काही कविता साचेबद्ध कवितावाचनाला आव्हान देणार्या असतात. त्या वाचताना आधीच्या कवितेच्या वाचनाला अन-लर्न करावे लागते. त्या नॉन-लिनियर पद्धतीने वाचाव्या लागतात. त्यांच्यात स्वाद आहे हे कळते पण तरीही त्यांचा आस्वाद घेताना बराच तकालस घ्यावा लागतो. दीपक गोविंद प्रभू देसाई यांचा ‘खग्रास’ हा कवितासंग्रह वाचताना काहीसे असे जाणवले. सध्या वाचनात येणार्या गोमंतकीय मराठी कवितेत नजरेत भरणारा वेगळा बाज या कवितेचा दिसतो. त्यामळे कविता फ्रेश वाटते. हा लेखकाचा हा दुसरा कवितासंग्रह आहे. यंदाच्या मार्च महिन्यात तो प्रसिद्ध झाला आहे. अगदी मुखपृष्ठापासून बोलणारा असा हा काव्यसंग्रह आहे. कविचा पहिला काव्यसंग्रह 1993 साली प्रकाशित झाला होता, असे ब्लर्ब म्हणतो. म्हणजे तब्बल 28 पावसाळ्यांनंतर नवा कवितासंग्रह येतो आहे.
एकूण ५७ कविता या संग्रहात आहेत. कवितासंग्रहाचे शीर्षक ‘खग्रास’ आहे. याला एक खगोलशास्त्रीय अर्थ आहेच. त्याचबरोबर एक अर्थ ‘ब्लँकेट ब्लॅकआऊट’ असाही होऊ शकतो. या ब्लॅकआऊटमध्ये कवि जगण्याच्या विविध आयामांची चाचपणी करतो आहे. जाणीव आणि भाषा यांच्या सोबतीने कवि त्याला भेडसावणार्या प्रश्नांची लेणी कवितेतून खोदतो आहे. या खोदकामातून एक चक्रावून टाकणारा चक्रव्यूहच तयार झालेला दिसतो. या चक्रव्यूहातच सगळे अनुुभव घेऊन पार व्हायचे आहे. अनुभव घेणे हीच यातून सुटका असावी. स्व व स्व भोवतीचे जगणे हे या कवितेचे एकक आहे. असे असले तरी एकूण जगण्यावर भाश्य करणारी ही कविता आाहे. अस्तित्ववादी पर्यावरणातली ही कविता दिसते. शाब्दीक व भाषिक चकव्यांतून, शब्दांच्या कोट्या करून कवि जगण्यातल्या अनुुभवांeतला जादू उजागर करताना दिसतो. अंतर्विरोध आणि विसंगती या दोन ठळक बाबी कविच्या भाषित रचनेत ठिकठिकाणी दिसतात. त्यातून कवि अर्थविचलन साधताना दिसतो. ही कविता भावनिक वाटते पण ती भावनेच्या आहारी गेलेली कविता नाही. त्यात कसलाही इमोशनल ड्रामा नाही की इमोशनल ब्लॅकमेलिंग. कदाचित यासाठी काव्यरचनेत विधानात्मकता कविने आणलेली असावी. ‘नही उदास नहीं, बस एक चूप सी लगी है’ असा काहीसा अंदाज असलेली ही कविता आहे. एक चिंतनस्वर या कवितेला लाभला आहे. अनेक ठिकाणी अल्पाक्षरी आणि अनेकठिकाणी पल्लेदार विधानात्मकता अशी या कवितेची शैली दिसते. विशेष म्हणजे ही कविता एकदा वाचून संपत नाही.
कवि आणि कवितेची प्रकृती लक्षात यावी म्हणून यातील चार कविता येथे देत आहे. -
1. माती
आम्ही मूळचे जमीनदार
आता आमच्यातले काही
कॉन्ट्रॅक्टर, इंजिनिअर, आर्किेटेक्ट झाले
काही आडनावातच गुंतून पडले
तर काहीनी स्वत:चं स्वतंत्र नाव शोधलं
घरं बांधली, पाडली, पाडून पुन्हा नवीन बांधली
इमारती बांधल्या, मजल्यांवर मजले चढवले
इमले बांधले, देवळं बांधली, थडगी बांधली
स्मारकं बांधली, मनोरे बांधले, ढिगारे बांधले
आणि स्वत:च मातीमोल झाले
मी मातीचं काहीच बांधलं नाही
मी फक्त मातीला शब्दांत बांधलं
तिला पिढ्यान् पिढ्या पुरेल असं केलं
****
2. खग्रास
चालताना त्याची नजर नेहमी खाली असते
हात रिकाम्या खिशात असतात
शहरात हिंडून तो दरवेळी
रिकामा होऊनच परत येतो
कधी कधी पडल्या पडल्याच
सर्वत्र हिंडून येतो
भविष्य पाहून त्याच्या कपाळावर
आठ्या पडतात
हातावरच्या सगळ्या रेषा
तो करकचून आवळतो
इंद्रियांवर
त्याचं नाव कधीतरी
शाळेच्या हजेरीपटावर यायचं
भाषा शोधता शोधता
हळूहळू तो निनावी होत गेला
डोळे मात्र तो काळोखात जपून उघडतो
डोळे उघडून त्यानं पंधरा वर्षानंतर पाहिलं-
खग्रास सूर्यग्रहण
एकोणिसशें ऐंशी सालानंतर
प्रथमच तो एवढा आनंदीत झाला
*******
3. प्राण
नाक दाबलं
की चटकन एखादा शब्द
ओठांवर येतो
उरले सुरले ओठही
दाबून धरावेत
म्हणजे उघडतील
प्राण
पंख उघडून
एक जन्म कवेत
घट्ट धरतील
जातील समुद्रतळाशी
शिंपल्यासारखे
मोती रचण्यात
गढून जातील
*******
4. शब्द
शब्द कसा हवा ?
शब्दाने वाढणारा
जो बसवील
तुझी माझी वाचा
होऊन
परवलीचा
Comments
Post a Comment