दिल्लीची ग्रंथ वारी


नवी दिल्ली विश्‍व पुस्तक मेळ्यात सकाळ-दुपार-संध्याकाळ पुस्तकांमध्ये काही दिवस भटकणं एक नवी ऊर्जा प्रदान करणारं होतं.

इतक्या मोठ्या आवाक्याचं पुस्तक प्रदर्शन पाहाण खरं तर माझा दुसरा अनुभव होता. पहिला अनुभव काही वर्षांपूर्वी काहीसा अपघाताने जुळून आलेला मी पश्‍चिम बंगालला गेलो होतो तेव्हा. त्यावेळी कोलकाता विमानतळावरून शहरात येताना सगळीकडे कोलकाता इंटरनॅशनल बूक फेअरचे पोस्टर आणि बॅनर्स लागलेले दिसले. त्यामुळे अर्धा दिवस ‘सहज चक्कर’ टाकूया म्हणूण गेलो आणि स्तंभित झालो. एखाद्या पुस्तक प्रदर्शनात दोन तीन एटीएम व्हॅन्स वगैरे उभ्या असलेल्या मी पहिल्यांदाच पाहिल्या. अनेक पालक आपल्या मुलांना आवर्जुन घेऊन आले होते व त्यांना पुस्तक खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करीत होते. अनेक तरूण गाणी म्हणत होते. प्रस्तापित प्रकाशकांप्रमाणे छोटे प्रकाशक, वैयक्तिक कलाकार यांचे स्टॉल्स तिथे लागले होते. मला आठवतंं पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लिहिलेली पुस्तके मांडलेली एक सुबक ‘कुटीया’ तिथे उभारण्यात आली होती. एक जीवंतपणा व ‘फेस्टिव्हपणा’ त्या महोत्सवात इतक्या मोठ्या प्रमाणावर मी पहिल्यांदाचा अनुभवला. तिथली पुस्तके मोठ्या प्रमाणावर बंगाली भाषेतील होती त्यामुळे मला भाषेच्या मर्यादा या होत्याच. तिथे प्रवेश करताना प्रदर्शनाचा नकाशा देण्यात आला होता पण दोन तीनदा मी फिरताना वाट चुकलो यावरून प्रदर्शनाचा व्याप्ती मला आली. माझा इथला अनुभव मात्र मर्यादित होता. कारण माझा इतर प्रवासाचा कार्यक्रम आखलेला होता त्यामुळे केवळ अर्धा दिवस जेवढ पाहता येईत तितकंच मला पाहता आलं. 

दिल्लीच्या विश्‍व पुस्तक मेळ्याविषयी समजलं तेव्हापासून हा मेळा पाहण्याची तीव्र इच्छा होती. बरीच वर्षे काही ना काही कारणांमुळे तो पाहायचे राहून जात होते. कोवीडच्या काळात तो दोन वर्षे बंद राहिला तर एका वर्षी केवळ व्हच्युअल पद्धतीने पार पडला. गेल्या वर्षीपासून पुन्हा हे न्यु डेली वर्ल्ड बूक फेअर पुन्हा अवतरले. भारतभरातून अनेक विक्रेते व प्रकाशक या मेळ्यात आपली हजेरी लावण्यासाठी अर्ज दाखल करीत असतात पण लॉटरी पद्धतीने स्टॉल्सधारकांनी निवड होते व त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशाही येते. सुमारे दीडेक हजार ग्रंथ दालने इथे असतात असे समजले. प्रगती मैदान येथील पाच मोठ्या प्रदर्शन हॉल्समध्ये हे प्रदर्शन भरले होते. 

