रवींद्रसंस्कृती यात्रा

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची 150वी जयंती देशात साजरी होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या जीवन व कार्याचे दर्शन घडवणारे ‘संस्कती एक्सप्रेस’ हे रेल्वेतील फिरते सचित्र प्रदर्शन गोव्यात येऊन गेले. भारतीय रेल्वेच्या या उपक्रमांमध्ये एकुण पाच वातानुकूलित डब्यांमधून मांडलेल्या या प्रदर्शनातून टागोरांचे व्यक्तिमत्व उभे करण्याचा सुंदर प्रयत्न झाला आहे.

प्रत्येक बोगीचा एक सुंदर विभाग करून त्याला अनुक्रमे - जीबोन स्मृती, गीतांजली, मुक्तधारा, चित्रलेखा व शेष कथा आणि स्मरणिका अशी नावे देण्यात आली होती.

जीबोन स्मृतीमध्ये टागोरांच्या बालपणापासूनच्या विविध टप्प्यांना टिपणारी छायाचित्रे प्रदर्शित केली होती. ती पाहताना आढळून येते की अगदी लहानपणापासून टागोरांची मुद्रा ही ध्यानमग्न होती. त्यांच्या डोळ्यांतून काहीतरी गुढ शोध सुरू असल्याचे अभिव्यक्त होते. गुरुदेवांचा जन्म झाला तो जोरासांकोच्या भव्य वाड्यात. तिथेच त्यांचे बरेचसे शैशवत्व गेले. भारतीय रेल्वेचे एक शिल्पकार (प्रदर्शनातील माहितीप्रमाणे) द्वारकानाथ टागोर यांचे ते नातू. मात्र त्यांनी ध्यास धरला तो शारदेच्या उपासनेचा. त्यांच्या घरातील कलात्मक वातावरणही त्याला बरेचसे जबाबदार ठरले.

जीवनाच्या विविध टप्प्यांवर त्यांना आलेले अनुभव, झालेले साक्षात्कार आणि त्यातून त्यांच्यातील प्रतिभेचे होत गेलेले पोषण हे सर्व शब्दबद्ध स्वरूपात छायाचित्रांच्या अधूनमधून मांडलेले.

रवींद्रनाथांची सुखाची, दु:खाची, सर्जनाची, साधनेची अनुभूती उत्कट होती. त्यांच्या या विविध भावनिक क्षणांचे दर्शन प्रदर्शनात घडले. त्यांच्या स्फूर्तीदेवता, त्यांच्या वहिनी कादंबरीदेवी यांनी ऐन तरुणपणी आत्महत्या केल्यानंतरचा त्यांचा हताशपणा, तरुणपणातील सूट परिधान केलेले पाश्‍चात्य प्रभावाखालील विद्यार्थी रवींद्रनाथ, पहिली मुलगी माधुरीलता, पूत्र रथींद्रनाथ यांच्यासोबतचे पिता रवींद्रनाथ, ‘डाकघर’, ‘वाल्मिकी प्रतिभा’ आदि स्वरचित नाटकांतील भूमिकांमध्ये रंगभूमीवर वावरणारे रंगकर्मी रवींद्रनाथ, शांतिनिकेतनमध्ये वर्ग घेणारे शिक्षण रवींद्रनाथ, शेत नांगरणारे शेतकरी रवींद्रनाथ, लेखनात गढलेले सर्जक रवींद्रनाथ अशा विविध रूपात त्यांना पाहता आले.

यानंतर होते ‘गीतांजली’ व ‘मुक्तधारा’ हे दोन विभाग. ‘गीतांजली’ विभाग त्यांची गीते आणि पद्यरचनांनी तर ‘मुक्तधारा’ विभाग हा कथा, कादंबर्‍या व अन्य गद्य रचनांनी सजविण्यात आला होता. ‘गीतांजली’ हा गुरुदेवांचा नोबेल पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह. त्याचे सुमारे 20 देशी-विदेशी भाषांतून अनुवाद झाले आहेत. या सर्व अनुवादित पुस्तकांची कव्हर्स इथे पाहायला मिळाली. टागोरांनी वय वर्षेे 22 ते 73 पर्यंत सुमारे 14 कादंबर्‍या लिहिल्या. त्याशिवाय शेकडो कथा व हजारो पद्यरचना. शिवाय नाटक, निबंध अशा रचनाही केल्या. त्यांची दोन गीते ‘जन गण मन’ आणि ‘आमार सोनार बांगला’ ही अनुक्रमे भारत व बांगलादेशची राष्ट्रगीते बनली.

त्याकाळात भारतातील व जगातील अनेक महनीय व्यक्तींना टागोरांनी आकर्षित केले होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, तसेच शास्त्रज्ञ आईन्टाईन, रोमियन रोलंड, हेलन केलर, जार्ज बनॉर्ड शॉ, स्पॅनिश कवयित्री व्हिक्टोरिया ओकांपो, डब्लू बी एट्स, फ्रांसचे प्राच्यविद्यातज्ज्ञ सिल्वेन लेवी आदि अनेकजण त्यांच्या सान्निध्यात आले. या सर्व सचित्र स्मृती पाहताना टागोरांचे उत्तूंग व्यक्तिमत्व लक्षात येते.

