स्वातंत्र्य चळवळीला व्यापून उरलेले गांधीही समजत गेले तसतसे त्यांचे व्यक्तिमत्व आणि विचार समजूून घेण्याचे माझे कुतूहल वाढत गेेले. गांधी हा संदर्भ अजूनही आहे त्याचे कारण म्हणजे ‘गांधी’ हा एक विचार आहे. असा विचार जो अनुभवता येऊ शकतो.
गांधी म्हटल्यानंतर लगेच ज्या काही गोष्टी आठवतात त्यापैकी एक म्हणजे आश्रम. विदर्भात जाणे झाले तेव्हा सेवाग्राम आश्रम पाहायचे मी निश्चित केले.
या आश्रमचाच्या स्थापनेसंबंधी माहिती वाचली होतीच. पुन्हा एकदा त्याचा होमवर्क म्हणून उजळणी केली.
महात्मा गांधींनी 1930च्या दशकाच्या सुरूवातीला राजकारणातून निवृत्तीची घोषणा करत गावात जाऊन विधायक कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ते वर्ध्याला आले व अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाचे काम करू लागले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गो-सेवा, चर्मोद्योग, मातीकाम, मधमाश्यांचे पालन, तेलाचे घाणे, गूळ तयार करणे असे भारतीय पारंपरिक उद्योग सुरू झाले. भारतातील पारंपरिक लघुउद्योगांना बळकटी देऊन भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत बनविण्याचा त्यांचा मानस होता. याचबरोबरीने आपल्या ‘ग्राम’निर्माणाचे प्रात्यक्षिक म्हणून त्यांनी ‘सेवाग्राम’चे कार्य हाती घेतले. या गांधींच्या ‘सेवाग्राम’मधील वास्तव्यातून ‘सेवाग्राम आश्रम’ बनला.
सेवाग्राम आश्रमाच्या व्यवस्थापनाच्या मदतीमुळे दोन दिवस आश्रमात राहिला. त्यामुळे आश्रम जवळून अनुुभवता आला.
आश्रमातील गांधींची कुटी हे गांधींच्या विचारांचे एक जीवंत स्मारक वाटले. एक पवित्र आणि पावन झालेली ऐतिहासिक वास्तू.
साधेपणा आणि ’अपरिग्रही’ रचना यांचे एक उदाहरणच ही कुटी आहे. एका छोट्याशा चौथर्यावर उभारलेली मातीच्या भिंतींची तीन छोट्या खोल्यांची ही वास्तू आहे. त्यातील जमीन शेणाने सारवलेली. गांधीजी या कुटीत जमिनीवर बसून सर्व व्यवहार करायचे. देशाच्या चळवळीतील मोठमोठे धुरीण या कुटीत गांधींबरोबर जमिनीवर बसले आहेत. लेखनाच्या कामासाठी छोटासा डेस्क, कंदील, चरखा अशा अगदी आवश्यक वस्तू वगळल्यास या कुटीत काहीही नाही. कुटीत शौचालयासाठी करण्यात आलेली आधुनिक पद्धतीची व्यवस्था व साप पकडण्याचा पिंजरा यांनी लक्ष वेधून घेतले. गांधीजी या कुटीत सर्व दारे उघडी ठेवून झोपायचे, कधीकधी बाहेरच्या छोट्याशा व्हरांड्यातदेखील ते झोपायचे, अशी माहिती मिळाली.
माणसाला किती जागा हवी, किती वस्तू हव्यात ? हा प्रश्न कुटी पाहताना माझ्या मनात जागा झाला. केवळ दर्शनाने माणूस अपरिग्रही बनावा अशाप्रकारे सिद्ध झालेली ही कुटी आहे.
गांधीजींसाठी ही कुटी बनविण्यात आली त्याआधी ते (जवळच पाहता येते त्या) ‘आदि निवास’ संबोधले जाते, त्या वास्तूत राहायचे. ‘आदि निवास’च्या बांधकामाविषयीही गांधींनी त्या काळात अट घातली होती. पाचशे रुपयांमध्येच कुटीचा सर्व खर्च करावा व बांधकामासाठी आश्रमाच्या साठ-सत्तर किलोमीटरपर्यंत मिळणारी सामग्रीच वापरली जावी. हे बांधकाम म्हणजे खरे तर एक ‘स्वदेशी’चा संस्कार वाटला. ‘आपल्या जमिनी’त मुळे घट्ट असणार्या वृक्षात महाकाय बनण्याची संभावना असते.
