‘जीवन उत्कटपणे जगता आले पाहिजे. जीवनात काही मूल्ये-मुद्दे हवेत व त्यांच्याशी एकनिष्ठ राहायला हवे. नुसती प्रतिभा नको, निष्ठाही हवी’ : ज्ञानपीठ रवींद्र केळेकरांशी एक संवाद

कोकणी ‘अक्षर’ सिद्ध करण्यासाठी समर्पितपणे  कृतीशील राहिलेल्या पद्मभूषण रवींद्र केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. वयाच्या 83व्या वर्षी व्रतस्थपणे कार्य करत असलेल्या रवींद्र केळेकरांना पहिला कोंकणी साहित्य अकादमीचा पुरस्कार, फेलोशीप मिळाली होती.

पुरस्कार जाहीर झाला त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी केळेकर प्रियोळच्या आपल्या घरात कुतुहलाने वर्तमानपत्रे चाळत होते. चेहर्‍यावर मात्र तेच स्थितप्रज्ञ भाव... एव्हाना चाहत्यांची वर्दळ सुरू झाली होती. अधूनमधून राज्यातील व राज्याबाहेरील तमाम चाहत्यांचे अभिनंदनाचे फोन चालूच होते. ‘रवींद्रबाब तुम्ही आम्हाला व्यासपीठ दिले व आता ज्ञानपीठ...’-एकाची कॉमेंट.

अशा या  वातावरणात आमच्या मनमोकळ्या गप्पा सुरू झाल्या.


- पुरस्कार मिळाल्याचे समजले त्यावेळी पहिल्यांदा काय आठवणी जाग्या झाल्या ?
- सर्वप्रथम वडलांची आठवण आली. त्यांची खूप इच्छा होती की मी लेखक वगैरे व्हावे. घरात पुस्तकांनी भरलेली कपाटे . मला खूप पुरस्कार मिळावेत. त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटते. पत्नीची आठवण आली. ती आज असायला हवी होती.

- हा कोंकणी भाषेला मिळालेला ज्ञानपीठ आहे. यात काही वेगळेपणा आहे का ?
- नक्कीच ! जिला भाषा मानायला अनेकजण तयार नव्हते त्या कोंकणीला हा पुरस्कार लाभला आहे. कोंकणीने ही उंची गाठली त्याचा आनंद वाटतो. यात माझा हातभार लागला याचा अभिमान आहे.

- तुम्ही नेहमी ‘मी रायटर नव्हे फायटर’ असे म्हणता. ही फायटींग यशस्वी झाली का ?
- नाही. जोपर्यंत मराठीवादी कोंकणीची जागा मान्य करीत नाहीत व कारवार, सुपा, हल्ल्याळ व सिंधुदुर्ग हे भाग गोव्याला जोडले जात नाहीत तोपर्यंत फायटिंग यशस्वी झाले असे मी म्हणणार नाही. कोणीतरी आता हे पुढे चालवायला हवे.

- हे भाग गोव्यात यावेत, असे आपल्याला का वाटते ?
- कारण हे सर्व कोकणी प्रदेशच आहेत. गोवा हा या प्रदेशाचा एक भाग आहे.

- जीवनाविषयीचे भूलभूत तत्त्वज्ञान तुमच्या लेखनात मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. या विचारांमागील प्रेरणा कोणती होती ? ती साधना कशी होत गेली. ?
- वर्ध्याला काकासाहेब कालेलकरांच्या आश्रमात राहिलो होतो. काकासाहेब - विनोबा यांचेच संस्कार आहेत हे सगळे.

- तुमची एक खासियत म्हणजे तुमची लेखनशैली. साधी सरळ भाषा, लहान वाक्यरचना हे तिचे विशेष. ही शैली कशी विकसित झाली. ?
- अलंकारिकपणामला कधीच आवडला नाही. तुम्ही संवाद साधता त्याचप्रमाणे लिहिता आले पाहिजे, असे मी मानतो. मी तसाच प्रयत्न केला व तो सर्वांना भावला.

- कोंकणी चळवळीचे अनेक टप्पे तुम्ही पाहिले आहेत. सध्याच्या कोंकणी साहित्य चळवळीचे मूल्यमापन कसे कराल ?
- सध्या केवळ साहित्यनिर्मिती होते आहे. चळवळ मागे पडू लागली आहे. कोंकणी साहित्यनिर्मिती ही चळवळीचा भाग होती. आमच्या पीढीतील तो अ‍ॅक्टीव्हिजम नव्या पीढीत कसा आला नाही याचा अनेकदा विचार करतो. दुसरे म्हणजे साहित्यनिर्मिती कोंकणी भाषेला पुढे नेण्यासाठी हवी, त्यात भर टाकण्यासाठी नव्हे. सध्या भर टाकण्याचे काम चालले आहे, हे पाहून खंत वाटते. वर्षाला 10-15 पुस्तके प्रकाशित झाली तरी चालतील पण ती दर्जेदार हवीत.

- कोंकणीत साहित्य अकादमी पुरस्कार लवकर मिळतात म्हणून काहीजण कोंकणीत लिहितात असे एक मत आहे.
- असे लिहिणारे मराठीवादी कोंकणी लेखक असावेत.

-कोंकणीने इतकी  वर्षे लढा देऊन यश मिळवले. आज अचानक कोंकणीत लीपिवाद निर्माण झाला आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटते ?
- कोंकणीची चळवळ नवा गोवा निर्माण करण्यासाठी  होती. त्यात जसे मराठीला स्थान नाही तसेच रोमीलाही नाही. कोंकणी पोर्तुगालहून आलेली भाषा नाही. ती इथेच जन्मली आहे. दाल्गादनी कोंकणीची स्वत:ची लीपी आहे असे म्हटले. काहींनी त्यांच्या नावे रोमी अकादमी स्थापन केली. हे महात्मा गांधींच्या नावे बार उघडण्यासारखे आहे.

