तुंगभद्रेचा स्वप्नकिनारा...!


कळावे की आपण कुठल्यातरी स्वप्नात जागे झालो आहोत, पावलांवर आपले नियंत्रण राहिलेले नाही, पावलांनी जेथे न्यावे तसे आपले चित्त वाहावत जावे, आपला प्रतिकार प्रतिसाद बनून स्वप्नांच्या अधीन व्हावा, दृष्टी जावी तेथे मन मोहवून टाकणारी गुंतागुंत अधिक गहन होत जावी....
हंपीतील अवशेषांच्या भूमीत जाऊन सभोववार नजर टाकावी तर अशी अनुभूती येते. हे अवशेष आहेत की, एखाद्या रचनेचा स्वप्नभंग.. मन गोंधळून जातं...

अंतरात शेकडो वर्षांच्या कहाणीचा प्रवाह जिवंत ठेवून वाहणारी तुंगभद्रा आणि सारे वैभव पाहत थिजून गेलेला आणि हंपीच्या पतनाच्या आघाताने जणू मौन बनलेला ‘शिळा’संभार, याच्यात अस्ताव्यस्त दिसणारा हंपी आज एक अवशेषांचा गाव. भारतीय संस्कृतीने अनुभवलेल्या विजयनगर साम्राज्याच्या विदग्ध जीवनशैली आणि विचारशैलीच्या खाणाखुणा सांभाळणार्‍या हंपीला पाहिले तेव्हा आठवण आली महाभारत युद्धातील भिष्मशैय्येची.

नजर क्षितिजसन्मुख व्हावी तिथपर्यंत फक्त अवशेष अवशेष अवशेष...! आणि एक उदासपणा पांघरलेला रिता-रिता आसमंत, पहाटेच्या कोवळ्या उन्हात आणि तिन्हीसांजेला आकाश दाटून येते तेव्हा मनही आकाश बनल्याशिवाय राहत नाही... नुसत्या कल्पनांनी, संवेदनांनी हंपीचे गतकालीन वैभव बांधून काढायचे ठरवले तरी या अवशेषांत दडून राहिलेले हंपी बिलोरी ऐना बनून समोर उभे राहते.
हंपी किती पाहावं आणि किती सोडून द्यावं, याचा हिशेब करत बसलात तर त्याच्यातच कितीतरी वेळ निघून जायचा. त्यापेक्षा जितके मनात साठवता येईल तितके साठवावे, आपले करून घ्यावे!
त्यातच रिक्षावाल्याची स्टेटमेंट कमालीची होती - पुरी दुनिया में इतने अच्छे और बडे (इतक्या मोठ्या परिसरातील असे म्हणायचे असावे त्याला कदाचित) रुइन्स और किधर भी नही मिलेंगे!
त्याचे बोलणे ऐकले आणि हंपीच्या प्रेमात पडलेल्या १५ व्या शतकातील एका परदेशी मुशाफिराने नोंदवलेला अभिप्राय लक्षात आला. तो म्हणतो, पृथ्वीवर अन्य कुठेच या स्थळाचे साम्य नाही, असे ठिकाण डोळ्यांनी कधी पाहिले नाही, कानांनी कधी ऐकले नाही. एका पोर्तुगीज प्रवाशाने वक्रोक्तीपूर्ण स्वरात म्हटलेले ः मी काही बोलत नाही, कारण बोलणे कधी संपणार नाही!
आजही अवशेषांनाही हे उद्गार तितकेच लागू पडतात.