गांधीजी यायच्या अगोदर ‘सेवाग्राम’चे नाव शेगाव होते. वर्ध्याहून या गावात जाण्यासाठी रस्ताही नव्हता. 1936 साली जेव्हा गांधीजी वर्ध्याला पोचले तेव्हा ते चालत या शेगावपर्यंत गेले होते. तेव्हा हा गाव जंगलसदृश्य होता. सर्वत्र सापांचा संचार होता. पोस्ट ऑफिसची सोय नव्हती. खून, चोर्यांचे किस्से सर्वत्र ऐकायला मिळत.
गांधीजी सेवाग्राममध्ये राहायला आले तेव्हा त्यांचे वय 67 होते. मात्र त्यांच्यात कमालीची ऊर्जा होती. ते नित्य पहाटे 4 वा. उठायचे व रात्री 9.30 ला झोपी जायचे. कितीही व्यस्त असले तरी जेवण, प्रार्थना यांबाबतीत ते काटेकोर असत. या काटेकोर वेळापत्रकातून राजकीय चर्चा करण्यासाठी येणार्यांना ते जसा वेळ देत तसेच गावातील रोगट वातावरणात आजारी पडलेल्या आश्रमवासीयांची सेवाही ते स्वत: करत. परचुरे शास्त्रींना कुष्ठरोग झाल्याचे निष्पन्न झाले तेव्हा स्वत: गांधींनी त्यांची सेवाग्राम आश्रमात सेवा केली. या रोगाबाबतची घृणा दूर करण्याची दृष्टीही त्यामागे होती.
आजही गांधींच्या संकल्पनेतून आश्रम चालविण्याचा प्रयत्न केला जातो.
सकाळी 4 वा. उठतात. 4.45 च्या दरम्यान बापूंची कुटीत प्रार्थना होते. त्यानंतर 6.30 पर्यंत अध्ययन-अध्यापनासाठी वेळ असतो. नंतर तासभर श्रमदान होते. 7.30 ते 8 पर्यंत नाष्टा, नंतर कृषिकाम, 11 वा. जेवण, दुपारी 12 ते 2 पर्यंत विश्रांती, 2 ते 2.30 पर्यंत सामूहिक सूतयज्ञ, 3 ते 5 पर्यंत अध्ययन, 5 वा. भोजन, 6 वा. सायंप्रार्थना, 6.30 ते 9 मुक्त वेळ आणि 9 वा. झोपायची वेळ असते.
सध्या आधुनिक जीवनशैली जगणार्यांना हे वेळापत्रक बरेच आश्चर्याचे वाटेल. मी येथे राहिलो त्या काळात या वेळापत्रकाप्रमाणचे वागत होतो. प्रयत्न केल्यास व समविचारी लोकांचा सहवास असेल तर चांगल्या सवयी लावून घेतल्या जाऊ शकतात, असा माझा अनुभव होता.
स्वयंपाकखोली हीसुद्धा आश्रमाचा एक विशेष आहे. गांधींच्या काळात होती तशीच तिची रचना ठेवण्यात आली आहे. ‘अस्वाद’ हे गांधींच्या आश्रम-व्रतांपैकी महत्त्वाचे व्रत होते. जेवण शरीरासाठी पोषक असावे; जीभेचे चोचले पुरविण्यासाठी नव्हे! ही त्यांची भूमिका होती. अन्न जेेेवढे आवश्यक आहे तितकेच घेतले जावे, त्याची नाशाडी करू नये असे ते सांगत. मला नेहमी वाटते. भूक दोन प्रकारची असते. एक पोटाची आणि दुसरी जीभेची.
येथे जेवायला बसणारा स्वत: आपले ताट घेतो, हवे तेवढेच अन्न घेऊन जेवतो आणि स्वत:चे ताट स्वत: धुवून पुन्हा जाग्यावर ठेवतो.
आश्रमातील संध्याकाळी होणारी प्रार्थना हा एक अनोखा सोहळा असतो. बापूंच्या कुटीसमोर त्यांनी लावलेल्या झाडाच्या सावलीत तिन्हीसांजेच्या संधिकाळात ही प्रार्थना सुरू होते. ही प्रार्थना म्हणजेसुद्धा एक अनोखा प्रयोग होता. सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन सगळ्या धर्मांच्या येथे प्रार्थना म्हणतात. सर्वधर्मसमभाव व विश्वबंधुत्वाचे ते आगळे उदाहरण ठरावे. प्रार्थना ही जीवनात आत्मबलासाठी आवश्यक असल्याचे गांधीजी मानायचे. त्यांच्या जीवनातील तो एक अपरिहार्य भाग त्यांनी बनवला होता. वैश्विक सत्याशी स्वत:ला जोडण्याचे प्रार्थना हे त्यांच्यासाठी साधन असावे. आणखी एक गोष्ट प्रार्थनेवेळी मला जाणवली- ही प्रार्थनासुद्धा धर्मभेदाविरुद्धची आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची एक ‘सत्याग्रही’ लढाईच होती.
