स्वर आणि ईश्‍वर

ईश्‍वराचे सान्निध्य प्राप्त करण्यासाठी  संगीताच्या माध्यमातून स्वत: आणि इश्‍वरातील अंतर मिटविण्याचा प्रयत्न करणार्‍या सुफी परंपरेचा उल्लेख वारंवार येतो.

‘समा : दि मिस्टिक म्युझिक ऑफ इंडिया’ हा शाजिया खान यांचा माहितीपट भारतीय इस्लामी परंपरेतील संगीतातून ईश्‍वराच्या साधनेच्या परंपरेचा शोध घेतो. ‘समा’ म्हणजे समर्पणासाठी जमलेल्या श्रद्धावान श्रोत्यांचा मेळा. ज्यांचा उद्देश विश्‍वाच्या सर्वोच्च सत्याशी तादात्म्य पावण्याचा आहे. ‘समा’ संगीत इस्लामच्या ‘सूफी’ परंपरेशी निगडित आहे.

माहितीपटात दिग्दर्शकाने भारतातील ÷इस्लामी आध्यात्मिक-गुढ अशा सांगितीक वैशिष्ट्यांचा आणि वैविध्यांचा शोध घेतला आहे. तो घेताना या संगीतात मिसळून गेलेल्या मूळ भारतीय संगीत - आध्यात्मिक संस्कारांना अधोरेखित करण्याचे कामही या माहितीपटातून झाले आहे. त्याशिवाय एखादी संगीत परंपरा घडण्याची प्रक्रियाी माहितीपट उलगडतो. कोणताच धर्म एकांगी राहू शकत नाही. तो परिसराने कसा प्रभावित होत असतो याचे दर्शनही घडते.

या संगीताच्या सान्निध्यात आल्यावर धर्म-जात -पात रूढी व तत्सम भेद विरून जातात आणि श्रवणकर्ता एका दैवी एकांताशी तादात्म पावत जातो याचा अनुभव माहितीपट पाहतेवेळी घेता आला.

माहितीपटाची सुरुवात तामीळनाडुच्या किनार्‍यावर होते. तेथे डफली घेऊन (बहुधा मच्छीमार) लोक तामीळ भाषेत समुद्रकिनारी बसून प्रेषित महम्मदांची साधना करतात. नंतर केरळ येथे स्त्रिया मपिलापट्टू गाताना दिसतात. मपिलापट्टू हा चरित्रात्मक काव्याच्या गायनाचा प्रकार आहे. याठिकाणी कुराणमध्ये येणार्‍या विविध चरित्रांचे गायन केलेे जात होते.

करता करता अजमेर येथे फिल्म पोचते. भक्ती परंपरेच्या संपर्कात आल्यानंतर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांनी स्वत:ही ईश्‍वराचा संदेश व ईश्‍वरासाठी समर्पणाचा प्रसार करण्यासाठी संगीत-गायनाचा मार्ग निवडला त्याची झलक माहितीपट दाखवतो.

राजस्थानमधील मंगलियार समुदायाचीही भेट घडते. इस्लामी रीतीरिवाज मानणार्‍या या लोकसमाजाला हिंदू सणांवेळी गायनासाठी मानाचे निमंत्रण देण्याची तेथे प्रथा आहे. आपल्या दिनचर्येतही हा समुदाय दोन्ही धर्मांची आराधना संगीतातून करतो.

माहितीपटात पुढे आसाम येते. तेथील इस्लामी ‘जिक्र’मध्ये हिंंदू मठ संस्थापक शंकराचार्यांचा, महादेवाचा आणि श्रीकृष्णाचा उल्लेख येतो. येथील इस्लामी सूफी परंपरेत शंकराचार्यांना मानाचे स्थान आहे, हे त्यांच्या गायनातून दिसते. आसाममध्ये सूफी परंपरा आणणार्‍या अजान पीरवरच शंकराचार्य आणि भारतीय संगीताचा प्रभाव होता असे दिसते.

जम्मू काश्मीरमध्ये एक अजब अवलिया दिसतो. पहलगाम नदीकिनारी एकदा सारंगी वाजवताना त्याला आभास झाला की नदीच्या हालचालीत आपल्या संगीताचे प्रतिबिंब उमटले आहे, त्यापासून गेली ३५ वर्षे या नदीकिनारी निसर्गात तल्लीन होऊन तो सारंगी आळवतो आहे.

पहलगाम येथे स्थानिक लोकसंगीतातून उदय पावलेल्या समर्पण संगीताच्या सुफी परंपरेचे  दर्शन फिल्ममध्ये घडते. हे संगीत साधक म्हणतात - ‘सुफी म्हणजे निर्भय होणे, आम्ही निर्भय आहोत.’ रक्तलथपथ काश्मीर खोर्‍यांत, नाही म्हटले तरी या विधानाला महत्त्व प्राप्त होते. लोकसंगीतातील सुफी परंपरेबरोबर शास्त्रीय रागदारीवर आधारित ‘सुफीयाना कलाम’ची परंपराही काश्मीरमध्ये आहे. देशभरातील भारतीय रागदारी व शास्त्रीय प्रकारांचे संस्कार त्यात आहेत. तजिकिस्तान, तुकस्थान येथील संगीत विशारदांनीही या ‘कलाम’ला पैलू पाडले आहेत. कलामचे साधक विहंगम अशा निसर्ग पार्श्‍वभूमीवर तलावाच्या काठावर बसून ‘धर्म इतका साधा असतो... माहित नव्हते’ असे भजन म्हणतात तेव्हा थिएटरमधील श्रोते तल्लीन होऊन जातात.

माहितीपटाचा शेवट हा बंगालच्या बाऊल आणि फकिरांपाशी होतो. बाऊल हिंदू परंपरेशी नाते सांगणारे तर फकिर इस्लामी श्रद्धेचे. पण ते धुंद होऊन गाऊ लागतात तेव्हा धर्माचे भेद गळून पडतात. कुठल्याही आर्थिक मदतीविना हे बाऊल - फकीर गावागावांत जाऊन भक्ती संगीताची धूनी जागवत आहेत. मोह, स्वार्थ, वाईट मार्ग त्यागून पावित्र्याच्या-नैतिकतेच्या समीप होण्याचा संदेश आपल्या गीतांतून - गायनातून तेे देतात.

माहितीपट पाहताना विविध राज्यांतील लोकसंगीताची परंपरा व प्रदेशनिष्ठ संगीताचा बाज यांची ओळखही घडते. संगीताच्या माध्यमातून श्रद्धेचा धागा जोडणारी परंपरा आणि भेदांची श्रृंखला तोडणारी परंपरा यांचा वेध माहितीपट घेतो.

(पुरवणी संदर्भ  : हा माहितीपट  youtube वर  उपलब्ध असल्याचे आढळले )

Comments