पत्रकार, कवि, लेखक अशोक नाईक तुयेंकर शुक्रवार दि. 21 जानेवारी 2022 रोजी निधन पावले. आपण धारण केलेल्या ‘पुष्पाग्रज’ या
नावानेच ते साहित्यक्षेत्रात अधिक परिचित होते. पुष्पाग्रज हे गोमंतकीय कवितेचे एक
खणखणीत नाणे असल्याचे नरेंद्र बोडके यांनी मुक्तिनंतरच्या गोमंतकीय मराठी कवितेचा
आढावा घेताना लिहिले आहे.
एकदा मी एका हॉटेलात बसलो होतो. तिथे पुष्पाग्रज जेवण घेत
होते. सभोवतालचा माहौल विसरून आपल्याच तंद्रीत ते जेवत होते. अगदी सावकाशपणे जेवण
घेण्याची त्यांची शैली लक्ष वेधून घेत होती. माझ्यासोबतची व्यक्ती म्हणाली. हा
कोणीतरी लेखक असावा. मी त्यावेळी पुष्पाग्रज यांना फक्त नावाने ओळखत होतो.
अलिकडे
म्हणजे 2018 साली माझे पुस्तक ‘बुद्धायन आणि इतर प्रवास’ प्रकाशित झाले. त्याचे
कौतुक वगैरे झाले. यापासून थोडे कट-ऑफ होण्यासाठी काहीतरी वेगळे करावे असेे मनात
आले. निवडक गोमंतकीय लेखकांवर ब्लॉग बनवावेत असे त्यावेळी मी ठरवले. असे लेखक जे
महत्त्वाचे आहेत पण त्यांची फारशी चर्चा होताना दिसत नाहीत. शिवाय त्यांचे संदर्भ
विशेषत: ऑनलाइन सहज उपलब्ध होत नाहीत अशांवर हे ब्लॉग होते. हा पूर्णपणे स्वान्त
सुखाय असा उपक्रम होता. पुष्पाग्रज यांच्यावरही मी एक ब्लॉग बनवला. त्यानिमित्त
त्यांच्याशी संपर्क आला.
पुष्पाग्रज यांच्याशी माझा थेट संपर्क तो इतकाच.
पुष्पाग्रज
यांचे कवितेवर विशेष प्रेम होते. हे प्रेम प्रामाणिक व तत्वनिष्ठही दिसते.
त्यांनी आपल्या पहिल्या कवितासंग्रहाच्या (कॅलिडोस्कोप) दुसर्या आवृत्तीत आपल्या
कवितेच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. त्यांच्या विधानांतून त्यांची कवितेकडे
पाहण्याची दृष्टी व कवितेशी असलेल्या संबंधांबद्दलची पारदर्शकता दिसते. ते म्हणतात
- ‘कॅलिडोस्कोप’ हा माझा पहिला कवितासंग्रह 1986 साली प्रकाशित झाला. वास्तविक त्या
आधी दहा वर्षे मी लिहायला लागलो होतो. पण ते अभिजात लेखन नव्हे याची मला कल्पना
होती. मराठीतील समकालीन कवितेची मला तोवर जाणही नव्हती. त्यामुळे तो सगळा
कवितेआधीचा रियाज होता असेच मी म्हणेन.’ ‘कॅलिडोस्कोप’साठी कवितानिवडीबद्दल ते
म्हणतात, ‘पूर्वीच्या दीड-दोनशें कविता मी बाजुला ठेवल्या. तात्यासाहेबांना (म्हणजे
कुसुमाग्रजांना) आवडलेल्या, परंतु माझ्या नव्या जाणिवांत न बसणार्या कवितांचा मी
स्वीकार केला नाही.’