आश्रमातील आणखी दोन गोष्टी आश्रमाचे व्यवस्थापक विनोदभाई यांनी दाखवल्या. त्या दोन गोष्टी म्हणजे तालीम शाळा आणि ग्रामन्यायालय. ग्रामन्यायालयात शहरातील दंडाधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकारी महिन्यातील ठरलेल्या दिवशी येतात व गावातील प्रकरणांचा गावात निपटारा केला जातो. त्यासाठी गावातल्या लोकांना शहरात जावे लागत नाही.
‘नई तालीम’ हा शिक्षणासंबंधी गांधींचा महत्त्वाचा उपक्रम होता. त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही शाळा चालवली जाते. शाळेत शैक्षणिक विषयांबरोबरच श्रमाच्या कामांविषयी मुलांच्या मनात आदर निर्माण करण्याचा संस्कार बिंबवला जातो. सुतकताई, बागकाम तसेच काही हस्तकलाही त्यांना शिकवल्या जातात. मी तेथे छोट्या मुलांनी बनवलेली सुरेख बाग पाहिली. प्रत्येक मुलाला छोटी छोटी जागा देण्यात आली होती. त्या जागेत प्रत्येक मुलाच्या नावाचा फलक होता. त्यात त्याने आपल्या आवडीची फुलझाडे वगैरे लावायची व त्यांची काळजी घ्यायची अशी ती संकल्पना होती. हा एक सुंदर प्रयोग वाटला.
आश्रमात असताना एकाने मगन गांधी संग्रहालय पाहण्याचा सल्ला दिला. स्वत: महात्मा गांधींनी सुरू केलेले हे संग्रहालय आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चरखे यांचे एक दालन आणि लघुद्योग, कुटीरोद्योग यांच्या प्रदर्शनाचे एक दालन अशी या संग्रहालयाची रचना आहे. संग्रहालय पाहताना महात्मा गांधींचे ग्रामरचनेबाबतचे विचार किती ‘प्रॅक्टिकल’ होते व गांधी किती उद्ममशील होते याची प्रचिती येते.
मगन संग्रहालयात गांधींचे आर्थिक सल्लागार जे. सी. कुमारप्पा यांचे ‘इकोनॉमी ऑफ पर्मनन्स’ हे पुस्तक दिसले. ते विकत घेतले. संध्याकाळ्ी पुस्तक चाळताना वाटले यावर एक सविस्तर नोंद लिहायला हवी. स्वत: महात्मा गांधींची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक आहे. दोन भागातील या पुस्तकात एका पर्यायी अर्थव्यवस्थेचे संकल्पना चित्र या पुस्तकात उभे केले आहे. माणसाच्या तुलनेत निसर्ग शाश्वत असल्याचे नमूद करून निसर्गातील वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक रचनांबद्दल सांगताना कुमारप्पा यांनी ‘सेवेचे अर्थकारण’ सर्वोच्च असल्याचे सांगून त्याला पायाभूत मांडून आर्थिक व्यवस्थेची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे पुस्तक चाळताना लक्षात आले. कुमारप्पा म्हणतात - The object of the present quest is to relate our spiritual and higher self back to life so that the daily routine of mundane existence may be regulated in accordance with the dictates of our better self ... An effort is made here to bring all walks of life into alignment with the universal order.
‘सेवाग्राम’ महात्मा गांधींसाठी एक प्रयोगशाळा होती. ‘सेवाग्राम’च्या माध्यमातून माझा संदेश देशाच्या जनतेत चांगल्या तर्हेने जाऊ शकेल,’ असे गांधी म्हणायचे. काय होते हे प्रयोग? गांधी सेवाग्राममध्ये आले होते ते दोन उद्देश घेऊन- ग्रामविकासाचे एक आदर्श उदाहरण उभे करण्यासाठी आणि सेवेेच्या शक्तीतून आत्मोन्नतीचा प्रयोग करण्यासाठी.
