एका मिशनरी अवलियाच्या एक्झिटची वर्षपूर्ती

दादू मान्द्रेकर याची या जगात फिजिकल उपस्थिती नसेल या विचाराने मन सून्न झाले होते. आज (२६ नोव्हेंबर २०२१ रोजी) त्याच्या जाण्याला वर्ष पूर्ण होत आहे.


आपल्या मृत्यूची जाणीव झाल्यानंतर त्याच्या तयारीसंबंधी स्वत:च पुढाकार घेणार्‍या भगवान बुद्धांचा दादू एक सच्चा अनुयायी. मृत्यूचे दु:ख आणि शोक करणे त्याच्या मृत्यूसाठी शोभणारे नाही. स्वत: त्यालाही ते आवडले नसते. पण मात्र त्याच्या व्यवस्थित निरोप न घेताच या मृत्यूच्या ब्लॅक होलमध्ये अदृश्य होण्याबद्दल थोडासा राग जरूरच व्यक्त करता येईल. त्यातून निर्माण होणारा विषादही बराच काळ पाठ सोडणार नाही.

दादू आणि माझी व्यवस्थित ओळख झाली ती मी पणजीतील पत्रकारितेत प्रवेश करून वावरू लागल्यानंतर. तेव्हा दादू आपली शासकीय सेवा निवृत्तीपूर्वीच सोडून काहीसे फ्रीलांसिंंग करत होता. तो पणजीत ठळकपणे नजरेत भरायचा तो शहरातून सायकलवरून फिरण्यामुळे आणि मोठ्या आवाजात रोखठोक विधानांमुळे. 
दादूच्या व्यक्तिमत्त्वाचा यथोचित परिचय देणारा एक फोटो इंटरनेटवरून

दुसर्‍याशी आपणहून ओळख वाढविण्याचा त्याचा स्वभाव होता. ओळख स्थापित करून नंतर बुद्ध, भारतीय संविधान आणि बाबासाहेब यांच्याबद्दल माहिती देणे, चर्चा करणे प्रसंगी वादविवाद करणे असे ‘मिशनरी’ व्रत त्याने आपणहून आपणास बहाल करून घेतले होते. गेली अनेक वर्षे तिबेटी लामा आणि बौद्ध भिक्खू घेऊन फिरतात तशा प्रकारची झोळी घेऊन तो फिरायचा. या त्याच्या झोळीतून प्रत्येक भेटीवेळी नवनवीन गोष्टी बाहेर पडत. कधी विज्ञान, पर्यावरण, बुद्ध, संविधान, बाबासाहेब यांच्याबद्दलच्या लेखाची झेरॉक्स, पुस्तक किंवा त्याच्या स्वत:च्या लेखांचा ड्राफ्ट. अनेकदा प्रेरक असे लेख शोधून त्याच्या झेरॉक्स स्वत:च्या खर्चात तो अनेकांना वाटत फिरायचा. काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात बिल गेट्स व त्याच्या पत्नी मेलिंदा गेट्स इतके श्रीमंत असूनही कशा प्रकारे साधे जीवन जगतात व त्या जगभरातील सेवाकार्यांकरिता कसे वाहून घेतले आहे अशा आशयाचा  दीर्घ लेख आला होता. दादूने त्याच्या प्रती करून वाटल्या होत्या.


दादूने ‘मास्तर’ नावाची दीर्घ कविता लिहिली. त्याच्या पोस्टरचे प्रकाशन महाराष्ट्रातील एका प्रकाशन संस्थेने केले व कार्यक्रम कला अकादमीत झाला. ती कविता वाचणार्‍याच्या लक्षात येईल की अशी कविता एक सच्चा विद्यार्थीच लिहू शकतो. दादूला त्याला शिकवणार्‍या मास्तरांचा अभिमान होता. पण ‘अ‍ॅकेडमिक्स्’ म्हणून गणले जाते त्या चौकटबद्ध शिक्षणापेक्षा त्याचा अभ्यासपट मोठा होता. आपले सिलेबस आपण ठरवून त्यात पारंगत होण्यासा ध्यास घेतलेला तो सेल्फ मेड विद्यार्थी होता. संविधान, साहित्य, इतिहास, तत्वज्ञान भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वनस्पतीशास्त्र, फोटोग्राफी असा अफाट त्याचा सिलेबस त्याने ठरवून टाकला होता. 

तो एका विमा कंपनीत एजंट म्हणून गेली काही वर्षे काम करायचा. मात्र हल्ली लॉकडाऊननंतर त्याचे पणजीत येणे कमी झाले होते. या मिळालेल्या वेळेचा उपयोग तो नवनवीन गोष्टींच्या अभ्यासासाठी वापरत होता. ‘मी एका मोठ्या विद्यापीठात प्रवेश घेतला आहे.’ असे तो सांगायचा. इंटरनेट व यूट्यूबच्या माध्यमातून नवनवीन अभ्यासविषयांचा तो माग काढत होता. नेहमी विद्यार्थी राहण्याचा त्याचा गुण लक्षणीय होता.