अवघ्याच वास्तुरचना सोडल्या तर बाकीचे हंपी चौथरे आणि पुरातत्त्व विशारदांनी तर्काने रचून ठेवलेल्या दगडांपुरते मर्यादित आहे. मात्र ते जितके उर्वरित आहे तेवढेही एकूण हंपीचा दिमाख डोळ्यांसमोर उभे करण्यास पुरेसे आहे. विजयनगर सम्राटांनी अनेक शतके या राजधानीचा नियोजनबद्ध विकास चालू ठेवला होता. त्यावरून त्यांच्या विचारांतील सौंदर्यदृष्टीची सातत्यातही समोर येते. येथील मंदिरे, राजवाड्यांचे अवशेष, अगदी सैन्यातील हत्तींना राहण्यासाठी बांधलेले निवारे, बाजारहाटाची ठिकाणे पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे - विजयनगरने काटेकोरपणे बाळगलेल्या भव्यतेचा, सौंदर्याचा अट्टहास.
विस्तीर्ण भूपटावर चित्र रंगवावे तशी शीलाबद्ध केलेली मंदिरे, त्याच्या सर्वांगावर केलेली रामायण-महाभारतादी भारतीय सृजनशील्पांची सजावट.. ही सजावट मनावर कोरून घ्यायचा मोह नजरेला आवरता आवरत नाही. कृष्ण मंदिर, हजाराराम मंदिर आदी अनेक मंदिरांच्या गाभार्‍यात आज मूर्तीचा देव नाही पण या वास्तूंचे देवपण या समर्पित रचनेने तोलून धरले आहे. या मंदिराच्या परिसरात पोचल्यावर मन शैशव बनून इकडे तिकडे धावू लागते. कृष्ण मंदिरासमोर बाजाराचे असलेले ठिकाण, तेथील सजावट, पाण्याचा प्रवाह गतकालीन वातावरण डोळ्यासमोर उत्कटपणे घेऊन येतो.
हत्तींची शाळा ही तशीच दिमाखदार. प्रत्येक हत्तीसाठी वेगळा गृह, तितक्याच नजाकतीने कोरलेला वरचा घुमट... याच परिसरात असलेली ‘लोटस महल’ म्हणून ओळखली जाणारी वास्तूही अशीच आपल्या अवघड अडखळ रचनेतून कमळावरी खुलत जाणारी.... याच परिसरात आणखीही एक महल होता; ज्याचा आज फक्त चौथरा तेवढा शाबूत आहे. पण त्या चौथर्‍याची आकर्षक रचनाही त्याच्या एकूण बांधकामाची साक्ष देऊन जाते.
वहा ‘महानवमी डिब्ब है’, मला रिक्षावाल्याने सांगितले. माझी नजर गेली तो तिथे एक उंचवटा दिसला, स्तरा-स्तरांतून वाढत जाणारा. समोर मोकळे मैदान अनेक आटलेल्या पुष्करिणींच्या भग्नावस्थेने व्यापून गेलेले. या उंचवट्याचे आज एकूण पाच स्तर काहीसे शिल्लक आहेत. याचा उपयोग विजयनगरचे राजे विजयादशमीच्या उत्सवाचे निरीक्षण करण्यासाठी करीत. या ‘डिब्ब’ची दोन स्तरांमध्ये कोरलेली ‘चित्रलिपी’ नजरेचा ठाव घेते. प्रत्येक स्तर चढताना पावलागणीक विजयनगरच्या वैभवाच्या आठवणी माग घेऊ लागतात आणि वर पोचल्यानंतर चौही बाजूंनी झोंबणारा वारा सगळा इतिहास सांगण्यासाठी आतुर झाल्यासारखा वाटतो. ...दूरपर्यंत नजर न्यावी तर आज तेथे काहीच नाही.. फक्त शिळांच्या नियतीने रचून ठेवलेल्या राशी मौन साधून उभ्या दिसतात.
विठ्ठल मंदिर परिसरही तितकाच लोभस. विठ्ठल मंदिराच्या प्राकारातही एक कृष्ण मंदिर आहे. याच्या खांबांवर थाप मारल्यास स्वरमयी प्रतिसाद यायचा असे सांगतात, मला मात्र तसा प्रतिसाद द्यायचं या खांबांनी टाळलं, कदाचित माझी थाप अरसिक असावी! याच ठिकाणी डोळ्यांचे पारणे फेडणारा दगडातून कोरलेला रथ आहे. तो दोन हत्ती खेचत आहेत. हंपीच्या नजाकतभर्‍या सौंदर्याचा विचार स्पष्ट होण्यासाठी फक्त या रथाला एक प्रदक्षिणा पुरेशी आहे.
रथासमोरचे विठ्ठल मंदिर ‘कानडा विठ्ठला’च्या अनुनयातून घडलेले. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक दशके सातत्याने काम करून तयार केलेल्या या सुरेश शिल्पात विठ्ठल विराजमान होऊ शकले नाहीत. याला एक कारण म्हणजे हंपीच्या र्‍हासाला कारणीभूत ठरलेले ते भेसूर युद्ध सुरू झाले, आणि एक समजूत अशीही आहे, की विठ्ठलाने आपल्या जीव जडलेल्या पंढरीत राहणे पसंत करून या मंदिरात येण्यास नकार दिला.

