कोसंबी स्कूल ऑफ थॉट


हे शीर्षक खरे म्हणजे एखाद्या स्वतंत्र ग्रंथाचाच विषय आहे. पण इथे हा विषय निघण्याचे औचित्य म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या Exasperating Essays : execises in dialectical method  या पुस्तकाचा पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाने करून घेतलेला व लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेला मराठी अनुवाद ‘संतापजनक निबंध’ हे पुस्तक. 

मुळ इंग्रजी पुस्तक हे पुस्तक हे 1957 साली प्रकाशित झाले होते. यांतील लेख हे 1939 ते 1957 या काळातले आहे. पैकी बहुतेक लेखन हे जर्नल स्वरूपाच्या नियतकालिकांसाठी (त्यात पुन्हा बरेच परदेशी नियतकालिकांसाठी) केलेले लेखन आहे. हे लेखन गंभीर, अकादमिक स्वरूपाचे असणे स्वाभाविक आहे. कारण त्याचा वाचकवर्ग हा मुख्यत्वे विद्वज्जन, किंवा बुद्धीवादी वर्ग म्हटला जातो तो आहे. 

प्रस्तूत लेखकाने या पुस्तकाविषयी केलेली विधाने, काढलेले निष्कर्ष हे अनुवादाला अनुसरून आहेत. प्रस्तूत लेखकाने केवळ अनुवादच वाचला आहे व मूळ पुस्तक पाहिलेले नाही. पुस्तकाविषयी केलेल्या या लेखनाचा उद्देश्य सदर अनुवादाची समीक्षा किंवा पुस्तकाची समीक्षा किंवा त्यात वापरलेल्या विरोधविकासी पद्धतीच्या उपयोजनाचे मूल्यमापन किंवा पुस्तकाबद्दल तपशील पुरवणे नसून एक वाचक म्हणून या पुस्तकाच्या संदर्भात कोसंबींविषयी जी काही वैशिष्ट्ये जाणवली ती सांगणे हा आहे.

असे असले तरी या पुस्तकात काय आहे इथून सुरूवात करावी लागतेच. यासाठी ब्लर्बमधील एक परिच्छेद याविषयी बर्‍यापैकी आटोपशीर वाटला तो इथे उदृत करीत आहे.-
“ नेतृत्व आवश्यक असतं का ? समूह पातळीवरचे सर्व बदल अपरिहार्य सतील , तर व्यक्तीनं काहीच करायची गरज नाही का ? स्वातंत्र्योत्तर भारतातील सत्ताधारी  वर्गाचं स्वरूप कसं आहे ? चीनमधील क्रांतीचं स्वरूप कसं होतं ? विज्ञान आणि वैज्ञानिकांचं स्वातंत्र्य म्हणजे काय ?‘आतला आवाज’ नेहमी सुरक्षित मार्गदर्शन करतो का ? सॉक्रेटिसच्या वादविवाद पद्धतीचा तत्कालीन ग्रीक वर्गरचनेशी काय संबंध होता ? दयाभावानं भारलेला बौद्ध धर्म आपल्या देशातून विरून का गेला ?’ 1857च्या उठावाचं महत्त्व काय होतं ? संस्कृत साहित्य वर्गीय पूर्वग्रहापासून मुक्त आहे का ? जागतिक शांततेच्या वाटेमधील अडथळे ठरणारे घटक दूर करता येतील का ? - अशा विविध प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे.’ 

आता दामोदर कोसंबी कोण या प्रश्‍नाचे उत्तर म्हणून पुस्तकाच्या ब्लर्बमधील हा परिच्छेद पाहता येईल - ‘प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी हे आपल्या देशातील एक विख्यात विद्वान होते. प्रसिद्धीपराङ्मुख असलेल्या कोसंबींनी गणित, सांख्यिकी, भारतविद्या, इतिहास, अशा विविध ज्ञानशाखांमध्ये मूलगामी योगदान दिलं. त्याचसोबत समकालीन सामाजिक-राजकीय समस्यांवरही त्यांनी मर्मग्राही लेखन केलेलं आहे. एकंदरीत, भारतातील मार्क्सवादी विचाराच्या कक्षा रूंदावण्यामध्ये त्यांनी कळीची भूमिका बजावली.’