1960 नंतर विशेषत: अस्तित्ववादी वृत्तीने ‘स्व’चे आणि
सभोवतालचे ऑडीट करणारी पिढी समोर आली. आयुष्याला भिडत, अनुभव घेत या अनुभवाचे अर्थ
लावण्याचा प्रयत्न या कविंनी केला. स्वप्नसृष्टीत रमण्यापेक्षा भीषण वास्तव त्यांनी
पेलण्याचा प्रयत्न केला. पुष्पाग्रजांची कविता त्या पिढीशी नाते सांगणारी दिसते.
जीवनातील अनुभवांना कवितेचा ‘कॅलिडोस्कोप’ त्यांनी लावला. त्यांच्या पहिल्या
कवितासंग्रहातली पहिली कविता त्यांच्या काव्यविश्वाची प्रस्तावना ठरावी. ‘होडी
बुडते आहे’ अशी ही कविता आहे -
होडी बुडते आहे हे कळल्यानंतरचा हा प्रवास
: किती काळ म्हणून झेंडे लावायचे असे
आपल्या बेहद्द आनंदाचे ?
याच कवितेत पुढच्या दोन ओळी अशा आहेत -
मी बंदिस्त आहे
तुझ्या जहांबाज व्यूहरचनेत.
आणि या कवितेचाा शेवट होतो तो असा -
आता गूढ तळाशी हरवल्यागत हिंडणारी
नीरवता फक्त माझी आहे...
पाण्यावर दिसताहेत
ते
दोन्ही हात मात्र माझे नाहीत...
‘कॅलिडोस्कोप’ ते ‘शांती अवेदना’ हा त्यांचा कवितेचा प्रवास अस्तित्ववादी अंगाने
असला तरी संवेदनशील व करूणामय होत गेलेला दिसतो. त्यांच्या दुसर्या कविताशीर्षकाचे
नाव ‘नन्रूख’ असे आहे. बोलीभाषेतील या शब्दाचा अर्थ लहान झाड असा कविने दिला आहे.
हे झाड आकाराने लहान असले तरी त्याला स्वत:चे अस्तित्व आहे आणि ते महत्त्वाचे आहे.
त्यांच्या अलिकडच्या कवितासंग्रहाचे नाव ‘शांती अवेदना’ असे त्यांनी दिले. हे नाव
एका मिशनरी संस्थेचे आहे. जिथे नाकारलेल्या-अव्हेरलेल्या रूग्णांची निरपेक्षपणे
सेवा होते. कवि पुष्पाग्रज या संस्थेची ओळख ‘सुसह्य मृत्यूचं आवतण देणारं एक अनोखं
मंदिर’ अशी करून देतात. एकूण जीवनाचेच रूपक म्हणून ते ‘शांती अवेदने’कडे पाहतात की
काय असे दिसते. या संग्रहातील पहिल्या कवितेचे नावही ‘शांती अवेदना’ असे आहे. कवि
त्यात प्रार्थना करताना दिसतो -
एका पूर्वकथित अंताची कहाणी स्वत:लाच सुनावत
बसलेल्या या माणसांच्या वेदनेला
हे
ईश्वरा
शांती अवेदनेचे दान दे !
पुष्पाग्रज यांचे आज मागे राहिलेले पुस्तक रूपात प्रकाशित साहित्य पाहिले तर ते
मोजकेच आहे. पण असे असले तरी ते बहुआयामी आणि दर्जेदार आहे. त्यांच्या नावावर एकूण
नऊ पुस्तके दिसतात. त्यांचे तीन कवितासंग्रह - ‘कॅलिडोस्कोप’, ‘नन्रूख’, ‘शांती
अवेदना’ - प्रकाशित झाले आहेत. ते महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा लोकवाङ्मय व
ग्रंथाली सारख्या संस्थांनी प्रकाशित केले. त्याला नारायण सुर्वे, प्रज्ञा दया पवार
यांसारख्यांच्या प्रस्तावना लाभल्या. पैकी दोन संग्रहांच्या अलीकडे दुसर्या
आवृत्याही प्रकाशित झाल्या.
कवितेशिवाय कादंबरीका (मन:पूत), विनोदी लेखन (हंसोळी,
झंप्याची झंपेगिरी), प्रवासवर्णन (लंडन ते रोम व्हाया पॅरीस), निबंध-लेख संग्रह
(किती लक्ष वाटांतूनही हिंडताना), अ गट नाट्यस्पर्धेतील पुरस्कारप्राप्त नाटक
(सूर्यकोटी सम:प्रभ) अशी त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली दिसतात. अन्य
महत्त्वाच्या पुरस्कारांबरोबरच, सिंगापूर येथे झालेल्या मराठी विश्व साहित्य
संमेलनात निमंत्रित म्हणून त्यांचा सहभाग होता. गेल्या डिसेंबर महिन्यात पेडणे येथे
झालेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात या पेडण्याच्या सुपुत्राची सुवर्णपदकासाठी
निवड झाली होती, हे आणखी दोन महत्त्वाचे पुरक संदर्भ.
पुष्पाग्रज यांची आणखी एक
प्रवृत्ती दिसते ती म्हणजे जीवनाचा समरसून अनुभव घेण्याची. प्रवासाबद्दलही त्यांना
आकर्षण असल्याचे दिसते. साहित्य अकादमीतर्फे लाभलेल्या प्रवास अनुदानांतर्गत
त्यांनी ओरीसाचा दौरा केला. इशान्य भारत वगळता काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास
केल्याचे त्यांनी एकाठिकाणी नमुद केले आहे. निवृत्तीनंतर एक ब्रेनस्ट्रोक येऊन
गेल्यानंतर व मधुमेहाचा त्रास असतानाही त्यांनी युरोप टूरचा बेत आखला. या
प्रवासावरचे त्यांचे ‘लंडन ते रोम व्हाया पॅरीस’ हे पुस्तकही आले.
अगदी अलिकडे 2018
साली त्यांचे ‘किती लक्ष वाटांतूनी हिंडताना’ हे निबंध-लेख संग्रहाचे पुस्तक
प्रकाशित झाले आहे. हे शीर्षक म्हणजे त्यांच्या एका कवितेची पहिली ओळ आहे. त्या
कवितेचे पहिले कडवे असे आहे -
किती लक्ष वाटांतुनी हिंडताना
कसा गुंतलो ना वाटांतुनी
कधी आडवाटांतुनी पाय गेले
तरीही
दिशा नादली पैंजणी
त्यांचे लालित्यपूर्ण गद्यलेखन या पुस्तकात पाहता येते. स्वत:च्या जीवनविषयक
आठवणींनाही निस्पृह, निरागसपणे व पारदर्शकपणे त्यांनी यांत उजाळा दिलेला आहे.
त्यातून त्यांच्याविषयीचे अनेक संदर्भ समोर येतात. त्यांच्या साहित्याचा अभ्यास
करणार्यांना ते पुरक ठरावेत. ‘मवाल्यांच्या गराड्यात’ व ‘मुंबईतला थरार’ सारख्या
लेखांतून अगदी अधोविश्वाशी आलेल्या त्यांच्या संबंधांबद्दलही खुलेआमपणे त्यांनी
लिहिले आहे. ‘किती लक्ष वाटातुनी हिंडताना’ या त्यांच्या कवितेचे शेवटचे कडवे या
नोंदीचा शेवट करताना उदृत करावेसे वाटते. ते म्हणतात -
प्रवासास ऐसा निघालो जिथुनी
त्या वाटा पुन्हा आज खुणावती
मला माऊलीचे पडे स्वप्न
देहीं तिच्या गर्भगारात माझी मठी.
पण असे असले तरी त्यांच्या ‘उणीव’ कवितेचा आधार घेत म्हणावेसे वाटते -
आयुष्य म्हणजे केवळ वसंतोत्सव नव्हेे
हे ठावूक आहे मला
तरीही ह्या अवेळीच्या
पानगळीला
मी शीशीर कसे म्हणू !
पुष्पाग्रज यांच्यावरच्या ब्लॉगची लिंक - www.pushpagraj.blogspot.com
Comments
Post a Comment