तो प्रतिभावंत होता. त्याची ललित गद्याची भाषा अप्रतिम होती. पण सुरूवातीचा कवितासंग्रह व हल्ली प्रकाशित कवितासंग्रह सोडले तरी त्याची बहुतेक पुस्तके ही वैचारिक स्वरूपाचीच दिसतात. आपल्याकडे कविता व कथात्म साहित्य लिहिणार्‍यांना साहित्यिक वा प्रतिभावंत म्हणून तात्काळ मान्यता मिळते तशी वैचारिक गद्य लिहिणार्‍यांना किंबहुना ललितेतर गद्य लिहिणार्‍यांना अभावानेच मिळालेली दिसते. आपण बौद्ध काळाच्या पार्श्‍वभूमीवर एक कादंबरी लिहायला घेतल्याचे अलिकडे दादू सांगायचा. त्याची काही पाने त्याने लिहिल्याचे तो म्हणायचा. लवकरच ती पूर्ण करणार असेही म्हणायचा. या कादंबरीची काही पाने मागे त्याने दाखवली होती. कुठल्याही प्रतिभावंत लेखकापेक्षा ती भाषा, शैली, मांडणी यात कमी म्हणता येणारी नव्हती. आता ती कादंबरीही ब्लॅक होलमध्ये विलीन झाली आहे कदाचित. केवळ कादंबरीच नव्हे. अफाट फोटोग्राफी तसेच अनेक व्हिडिओ क्लिप्स त्याच्या संग्रहात होत्या. हल्ली त्याने त्यांचा ऑनलाईन संग्रह करण्याची तयारी चालवली होती. 

बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशेपन्नासाव्या जयंती वर्षीे त्याने वर्षभर बाबासाहेबांवर लेखमाला चालवली. इतका दीर्घकाळ कोणत्याच मराठी वृत्तपत्रांतून बाबासाहेबांवर लेखमाला चाललेली नाही असा त्याचा दावा होता. त्या वर्षी तो एखाद्या नशेतच होता. कितीतरी शेकडो बाबासाहेबांवरची पुस्तक त्याने त्यावर्षी वाचली. बाबासाहेबांवरची नवनवीन माहिती मिळेल त्याला त्यावर्षी तो सांगताना दिसायचा. ज्ञानाचा ध्यास घेतलेल्या बाबासाहेबांचे वर्षभर अध्ययन करून त्यांचे एकशेपन्नासावे जयंती वर्ष साजरे करणारा दादू एक विरळा अनुयायी असावा. पुढे या लेखमालेतून ‘बाबासाहेब आंबेडकर : आंतरराष्ट्रीय महत्त्व व महात्म्य’ हे पुस्तक निर्माण झाले. हे पुस्तक म्हणजे एका गोमंतकीयाने बाबासाहेबांचे बांधलेले एक अक्षरस्मारक म्हणता येईल. डॉ. आंबेडकर हे केवळ भारतीय दलितांचे नेते नव्हते तर एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नेते होते अशी प्रतिमा प्रस्थापित करणारी दादूची दृष्टी या पुस्तकातून दिसते.

दादू आणि माझ्यात बुद्ध हा कॉमन फॅक्टर होता. बुद्ध हा माझ्या आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय. माझी एक सवय आहे. एखादा विषय मला भावला तर त्याच्या जास्तीत जास्त पैलूंचा अभ्यास करावा असे मी करतो. बुद्धांवर पुस्तके वाचल्यानंतर वाटले की बौद्ध स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत. या यात्रेबद्दल दादूशी निगडीत एक आठवण आहे. त्यावेळी मी पणजीत एका वृत्तपत्रात काम करीत होतो व दादू दुसर्‍या एका वृत्तपत्रात जाहिरात अनुवादाचे काम करत होता. तो रात्रीचे काम करून तिथेच राहायचा व दुसर्‍या दिवशी घरी जायचा. मी त्या दिवशी सकाळी कामावर जाणार होतो. मला बौद्ध यात्रेच्या रेल्वे तिकिट्स आरक्षिण करायच्या होत्या. म्हणून मी आदल्या रात्री पैसे काढून ठेवले मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी ते न्यायला विसरलो. हे माझ्या लक्षात आले दुसर्‍या दिवशी पणजीत पोहोचल्यानंतर. तर जवळच दादूचे दर्शन. मी सकाळी का आलो वगैरे विचारल्यानंतर त्याल हकीगत समजली तेव्हा लगेच नजीकच्या एटीएममधून त्याने पैसे काढून दिले. मी आरक्षण केले. दुसर्‍या दिवशी दादूचे पैसेही दिले. मात्र त्या यात्रेचे आरक्षण दादूच्या पैशांतून व्हावे असा काही ‘बुद्धयोग’ असावा.