विठ्ठल मंदिराच्या प्रकारातील एक खूण मनात घर करून राहिली. त्या विस्तीर्ण चिरेबंदी प्रकारात टिकून राहिलेले चाफ्याचे झाड आणि त्यावरील दोनचार फुललेली फुले. या प्रकारातील आध्यात्मिकता, मार्दव राखण्याचा वसा जणू या चाफ्यांना दिला असावा. अशीच स्थिती कृष्ण मंदिराचीपण येथील सुनसान वातावरणातील जमलेले शुकपक्षी आपल्या आवाजांनी नखरेल, दिलखेचक स्वरलहरी निर्माण करू लागतात तेव्हा कृष्णलीला साकार करून जातात.

परतीचा प्रवास विठ्ठल मंदिरापासून तुंगभद्रेच्या साथीने विरूपाक्ष मंदिरापर्यंत पायी केला तो विशेष संस्मरणीय राहिला आहे. या वाटेवरच्या टेकड्यांवर अनेक पुराणकालीन लोककथांचे संदर्भ भेटतात... नदीचा प्रवाह अनेकविध विभ्रमातून पलीकडच्या मातंग पर्वताच्या पार्श्‍वभूमीवर प्रकट होताना आपले मुग्ध सौंदर्य खुलवत जातो. ज्ञानयोगी सगळे जाणून झाल्यानंतर शांतता, शीतलता त्याचा स्थायिभाव बनून जातो तशी प्रभा तुंगभद्रेच्या प्रवाहात दिसत होती. मात्र पावसाच्या दिवसात हा प्रवाह किती रौद्र बनतो, त्याच्या गोष्टी किनार्‍यावरील लोकांकडून ऐकाव्यात.
या वाटेत दगडांना लगटून जाणारा तुंगभद्रेचा प्रवाह विशेष संपन्न होऊन दिसतो. पावले आपोआप मंद होत जातात.. थांबतात. नदीचा प्रवाह आणि कातीव खडकांचे समूह एकमेकांत इतके गुंतून गेलेले दिसतात की ते एकमेकांना आलिंगन देत असावेत. खडकात उमलून आलेली हिरवळ या मिठीस एक आगळी उत्कटता प्रदान करते. एका खास सहवासाच्या लावण्यमयी आठवणी जणू येथे सांडलेल्या असाव्यात.
हंपीच्या वेगळेपणाला तुंगभद्रेच्या प्रवाहाचा जसा विशेष लाभला आहे, तसेच महाकाय, दिलखेचक रचनाबंधात विखरून पडलेले मोठमोठे दगडही परिसराला एक आगळा प्रत्यय देतात. दगडांतील लालित्य भावमयी दिसू लागते. वेगवेगळ्या आकारातील हे दगड इतक्या सुनियोजितपणे मांडणार्‍या सृष्टीच्या सौंदर्यशास्त्राला मन दाद देते, कुठल्या आकर्षणाने इतक्या अलगदपणे त्यांना तोलून धरले आहे.
अगदी थिजून गेलेले मानवी चेहरे कसे हे दगडांचे समूह समोर येतात. काही एकमेकांना बिलगलेले, काही एकांतात पडलेले, काही कुठल्यातरी गहन चर्चेत मग्न झालेले, काही पोरगेलेसे बागडणारे कसे तर काही प्रौढ व वृद्धत्वाकडे झुकलेले.
चालता चालता पावले विरूपाक्ष मंदिरापर्यंत आली. आपली सजीवावस्था राखून राहिलेले हे हंपीतले एक ठिकाण. इतर अनेक दाक्षिणात्य मंदिरांप्रमाणे गोपुर असलेले एक ऐस-पैस वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशास्त्र मिरविणारे मंदिर. येथील एक खासियत म्हणजे एका कोपर्‍यात छोट्याशा फटीतून येणारा प्रकाश समोरच्या गोपुर्‍याची उलटी प्रतिमा समोरच्या भिंतीवर पाडतो, तेव्हा कुतुहल वाटते.
मंदिरात प्रवेशानजीक मात्र एक ह्रदय हेलावणारे दृश्य पाहिले. एका हत्तीला पाय बांधून सक्तीने स्थिरपणे उभे केले होते, भाविकांच्या पूजा स्वीकारून सिद्ध करण्यासाठी, अशा आराधनेतून कसले पुण्य जोडतात माहीत नाही, मात्र हत्तीच्या डोळ्यांतील करुणा जणू विचारीत होती- विजयनगरच्या परंपरेला हे शोभते का?
...एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. विरूपाक्ष मंदिर हंपी विजयनगरचे होण्याअगोदरचे. पण विजयनगर राजांनी त्याचा जीर्णोद्धार केला. आता विरूपाक्ष शैवत्वाचे प्रतीक! पुढे रामाचे, गणेशाचे, विठ्ठलाचे, कृष्णाचे मंदिर उभारण्यासही पुढाकार घेतला, यातून संस्कृती समन्वयाचा विचार नकळत दिसून येतो.
अशा प्रकारे शेकडो राजमहाल, प्रासाद, अन्य रहिवास, ठिकठिकाणी विखुरलेली मंदिरे, विस्तीर्ण रस्ते, भरलेले बाजार, घोड्यांचे लोभस टाप, हत्तींची राजस सवारी, हिरे-माणकांचे होणारे तुलाभार.... अशा या हंपीला नजर लागली ती तालिकोटा युद्धाची.
या युद्धात दख्खनच्या सुलतानांनी विजयनगरवर केलेली स्वारी खरोखरच विदारक होती. विजयनगर सम्राटास ठार करून त्यांनी संपूर्ण राज्याची घडी विस्कटवून टाकलीच पण पुढे त्याचीच परिणती हंपी केवळ एक मोडक्या-पडक्या अवशेषांचा ढीग होण्यात झाली. युद्धानंतरच्या लुटालुटीत सुख - समाधान डिवचले गेलेच त्याशिवाय अनेक मंदिरे, वास्तूही नेस्तनाबूद झाल्या. लोक सगळे वैभव फक्त डोळ्यांत साठवून आणि ह्रदयाशी कवटाळून सैर भैर निघून गेले आणि राहिल्या त्या आठवणी अवशेषांत कैद झालेल्या... तुंगभद्रेच्या प्रवाहाच्या आणि शिळांनी मौनाने सहन केलेल्या कटू आठवणी.... पुढे हंपी तसे कधीच उभे राहिले नाही. हंपीचे हे अवशेष मनात रचता, रचता तिन्हीसांजेचा प्रहर कूस परतू लागला होता. मी हंपीचा निरोप घेतला तो परत येण्याचा बेत नक्की करून. अवशेषांत विखुरलेला हंपी हा सौंदर्याचा एकात्म आविष्कार. त्याला सुटे सुटे पाडून व्यक्तच करता येणार नाही. परतताना हंपीचा आठवणी जाग्या होत राहिल्या त्या मिळून मिसळून....


Comments