पुस्तकांत आलेल्या निबंधांचे वर्गीकरण करायचे तर भारताशी सबंधित व जागतिक विषयांवरील असे किंवा मग वाङ्मयीन, राजकीय व सामाजिक-आर्थिक असे करता येईल. या पुस्तकातील एक विशेष म्हणजे यात असलेले कोसंबीलिखित फिक्शन. 1857 या भारतीय इतिहासातल्या महत्त्वाच्या वर्षी घडलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवरील ‘कानपूरच्या वाटेवर’ ही लघुकथा आहे. अर्थात त्यातूनही एक वैचारिक शोध मुखर करण्याचा लेखकाचा प्रयत्न दिसतो. कोसंबी वैचारिक मांडणीसाठी फिक्शनचा कसा उपयोग करतात हे यातून पाहता येते.

जे दिसतं ते जशास तसे न स्वीकारता प्रश्‍न विचारत गोष्टींच्या मुळापर्यंत जाण्याचा कोसंबींचे धोरण या पुस्तकात दिसते.

कोसंबींना अनेक प्रश्‍न पडले आहेत. त्याची उत्तरे ते शोताना दिसतात. असे करताना मूळापर्यंत जाण्यासाठी नवे प्रश्‍न उपस्थित करत जातात. त्यांना प्रश्‍नाची उत्तरे शोधताना प्रश्‍नाची पार्श्‍वभूमी समजून घेणे महत्त्वाचे वाटते. या पार्श्‍वभूमीसाठी तथ्ये स्वीकारताना कोसंबी अत्यंत जागरूक दिसतात. केवळ उपलब्ध तथ्यांची नक्कल ते करीत नाहीत. जे एक तथ्य म्हणून सांगितले गेले ते तथ्य होते की तथ्यासारखा दिसणारा आभास असा संशय त्यांना पडतो. तेव्हा ते तथ्याच्या सत्यासत्यतेचे विश्‍लेशण करतात. तथ्याचे मूळ स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करतात व त्याचे आभासी स्वरूप  उघडे पाडतात. यामुळे परिस्थितीच्या प्रस्थापित मांडणीलाच ते धक्का देतात. हे करताना ते तटस्थ व व्रतस्थ होतात. अगदी आपल्या श्रद्धेय व्यक्तींची / बाबींची चिकित्सा करतानाही कोसंबी कमकुवत होत नाहीत. 

प्रस्थापित आकलनातील उपरोध आणि आकलनाचा पुनर्शोध या निबंधांतून दिसतो. असे करताना अगदी प्रस्थापित आणि प्रवाहाशी (वैचारिक) दोन हात करताना कोसंबी मागे हटत नाहीत. कोसंबी हे तत्वांशी व मूल्यांशी बांधील निष्ठावंत आहेत.

नियतकालिकांतून प्रकाशित झालेलेे हे निबंध पुस्तकात समाविष्ट करतेवेळी जिथे जिथे माहिती वाढवली आहे किंवा प्रकरणांच्या शेवटी ‘पुरक भर’ दिली आहे तिथे तिथे तसे स्पष्ट करण्यात आले आहे. यातून कोसंबींच्या लेखनाबद्दलची पारदर्शकता व प्रामाणिकपणा दिसून येतो.

