समुद्राची प्रतीक्षा

अदृश्य झालेला समुद्र आणि धोक्यात आलेले किनार्‍यावरच्या नगराचे अस्तित्व. हताशपणे सामना करीत कसेबसे जीवन कंठणारे तटावरचे लोक आणि अशा या बदलाची शक्यता अशक्य दिसणार्‍या परिस्थितीत जिद्दीने समुद्राची प्रतीक्षा करणारा, समुद्राचा शोध घेणारा आणि त्यासाठी आपली नौका तयार करण्यात व्यग्र असलेला, कधीतरी याच प्रलयाचा बळी ठरलेला नौकेचा कप्तान असे कथानक लाभलेला चित्रपट - ‘वेटिंग फॉर द सी’. हा चित्रपट इफ्फी 2013च्या स्पर्धा विभागात दाखवण्यात आला.

चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा मच्छीमारांच्या एका संपन्न गावात मासेमारीचा हंगाम सुरू करण्यापूर्वीचा दैवी विधी चालू असतो. त्यावेळी काहीजण खराब हवामानाचा अंदाज वर्तवतात. नायक मारात मात्र कशाचीही तमा न बाळगता पत्नीसह समुद्रात नौका घेऊन जातो आणि प्रलयाला बळी पडतो. काही वर्षांनी मारात गावात परततो. तोपर्यंत गावाचे वैराण वाळवंट झालेले असते. प्रलयावेळी समुद्र मागे हटलेला असतो. तो इतका मागे हटलेला आहे की तो नेमका कुठे आहे हे कुणालाच माहित नाही. आणि गावाचे परिवर्तन एका महाकाय वाळवंटात झालेले आहे.

मारातचे जहाज किनार्‍यावर सापडते.  मात्र त्यात अन्य कोणी सापडत नाही. मारात वाळवंटात एकेठिकाणी पडलेला आढळतो.

या प्रलयासमोर सर्व नगराने हात टेकलेले असताना मारात मात्र ‘समुद्र आपल्याकडे काही ठेवत नाही तो सर्व परत करतो’ असे सांगत समुद्र पुन्हा येणार आणि हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी आपण जाणार या ध्यासाने झपाटलेेला आहे. त्यासाठी किनार्‍यावर येऊन थडकलेली त्याची गंजलेली नौका तो दुरुस्त करायला लागतो. महत्प्रयासाने पूर्वी समुद्र होता त्या दिशेने नेतो. त्याला सर्व वेडात काडतात. काहीजण तर त्याला सैतान ठरवतात. पण तो ठाम असतो. फक्त त्याचा मित्र बाल्तझार आणि निधन पावलेल्या पत्नीची बहीण तमारा यांचा त्याच्यावर विश्‍वास असतो.

लोकांच्या अधिवासाची पद्धत, लोकसमजुती, रुढी, दैववादी परंपरा, गुढ विधी, लोकसंगीत यांचे मिलाफ चित्रपटाला एक आगळे वलय प्रदान करतात. शिवाय संपूर्ण चित्रपटभर, नजर जाईल तेथे केवळ वाळवंट एवढेच नेपथ्य ‘समुद्राच्या प्रतीक्षे’ची उत्कंठा बर्‍यापैकी जागी ठेवते.

चित्रपटात काही नमूद करण्यासारखी दृश्ये आहेत. हताश नगरात मारात या नायकाचे लोकांचा आनंद परत आणण्याचे कारण देऊन नाचणे. सर्वांकडून हिणवले जात असतानाही लुटारुंनी जखमी केलेल्यांना आपल्यासाठी दूर अंतरावरून कष्टाने आणलेले पाणी पाजणे, लहानपणापासून मारातविषयी आकर्षण बाळगणारी मारातची मेहुणी प्रेमाचा अनुनय करीत असताना तो नाकारून समुद्रात हरवलेल्या पत्नीच्या प्रेमाशी एकनिष्ट राहणे व तिच्या शोधासाठी ठाम राहणे, इकडे दुसरीकडे नायकाने, ‘यू रिनाऊंस मी अ‍ॅण्ड आय वील लव्ह यू’ असे सांगितल्यावर मेहुणीने दूर निघून जाणे, एक दिवस समुद्र येईल या ठाम समजुतीने भूक - तहान विसरून, सर्वांनी साथ सोडल्यावरही जिद्दीने जहाज समुद्राच्या दिशेने लोटणे, या सर्व गोष्टी सिनेमाला आध्यात्मिक वलय प्राप्त करून देणार्‍या वाटतात.

शेवटी समुद्र अवतरतो. त्यावेळी सर्वजण आपापला जीव सावरण्यात गुंतलेले असताना-सर्वत्र पळापळ सुरू असताना, नायक जहाज घेऊन समुद्रात निघून जातो आणि चित्रपट संपतो. यावेळी पडद्यावर बायबलमधील काही ओळी उमटतात -
"Then I saw a new heaven and a new earth, for the first heaven and the first earth had passed away, and there was no longer any sea.'

Comments