भाषा, साहित्य, सामाजिक शास्त्रे, कला, विज्ञान, स्पर्धा परीक्षा, बालवाङ्मय वगैेरे अशा प्रकारातील पुस्तके, इंग्रजी, हिंदी, राजस्थानी, सिंधी, पंजाबी, ऊर्दु, बंगाली भाषेतील पुस्तके, भारतासोबतच इराण, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, रशिया, स्पेन अशा देशांशी संबंधित ग्रंथदालने, साहित्यिक गप्पा, मुलांसाठीचे कार्यक्रम, प्रकाशकांचा कट्टा, त्याशिवाय विविध प्रकाशकांच्या ग्रंथदालनात छोट्या छोट्या कार्यक्रमासाठीच्या जागा असा अवाढव्य व्याप या प्रदर्शनाचा होता. इतके असुनही दालनांची सुनियोजित मांडणी होते ज्यामुळे नीट न गोंधळता फिरता येत होते. सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशनपासून प्रदर्शनस्थळ जवळ होते. या मेट्रो स्टेशनपासून प्रदर्शन स्थळापर्यत मोफत शटलसेवा नियमित सुरू होती. प्रदर्शनस्थळी विविध व्यंजनांनी सज्ज दालनेही सज्ज होती. त्यामुळे अगदी सकाळी जाऊन रात्री प्रदर्शनातून बाहेर पडणं शक्य होतं.

माझ्या काही मर्यादा जशा की देवनागरी वगळता अन्य लीपी वाचता न येणे, इंग्रजीशिवाय इतर युरोपीय भाषा न येणे यामुळे अनेक दालने वगळणे किंवा तिथली पुस्तके वरवर पाहणे भाग होते. शिवाय मीही काही गोष्टी वगळायच्या ठरवल्या होत्या. जशा की अकादमीक पाठ्यपुस्तके प्रकारातील पुस्तके, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, आध्यात्मिक गुरूंची ग्रंथदालने, देवदैवतांची पुस्तके वगळायची किंवा तिथे ओझरते दर्शन घ्यायचे असे ठरवले होते. शिवाय प्रकाशकांप्रमाणेच काही पुस्तक विक्रेतेही आपली दालने येथे लावतात. त्यामुळे पुस्तकांचे रीपीटेशनही होत असते. जुन्या पुस्तकांची ज्यात युरोपीय पुस्तकांचा भरणा होता अशी दालनेही होती. कुठलेही पुस्तक 100 रूपयांत असेही स्टॉल्स होते. बॉक्सभर पुस्तके अमुक रूपयांत अशी पुस्तकेही होती. ही बहुतेक युरोपीय फिक्शनची पुस्तके होती. 

पुस्तके ही अभिव्यक्तीचे अजूनही एक सशक्त माध्यम आहे याची जाणीव प्रदर्शन करून देत होते. सेल्फ हेल्प प्रकारातील पुस्तके अनेक ठिकाणी दिसत होती. ओशो, कृष्णमूर्ती, गांधी, आंबेडकर, डाव्या विचारसरणीचे साहित्य यांची छाप अजूनही आहे हे प्रदर्शनातील पुस्तके पाहून दिसत होते. प्रदर्शनात गीता प्रेसच्या स्टॉलवर गर्दी होती तशीच आंबेडकर व बौद्ध साहित्य प्रकाशित करणार्‍या स्टॉलवरही गर्दी दिसत होती. साहित्य अकादमी ही भारतातील बहुभाषीय साहित्य प्रकाशित करणारी संस्था त्यांची हिंदी, इंग्रजी, मराठी, कोंकणी या भाषेतील पुस्तकेच आजपर्यंत पाहायची संधी लाभली होती. या प्रदर्शनात इतर भाषीय पुस्तकेही पाहता आली. आदीवासींचे किंवा आदिवासींसंबंधित साहित्य प्रकाशित करणारे प्रकाशक, प्रतिपक्ष मांडणार्‍या, पर्यावरण, सामाजिक जागृतीच्या हेतूने ग्रंथनिर्मिती करणार्‍या संस्था यांच्या पुस्तकांचा परिचय प्रदर्शनामुळे होऊ शकला. अनेक शासकीय संस्था ज्यांची दर्जेदार व अल्पकिमतीतली प्रकाशने जी सहसा कुठे दिसत नाहीत, ज्यांची फारशी कुठे जाहिरात होत नाही किंवा ती ऑनलाईन मिळणे-दिसणे दुरास्पद असते अशी पुस्तकेही या प्रदर्शनाच्या निमित्त पाहता आली व विकत घेता आली. 