कोसंबींचा विविध ज्ञानशाखांचा चौफेर व अफाट व्यासंग हे निबंध वाचताना लक्षात येतो. एखाया विषयाची मांडणी बारकाव्यांसह कोसंबी अधिकारवाणीने आाणि तितक्याच सहजपणे करतात. ही अधिकारवाणी व सहजपणा हा व्यासंगातून आलेला आहे. एखाद्या विषयाच्या किती पारंब्या असू शकतात, आणि त्यासाठी किती तयारी करावी लागते याबाबतही हे निबंध प्रेरक दिसले.   
 
कोसंबी एक अभ्यासक म्हणून हे निबंध लिहितात. अर्थात त्यांचा शोध घेण्याचा दृष्टीकोन हा मार्क्सवादी विचारसरणीचा आहे. त्यांनी या निबंधांत निष्कर्ष काढण्यासाठी निकष म्हणून विरोधविकासी भौतिकतावाद ही पद्धती वापरलेली पद्धती आहे. ‘यामागचा सिद्धांत पहिल्यांदा विकसित करून एक साधन म्हणून त्याचा पद्धतशीर वापर करणार्‍या प्रतिभावंताच्या नावावरून या पद्धतीला ‘मार्क्सवाद’ असं संबोधलं जातं’ ही कोसंबी यांनी दिलेली माहिती आहे..

हेही नमूद केले पाहिजे की, कोसंबींच्या काही धारणा आहेत. काही गोष्टी या विचार म्हणून, परिस्थिती म्हणून श्रेष्ठ आहेत किंवा नाहीत याबद्दल त्यांचा स्वत:चा तर्क आहे. त्यांची अनेक गृहितके ही या धारणा व तर्कातून निर्माण झालेली आहेत. हे अनेक ठिकाणी जाणवेल. पण असे असले तरी कोसंबींच्या विद्वानपणाबद्दल व अभ्यासक म्हणून वैशिष्ठ्यांना त्यातून बाधा होत नाही.

चिकित्सा करताना कोसंबी हे पूर्णपणे तटस्थ राहून निरपेक्षपण तथ्यांचे आकलन प्रस्तूत करतात, त्याचे विच्छेदन व विश्लेषण  करतात आणि निष्कर्षावर पोचतात. नेहरू-गांधींविषयी ते श्रद्धा व्यक्त करतात मात्र त्यांची चिकित्साही ते तितक्याच थेटपणे करतात. मार्क्सवाद व संबंधित घडामोडींवर भाष्य करताना ते अभ्यासक होतात. तिथे त्यांचा त्या मतांबद्दलचा अनुकूलपणा ते कुठेही आड येऊ देत नाहीत.

40 व 50 चे दशक हे भारताच्या दृष्टीने महत्वाचा काळ ठरतो. भारतीय स्वातंत्र्याचे शेवटचे पर्व व सुरूवातीची जडणघडण या काळात होत होती. कोसंबींची चिकित्सा ही या काळात करत होते. परिस्थितीचे आकलन पूर्णपणे भिन्नपणे करत होते. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमतां’ या संत तुकारामांच्या विधानाप्रमाणे निडरपणे ते आपले निष्कर्ष मांडतात यामुळे ते श्रेष्ठ विचारवंत वाटतात.

घटना जशा घडताना दिसतात किंवा त्याच्यासमोर त्या जशा घडतात. त्या मुळात तशा नैसर्गिकपणे घडतात का ? की त्या तशा घडवल्या जातात व किंवा तशा घडताहेत हे भासवले जाते. हे भासवण्यामागे काही लागेबांधे असतात का ? हे लागेबांधे का असतात. त्यातून कुणाचा लाभ होत असतो. दृक स्वरूपात दिसणार्‍या परिस्थितीचे काही अधोविश्‍व ‘अंडरवर्ल्ड’ असते का ? अशी उकल कोसंबीच्या विविध निबंधांतून झालेली दिसते. सत्ताधारी, संपत्तीधारी व अन्य यांच्यातील वर्गीय संबंधांच्या विस्कटावणीतून निबंधांतील मंथनाची घुसळण होताना दिसते. ‘लोकआंदोलनातील नेतृत्वाचं कार्य’, ‘भारतातील वर्गरचनेविषयी’, ‘विज्ञान आणि स्वातंत्र्य’, ‘साम्राज्यवाद आणि शांतता’, ‘भारतात बौद्ध धर्माचा र्‍हास’ असे निबंध यादृष्टीने पाहता येतील.