- नुकत्याच प्रकाशित झालेल्या तुमच्या ‘भाषिक संघर्षाचे समाजशास्त्र’ पुस्तकात तुम्ही कोंकणी-मराठी सहयोगाचा विचार मांडलात. मराठीला कधीच विरोध नव्हता असे म्हटलेे आहे.
- मराठीला विरोध कधीच नव्हता. आमचा लढा कोंकणीला तिची हक्काची जागा मिळवून देण्यासाठी होता. पण मराठीवाद्यांनी कधी समजूनच घेतले नाही. बौद्धिक अहंकार होता तो त्यांचा. डोकी बंद करून घेतल्यानंतर काय कळणार ? आणि कोंकणी - मराठी सहयोगासाठी मराठीवाल्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होणे आधी गरजेचे आहे. ‘भाषिक संघर्षाचे समाजशास्त्र’मध्ये त्यातबाबत आले आहे.

- तुम्ही काही काळ सक्रिय राजकारणात घालवलात. निवडणुकाही लढवल्या. अचानक राजकारणापासून दूर का झालात.
- मी राजकारणात गेलो होतो तो तेव्हाचा आदर्शवाद पाहून. हळूहळू आदर्शवाद बाजूला पडत गेला व त्याची जागा आकड्यांच्या खेळाने घेतली. हे लक्षात आल्यानंतर मी त्यातून अंग काढून घेतले.

- राजकारणाचे शुद्धीकरण कसे करता येईल ?
- गोव्याच्या बाबतीत बोलायचे तर पहिल्यांदा जे ‘सिटींग’ आहेत त्या सर्व राजकारण्यांना घरी पाठवा. जनतेने सर्वसंमतीने अपक्ष उमेदवार निवडायचा. अशा अपक्षांचे सरकार बनवायचे.

- प्रदीर्घ अशा स्वातंत्र्यचळवळीनंतर भारतात लोकशाहीप्रधान व्यवस्था अस्तित्वात आली. आज या लोकशाही  व्यवस्थेला सगळे कंटाळल्याचे चित्र आहे. तुमचे नक्कीच याबाबत काहीतरी मत असेल.
- आज लोकशाहीची विटंबना चालली आहे. धर्म, जाती एकत्र येण्यापेक्षा एकमेकांपासून दूर कशा जातील हे पाहिले जातेय. लोकशाहीचा कंटाळा आला असेल तर त्याला डेमोक्रेटिक विकल्पच शोधावा लागेल. आपल्याला लोकशाहीचा खरा अर्थच आपल्याला गवसलेला नाही. केवळ मेजॉरिटी रूल म्हणजे लोकशाही नव्हे.

-जातीयवाद व दहशतवाद ही दोन संकटे देशासमोर आहेत. त्यामागील कारणे काय असतील असे तुम्हाला वाटते ?
- सध्याच्या लोकशाही व्यवस्थेचे व निवडणूक पद्धतीचे ते दोष आहेत. मेजॉरिटी, मायनॉरिटी या ज्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत, त्यात प्रत्येकजण कुठल्यातरी असुरक्षिततेमुळे स्वत:चे उपद्रवमूल्य सिद्ध करू पाहतो आहे व त्यामुळे हे प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

- तुम्ही गांधीवादाचे अभ्यासक आहात. देशात आज गांधीवाद हरवत चाललाय का ?
- गांधींचा केवळ वापर केला गेला त्यांच्या शिष्यांकडून. सरदार पटेल व जवाहरलाल नेहरू यांनी एक प्रॅगमेटीक पॉलिटिक्स सुरू केले. ज्यावेळी त्या दोघांनी भारताचे विभाजन स्वीकारले त्याचवेळी गांधीवाद फेल झाला.

- सध्याच्या परिस्थितीत लेखकाची भूमिका काय असावी असे तुम्हाला वाटते ?
- लेखकाचा वावर केवळ मनोरंजन करण्यापुरताच नको. ते काम विदुषकही करू शकतात. साहित्यिकांनी प्रबोधनासाठी व समाजात वाइटाविरूद्ध चीड निर्माण करण्यासाठी लिहिले पाहिजे.

- मौलिक चिंतन कमी होत आहे. तुम्हीही तसे म्हटले होते. यामागील कारणे काय असावीत ?
- जीवनाविषयी गंभीर नसाल तर चिंतन कसे घडेल. जीवन उत्कटपणे जगता आले पाहिजे. जीवनात काही मूल्ये-मुद्दे हवेत व त्यांच्याशी एकनिष्ठ राहायला हवे. नुसती प्रतिभा नको, निष्ठाही हवी !

- कोंकणी भाषेचे माध्यम स्वीकारल्यामुळे लेखक म्हणून कधी मर्यादा जाणवल्या का ? काही गमवावे लागले असे वाटते का ?
- मी प्रसिद्धीच्या मागे लागलो नव्हतो. गुजराती, हिंदी, मराठी या भाषाही मला चांगल्या येतात. त्यातही मी नाव कमाऊ शकलो असतो. पण ‘माझी भाषा मागे का ?’ हा विचार नेहमी मनात यायचा. मी माझ्या भाषेला पुढे नेण्यासाठी वावरलो आहे. मी त्यासाठी काहीच गमावलेले नाही.


(नवप्रभा:30नोव्हेंबर2008)

पुरवणी संदर्भ  : रवींद्र केळेकर  यांच्यावर  एक माहितीपट youtube वर  आहे. 

Comments