संगणक अभ्यासक्रमाकडे वळलेला जो मागे
पडला ‘ड्रापआऊट’ ठरला व स्यमंतकमध्ये आला. येथे पशुसंवर्धनाविषयी त्याला
रस निर्माण झाला व सध्या तो स्वत:चा फार्म चालवतो. अशाच काही मुलींनी येथे
येऊन आपल्या आयुष्याची वाट शोधली. अशा विद्यार्थिनींपैकी एक इंदौर येथे
प्रकल्प सहाय्यक म्हणून एनजीओत काम करीत आहे तर एकीने आपल्या आईसोबत काजू
प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे.
हे
सर्व जरी असे असले तरी सचिन यांची एक खंतही आहे. ते म्हणतात, या मुलांना
आम्ही घडवतो तेेव्हा आमची एक छोटीशी अपेक्षा असते. या मुलांनी गावात जायचे,
तेथे राहून काम करायचे हा जो विचार आहे तो पुढे न्यावा असे आम्हाला वाटते.
पण त्यात फारसे यश आलेले नाही. काही उदाहरणे सोडली तर ही मुले कौशल्य
प्राप्त केल्यानंतर पुन्हा व्यवस्थेच्या मूळ प्रवाहात ओढली जातात आणि तेथेच
राहू लागतात.
त्यामुळे
कौशल्य प्रदान करण्याबरोबरच माणुसकीचे, स्वत:च्या जीवनाचा उद्देश जाणून
घेण्याचे शिक्षण त्यांना मिळायला हवे. त्यासाठी आम्ही विशेष संशोधन करणारच
आहोत. गांधी, विवेकानंद आदींनी जे माणसांत आध्यात्म शोधण्याचे काम केले ते
माणुसकी प्रदान करण्याच्या उद्देशानेच होते. आपली एकूणच शिक्षणव्यवस्था हे
काम करण्यात अपुरी पडत आहे. त्याकडे आता जाणीवपूर्व लक्ष देण्याची गरज
निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment