कोसंबी स्कूल ऑफ थॉट


हे शीर्षक खरे म्हणजे एखाद्या स्वतंत्र ग्रंथाचाच विषय आहे. पण इथे हा विषय निघण्याचे औचित्य म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या Exasperating Essays : execises in dialectical method  या पुस्तकाचा पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाने करून घेतलेला व लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेला मराठी अनुवाद ‘संतापजनक निबंध’ हे पुस्तक. 

मुळ इंग्रजी पुस्तक हे पुस्तक हे 1957 साली प्रकाशित झाले होते. यांतील लेख हे 1939 ते 1957 या काळातले आहे. पैकी बहुतेक लेखन हे जर्नल स्वरूपाच्या नियतकालिकांसाठी (त्यात पुन्हा बरेच परदेशी नियतकालिकांसाठी) केलेले लेखन आहे. हे लेखन गंभीर, अकादमिक स्वरूपाचे असणे स्वाभाविक आहे. कारण त्याचा वाचकवर्ग हा मुख्यत्वे विद्वज्जन, किंवा बुद्धीवादी वर्ग म्हटला जातो तो आहे. 

प्रस्तूत लेखकाने या पुस्तकाविषयी केलेली विधाने, काढलेले निष्कर्ष हे अनुवादाला अनुसरून आहेत. प्रस्तूत लेखकाने केवळ अनुवादच वाचला आहे व मूळ पुस्तक पाहिलेले नाही. पुस्तकाविषयी केलेल्या या लेखनाचा उद्देश्य सदर अनुवादाची समीक्षा किंवा पुस्तकाची समीक्षा किंवा त्यात वापरलेल्या विरोधविकासी पद्धतीच्या उपयोजनाचे मूल्यमापन किंवा पुस्तकाबद्दल तपशील पुरवणे नसून एक वाचक म्हणून या पुस्तकाच्या संदर्भात कोसंबींविषयी जी काही वैशिष्ट्ये जाणवली ती सांगणे हा आहे.

असे असले तरी या पुस्तकात काय आहे इथून सुरूवात करावी लागतेच. यासाठी ब्लर्बमधील एक परिच्छेद याविषयी बर्‍यापैकी आटोपशीर वाटला तो इथे उदृत करीत आहे.-
“ नेतृत्व आवश्यक असतं का ? समूह पातळीवरचे सर्व बदल अपरिहार्य सतील , तर व्यक्तीनं काहीच करायची गरज नाही का ? स्वातंत्र्योत्तर भारतातील सत्ताधारी  वर्गाचं स्वरूप कसं आहे ? चीनमधील क्रांतीचं स्वरूप कसं होतं ? विज्ञान आणि वैज्ञानिकांचं स्वातंत्र्य म्हणजे काय ?‘आतला आवाज’ नेहमी सुरक्षित मार्गदर्शन करतो का ? सॉक्रेटिसच्या वादविवाद पद्धतीचा तत्कालीन ग्रीक वर्गरचनेशी काय संबंध होता ? दयाभावानं भारलेला बौद्ध धर्म आपल्या देशातून विरून का गेला ?’ 1857च्या उठावाचं महत्त्व काय होतं ? संस्कृत साहित्य वर्गीय पूर्वग्रहापासून मुक्त आहे का ? जागतिक शांततेच्या वाटेमधील अडथळे ठरणारे घटक दूर करता येतील का ? - अशा विविध प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे.’ 

आता दामोदर कोसंबी कोण या प्रश्‍नाचे उत्तर म्हणून पुस्तकाच्या ब्लर्बमधील हा परिच्छेद पाहता येईल - ‘प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी हे आपल्या देशातील एक विख्यात विद्वान होते. प्रसिद्धीपराङ्मुख असलेल्या कोसंबींनी गणित, सांख्यिकी, भारतविद्या, इतिहास, अशा विविध ज्ञानशाखांमध्ये मूलगामी योगदान दिलं. त्याचसोबत समकालीन सामाजिक-राजकीय समस्यांवरही त्यांनी मर्मग्राही लेखन केलेलं आहे. एकंदरीत, भारतातील मार्क्सवादी विचाराच्या कक्षा रूंदावण्यामध्ये त्यांनी कळीची भूमिका बजावली.’

पुस्तकांत आलेल्या निबंधांचे वर्गीकरण करायचे तर भारताशी सबंधित व जागतिक विषयांवरील असे किंवा मग वाङ्मयीन, राजकीय व सामाजिक-आर्थिक असे करता येईल. या पुस्तकातील एक विशेष म्हणजे यात असलेले कोसंबीलिखित फिक्शन. 1857 या भारतीय इतिहासातल्या महत्त्वाच्या वर्षी घडलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवरील ‘कानपूरच्या वाटेवर’ ही लघुकथा आहे. अर्थात त्यातूनही एक वैचारिक शोध मुखर करण्याचा लेखकाचा प्रयत्न दिसतो. कोसंबी वैचारिक मांडणीसाठी फिक्शनचा कसा उपयोग करतात हे यातून पाहता येते.

जे दिसतं ते जशास तसे न स्वीकारता प्रश्‍न विचारत गोष्टींच्या मुळापर्यंत जाण्याचा कोसंबींचे धोरण या पुस्तकात दिसते.

कोसंबींना अनेक प्रश्‍न पडले आहेत. त्याची उत्तरे ते शोताना दिसतात. असे करताना मूळापर्यंत जाण्यासाठी नवे प्रश्‍न उपस्थित करत जातात. त्यांना प्रश्‍नाची उत्तरे शोधताना प्रश्‍नाची पार्श्‍वभूमी समजून घेणे महत्त्वाचे वाटते. या पार्श्‍वभूमीसाठी तथ्ये स्वीकारताना कोसंबी अत्यंत जागरूक दिसतात. केवळ उपलब्ध तथ्यांची नक्कल ते करीत नाहीत. जे एक तथ्य म्हणून सांगितले गेले ते तथ्य होते की तथ्यासारखा दिसणारा आभास असा संशय त्यांना पडतो. तेव्हा ते तथ्याच्या सत्यासत्यतेचे विश्‍लेशण करतात. तथ्याचे मूळ स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करतात व त्याचे आभासी स्वरूप  उघडे पाडतात. यामुळे परिस्थितीच्या प्रस्थापित मांडणीलाच ते धक्का देतात. हे करताना ते तटस्थ व व्रतस्थ होतात. अगदी आपल्या श्रद्धेय व्यक्तींची / बाबींची चिकित्सा करतानाही कोसंबी कमकुवत होत नाहीत. 

प्रस्थापित आकलनातील उपरोध आणि आकलनाचा पुनर्शोध या निबंधांतून दिसतो. असे करताना अगदी प्रस्थापित आणि प्रवाहाशी (वैचारिक) दोन हात करताना कोसंबी मागे हटत नाहीत. कोसंबी हे तत्वांशी व मूल्यांशी बांधील निष्ठावंत आहेत.

नियतकालिकांतून प्रकाशित झालेलेे हे निबंध पुस्तकात समाविष्ट करतेवेळी जिथे जिथे माहिती वाढवली आहे किंवा प्रकरणांच्या शेवटी ‘पुरक भर’ दिली आहे तिथे तिथे तसे स्पष्ट करण्यात आले आहे. यातून कोसंबींच्या लेखनाबद्दलची पारदर्शकता व प्रामाणिकपणा दिसून येतो.

कोसंबींचा विविध ज्ञानशाखांचा चौफेर व अफाट व्यासंग हे निबंध वाचताना लक्षात येतो. एखाया विषयाची मांडणी बारकाव्यांसह कोसंबी अधिकारवाणीने आाणि तितक्याच सहजपणे करतात. ही अधिकारवाणी व सहजपणा हा व्यासंगातून आलेला आहे. एखाद्या विषयाच्या किती पारंब्या असू शकतात, आणि त्यासाठी किती तयारी करावी लागते याबाबतही हे निबंध प्रेरक दिसले.   
 
कोसंबी एक अभ्यासक म्हणून हे निबंध लिहितात. अर्थात त्यांचा शोध घेण्याचा दृष्टीकोन हा मार्क्सवादी विचारसरणीचा आहे. त्यांनी या निबंधांत निष्कर्ष काढण्यासाठी निकष म्हणून विरोधविकासी भौतिकतावाद ही पद्धती वापरलेली पद्धती आहे. ‘यामागचा सिद्धांत पहिल्यांदा विकसित करून एक साधन म्हणून त्याचा पद्धतशीर वापर करणार्‍या प्रतिभावंताच्या नावावरून या पद्धतीला ‘मार्क्सवाद’ असं संबोधलं जातं’ ही कोसंबी यांनी दिलेली माहिती आहे..

हेही नमूद केले पाहिजे की, कोसंबींच्या काही धारणा आहेत. काही गोष्टी या विचार म्हणून, परिस्थिती म्हणून श्रेष्ठ आहेत किंवा नाहीत याबद्दल त्यांचा स्वत:चा तर्क आहे. त्यांची अनेक गृहितके ही या धारणा व तर्कातून निर्माण झालेली आहेत. हे अनेक ठिकाणी जाणवेल. पण असे असले तरी कोसंबींच्या विद्वानपणाबद्दल व अभ्यासक म्हणून वैशिष्ठ्यांना त्यातून बाधा होत नाही.

चिकित्सा करताना कोसंबी हे पूर्णपणे तटस्थ राहून निरपेक्षपण तथ्यांचे आकलन प्रस्तूत करतात, त्याचे विच्छेदन व विश्लेषण  करतात आणि निष्कर्षावर पोचतात. नेहरू-गांधींविषयी ते श्रद्धा व्यक्त करतात मात्र त्यांची चिकित्साही ते तितक्याच थेटपणे करतात. मार्क्सवाद व संबंधित घडामोडींवर भाष्य करताना ते अभ्यासक होतात. तिथे त्यांचा त्या मतांबद्दलचा अनुकूलपणा ते कुठेही आड येऊ देत नाहीत.

40 व 50 चे दशक हे भारताच्या दृष्टीने महत्वाचा काळ ठरतो. भारतीय स्वातंत्र्याचे शेवटचे पर्व व सुरूवातीची जडणघडण या काळात होत होती. कोसंबींची चिकित्सा ही या काळात करत होते. परिस्थितीचे आकलन पूर्णपणे भिन्नपणे करत होते. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमतां’ या संत तुकारामांच्या विधानाप्रमाणे निडरपणे ते आपले निष्कर्ष मांडतात यामुळे ते श्रेष्ठ विचारवंत वाटतात.

घटना जशा घडताना दिसतात किंवा त्याच्यासमोर त्या जशा घडतात. त्या मुळात तशा नैसर्गिकपणे घडतात का ? की त्या तशा घडवल्या जातात व किंवा तशा घडताहेत हे भासवले जाते. हे भासवण्यामागे काही लागेबांधे असतात का ? हे लागेबांधे का असतात. त्यातून कुणाचा लाभ होत असतो. दृक स्वरूपात दिसणार्‍या परिस्थितीचे काही अधोविश्‍व ‘अंडरवर्ल्ड’ असते का ? अशी उकल कोसंबीच्या विविध निबंधांतून झालेली दिसते. सत्ताधारी, संपत्तीधारी व अन्य यांच्यातील वर्गीय संबंधांच्या विस्कटावणीतून निबंधांतील मंथनाची घुसळण होताना दिसते. ‘लोकआंदोलनातील नेतृत्वाचं कार्य’, ‘भारतातील वर्गरचनेविषयी’, ‘विज्ञान आणि स्वातंत्र्य’, ‘साम्राज्यवाद आणि शांतता’, ‘भारतात बौद्ध धर्माचा र्‍हास’ असे निबंध यादृष्टीने पाहता येतील.

विविध विषयांवर विचारमंथन करताना कोसंबी साहित्यावर विचार व्यक्त करतात. यादृष्टीने नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकाची उलटतपासणी करणारे त्यांचे परीक्षण, भर्तृहरीवरीच्या मर्यादांची चर्चा करणारा त्यांचा निबंध पाहता येईल. सॉक्रेटिसवरचा लेखही वाङ्मयीनपणाशी जवळीक असलेला वाटतो, त्यातून सॉक्रेटीसची परिस्थिीतीसापेक्ष व्यक्तीचित्रण उभे राहिलेले आहे. त्यांची लघुकथा सुद्धा एक ‘वाङ्मयीन विधान’ वाटते.

प्रस्थापितांना व प्रस्थापितांचा मूक संमतीने अनुनय करणार्‍यांना हे निबंध बर्‍यापैकी संताप आणणारेच आहेत. पण त्याचबरोबर आभासी दर्शविल्या गेलेल्या गोष्टींचा कोसंबीना असलेला संतापही या निबंधांतून कधी उघडपणे तर कधी शांतपणे व्यक्त होताना दिसतो. त्यादृष्टीनेही हे संतापजनक निबंध ठरावेत. शिवाय पुस्तकात एक टीप आलेली आहे. अर्थात ती अनुवादक/प्रकाशक यांची आहे की मूळ पुस्तकातली आहे कळत नाही. ती अशी :

‘शीर्षकाविषयी’
हे संतापजनक निबंध आहेत, म्हणजे ते वाचकाला त्या संतापात सहभागी करून घेणारेही निबंध मानता येतील. दुराग्रही नसलेला संताप असू शकतोच. शिवाय, संताप विध्वंसकच असतो असं नाही, किंबहुना संताप सर्जनशीलतेलादेखील खतपाणी घालू शकतो.

हे निबंध वाचल्यानंतर प्रस्थापित केल्या गेलेल्या साचेबद्धपणामुळे वाचक कदाचित सुरूवातीला संतापेल पण सम्यकपणे विचार केल्यावर अनेक गोष्टींकडे नव्याने व निराळ्या दृष्टीने पाहण्यास नक्कीच प्रेरीत होईल. हे या निबंदांचे फलित ठरते. निदान आकलनाची वेगळी दिशा असते याचा साक्षात्कार तरी हे निबंध नक्कीच घडवतील. विचारप्रक्रियांना चालना देणारे हे निबंध दिसतात. कोणत्याची लेखनाचे असेच फलित हवे. वाचणार्‍याला त्या लेखनाने ‘ग्रो’ करायला हवे. नुसते लाटेवर स्वार होऊन केलेली विधाने प्रसिदी देणारी असू शकतात पण त्यातून काहीच श्रेष्ठ साध्य होत नसते. कोसंबी परिस्थिती व तत्थांकडे अधिक चिकित्सकपणे, डोळकसणे, प्रश्‍न उपस्थित करून पाहण्याची, परिस्थितीची उलटतपाणी करत सत्य शोधण्याची प्रेरणा या निबंदांतून देतात.

दामोदर धर्मानंद कोसंबी
(फोटो : इंटरनेटवरून

पुस्तक : संतापजनक निबंध
- दामोदर धर्मानंद कोसंबी
भाषांतर - अवधूत डोंगरे
प्रकाशक : लोकवाङ्मयगृह प्रकाशन, मुंबई
पहिली आवृत्ती : 29 जून 2021
पाने  :128, किं. रू. 200/-

अंतोनी व्हिवसचे शहर चिंतन

 “आपली शहरे म्हणजे दीर्घ आणि अनेक कालखंडांतून विकसित होत होत साकारलेल्या कलाकृती असतात “ - अंतोनी व्हिवस

शहरे हा आधुनिक काळातील चर्चेचा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. शहरीकरण (कधी कधी भीषण आणि उग्र वाटत असले तरी) सत्य आहे किंवा अटळ सत्य बनत आहे.

सध्या ‘तुम्ही बी घडा ना’ हे अंतोनी व्हिवस यांच्या ‘smart city Barcelona’ या पुस्तकाचा सुलक्षणा महाजन आणि करूणा गोखले यांनी केलेला अनुवाद वाचतो आहे. मोठ्या 17x24 सें.मी. आकारातील 266 पानांचे हे भारदस्त जाडजूड पुस्तक राजहंसने प्रकाशित करून एक सध्याच्या काळासाठी आवश्यक असा दस्तावेज उपलब्ध करून दिला आहे असे वाटले.

अंतोनी व्हिवस हे बार्सेलोना शहराचे उपमहापौर होते. शिवाय स्मार्ट सीटी संकल्पनेबाबत जगभरात त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. शहराची उभारणी, घडण, नियोजन या संदर्भातील प्रयोग व त्यामागील चिंतनातून हे पुस्तक घडले आहे. शहरांना जास्तीत जास्त मानवी चेहरा कसा मिळू शकेल व टीकू शकेल असा या प्रयोगांमागील धडपड व चिंतनामागील उद्देश्य दिसतो. 

शहरवासीयांचे त्यांच्या शहराशी संबंध कसे घनिष्ट होऊ शकतील, नियोजन आणि उपयुक्तता यांचा सुमेळ साधून प्रकल्प कसे उभारले जाऊ शकतात, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, जनसहभाग, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांशी जोडणी, शहराच्या पारंपरिक स्वरूपाचे जतन-संवर्धन, पारंपरिकता, शहरांचे वैशिष्ट्य, सांस्कृतिक संदर्भ सांभाळून नवीनीकरण, शहर आधुनिक बनवताना सौंदर्यशास्त्राचा विचार जपणे, शहरांतील गच्चपणा कमी करून मोकळेपणा निर्माण करणे, नागरिकांना स्वाभिमानाने व सुरक्षितपणे कसे जगता येईल, इत्यादी अनेक प्रयोगांबाबत विधानं व्हिवस यांनी केली आहे. यातील विशेष म्हणजे हे प्रयोग व्हिवस यांनी त्यांच्या कारकिर्दीत केले आहेत तसेच अनेेक प्रयोगांत त्यांचे मार्गदर्शन व सहभाग राहिला आहे. शिवाय अशा प्रकारच्या इतरांच्या प्रयोगांचे आकलनही त्यांनी मांडले आहे.

पुस्तकात व्हिवस यांची विधाने लक्ष वेधून घेतात. उदा-

“शहरे मानवी प्रमाणांशी सुसंगत असावी लागतात. जेव्हा शहरांचा विस्तार माणसाच्या आवाक्याबाहेर जातो, तेव्हा शहर समजून घेणे अवघड जाते. ...उपभोगाच्या आहारी गेलेली शहरे आत्मा आत्मा हरवलेल्या देवालयांसारखी भासतात.”

“वाढती लोकसंख्या सामावून घेत शहरे वाढत आहेत, सुजत आहेत आणि त्याचे नागरी स्वरूप हरवून ती केवळ माणसांचे मोहोळ असलेल्या वस्त्या बनत आहेत, ही माणसे कशापासून तरी दूर पळत आहेत असे वाटते, पण ती कशापासून  लांब पळत आहेत तेच अजून समजलेले नाही.”

“स्मार्ट होणे म्हणजे अवास्तव हाव टाळणे, स्मार्ट होणे म्हणजे माणूस, समाज, निसर्ग यांच्यात अतूट परस्परावलंबन आहे याचे भान येणे. स्मार्ट होणे म्हणजे समाज, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि निसर्ग या सर्वांशी जोडले जाणे.”

“लोकशाहीला अभिप्रेत असलेले प्रगल्भ शहर कधीच भ्रामक समजुती, अंतर्मन, चमकदार आणि अगडबंब प्रकल्प यांच्या माध्यमातून प्रगती करू शकत नाही. त्यासाठी बदल करण्याची महत्त्वाकांक्षा आवश्यक असली तरी बदलांची अंमलबजावणी वास्तववादी प्रकल्पांद्वारे करावी लागते.”

“शहरांचे नियोजन हे चलाख वास्तुरचनाकार आणि नगरतज्ज्ञ यांच्या कंपूने नकाशांवर काही ठिपके आणि बाण दाखविण्यापुरते मर्यादित नसते.”प्रज्ञापथावरचा प्रतिभावंत

कॉम. नारायण देसाई यांच्या लेखनकार्याविषयी एक नोंद. 


काही माणसे आपल्या प्रश्‍नांची सोडवणूक परंपरांच्या दंडकांच्याआधारे, प्रस्थापित आदर्शांना प्रमाण मानून करतात तर काही बुद्धी, तर्क, चिकित्सा, विवेक यांच्याआधारे शोध घेतात, परंपरांचे अंधानुकरण नाकारून प्रस्थापिताच्या पुढे जाणारा मार्ग शोधतात. नारायण देसाई हे दुसर्‍या वाटेवरचे एक पांथस्थ होते.

पोर्तुगीज गोव्यात जन्मलेले मूळ पेडणे येथील देसाई गोव्यात, मुंबई व अखेरच्या दिवसांत पुण्यातून कार्यरत राहिले.

बा.द. सातोस्कर यांना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात -‘सर्वांचेच विचार कालग्रासित असतात. जी गोष्ट कालग्रासित होऊ शकत नाही ती म्हणजे आपली विचारशक्ती. म्हणून माझ्या साहित्य लेखनातला हेतू अमुक विचार देणे हा नसून विचारशक्ती वाढवणे हा आहे.’

देसाई यांनी हयातभर लोकांमध्ये ही विचारशक्ती, चिकित्सावृत्ती, आत्मभान रूजावे यासाठी कार्य केलेेले दिसते. त्यासाठी आपली लेखणी त्यांनी एखाद्या लढवय्याने तलवार वापरावी तशी वापरली.

आपल्या विद्वत्तेने व कर्तृत्वाने कॉम्रेड देसाई यांनी गोवा व गोव्याबाहेर अनेकांना प्रभावित केले. त्यांच्या निधनानंतर ‘लोकभूमी’ने प्रकाशित केलेल्या त्यांच्यावरील विशेषांकात विविध क्षेत्रातील व वयोगटातील आणि  गोवा तसेच महाराष्ट्रातील व्यक्तींच्या स्मृतीपर लेखांतून त्याची प्रचिती येते. ‘ज्ञानपीठ’प्राप्त साहित्यिक रवींद्र केळेकर यांनी आपले एक पुस्तक देसाई यांना अर्पण केले आहे. अर्पण पत्रिकेत केळेकर म्हणतात -  ‘पुस्तक तुमच्या हातांत दवरून फाट थापटून घेवंक आंवडेतालो’. यावरून देसाई यांच्याबद्दलच्या आदराची कल्पना यावी.

नारायण देसाई हे चिंतनशील लेखक होते तसेच ते एक ‘कॉमे्रड’ होते. नारायण देसाईंच्या जीवनाच्या घटनाक्रमांचा आढावा घेतल्यास एक शिक्षक, स्वातंत्र्य सैनिक, कम्युनिस्ट कार्यकर्ता - संघटक - नेता असा त्यांचा परिचय होतो. त्याचबरोबर त्यांची कारकिर्द उजळून दिसते ती एक स्वतंत्र विचारांचा विचारवंत लेखक म्हणून. मात्र त्यांचे लेखन हे त्यांच्या जीवनाचा ‘बायप्रोडक्ट’ दिसते हेही तितकेच खरे. कृतीशील जीवन जगता जगता व प्रज्ञापथावर विचारांची साधना करता करता त्यांनी आपल्या साहित्याची निर्मिती केलेली दिसते.

जीवनाच्या अगदी आरंभापासूनच त्यांना चिकित्सकपणा, चौकटीबाहेरच्या विचारांचे व पुरोगामीपणाचे आकर्षण दिसते. वयाच्या 19व्या वर्षी त्यांचा पहिला लेख ‘उ एराल्द’ दैनिकात सन 1939 साली पोर्तुगीज भाषेतून प्रकाशित झाला होता. गणपती स्वर्गात राहणारा देव नसून खरा योद्धा होता,  वेदकालीन एका गणाचा नायक होता आणि तिबेट स्वारी करून तो प्रदेश त्याने मुक्त केला असे विचार पं. सातवळेकरांनी मांडले होते, त्यांचा अनुवाद करून देसाईंनी तो लेख लिहिला होता. 

बा. द. सातोस्कर यांनी देसाई यांचा समावेश ‘गोमंतकीय मराठी साहित्याच्या आधुनिक शिल्पकारां’मध्ये केला आहे. 1960 साली लोणावळा येथे गोमंतकीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी देसाई यांची निवड झाली होती. पोर्तुगीजांच्या जाचामुळे गोवा मुक्तिपूर्व काळातील संमेलने गोव्याबाहेर होत असत. गोवा मुक्तीनंतर म्हापसा येथे 1965 साली झालेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात देसाई यांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले होते. वयाच्या 45व्या वर्षी त्यांना हा सन्मान लाभला होता. 

मराठीत त्यांनी विपूल साहित्य निर्मिती केली आहे. कोंकणी भाषेतही त्यानी लेखन केले आहे. त्यांच्या लेनिनवरच्या ‘लेनिन : जीण, चिंतन, कर्तृत्व’ या कोंकणी ग्रंथाला कला अकादमीने साहित्य पुरस्कार देऊन गौरविले आहे. कोंकणी लेखनाशी त्यांचा संबंध त्याहीपर्वीचा दिसतो. सन  1955 साली गोमन्तक प्रेस, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या शणै गोंयबाब लिखित ‘अल्बुकेर्कान गोंय कशें जिखलें’ या पुस्तकाला त्यांनी एक अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिलेली दिसते. त्यावेळी त्यांचे वय 35 वर्षे होते. त्यांच्या पुस्तकांचे हिंदी, इंग्रजीत, गुजराथीत अनुवादही झालेले दिसतात.

संपादन क्षेत्रातही त्यांची भरीव कामगिरी दिसून त्यांनी मुंबईत अन्य सहकार्‍यांबरोबर गोवा मुक्तीपूर्व काळात ‘साळीक’ व ‘युगदीप’ नियतकालिकांचे संपादन केले. याशिवाय मुक्तीनंतर ‘लोकसंग्राम’, ‘आमचे श्रम’ , ‘आमचे राज्य’, ‘लोकभारत’, ‘लोकभूमी’ अशी नियतकालिके त्यांनी चालविली. एक रोमी लिपीतील नियतकालिकही ते चालवित असा संदर्भ कुठेतरी आढळल्याचे आठवते.

नारायण देसाई यांचे पहिले पुस्तक हे 40च्या दशकात तर अखेरचे 2005 साली निघाले. म्हणजे पाच दशकांहून अधिक काळ आणि त्यांचे निधन 2007 साली झाले त्याच्या दोन वर्षे अगोदरपर्यंत लेखक म्हणून ते कार्यरत होते.

40च्या दशकात ब्रिटीश भारतात मुंबईत प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘क्रांतिवीर’ आणि ‘कंगाल भारत’ या नाटकांवर बंदी आणली गेली व प्रती जप्त करण्यात आल्या होत्या. यापैकी एक नाटक आंतरजातीय प्रेमसंबंधांवर तर एक सुभाषचंद्र बोस यांच्यावर होते.

नाटक, चरित्र, निबंध, प्रबंध, लेख असे लेखन त्यांनी केले. त्यांचे लेखन ललित किंवा रंजनपर नाही. त्याला प्रबोधनाचे आणि जागृतीचे अंग आहे. त्यांचा पिंड हा वैचारिक लेखकाचा. आणि त्यांच्या जीवन मिशनास ते अनुसरूनच होते. चिंतनाची सखोलता, अभ्यासाची व्यापकता, मूलगामीपणा, व्यासंग त्यांचे साहित्य वाचताना लक्षात येते. मार्क्सवादी दृष्टीकोन आणि भारतीय परंपरेची चिकित्सा ही त्यांच्या लेखनाची दोन ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांचा सखोल अभ्यास त्यांच्या लेखनातील आणखी एक विशेष. 

त्यांच्या लेखनाच्या आषयाची कल्पना पुस्तकांच्या नावांवरूनही यावी. काही नावे अशी - ‘समाजक्रांतिच्या प्रकाशरेखा’, ‘लेनिन आणि आपण’, ‘एकविसावे शतक आणि स्वामी विवेकानंद’, ‘इश्‍वर नव्हे मीच खरा’, ‘मार्क्सवाद - लेनिनवादाची मूलतत्वे’ इ.

16 डिसेंबर 1920 रोजी जन्मलेल्या देसाई यांचे जन्मशताब्दीचे वर्ष यंदा सुुरू होत असताना श्री. देसाई यांचा वैचारिक पिंड लक्षात घेता त्यांच्या विचारांची थोडीशी चर्चा औचित्यपूर्ण ठरावी. यासाठी प्रतिनिधिक स्वरूपात त्यांची दोन पुस्तके येथे विचारात घेतली आहेत.

त्यांच्या लेखन कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातले एक पुस्तक म्हणजे ‘शास्त्रीय तत्वज्ञान’. 1962 साली प्रकाशित हे पुस्तक त्यांच्या व्यक्तीमत्वाचा व वाङ्मयीन - जीवन मिशनाचा ‘मेनिफेस्टोच’ म्हणता येईल. पुढे लिहिलेल्या पुस्तकांतील चर्चेचा मूळ स्वरही ‘शास्त्रीय तत्वज्ञानात’ आढळून येतो. 


पुस्तकात त्यांनी भारतीय आध्यात्म परंपरेवर मार्क्सवादी दृष्टीकोनातून क्ष-किरण टाकले आहे. इश्‍वर (सं)कल्पना व आध्यात्मिक अवडंबरात गुरफटून गेल्याने मानवजातीचा विकास खुंटला व तो गतीहीन झाला. या अवडंबराच्या सहाय्याने किंबहुना ते पद्धतशीररित्या माजवून धर्मसत्ता व राजसत्तेने शोषित वर्ग घडवला असा त्यांच्या एकूण विवेचनाचा सूर दिसतो. स्वत:वर लादून घेतलेल्या या बंधनांतून माणसाला मुक्त करणे, हे भौतिक जगच सत्य असून त्यात सर्वश्रेष्ठ निर्मितीशील मानव आहे याचे आत्मभान जागवणे व सर्वांना अग्रेसर करणे याचा ध्यास जणू त्यांच्या लेखणीने घेतलेला दिसतो. 

नारायण देसाई यांचे क्रांतिकारी स्वरूपाचे विचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावेच त्याचबरोबर त्यांची विचार करण्याची, खंडण-मंडण-विश्‍लेषण-संश्‍लेषण-निष्कर्षाची पद्धत थोडक्यात त्यांचे ‘लेखन विशेष’ समजून घेण्यासाठीही हे  पुस्तक महत्त्वाचे ठरावे. 

नारायण देसाई हे भारतीय आध्यात्म परंपरेचे केवळ मंथनच करीत नाहीत तर आपले क्रांतिकारी नवीन विचार ठामपणे मांडतात. उदाहणार्थ ‘कर्म’सिद्धांताविषयीचे त्यांचे मत. 

ते म्हणतात - ‘कर्म जर मी करणार आणि मी ते करावयालाच हवे तर त्या कर्मफालाची आसक्ती धरणेही स्वाभाविक नाही काय ? फळ जर सहजासहजी मिळत नसेल तर तशी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हे आपले कर्तव्य ठरते. कर्म जसे करावयालाच हवे तसेच कर्माचे रास्त फळही त्याला मिळावयालाच हवे. तो त्याचा उचित कर्मसिद्ध हक्क आहेे...कर्म तर कराच, परंतु प्रत्येक कर्माचे रास्त फळ मिळावे म्हणून न्यायनिर्माण, शोषणनिवारण व समाजक्रांती वगैरे जी जी काय सामूदायिक कर्मे आहेत तीही करा’

अर्थात त्यांचे हे विचार वैयक्तिक स्वार्थकेंद्रिततेला प्रोत्साहन देण्यासाठी नसून व्यापक शोषणमुक्तीच्या दृष्टीकोनातून आले आहेत हे वेगळे सांगायला नको.

जीवनाच्या अखेरच्या काळापर्यंत ते कार्यरत दिसतात. त्यांचे शेवटचे पुस्तक ‘बुद्ध आपुला सांगाती’ हे वर्ष 2005 मध्ये प्रकाशित झाले. त्यांच्या मृत्यूच्या दोन वर्षे अगोदर.

त्यांना प्रेरित असलेल्या ‘शास्त्रीय तत्वज्ञाना’चा भारतीय आदर्श पुरुष म्हणून ते बुद्धांकडे पाहत असावेत असे दिसते. या पुस्तकातील दोन दीर्घ वैचारिक निरुपणांतून नारायण देसाई बुद्धांच्या मानव उत्थानासाठीच्या मूल्यांचे अन्वेषण करताना व रोजच्या व्यवहाराशी त्याची सांगड घालताना दिसतात. असे असले तरी बुद्धमताची चिकित्सा करूनच ते बुद्धांचा स्वीकार करतात. बुद्धाची मानव उत्थानासाठीची तत्वे व त्यांत भरडले गेलेले कर्मकांडांचे अवडंबर यांचा उहापोह व वर्गीकरण करायला ते विसरत नाहीत. 

बुद्धांचा धम्म त्यांना तीन गोष्टींसाठी भावतो - एक : त्याला असलेले मूल्य-शिक्षणाचे अंग, दोन : स्वदेशातील समाज सुधारणांचे अंग, आणि तीन : मानव-समाजाने ‘जैसे थे’ परिस्थितीच्या दलदलीतून हत्तीच्या बळाने पुढचे पाऊल टाकण्याचे अंग.

काॅ. नारायण देसाई जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने

काॅ. नारायण देसाई यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून (१६ डिसेंबर २०१९ ) सुरु होत आहे. 16 डिसेंबर 1920 रोगी पोर्तुगीज गोव्यात पेडणे येथे जन्मलेेले देसाई गोव्यात, मुंबई व अखेरच्या दिवसांत पुण्यातून कार्यरत राहिले. डाव्या चळवळीतील कार्यकर्ते - नेते होते तसेच ते एक लेखकही होते. गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या म्हापसा येथील संमेलनात सन 1965 साली त्यांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले होते. विपुल असे वैचारिक लेखन त्यांनी केलेले दिसते. मागे पेडण्याशी संबंधित गोमंतकीय वाड़्मयाला योगदान दिलेल्या निवडक लेखकांचे ब्लॉग मी केले होते. त्यात एक ब्लॉग नारायण देसाई यांच्यावर होता. ब्लॉगच्या माध्यमातून संबंधित लेखकाचे विविध संदर्भ एकत्र आणणे असा उद्देश होता. नारायण देसाई यांची जन्मशताब्दी आज सुरू होत आहे त्यानिमित्त त्यांच्यावर केलेल्या ब्लॉगची लिंक येथे शेअर करीत आहे. 

शक्य झाल्यास त्यांच्यावर आणखी काही लिहिण्याचा प्रयत्न करीन.  लिहिल्यास येथे  शेअर करीन. 


काॅ. नारायण देसाई ब्लॉगवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


निस्पृह - निरागस आत्मकथन


‘नाही मी एकला’ हे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रांसिस डिब्रिटो यांचे आत्मकथन. एकूण चौदा प्रकरणांच्या या पुस्तकात फा. डिब्रिटो एक व्यक्ती, धर्मगुरू, कार्यकर्ते, लेखक अशा रूपांत दिसतात. आपल्या आत्मकथनाला त्यांनी ‘तपासणी व उलटतपासणी’ म्हटले आहे.
डिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरीही भारतीय परंपरेचा त्यांच्या जडणघडण व व्यक्तीमत्त्वावरील प्रभाव त्यांनी खुलेपणाने व्यक्त/स्वीकार केला आहे.  ‘घंटानाद म्हणजे आदिनादाचा, ओम्काराचा हुंकारच जणू!’ असे ते म्हणतात. तुकारामांचे उद्गार ठिकठिकाणी ते उपयोगात आणतात. पुण्यातील जंगली महाराज मंदिरात व वरळीच्या हनुमान मंदिरात त्यांची प्रवचनेही झाली आहेेत.

दिब्रिटो यांचा जन्म व बालपण वसईच्या सुंदर वातावरणात गेले. वसईच्या आपल्या जन्माची कथा सांगताना फादरनी तेथील भाषा, लोकवेद, हिंदू-ख्रिस्ती सद्भाव याच्या मिलाफाचे सुरेख दर्शन घडविले आहे. पुढे त्यांनी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला व धर्मशिक्षणाकडे वळले. धर्मशिक्षणावेळी काही काळ रोम येथे राहण्याची संधी लाभली. अभ्यासाचे क्षितीज आणखी विस्तारले. जगभरातल्या सहाध्यायींशी संबंध आला. तेथे पोप जॉन पॉल दुसरे आणि मदर तेरेसांचा अल्पसा सहवास लाभला ज्याने त्यांना श्रेयस अशा अनुभूती दिल्या. पुणे येथील वास्तव्यासंबंधीही त्यांच्या मनात विशेष जागा आहे असे दिसते. येथे त्यांचा अनेक सांस्कृतिक - साहित्यिक उपक्रमाशी व्यक्तींशी संबंध आला. ज्याने त्यांचे व्यक्तीमत्व वर्धीष्णू केले. धर्मगुरू म्हणून वावरताना वेळोवेळी त्यांनी भूमिका घेतल्या. कधी त्या धार्मिक सुधारांसाठी होत्या तर कधी सभोवताल्या परिस्थितीच्या सुधारासाठी. यावेळी त्यांना कटू-थरारक अनुुभवांचा सामना-मुकाबला करावा लागला. जगताना अक्षरांशी नाते जुळत गेले व त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटत गेले. प्रबोधनाचे कार्य करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘सुवार्ता’ मासिकाच्या संपादकपद त्यांनी दोन तपे सांभाळले. मासिकातून एकाबाजूनेे सभोवताल्या घटनांविषयी अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्या तसेच विविध परिसंवादांतून समन्वयासाठी प्रयत्न केले. ते सामाजिक चळवळींत ओढले गेले व ती जबाबदारी धैर्याने पेलत त्यांनी तगड्या विरोधी शक्तींशी झुंज दिली. 

‘सुवार्ता-विचाराची पालखी’, ‘माझी शब्द संवाद यात्रा’ व ‘सुबोध बायबल - सेतुबंधनाचा प्रयोग’ या प्रकरणांत फा. दिब्रिटो यांच्या वाङ्मयीन व्यक्तीमत्त्वाचा व कार्याचा परिचय वाचकाला होतो. फा. दिब्रिटो यांची लेखन संपदा 14 पुस्तकांत सामावली आहे. ‘माझी शब्द संवाद यात्रा’ प्रकरणात त्यांनी आपल्या लेखनामागच्या प्रेरणा व भूमिकांचा मागोवा घेतला आहे.  ‘सेतुबंधनाचा प्रयोग’मध्ये बायबलच्या त्यांनी केलेल्या अनुवादासंबंधी यात्रेचे विवरण आले आहे. या अनुवादाला केंद्रीय साहित्य अकादमीचा अनुुवादासाठीचा पुरस्कार लाभला होता. लेखक म्हणून निसर्गाबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा दिसतो, त्यांच्या बहुतेक चळवळीही पर्यावरणाशीच निगडित दिसतात.

आपल्या फजितीचे प्रसंग खेळकरपणे सांगतानाच आपल्या तरुणपणातील/जीवनातील नाजूक प्रसंगांच्या, घालमेलीच्या आठवणीही त्यांनी धीटपणे व्यक्त केल्या आहेत. सेमिनारीत शिक्षण घेतेवेळी एक तरूण मुलीशी त्यांचा परिचय झाला व ती त्यांना पत्रे लिहू लागली. त्यांच्या मनातही वादळ निर्माण झाले. मात्र त्यांनी त्याला पूर्णविराम दिला. लहानपणी आईला चुकून दिली गेलेली शिवी व त्याविषयीचा पश्‍चाताप, एकदा आईलाच कन्फेशन बॉक्स मध्ये सामोरे व्हायचा प्रसंग, लहानपणी कॉपी करून मिळालेले चांगले मार्क मात्र नंतर त्याविषयीची खंत व ‘कन्फेशन’ असे प्रसंग पुस्तकात आहेत. 

आत्मकथनाची भाषा संयत व शांतरसाने व्यापलेली आहे. साधे आणि सहज तरीही ‘ग्रेसफूल’ असे लिहिणे कठीण असते मात्र फा. डिब्रिटो यांची अशा लिहिण्यावर पकड किती पक्की आहे त्याची प्रचिती अगदी ‘ना तरी मी मातीचे मडके’ या मनोगतातच येते. ते तरलतेने लेखन करतात. मात्र कल्पनाविलासात रमत नाहीत. भावनावश होत नाहीत. मोकळेपणाने व्यक्त होतात पण संयमितपणा आणि तटस्थपणा कुठेही ढळू देत नाहीत. ज्यांचा त्यांना विरोध करावा लागला त्यांच्याविषयी कुठेही कटू भाव व्यक्त होत नाहीत. आपल्या फजितीचे प्रसंग आनी झालेल्या चुकांची कबूलीही ते देतात. ज्यामुळे आत्मकथनास निर्मळ-निरागसता प्राप्त होते.

धर्मगुरू हा नियमांनी बद्ध असतो. या नियमांची जपणूक त्याला आयुष्यभर करायची असते.  असे असले तरी तो एक माणूस असतो. इतर माणसांसारखी संवेदनांची वादळे त्याला चुकत नाहीत. दिब्रिटो यांनाही अशा भावनिक, आकर्षणांच्या वादळांना सामोरे जावे लागले. संसार, एकटेपणा, स्त्रीआकर्षण आदि प्रश्‍नांनी त्यांनाही घेरले. मात्र त्यांनी ते न टाळता त्याची चिकित्सा केली आहे. याबाबत चर्चाही पुस्तकात आली आहे. 

in the compony of ‘सायलंट ऑब्झर्वर’

वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांचे ‘सायलंट ऑब्झर्वर’ हे प्रदर्शन (नाव अगदी समर्पक आहे) मुंबईत लागले आहे हे कळल्यानंतर ते कधी एकदा पाहता येईल या विचारात होतो. तो योग जयपूरला व्हाया मुंबई जाताना जुळवून आणला.

वासुदेव गायतोंडे यांच्याबद्दल पहिल्यांदा सविस्तर परिचय झाला ते सतिश नाईक संपादित "चिन्ह"च्या विशेषांकामुळे. गायतोंडे यांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल जाणून घेतल्यानंतर त्यांच्या चित्रांचे गारूड आणखी गहिरे होत जाते.

दिवसभर पाऊस  ठिबकत होता अशा वेळी सीएसटीहून चालत चालत काला घोडामार्गे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या त्या वैशिष्ट्यपूर्ण वारसा इमारतीत प्रवेश करणे आणि जिने चढत चढत त्या गॅलरीत गायतोंडेंच्या चित्रांना सामोरे जाणे हा सुद्धा एक अनुभव होता.

या प्रदर्शनातील काही चित्रकलाकृती ---

मी काही चित्रकलेतला पारंगत नव्हे. त्यामुळे ही पोस्ट चित्रांची समीक्षा करण्याच्या दृष्टीने लिहिलेलीही नाही.
पण कलेशी नाते असलेल्या आणि जीवनाच्या गहिरेपणाशी नाते असलेल्या प्रत्येकालाच गायतोंडेंची चित्रे अपिल व्हावीत. ही चित्रे सरळ डिस्क्राइब करता यावीत अशी कळत नाहीत. ती आपल्या कळण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या जगातली असावीत. तो काही त्या चित्रांचा दोष नव्हे. त्यामुळे त्यांना आपण अमूर्त आपल्या सोयीसाठी म्हणू पण अमूर्त म्हणणे कितपण योग्य माहित नाही. ..मात्र कळली नाहीत तरी अ‍ॅप्रिशिएट करावीशी वाटतात अशी ही चित्रे आहेत.

गायतोंडेंच्या चित्रांची विशेषत: त्यांच्या त्या अमूर्त शैलीतल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांची स्वत:ची अशी एक इकोसिस्टिम आहे. ती धारण करून चित्रे साकार होतात. त्यांचा भव्य कॅनव्हासी आकारही परिणामकारकतेला आधारभूत आहे. दूरून साधी वाटणारी चित्रे जवळ जाऊन पाहिल्यानंतर आपली गुंतागुंत उलगडू लागतात. दूरून ‘प्लेन’ वाटणार्‍या एखाद्या जागेच्या नजदीक गेल्यावर त्यातील छटांची वलये लक्षात येऊ लागतात. आणि मग या अचल चित्रांतून एक चैतन्यच जाणवू लागते. एक लय असलेले चैतन्य. ही चित्रे एक अनुभव देतात. कशी ‘आली’ असतील ही चित्रे गायतोंडेंना.

...तर तुम्ही जर 3 नोव्हेंबर 2019 पर्यंत कधी मुंबईत असाल तर नक्की ही चित्रे पाहून घ्या. प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात असल्याने प्रदर्शनाबरोबर इच्छुकांना संग्रहालयही पाहता येतील. तुम्हाला फोटो घ्यायचे असतील असतील तर अतिरिक्त फोटो पास मात्र घ्यावा लागतो.  

प्रदर्शनात जहांगिर निकोलसन यांच्या संग्रहातील, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्याकडची तसेच गायतोंडेंशी विशेष नाते असलेल्या पंडोल आर्ट गॅलरीच्या संग्रहातील चित्रे एकत्रित आणण्यात आली आहेत. असे योग जुळून येणे दुर्मीळ. त्या अर्थानेही प्रदर्शन महत्वाचे ठरावे. दुसरे म्हणजे प्रदर्शनात 50च्या शतकापासूनची गायतोंडेंची चित्रे आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रप्रवासाचाही प्रवास घडतो. अर्थात कुठलाच आर्टीस्ट स्टेटीक नसावा. त्यामुळे ‘प्रवास’चा अर्थही मर्यादीतपणे घ्यावा लागेल. कदाचित ‘कल्पना’ हा शब्द अधिक सयुक्तीक ठरावा. तर गायतोंडे म्हटल्यानंतर जी एका अमूर्त शैलीतली चित्रे डोळ्यांसमोर येतात त्यापेक्षा वेगळी figurative चित्रेही इथे पाहता आली.  तसेच ‘ऑइल ऑन कॅन्व्हास’ बरोबरच जलरंग, इंक माध्यमातली चित्रेही आहेत. एक कोलाजही आहे.

आणि हो इथे जाल तेव्हा पंडोल आर्ट गॅलरीचे दादीबा पंडोल यांनी सांगितलेल्या गायतोंडेंच्या स्मृती तसेच ज्ञानेश्‍वर नाडकर्णींचा गायतोंडेंच्या चित्रकारीतेवरचा लेख वाचायला ठेवला आहे. तो नक्की वाचा.

(९ सप्टेंबर २०१९)

'खिस्तपुराण' चरित्र आणि गोवा वैश्‍विकरणाचा शोध

अनुवादातूनही भाषेचे वाङ्मयीन सौंदर्य वाढीस लागत असते. अनुवाद हा सुद्धा स्वतंत्र कृती प्रमाणे सर्जनशील असू शकतो. कोंकणी भाषेत असे महत्त्वाचे अनुवाद सिद्ध अनुसर्जक सुरेश आमोणकर यांनी  केले आहेत.

धम्मपद, ज्ञानेश्‍वरी, जपुजी साहेब, झेन कथा, तिरुक्कुरळ, जुवांवनुसार खिस्ताचे शुभवर्तमान, जातक कथा, यांचे कोंकणी अनुवाद त्यांनी साकारले आहेत. धम्मपदाच्या कोंकणी अनुवादास साहित्य अकादमीने अनुवाद पुरस्कार देऊन गौरविलेही आहे.

या सर्व अनुवादांप्रमाणेच, गोमंतकाच्या भाषिक आणि एकुणच इतिहासात वगळता येणार नाही अशा फादर थॉमस स्टिफन्स लिखित 'ख्रिस्तपुराण'चा कोंकणी अनुवाद त्यांनी सिद्ध केला. सुमारे 11 हजार ओव्यांचा हा ग्रंथ आहे. या अनुवाद सर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर घडलेल्या सखोल अभ्यासातून साकारलेला ग्रंथ म्हणजे ‘गोंयचें संवसारिकीकरण’. गोव्याचे वैश्‍विकरण, गोव्याचे ग्लोबलायझेशन असाही त्याचा अर्थ व्हावा. मुळात ही खिस्तपुराणची प्रस्तावना. मात्र तिचा आवाका साकार झाली तेव्हा तिने एका ग्रंथाचे रूप घेतले. स्वत: ग्रंथकर्त्यानेही त्याला प्रस्तावना ग्रंथ म्हटले. असे असले तरी ‘प्रस्तावना ग्रंथा’ची मांडणी, रूप, रचना, त्यातील विषयाचा आवाका, आणि 181 पृष्ठांचा आकार त्याला स्वतंत्र ग्रंथाचे अस्तित्व बहाल करतो, असे म्हटले तर चूक ठरू नये. दुसरे म्हणजे, एखाद्या ग्रंथाच्या प्रस्तावनेने स्वतंत्र ग्रंथाचे रूप घ्यावे, हासुद्धा एक नवीनच आणि दुर्मीळ प्रकार ठरावा. 

सोळाव्या आणि सतराव्या शतकातल्या गोमंतकाच्या ऐतिहासिक, सामाजिक, समाजशास्त्रीय, धार्मिक, भाषिक स्थितीगती संदर्भांचे आलेखन करणारी प्रकरणे या ग्रंथात आहेत. ती माहितीची मांडणी करणारी, ऐतिहासिक तथ्यांची चर्चा-चिकित्सा करणारी अशी आहेत. त्यातून लेखक गोव्याच्या वैश्वीकरणाचा शोध घेतो.

ग्रंथातल्या एकूण 19 प्रकरणांमध्ये 9 प्रकरणे ख्रिस्तपुराण ग्रंथ, त्याची रचना, त्याची भाषा शैली, त्यातील शिकवण, ग्रंथकार म्हणजे थोडक्यात ग्रंथाचा संक्षिप्त पण सर्वांगाने वेध घेणारी आहेत. 

त्याशिवाय विषयाच्या अनुषंगाने 23 परिशिष्ट्ये जोडली आहेत.

अगदी ‘आरंभाचे निवेदन’पासून हा ग्रंथ आपली बौद्धिक आणि अभ्यासाच्या सखोलतेची मोहोर उमटवतो.

वैश्‍विकरणाची संकल्पना विसाव्या शतकात ठळकपणे समोर आली असली तरी ही प्रक्रिया खूप आधीपासून सुरू होती हेही लेखकाला दाखवायचे आहे. त्यादृष्टीनेही हे ‘ग्रंथ’लेखन नावीन्यपूर्ण ठरावे. या वैश्‍विकरण प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून ग्रंथलेखक गोव्याच्या 16व्या शतकापासूनच्या इतिहासाकडे पाहतो व तथ्यांचा चिकित्सक वेध घेतो. येणार्‍या राजकीय व सांस्कृतिक आव्हानांना सज्ज राहण्यासाठी ऐतिहासिक तथ्यांची चिकित्सा होणे गरजेचे असल्याचे लेखकाचे मत आहे. त्यातूनच खिस्तपुराण ग्रंथाच्या अनुवादकामाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकविध वेध लेखकाने घेतला आहे, ज्याची परिणती या ग्रंथात झाली.

पोर्तुगीजांना (किंवा म्हणूयात युरोपियनांना) हिन्दुस्थानच्या वाटा शोधून काढण्याची गरज का भासली येथून सुरेश आमोणकर हे तथ्यांचे उत्खनन आरंभ करतात. त्यानंतर 15 व्या 16व्या शतकातील युरोपातली धार्मिक परिस्थिती आणि त्याचा गोव्यावर परिणाम यांचा वेध घेतात. हिंदुस्थानातल्या पोर्तुगीज वसाहती, त्यांचा आरंभ-शेवट, ख्रिस्ती धर्माचे हिंदुस्थानात आगमन यांचा वेध घेतात. 

पुढे- अल्बुकर्कचे गोव्यात आगमन, 16व्या, 17व्या शतकातली परिस्थिती याचा प्रदीर्घ धांडोळा येतो. हिंदु-ख्रिस्ती संस्कृतींची गाठभेट व त्यातून उद्भवलेला धार्मिक-सामाजिक संघर्ष याची चिकित्सा करतात. धर्मसमीक्षण न्यायसभा ऊर्फ ‘इन्क्विझिशन’ची स्थापना, धर्मांतराचे टप्पे, त्याविषयीची धोरणेे, याची तथ्ये, चर्चाही केली आहे.

फादर थॉमस स्टिफन्सचा चरित्रपट उलगडणारे स्वतंत्र प्रकरणही ग्रंथात येते.

परिशिष्टांमध्ये, ख्रिस्तपुराण, थॉमस स्टिफन्स  व विषयाशी संबंधित दस्तऐवज आहेत. त्यात थॉमस स्टिफन्स यांची पत्रे, खिस्तपुराणवरील तत्कालीन अभिप्राय, खिस्तपुराणच्या विविध आवृत्तीतील उतारे, याचबरोबर कृष्णदासशामा यांच्या श्रीकृष्णचरित्रकथेतील उतारा, इन्क्विझिशन आज्ञापत्र यांचा समावेश आहे.

ग्रंथाला प्रकरणनिहाय संदर्भसूची, नामसूची, विषय सूची, स्थळ सूची जोडली आहे. शिवाय डॉ. सु. म. तडकोडकर यांचे ख्रिस्तपुराण संदर्भात अभ्यासपूर्ण टिपण आहे. तसेच खिस्तपुराणातील सासष्टीतील कोंकणी शब्द आणि बोली व युरोपीय पाद्रींनी वापरलेल्या लिप्यंतराच्या पद्धती असे प्रा. से. मा. बॉर्जिस यांचे दोन लेख आहे.

खिस्तपुराण ग्रंथाचे चरित्र समजून घ्यायचेे असलेल्यांना तसेच 16व्या 17व्या शतकातील गोव्याची ‘आऊटलाइन’ जाणून घ्यायची असेल त्यांना हा ग्रंथ उपयुक्त ठरावा. हा ग्रंथ वाचल्यानंतर मूळ ग्रंथाचे वाचन अधिक सुजाण व आकलनयुक्त ठरावे.

                                                 

गोंयचें संवसारिकीकरण
लेखक : सुरेश आमोणकर
प्रकाशक : कला संस्कृती संचालनालय, पणजी-गोवा.

अमर अपार्थिव


रमेश वेळुस्कार : एक मुद्रा. (फोटो : समीर झांट्ये, स्थळ : लखनऊ )
मृत्यू अटळ असतो. मरण टाळता येत नाही. हे शाश्वत सत्य जरी असले तरी एखादा माणूस पार्थिव रूपात आपल्यासमोर आता यापुढे दिसणार नाही हे सत्य पचवणं किती कठीण असतं. याचं एक कारण म्हणजे दोन पार्थिव रुपांत होणारा संवाद हे असावं.
कवि रमेश वेळुस्कर गेले हे  रविवारी रात्री(21 ऑक्टोबर 2018) फेसबूक चाळत असताना अचानक दिसले आणि एकदम स्तब्ध व्हायला झाले. अचानक एक पोकळी अनुभवली. एखादा जोडलेला धागा अचानक तूटून जावा तसा अनुभव झाला. याचे कारण रमेश वेळुस्कर यांच्याबरोबरचा होणारा संवाद हेच असावे. वेळुस्कर संवाद साधणारे साहित्यिक होते. ते अक्षरांशी जसा आत्मीयतेने संवाद साधायचे तसेच त्यांच्याशी परिचितांबरोबरही तितक्याच आत्मीयतेने संवाद साधायचे. दुसरे म्हणजे वेळुस्कर हे लिहिते लेखक होते. अगदी मृत्यूपर्यंत ते लिहित होते.
ते गेल्याचे कळल्यानंतर जाणीव झालेली त्यांची आठवण होती ती त्यांच्याशी झालेल्या चर्चांची आणि त्यांच्या नवनवीन प्रयोगशील लिहिण्याची.
प्रत्येक गोष्टीचा एका खास ढंगात शोध घेताना त्यांना अनुुभवणे हा त्यांच्याशी बोलतानातला विशेष असायचा. गोष्ट सुरू झाली की ती कुठून कुठे पोहोचेल कळायचे आणि सांगताही यायचे नाही. संवाद संपला की ज्यासाठी सुरुवात झाली ते कळायचेच किंवा गवसायचेेच असेही नाही, पण या बोलण्याच्या ‘यात्रे’चा आनंद मात्र छान असायचा, अपेक्षेपलिकडच्या अनेक गोष्टीचं गाठोडं त्यातून हाताला लागायचं अनेकदा.
कवितेने त्यांच्यावर विशेष प्रेम केले. त्यांनीही कवितेला सोबत करत पंचमहाभूतांच्या शाश्वत तत्त्वांचे उत्खनन करून एक अक्षर सृष्टी निर्माण केली. भौतिकातल्या अधिभौतिकाबद्दल त्यांचे नेहमी कुतूहल दिसायचे.
काखेला झोळी, अंगात सदरा परिधान केलेलेे दाढीवाले लोभस असे हे व्यक्तीमत्व बहुदा पायी चालत फिरताना दिसायचे. पणजीत यायचे असतील तर चहासाठी भेेट ठरलेली. मग चर्चा सुरू झाली की आपल्याच गोष्टी सांगण्यापेक्षा बरोबरच्याला विचार करण्यास, बोलण्यास प्रवृत्त करणारी विधाने. त्यातून गोष्टी फुलत जायच्या. संवाद ही सुद्धा किती सर्जनशील गोष्ट आहे हे त्यांच्याशी बोलताना जाणवायचे. त्यांचे बोलणे गद्य-पद्याच्या सीमारेषा ओलांडून एक वेगळीच भाषा व्हायचे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि काव्य यांत एक अद्वैत अनुभवता यायचे. माणसातल्या जगण्यातला स्पिरीच्युअल एलमेंट हा माझ्या आकर्षणाचा नेहमीच विषय राहिला. कदाचित त्यामुळेही आम्ही एकमेकांकडे ओढले गेलो असेल, संबंधांत सहजता येत गेली असेल.
त्यांच्या काव्य सादरीकरणाचीही आठवण येते. जाहीर कार्यक्रमात व खासगीत त्यांच्याकडून कविता ऐकता आल्या. कधी त्यांच्या किंवा बर्‍याचदा इतरांच्याही. एखाद्या कवितेत किती ऊर्जा असू शकते हे त्यांच्याकडून कविता ऐकताना जाणवायचे.
सोशल मिडियावरून आपले साहित्य प्रकाशित करणारे अखिल भारतात विरळा लेखक असावेत. वेळुस्कर यांच्या वयातले तर दुर्मीळच. वेळुस्करांनी हल्लीच्या दिवसांत, ‘मळब कळी’, ‘फांतोड फुला’ं हे ललित गद्द फेसबूकवरून लिहिले. पैकी ‘मळब कळी’ बिंब प्रकाशनाने मुद्रित पुस्तकरूपात आणले आहे. मध्यंतरी काही पुस्तकांचे अनुवादही त्यांनी फेसबूकवरून केले.
‘गजाली’ हा एक वेगळा फॉर्म बनवून त्यांनी कितीतरी कोंकणी कविता केल्या. ‘सुनापरान्त’मधून दर रविवारी रवीन्द्रनाथांच्या मूळ बंगालीतून ‘गीतांजली’च्या अनुवादाचे सदर त्यांनी चालवले. अनुवाद आणि टिपण असे त्याचे स्वरूप होते. वेळुस्कर हे बंगाली भाषा शिकले होते, हेही येथे नोंद करावेसे वाटते. ‘गजाली’ आणि ‘गीतांजली’ या दोन्ही कृती पुस्तक रूपात आल्यास त्या नक्कीच कोंकणी साहित्याला योगदान ठराव्यात.
याशिवाय गोव्यातील वृत्तपत्रांतून गेली काही वर्षे नियमित ते कॉलम लिहित होते. हे इतके वेगवेगळ्या प्रकारचे लेखन सातत्याने करणारा दुसरा लेखक सध्या गोव्यात नसावा. अगदी मृत्यू येईपर्यंत ते लिहित होते. 
मागे मी बौद्ध स्थळांची यात्रा केली तेव्हा एक दिवस लखनऊला राहावे लागणार होते. वेळुस्करांना कळल्यावर ते रायबरेलीहून लखनऊला हजर. मी म्हटले तुम्ही इतकी तसदी का घेताय, तर म्हणाले 'तू इतक्या दूरवरून आलास. कोण जवळ कोण दूर. ' त्यांची अनेक विधाने कोड्यात टाकणारी. त्याला वरच्यावर उत्तरे देऊन सोडण्याची घाई करण्यापेक्षा. उत्तरे देणे अनेकदा मी टाळायचो. त्यांची विधाने विधाने आहेत की प्रश्‍न, प्रश्‍न हे प्रश्‍न आहेत की विधाने हेच गुंत्यात टाकणारे व्हायचे.
नंतर दिवसभर लखनऊचे ओझरते दर्शन घेतले. एका कविबरोबर फिरण्याचा तो माझ्या आयुष्यातील एक अनोखा दिवस होता. रमेश वेळुस्करांमुळे तो संभव झाला होता. मायावती ह्या मुख्यमंत्री असताना बनलेली उद्याने पाहायची उत्सुकता होती. पण तिथे भेट आधीच वेळुस्करांनी आखली होती. तिथे गेल्यावर वेळुस्कर म्हणाले - लक्ष्मीसमोर हत्ती असतात तेव्हा गजलक्ष्मी म्हणतात. येथे बाबासाहेबांसमोर हे हत्ती आहेत. याला काय म्हणता येईल. 
काही अंतरानंतर आणखी एक विधान - मार्बल आणि दुपार, काॅम्बिनेशन जाणवतय का तुला ?
मागे ‘झेन कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन व्हायचेे होते. त्यावेळी होणार असलेल्या चर्चेत त्यांनी कोंकणीतील मोठ्या लेखक व्यक्तिमत्वांसोबत बोलण्यासाठी बसण्याचे मलाही निमंत्रण दिले. माझ्यासाठी तो मोठा सुखद् धक्का होता आणि मोठा पुरस्कारसुद्धा. नंतर झेन कवितांवर मी वेगळ्या प्रकारे परीक्षण लिहिण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे परीक्षणाचे पारंपरिक कपडे न घातलेले परीक्षण आहे अशी फेसबूकवर कौतुकाची टिप्पणीही केली होती.
दुसर्याना प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणे, नव्या लेखकांचे वाचणे, सूचना करणे हा सुद्धा त्यांचा एक महत्त्वाचा स्वभाव होता. साहित्यासंबंधी अनेक चर्चा मी त्यांच्याशी केल्या आहेत. आणि त्यांनीही न कंटाळता सातत्याने त्यात भाग घेतला आहे. आज या सर्व गोष्टींचे कागदोपत्री दस्तऐवजीकरण नसेलही कदाचित पण एक लेखक म्हणून माझे काही छोटेसे व्यक्तिमत्व असेल तर त्यात ते नक्कीच विखरून असेल.
गेले काही दिवस त्यांच्याशी केवळ वॉट्सअ‍ॅपवर संवाद होता. माझे ‘बुद्धायन आणि इतर प्रवास’ हे पुस्तक पाठवल्यानंतर त्याची पोच आणि कौतुकाचा मॅसेज आवर्जुन आलेला. दोन सप्ताहांपूूर्वी त्यांचा साप्ताहिक कॉलम छापून आला नाही म्हणून फोन केेला होता, तो घरच्यांनी उचलला. त्यांना थकवा आला असल्याने ते फोन स्वीकारू शकत नाहीत म्हणून सांगण्यात आले. औषधोपचार सुरू असल्याचे व त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्याशी संवादाचा लवकरच योग येईल या अपेक्षेने होतो. नोव्हेंबर महिन्यात त्यांचा वाढदिवसही होता.
मात्र ध्यानीमनी नसताना त्यांनी ही अशी अचानक एक्झिट घेतली. कवि काय सर्जन करेल हे सांगता येत नाही.
जिथून सुरूवात केली मी तिथेच येउन पोहोचतो. पण मग मला अचानक गवसते ते हे - एखादा माणूस पार्थिव रूपात जरी नसला तरी अपार्थिव रुपात राहतोच. कवि आणि साहित्यिक तरी नक्कीच राहतो. एक अपार्थिव झाड बनून रमेश वेळुस्कर नेहमीच राहणार आहेत. स्मृती आणि अक्षरांंच्या घनदाट फांद्यांचे झाड बनून. नाहीतर अनेकदा ते सांगायचेच, ‘मरण बिरण काय नासता रे...’

****
- रमेश वेळुस्कर यांच्या ‘झेन कविता’चे परीक्षण करणारी नोंद या ब्लॉगवर लिहिली होती. ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

- त्यांच्याविषयी अधिक माहितीसाठी विकिपिडीया पाहता येईल. त्यासाठी येथे क्लिक करा


रमेश वेळुस्कर यांचे साहित्य
कविता-
मोरपाखां (1979)
माती (1983)
आंगणी नाचता मोर मोरया (1988)
सावुलगोरी (1989)
हिरण्यगर्भ (1993)
तनरजोती (1999)
घुरू घुरू वारो (2005)
दर्या (2008)
झेन कविता (2014)


बालसाहित्य -
चूचू (2005)
भूकू भूकू भिशू (1980)
कुंडेकुस्कूर (2007)
चाचा नेहरू भुरग्यांचे भेटेक


कादंबरी -
मोनी व्यथा (1976)


ललित गद्य -
मळब कळी (2017)


लेखसंग्रह -
सृजनाच्या अंतरंगांत (2016)


हिंदी कविता -
समुद्र मुद्रिका 


अनुवाद -
अंधेर नगरी (2008)
मूळ हिंदी : भारतेंदु

पांडुरंग पांडुरंग (2014)
संत तुकारामाच्या निवडक अभंगांचा अनुवाद


(याव्यतिरिक्त आणखी पुस्तके असू शकतात. जेवढी शीर्षके निदर्शनास आली तेवढी दिली आहेत.)


समग्र विनोबा संचित


वाचनव्यवहाराची व्याप्ती मर्यादित राहिलेली नाही. वाचन म्हणजे केवळ मुद्रित मजकुराचे वाचन ही संकल्पना आता पुरेशी ठरणार नाही. मुद्रित मजकुराबरोबरच ई- मजकूरही विचारात घ्यावा लागेल. ‘किंडल’ सारखी केवळ ई-पुस्तके वाचण्याची उपकरणेही केव्हाच बाजारात आली आहेत.

या पार्श्‍वभूमीवर ‘विनोबा डॉट इन’ या संकेतस्थळाकडे लक्ष वेधावेसे वाटते.  

विनोबा भावे आणि त्यांच्यावरील तसेच त्यांच्या चळवळीसंबंधी साहित्याचा संग्रह या संकेतस्थळावर करण्यात आला आहे. वाचल्यावर वाटते की या संकलनातून विनोबांसंबंधी काहीच महत्त्वाचे सुटले नसावे. विनोबा भावे यांच्याविषयीचे हे समग्र आणि साक्षेपी, असे संकलन ठरावे.

विनोबा हे २० व्या शतकातले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. निष्ठावंत गांधीवादी म्हणून ते परिचित आहेतच. पण, भूदान- ग्रामदान क्रांतिकारक म्हणूनही ते सिद्ध आहेत. आपल्या जीवनात कृतिशील राहून विविध कार्यक्रम राबवतानाच विपुल असे लेखन त्यांनी सातत्याने केले. त्यांची व्याख्याने, प्रवचनेही आज अक्षर वाङ्मयाचा भाग बनली आहेत.

विनोबांवरही अनेकांनी लेखन केले आहे. त्या वाङ्मयाचे  संकलनही या संकेतस्थळात आढळते. विनोबा यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजे परंधाम प्रकाशन. विनोबा आणि विनोबांच्या विचारधारेशी संबंधित साहित्य प्रकाशनासाठी वाहून घेतलेली ही संस्था. विनोबांच्या साहित्याचे स्वामित्व अधिकारही  तिच्याकडे आहेत. हे संकेतस्थळ परंधाम प्रकाशनाने ‘होस्ट’ केल्याचे व त्याची निर्मिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने केल्याचे दिसते. त्यामुळे या संकेतस्थळाला अभ्यासाच्या दृष्टीनेही अधिकृतता व अस्सलपणा प्राप्त होतो.

या संकेतस्थळावर काय आहे?

१. संस्थेतस्थळ निर्मितीविषयीची व निर्माणकर्त्यांविषयी माहिती.

२. पुस्तकांच्या विभागात विनोबांची पुस्तके तसेच विनोबांवर लिहिलेली. त्यांच्या आणि गांधीवादी अनुयायांनी लिहिलेली पुस्तके दिसतात. परंधाम प्रकाशनाची पन्नासपेक्षा जास्त पुस्तके येथून डाऊनलोड करून संग्रही ठेवणे शक्य आहे.

३. विनोबांच्या जीवनाचा संक्षिप्त आलेख,

४. लेखांचा विभाग आहे. त्यात विनोबांनी लिहिलेल्या, त्यांच्यावर लिहिलेल्या तसेच ‘सर्वोदय’ विचारधारेवरील लेखांचे संकलन आहे.

५. पत्र-पत्रिकांच्या अंकांचा वेगळा विभाग आहे. यात ‘भूदान’, ‘भूदान-यज्ञ’, ‘भूदान-क्रांति’, ‘ग्रामराज’, ‘ग्रामसेवावृत्त’, ‘हरिजन सेवक’, ‘महाराष्ट्र धर्म’, ‘पिपल्स अ‍ॅक्शन’, ‘समयोग’, ‘सर्वोदय सेवक’, ‘विनोबा चिंतन’, ‘विनोबा वृत्त’, ‘विनोबा प्रवचन’ या  पत्र-पत्रिकांच्या दुर्मीळ अंकांचे तारीखवार संच आहेत.

६. मिडिया विभागात विनोबा भावे यांच्यावरील माहितीपटाचे व व्याख्यानांच्या व्हिडिओंचे संकलन आहे.
७. भूदान- ग्रामदान चळवळीविषयीच्या विभागात भूदान कायदे, चळवळीची माहिती, पुस्तके, लेख, कागदपत्रे यांचा समावेश आहे. भूदान ही विनोबांनी सुरू केलेली व स्वतंत्र भारतातील ऐतिहासिक अशी चळवळ ठरावी.

८. ‘गीता प्रवचन’ विभागात विविध भाषांमधील गीता प्रवचनांचा अनुवाद आहे. शिवाय इंग्रजी, जर्मनी, कोरियन, डॅनिश, जपानी, नेपाळी अनुवादही आहेत. ते डाऊनलोड करण्याची सोय आहे. बा. भ. बोरकरांनी केलेला कोकणी अनुवादही आहे. त्याला विनोबांची कोकणीतून प्रस्तावना आहे.

आणखी एक खासियत म्हणजे ‘फोटोबायोग्राफी’. विनोबा जीवन दर्शन त्यातून घडते. भूदान पदयात्रेलाही यात टिपले गेले आहे. गौतम बजाज यांचे हे छायाचित्रण. तेही डाऊनलोड करता येते.

नियोजनबद्ध व विचारपूर्वक असे हे संकलन. विनोबा तसेच भूदान- ग्रामदान चळवळ जाणून घेण्याबरोबरच विनोबा अभ्यासकांनाही साधने उपलब्ध करणारे ते ठरावे. आजच्या माहिती, ज्ञान यांच्या बदलत्या संकल्पनांच्या काळात अशा प्रकारच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देणारे व तत्संबंधी मार्गदर्शन देणारेही हे संकेतस्थळ ठरावे.


संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


निमित्त : ‘मंटो’चित्रपटाचे पोस्टर (इंटरनेटवरून )


एका लेखकाच्या जीवनावर कमर्शियल पद्धतीने चित्रपट बनवला जावा हे दुर्मीळ. अशी दुर्मीळ घटना हल्लीच घडली ती नंदिता दास यांच्या मंटो या सिनेमामुळे. मंटो ही फिल्म प्रदर्शित झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी पाहिली. अवघी काही डोकी थियेटरमध्ये उपस्थित होती. 

फिल्म एन्गेजिंग वाटली. प्रत्येक क्षणात गुंतवून ठेवणारी. फिल्मचे मध्यंतर झाले तेव्हा अस्वस्थ वाटले (अशा फिल्म्सना इंटरव्हल असूच नये मुळी, त्यात सगळी साखळी आणि परिणामच कुठल्या कुठे निघून जातो) आणि फिल्म पाहून बाहेर आल्यानंतर एखादी शास्त्रीय संगीताची मैफल ऐकून बाहेर आल्यासारखे वाटले. 

ही नोंद काही मंटो म्हणजे कोण, त्याचे साहित्य यांचा उहापोह करण्यासाठी लिहिलेली नाही. फिल्म पाहिल्यानंतर काहीतरी लिहावे असे वाटले, इमोशनल झाल्यानंतर अश्रु उचंबळून यावेत तसे शब्द आले, त्यांना वाट मोकळी करणेच इष्ट वाटले. म्हणजे हा या नोंदीचा स्कोप किंवा मर्यादा. आता फिल्म पाहिलेले व मंटोचे साहित्य वाचलेले त्याच्याविषयी आपली मते कायम ठेवण्यास मोकळे आहेत. तसे मंटो ही फिल्म न पाहिलेले, त्याचे साहित्य न वाचलेले, त्याच्याविषयी काहीच माहिती नसलेले असेही त्याच्याबद्दल मते ठेऊन असतीलच. असो.

आता फिल्मबद्दल.

वेगवेगळ्या पैलूंनी या फिल्मबद्दल कोण-कोण सांगू शकतो. हा एक पैलू असेही म्हणता येईल.

ही फिल्म म्हणजे एका गोष्टी लिहिणार्‍या लेखकाची गोष्ट आहे. तो नावलौकीकाला आला आहे. अशावेळी राजकीय परिस्थिती, तो राहतो त्या देशाला स्वातंत्र्य देते, मात्र त्याचबरोबर देशाची फाळणी करते. विभाजन केवळ भौगोलिक राहत नाही. माणसांचीही वाटणी होते. धर्मा - धर्मात लोक ठाकतात. मंटो त्याच्या धर्माचे लोक ज्याबाजून स्थलांतरित झाले आहेत त्या ठिकाणी अपरिहार्यपणे म्हणा हवे तर पण स्थलांतर करतो. तिथे त्याला तथाकथित ‘सभ्य चाली-रिती’ व नैतिकतेशी लढा द्यावा लागतो. स्वत:शी झगडणे आणि इतरांशी झगडणे यात मंटो खंगत खंगत जातो... (मंटोला ब्रिटिश भारतात व नंतर पाकिस्तानमध्ये अश्लीलतेच्या आरोपावरून कोर्ट खटल्याना सामोरे जावे लागले होते )

मंटो म्हणजे सदाअत हसन मंटो. मंटो सारख्या लेखकांना विरोध भलेही होवो. मात्र अशा लेखकांना वगळून त्या भाषेतील साहित्याचा इतिहास प्रामाणिकपणे सिद्ध करता येत नाही.

पण मंटो जगत जातो एखाद्या कादंबरीसारखा आणि विणत जातो गोष्टी-कथानके. आपल्या समकालाचा आवाज बनून आपल्या लिहिण्यातून व्यक्त होतो.  सभ्यपणाचे आवरण घालून वावरणारा आणि आपल्या सभ्यपणाच्या निकषांशी न जुळणारे सर्व काही दाबून ठेवण्याचा प्रयत्न करणारा वर्तमानाचा एक प्रवाह. ज्याला मंटो खुले आव्हान देतो. मंटो सारखे लेखक खरे तर हे आवरण काढत नाहीत. पण आवरणात असलेल्या गोष्टींचा फक्त शोध घेतात.  पण तरीही त्यांना अनेकांशाी सामना करावा लागतो. अदृश्यपणे, बेमालूमपणे माणूसपणाचे होणारे खून - erosion of human dignity  - टिपणारे त्यांचे पेन हेच अनेकांना एक हत्यार दिसू लागते. सत्य सांगण्याची त्यांची कलाच त्यांच्याबद्दलच्या असूयेचे कारण ठरते. पण यातूनच घडत जातात समकालाचे, वर्तमानाचे दस्तऐवज. 'मंटो ' ही एक संकल्पना होऊन जाते. मंटोच्या कथा या एका काळाचे दस्तऐवजच आहेत. त्याच्या कथा फॅक्ट आणि फिक्शनच्या रेषा धूसर करतात. अकृत्रिम लिहिणेही कलात्मक होऊ शकते हेही मंटो  वाचून समजू शकते. त्याचबरोबर अशा सिमारेषा ओलांडणारे आणि अकृत्रिम लेखन करणे सोपे नसते - कलात्मक व इतर पातळींवर हेही काहीसे कळू लागते. 

मंटो फिल्मबद्दल एकंदरित बोलावे तर हा सादत हसन मंटो याच्या 42 वर्षांच्या जीवनापैकी 4 ते 5 वर्षांचा घेतलेला हा वेध आहे. सिनेमातील घटनांनुसार साधारण 1947 ते 1951-52 पर्यंतचा काळ दिसतो. मंटोचे  आयुष्य 1912 ते 1955 असे होते. मंटोने पत्रकारिता केली, बॉलीवूड सिनेविश्‍वात काम केले. मात्र फिल्म ही मंटो लेखक म्हणून काय होता याचा अंदाज सिनेमातून येतो. कदाचित सिनेकर्त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एखाद्या लेखकाचा संघर्ष हा दृष्टीकोन ठेवायचा असावा म्हणून असे केले असावे. त्यादृष्टीने मंटो फिल्म ही वर्तमानासंबंधात एक statement  म्हणूनही पाहिली जाऊ शकते. प्रेक्षक मंटोबद्दल माहिती असलेला असेल असेही गृहित असावे कदाचित. पण थोडा विस्तार झाला असता तर ‘एकूण मंटो’चा अंदाज, निदान outline मिळाली असती. मंटोबद्दलचे कुतूहल त्यामुळे वाढू शकले असते. पण विस्ताराने depth  गमावली जाण्याचा धोका असतोच. मात्र मंटोबद्दल ब्लॅंक असणाऱ्याना फिल्म पाहिल्यानंतर त्याला वाचावे असे वाटावे.

मात्र त्याचे जगणेे आणि लिखणे हे कसे समरस होते हे मात्र ज्याप्रकारे सिनेकर्त्यांनी त्याचे जीवन व कथा गुंफल्या आहेत त्यातून दिसते.

मला नेहमीच एक प्रश्‍न पडायचा म्हणजे मुंबईवर जीव जडवणारा मंटो असा उठून पाकिस्तानात स्थलांतरित का झाला असावा. त्याबद्दल थोडेसे फिल्ममध्ये आले आहे, ते असे :
मंटो आपल्या पेनातून सक्तपणे व्यक्त होत असला तरी स्वभावाचा हळवा. लहान सहान गोष्टी मनाला लावून घेण्याची सवय. देशाच्या विभाजनानंतर एकूणच देशात स्थिती तणावजनक बनते. धर्म डोक्यात गेलेली माणसे एकमेकांसमोर ठाकतात. दरम्यान, मंटोची पत्नी व दोन लहान मुली या पाकिस्तान बनणार असलेल्या ठिकाणी नातेवाईकांकडे रवाना झालेल्या असतो. दंगली उग्र बनत जात असतात. (धार्मिक तणावाचे मंटोच्या कथानकातून येणारे चित्रण त्याच्या त्यावेळच्या स्थितीचा अंदाज देऊ शकते.) अशाच वेळी त्याचा मित्र अभिनेता शाम रागात बोलून जातो की एका धर्माच्या  लोकांना मारून टाकावे असे त्याला वाटत आहे. मंटो म्हणतो की तोही त्याच धर्माचा आहे, मग तो त्यालाही मारेल का. त्यावर मित्र तेही संभव असल्याचे बोलून जातो. त्यानंतर तात्काळ बॉम्बे म्हणजे मंटो इतके समीकरण मांडणारा तो शहर सोडून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतो. कदाचित माणसामाणसांत धर्माने तयार केलेले हे तेढ किती खोलपर्यंत पोचले आहे याचा अंदाज त्याला आला असावा. पण नंतर मात्र या निर्णयाचा त्याला पश्‍चाताप झाला असावा असे दिसते. ज्याच्या बोलण्याने तो देश सोडतो तो अभिनेता श्याम लाहोरला आला असता तो त्याला भेटायला जातो असे फिल्म दाखवते. चित्रपटाचे विभागून दाखवलेले शीर्षकही बरेच काही सांगणारे वाटते. 


तो दारू पित असतोच पण अचानक दारू त्याला पिऊ लागते. हेही त्याचा शेवट नजदीक घेऊन येण्याचे एक प्रमुख कारण ठरते. एका दारुच्या गुत्त्यावर ‘मंटो’च्या तोंडचा संवाद असा आहे - माणूस हा दारू दु:ख विसरण्यासाठी पितो तसा आतला आवाज दाबण्यासाठीही पीत असतो. 

त्याच्यावर एका कथेमुुळे अश्‍लीलतेचा खटला चालतो त्यावेळी कोर्टासमोर आपल्या जबानीत तो म्हणतो -

“सवाल यह है की... जो चीज जैसी है, उसे वैसेही पेश क्यूँ ना किया जाए ? मै तो बस अपनी कहानियों को आयिना समझता हूँ, जिसमें समाज अपने आप को देख सके ।’’

एकदा मित्रांच्या गोतावळ्यात वादविवाद सुरू असताना तो म्हणतो - 
“अगर मेरे अफसानों को बर्दाश्त नहीं कर सकते, इसका मतलब है जमाना ही नाकाबिले बर्दाश्त है।’’

सांप्रदायिक दंगलींच्या पार्श्‍वभूमीवर एका संमेलनात त्याचे बोलणे लक्ष वेधून घेते -
“सब पिछे देख रहें है, लेकीन आज का कातिल लहू से, लोहे से तारीख लिखता जा रहा है ।... मैं  आर्टिस्ट हूं , ओंझे घाव और भद्दे जख्म मैं बर्दाश्त नहीं  कर सकता '' 

चित्रपटात मंटो एकदा तीन आपल्या तीन लघुत्तम कथा वाचून दाखवताना दिसते. या तीन कथा येथे अनुवादित करण्याचा प्रयत्न करतोय :

1. तक्रार

काय मित्रा, काळाबाजाराच्या दरात दिलेस
पण इतके रद्दी पेट्रोल दिलेस
एक दुकानही जळू नाही शकले.


2. आरामाची गरज

‘मेला नाही- पहा, अजून जीवंत आहे’
‘असू देत यार - मी एकदम थकलोय’


3. सॉरी

सुरी पोट फाडत 
बेंबीच्या खाली पोचली.
विजार सुटून पडली.
सुरी चालवणाऱ्याच्या तोंडातून 
अचानक क्षमायाचनेच्या स्वरात शब्द आले -
‘च-च-च-च, मिश्टेक !’


ही नोंद लिहिता लिहिता लक्षात आले की काही वर्षांपूर्वी आकार पटेल यांनी अनुवादित आणि संपादित केलेल्या why I write and other essays या मंटोच्या निबंधस्वरूप लेखन संकलनातील लिहिण्याबद्दलच्या निबंधाची मी नोंद करून ठेवली होती. त्यातील निवडक भाग खाली देत आहे. स्वत: मंटोने त्यात आपल्या कथालेखनाबद्दल म्हटले आहे - 

“...मी माझ्या खोलीत सोफ्यावर कागदांचा गठ्ठा घेऊन बसतो आणि माझे पेन लिहिते करतो. माझ्या मुली यावेळी त्याच खोलीत खेळत असतात. त्यांच्याशीही गप्पा सुरू असतात. कधी कधी त्यांची भांडणेही सोडवतो. इतक्यात कोणीतरी अतिथी येतो. तेव्हा त्याचा पाहुणचार करण्यासाठी मी यजमान होतो. गप्पा-टप्पा होतात. पण हे सगळे सुरू असतानाच, माझे लिहिणेही सुरूच असते...’’

“...मी प्रयत्न करतो गोष्टी लिहिण्याचा. बैठक मारतो. एका मागोमाग एक सिगरेट पेटवत राहतो. पण काहीच येत नाही.
मी थकतो आणि पडून राहतो निपचित, एखाद्या काम करून शीणलेल्या स्त्रिसारखा, न लिहिलेल्या गोष्टींच्या थकव्यामुळे पार कोलमडून. मग मी उठतो आणि इतर कामांकडे लक्ष वळवतो. चिमण्यांना दाणे घालतो, मुलींसोबत खेळत बसतो. त्यांच्या घरभर विखुरलेल्या इवल्या इवल्या चपला शोधतो, जमवून एकत्र ठेवतो.
माझ्या खिशात पडलेली गोष्ट मात्र कशीच डोक्यापर्यंत येत नाही. ...’’ 

“...आणि ज्यावेळी मी सगळ्या कल्पनांकडून पराजित होऊन पडलेला असतो त्यावेळी माझी पत्नी, जी आमचे सर्व खर्च चालवते, ती मला दाटावते :
आता कृपया विचार करणे बंद करा आणि लिहिणे सुरू करा.
मग मी फाऊंटन पेन उचलतो आणि सहज काही ओळी बिरकवतो. माझा मेंदू अजून रिकामीच असतो - पण माझा खिसा भरलेला.
आणि बघता बघता जादू झाल्यागत एक परिपूर्ण गोष्ट अवतरते.
हे पाहता, मी लेखकापेक्षा खिसेकापू आहे, असे दिसते. जो स्वत:चा खिसा कापून जे हाती येईल ते तुम्हाला देतो....’’

सदाहत हसन मंटो (विकिपेडियावरून )