हिंदी भाषेचा अफाट साहित्य संसार  व साहित्य व्यहार यांचा परिचय प्रदर्शनामुळे झाला. वाणी प्रकाशन, राजकमल प्रकाशन यांच्या देखण्या स्टॉल्सना पुस्तक खरेदीसाठी भेट द्यावीच पण त्याचबरोबर एखाद्या भाषेत किती प्रकारची पुस्तके असू शकतात याची कल्पना येण्यासाठीही भेट द्यावी अशी त्यांची मांडणी होती. असाच इंग्रजीत स्टॉल आवडला तो पेग्वीनचा म्हणजे इंग्रजी आणि हिंदी दोन्ही. विशेष म्हणजे या दोन्ही स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत होती. वाणी आणि राजकमल या दोन आघाडीच्या हिंदीतील प्रकाशकांबरोबरच दिल्लीबाहेरच्या पण दर्जेदार आणि नवनवीन प्रकारच्या-विषयाच्या पुस्तकांची निर्मिती करणार्‍या प्रकाशकांचा परिचय प्रदर्शनामुळे होऊ शकला. हिंदीत तरूण वेगवेगळे विषय हाताळत विविध वाङ्मय प्रकारात वाङ्मयनिर्मिती करीत आहेत आणि हे साहित्य छापले जात आहे व वाचले जात आहे हे या प्रदर्शनाच्या निमित्ताने लक्षात आले. 

इतक्या मोठ्या प्रमाणावर बालसाहित्य पहिल्यांदाच प्रदर्शनामुळे पाहता आले. इंग्रजीत तर बालसाहित्याचे प्रमाण विपुल आणि अफाट आहेच. पण हिंदीतही मोठ्या प्रमाणावर आणि दर्जेदार बालसाहित्य निर्मिती केली जात आहे हे येथील ग्रंथसंपदा पाहुन म्हणावे लागते. मला सगळ्यात जास्त रमवले ते या अद्भुत बालसाहित्याने.

यंदाच्या प्रदर्शनाची थीम ही बहुभाषी भारत ही होती. या बहुभाषी परंपरेची ओळख करून देणारे सुंदर पॅब्हिलियन आयोजक संस्थान नॅशनल बूक ट्रस्टने थाटले होते. यांत भारतातील विविध भाषा, लीपी यांचा परिचय करून देण्यात आला होता. ही बहुभाषिकता केवढी मोठी श्रीमंती आहे या देशाची. भारतीय साहित्य श्रीमंत, बहुआयामी आणि श्रेष्ठ बनले त्यामागे ही बहुभाषिकता आणि या भाषेशी संबंधी विपुल सांस्कृतिक रूपे यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

प्रदर्शनाचे एक चांगले असते ते म्हणजे इथे कुठल्या मार्केटिंगमुळे तुम्ही पुस्तके घेत नसता. पुस्तके पाहण्याचे, निवडण्याचे स्वातंत्र्य व पर्याय प्रदर्शनामुुळे प्राप्त होते. तिथे जाण्याचा, राहण्याचा खर्च केला तो प्रदर्शन पाहण्याचा समाधानाने फिटला. प्रवासखर्चाच्या जवळपास खर्च ग्रंंथखरेदीवरही झाला. शिवाय सवडीने घ्यायची असे ठरवून अनेक काहीशी महागडी व महत्त्वाची वाटली अशी पुस्तके नोंदवून घेतली. अनेक विषयांवरची अनेक नवी पुस्तके संग्रही आली. त्याचबरोबर विशेषांक असलेले काही प्रकाशनगृहांची नियतकालिक अंकही संग्रही आले. येत्या वर्षभरासाठी पुरेल इतका स्टॉक जमा झाला. प्रदर्शनाच्या निमित्ताने पुस्तकांची मांडणी, डिझाईन, मुखपृष्ठे यांच्याबद्दलही मार्गदर्शन घडले, वाचनाची दिशा निर्धारित करण्याविषयीही आकलन हाती आले. खरे तर हे प्रदर्शन अनुभवण्यातूनच त्याचे मर्म आणि आनंद आत्मसाद करता येऊ शकते तरीही जे काही आत्ता आठवते आहे त्यावरून हे छोटेसे टीपण केले आहे.

Comments