विविध विषयांवर विचारमंथन करताना कोसंबी साहित्यावर विचार व्यक्त करतात. यादृष्टीने नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकाची उलटतपासणी करणारे त्यांचे परीक्षण, भर्तृहरीवरीच्या मर्यादांची चर्चा करणारा त्यांचा निबंध पाहता येईल. सॉक्रेटिसवरचा लेखही वाङ्मयीनपणाशी जवळीक असलेला वाटतो, त्यातून सॉक्रेटीसची परिस्थिीतीसापेक्ष व्यक्तीचित्रण उभे राहिलेले आहे. त्यांची लघुकथा सुद्धा एक ‘वाङ्मयीन विधान’ वाटते.

प्रस्थापितांना व प्रस्थापितांचा मूक संमतीने अनुनय करणार्‍यांना हे निबंध बर्‍यापैकी संताप आणणारेच आहेत. पण त्याचबरोबर आभासी दर्शविल्या गेलेल्या गोष्टींचा कोसंबीना असलेला संतापही या निबंधांतून कधी उघडपणे तर कधी शांतपणे व्यक्त होताना दिसतो. त्यादृष्टीनेही हे संतापजनक निबंध ठरावेत. शिवाय पुस्तकात एक टीप आलेली आहे. अर्थात ती अनुवादक/प्रकाशक यांची आहे की मूळ पुस्तकातली आहे कळत नाही. ती अशी :

‘शीर्षकाविषयी’
हे संतापजनक निबंध आहेत, म्हणजे ते वाचकाला त्या संतापात सहभागी करून घेणारेही निबंध मानता येतील. दुराग्रही नसलेला संताप असू शकतोच. शिवाय, संताप विध्वंसकच असतो असं नाही, किंबहुना संताप सर्जनशीलतेलादेखील खतपाणी घालू शकतो.

हे निबंध वाचल्यानंतर प्रस्थापित केल्या गेलेल्या साचेबद्धपणामुळे वाचक कदाचित सुरूवातीला संतापेल पण सम्यकपणे विचार केल्यावर अनेक गोष्टींकडे नव्याने व निराळ्या दृष्टीने पाहण्यास नक्कीच प्रेरीत होईल. हे या निबंदांचे फलित ठरते. निदान आकलनाची वेगळी दिशा असते याचा साक्षात्कार तरी हे निबंध नक्कीच घडवतील. विचारप्रक्रियांना चालना देणारे हे निबंध दिसतात. कोणत्याची लेखनाचे असेच फलित हवे. वाचणार्‍याला त्या लेखनाने ‘ग्रो’ करायला हवे. नुसते लाटेवर स्वार होऊन केलेली विधाने प्रसिदी देणारी असू शकतात पण त्यातून काहीच श्रेष्ठ साध्य होत नसते. कोसंबी परिस्थिती व तत्थांकडे अधिक चिकित्सकपणे, डोळकसणे, प्रश्‍न उपस्थित करून पाहण्याची, परिस्थितीची उलटतपाणी करत सत्य शोधण्याची प्रेरणा या निबंदांतून देतात.

दामोदर धर्मानंद कोसंबी
(फोटो : इंटरनेटवरून





पुस्तक : संतापजनक निबंध
- दामोदर धर्मानंद कोसंबी
भाषांतर - अवधूत डोंगरे
प्रकाशक : लोकवाङ्मयगृह प्रकाशन, मुंबई
पहिली आवृत्ती : 29 जून 2021
पाने  :128, किं. रू. 200/-

Comments