दादू हा अभ्यासू होता तसाच कलंदर होता. कॅमेर्‍यातून भवताल टिपावा असे त्याला वाटले तेव्हा त्यासाठी खास डीएसएलआर कॅमेरा त्याने विकत घेतला व तो जिकडे तिकडे फोटोग्राफी करत फिरू लागला. त्यातून स्वानंदासाठी फोटोंची एक ‘गाथा’ त्याने निर्माण केली. त्याची दोन प्रदर्शने भरवली. पैकी एक महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणार्‍या पुण्यात. शिवाय फोटोंचे स्वत:च्या फोटोंवर रसग्रहणात्मक सदरही त्याने जवळजवळ वर्षभर लिहिले. हे एक अनोखे असे सदर होते. मराठी साहित्यात अशाप्रकारचे लेखक विरळ असावे. 

दादूचे स्वत:चे आडाखे होते. धारणा होत्या. आपल्या व्यासंगातून त्याने त्या घडवल्या होत्या. कधी कधी आडाखे व धारणांबद्दल तो काहीशा ‘अ‍ॅरोगन्सने’ बोलायचा. ‘इंटेलेक्चुअल अ‍ॅरोगन्स’ म्हणूयात हवे तर याला. त्याचा हा अ‍ॅरोगन्स किंवा प्रसंगी मित्रांशीही अगदी भर रस्त्यात एखाद्या मुद्द्यावर भांडणाच्या सुरात वादविवाद करतानाचा त्याचा संताप हे सात्त्विक होते. त्यामागे निरपेक्ष भावना असायची. त्याचा स्वभाव सवयीचा झालेल्यांंनाच याचा अनुभव असेल.

त्याची विधाने त्याचे प्रश्‍न हे सभ्य म्हणून वावरण्याची किंवा प्रस्थापित व्यवस्थेेत समरस होण्यासाठी कसरत करणार्‍यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता असलेली होती. ‘असूर हे या देशातले आदीमानव होते. त्यांच्या वधांना साजरे करणे हे मुर्खपणाचे आहे.’, ‘सावित्रीबाईंच्या नावाने देशात महिला दिन साजरा का होत नाही ?’ ‘तुम्हाला गांधी नेहरू चालतात मग आंबेडकर का नाही ?’ बाबरी मशिदीचा विद्ध्वंस हा आंबेडकर पुण्यतिथीच्या दिवशी ठरवून झाला ही त्याची अशीच एक धारणा होती. कधी कधी तो आपल्या धारणांबद्दल ‘फॅनेटिकली’ बोलायचा. त्याचे जे श्रद्धेय आहेत त्याशिवाय बाकी सगळे कमी महत्त्वाचे आहे असे त्यातून ध्वनित व्हायचे. गांधींबद्दल त्याचा रोख असाच असायचा. पुणे करार गांधींचे आंबेडकरांना ब्लॅकमेलिंग होते असे त्याचे मत होते. दुसरे म्हणजे तो आपली प्रत्येक गोष्ट ‘लाऊड’ली करायचा व बहुतेक वेळी आर्ग्युमेंटिव्ह मूडमध्ये असायचा. पण त्यामागेही त्याची भूमिका ही ‘तूम्ही मला इतकी हजार वर्षे ऐकवलेत आता मी तुम्हाला ऐकवतो’ अशी काहीशी असायची. पण कधी कधी तो खूपच धडपड करायचा व गरजेपेक्षा जास्त शक्ती खर्च करायचा असे वाटायचे.. मला वाटते विचारवंत व चिकित्सक ‘मानसा’ला आवेश व लाउडनेस हे शोभत नाहीत. आपले काम हे शांतपणे करता येणेही शक्य असते. 

असे असले तरी त्याच्यातील लोभसपणा म्हणजे त्याच्यातले चैतन्य. निराश झालेला, हार पत्करलेला, गलितगात्र, दु:खी होऊन फिरणारा असा दादू कुठे पाहिल्याचे आठवत नाही. ही किमया त्याने बौद्ध मूल्यांच्या परिशिलनातून साधली होती असे नक्कीच म्हणता येईल. 

तत्त्वांसाठी जगणार्‍यांना तडजोडी अडचणीच्या होतात व ज्ञानाची कास धरणारे कलंदर हे भौतिक रस्त्यांपासून वंचित राहतात, दादूचे काहीचे तसेच झाल्याचे वाटायचे.

दादू संधी मिळेल तेव्हा व मिळेल तिथे नेहमी बेंबीच्या देठापासून ओरडून भारतीय संविधानातील मूल्याबद्दल प्रचार करीत फिरायचा. त्याची या जगातील फिजिकल एक्झिट भारतीय संविधान दिनासारख्या अत्यंत ‘सेक्युलर’ मुहुर्तावर झाली ही सुद्धा नोंद करण्यासारखी घटना.
दादूचे या ब्लॅागरला पत्र


(आणखी माहितीसाठी या ब्लॅागरचा www.dadumandrekar.blogspot.com हा ब्लॅाग पाहावा)

Comments