टागोरांची आणखी एक क्रिएटिव्ह बाजू म्हणजे पत्रलेखनाची हे प्रदर्शनातील पत्रांतून लक्षात येत होते. नातेवाईक, मित्रांना त्यांच्या झालेल्या पत्रव्यवहारातून सर्जनशीलता आणि चिंतनशीलता ठायी ठायी विखुरली आहे.

एकाला सल्ला देताना ते लिहितात, ‘पराजय स्वीकार करून समर्पण करणार्‍यांच्या छावणीत तू जाऊ नयेस असे वाटते. पृथ्वीवरील बहुताश दु:खे ही केवळ हसून नाहीशी करता येतात मनाला अंधकारमय बनवून ठेवतात त्यांना भाग्यलक्ष्मी भूत प्रेतासारखी भासते. खूप हसा म्हणजे ही खोटी नाटी भूते पळून जातील.’

एका पत्रात त्यांनी आपणास विंचू चावल्यासंबंधी घटना सांगितली आहे. ते लिहितात, ‘एकदा अचानक रात्री बिछान्यावर झोपलो असता विंचू चावला. बरीच पीडा होत होती. नंतर मी एक प्रयोग केला. त्या दुखण्याला शरीराबाहेरचे मानून तटस्थपणे पाहू लागलो. काय सांगू, शरीराची पीडा कमी झालीच पण मनाची पीडा तर संपल्यात जमा होती. मग मी शांत चित्ताने झोपी गेलो’

‘चित्रलेखा’ विभागात आपल्या चित्रलीपीतून टागोर संवाद साधत होते. इथे सुमारे 60 चित्रकृती लावलेल्या. त्यात स्केच, पोट्रेट्स, सेल्फ पोट्रेट्स, मास्क, लॅण्डस्केप असे विविध प्रकार आढळतात. प्रामुख्याने चेहरे आणि निसर्ग हे त्यांच्या बर्‍याच चित्रांचे विषय बनलेले दिसतात. ते म्हणतात, कशातच मन रमत नाही त्यावेळी चित्रे काढतो. चित्रकला माझा सखा आहे.

आपल्या अंतिम दिवसांना टागोर किती धैर्याने सामोरे गेले त्याचे दर्शन ‘शेष स्मृती’मध्ये मिळते. त्यांच्या निधना आदीच्या काही दिवसांच्या स्मृती त्यांच्या आप्तांनी सांगितल्या आहेत.  7 ऑगस्ट 1941 रोजी त्यांचे निधन झाले त्याआधी अवघे काही दिवस त्यांचे ऑपरेशन झाले होते. त्याची तयारी एकीकडे सुरू असतानाच कष्टप्रद समयी ते ज्योतिंद्रनाथ यांना कविया लिहायला घालत होते.

याच विभागाला जोडून असलेल्या ‘स्मरणिका’ कक्षात शांतिनिकेतनमधील हस्तकारागिरांनी बनवलेल्या विविध शोभेच्या वस्तू तसेच कपडे आदिंचे प्रदर्शन व विक्री होत होती.

....आणि हे सर्व प्रदर्शन पाहत असतानाच तुमच्या कानावर पडतात ते रवींद्र संगीताचे आर्त स्वर. अशा पद्धतीने गुरुदेवांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलुंचे दर्शन ‘संस्कृती यात्रा’ करता करता घडते. आणि भेट देणारा यात्रिक हा एक समृद्ध चित्ताने बाहेर पडतो.

गोव्याच्या मडगाव स्थानकावर येण्याआधी हे प्रदर्शन बंगाल, बिहार, झारखंड, आसाम, ओरिसा, आंध्रप्रदेश, तामीळनाडू, केरळ, गोवा या राज्यांचा प्रवास करीत आले होते. गोव्यात येण्यापर्यंत सुमारे 20 लाख लोकांनी प्रदर्शनाला भेट दिल्याची माहिती प्रदर्शनाचे व्यवस्थापन हाताळणार्‍यांकडून मिळाली. 9 मे 20110 रोजी हावडा येथून सुरू झालेली ही यात्रा वर्षभर देशात फिरणार होती. त्यानंतर प्रदर्शन बांगलादेशात रवाना होणार होते.

प्रदर्शनाच्यानिमित्ताने दिसून आले रवींद्रनाथांनी जनसामान्यांमध्ये जोडलेले आदराचे स्थान. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी काहीजण अगदी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत उभे होते. नंतर आतमध्ये शालेय मुले अंतर्मुख होऊन प्रदर्शन पाहताना दिसत होती. आपल्याकडच्या मोबाईल कॅमेर्‍यांमध्ये काही चित्रे, स्मृती, कविता टिपून घेत होती. अवती भवतीचे बंगाली बोलणारे कामगार (मुले-युवक) प्रदर्शनात फिरताना दिसत होते. कौतुकाने ते गुरुदेवांच्या रचना वाचत होते. सदैव विश्‍वमानव धर्म डोळ्यांसमोर ठेऊन मानवी मूल्ये अधिक समृद्ध करण्यासाठी अक्षरयज्ञ केलेल्या या महान तपस्वी साधकाने वेळोवेळी केलेल्या यात्रांप्रमाणष ही देखील त्यांची एक खास यात्रा होती. भारतीय रेल्वेने त्यासाठी आपले ट्रॅक उपलब्ध करून दिल्याने त्यांचेही अभिनंदन करायला हवे.
(नवप्रभा :8-10-10)



Comments