दक्षिण आफ्रिका आणि साबरमतीपेक्षा सेवाग्रामचा प्रयोग वेगळा होता. सेवाग्राममध्ये पूर्ण गावच एक आश्रम बनणार होता, जेथे माणून स्वत:चा विकास साधण्यासाठी प्रयोग करणार होता.
आदर्श गावाची एक कल्पना गांधींनी तयार केली होती. हे गाव स्वयंपूर्ण असतील. प्रत्येक गाव आपणासाठी लागणारे अन्नधान्य स्वतः पिकवेल, मुलांसाठी व प्रौढांसाठी खेळाचे मैदान असेल. अतिरिक्त जागा शिल्लक राहिल्यास तंबाखू, अफू यांसारखे पदार्थ सोडून अन्य मिळकतीची पिके घेतली जातील. गावात प्रेक्षागृह, शाळा, सार्वजनिक सभागृह असेल. गावातल्या लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी मुबलक साठे असावेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे. गावातील शक्यतो प्रत्येक सार्वजनिक काम हे सहकारी तत्त्वाने केले जावे. या गावातील व्यक्ती ही कायद्याचे पालन करणारी असावी. अशा या गावातील लोकांची जीवनशैली ही साधी आणि उद्यमशील असावी व त्यादृष्टीने उत्पन्न आणि जीवनमानातील दरी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. आळस, अस्वच्छता यांना गांधींना हाकलवून लावायचे होते. बेरोजगारी मिटविण्यासाठी हजारो बेरोजगार हातांना काहीतरी व्यवसाय हवा अशी त्यांची भूमिका होती. यासाठी खादी-ग्रामोद्योगाचा पर्याय त्यांना योग्य वाटत होता.
श्रम, चिंतन, प्रार्थना, सेवा, सहकार्य आणि साहचर्य अशा मुद्द्यांवर आधारित गांधींची ही आश्रमशैली एक अनोखी वाटली. सेवाग्राम म्हणजे आत्मोन्नतीची एक प्रयोगशाळा वाटली. प्रत्येकाने आपापल्यात ‘सेवाग्राम’ वसवले पाहिजे. सध्या आपल्या खाण्या-पिण्याचा व एकंदरच आपल्या जीवनशैलीचा अजेंडा जाहिराती आणि वस्तू उत्पादक ठरवू लागले आहे. आपण विचार करायचे थांबवले आहे की आपली विचार करण्याची शक्ती हायजॅक होत आहे असे कधी कधी वाटू लागते. एक अदृश्य वसाहतवाद आणि गुलामगिरीच्या दिशेने आपण जात आहोत की काय असा प्रश्न पडतो. या पार्श्वभूमीवर स्वत:ला शोधण्यासाठी, स्वत:ला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून विकसित करण्यासाठी, एका मूल्याधिष्ठित आणि नैतिक जीवनाच्या साधनेसाठी सेवाग्राम एक आश्वासक प्रेरणा वाटली.
सेवाग्राम आश्रमातून बाहेर पडताना काही गोष्टींची जाणीव घेऊन बाहेर पडलो होतो -
एक : जीवन साध्या पद्धतीने जगूनही महान बनवता येते. वा असेही म्हणता येईल की महान जीवन साध्या पद्धतीने जगता येऊ शकते.
दोन : जीवन साधे असले तरी त्याला एक शिस्त हवी. एखादा गायक जसा सुरांचा मान राखून एखादा राग सर्जनशीलपणे उभा करतो तसे जीवन जगता आले पाहिजे.
तीन : जीवनाला आकार येण्याची एक महत्त्वाची पायरी म्हणजे स्वावलंबन. आणि हे स्वावलंबन किमान गरजा राखून आणि संपूर्ण अपरिग्रह शक्य नसला तरी किमान संग्रहाचे तत्त्व पाळून आणि उद्यमशील वृत्तीने साध्य केले जाऊ शकते.
आपल्या गरजा कमीत कमी असाव्यात यापासून ते साधेपणा, आपले जेवण आपण बनविण्यास शिकणे, मौनव्रत, उपवासांपर्यंत अनेक प्रयोग मी गांधींच्या प्रेरणेतून केले.
सेवाग्रामला अनेक गोष्टी पाहिल्या व समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यातून गांधी नावाचा विचार अधिक दृढ झाला. अनेकदा असेही प्रसंग अनुभवले की जिथे गांधी विचारांपुढे माझ्या मर्यादाही लक्षात आल्या पण प्रमाणिकपणे त्या मर्यांदापलिकडे जाण्याचा माझ्यापातळीवर मी प्रयत्न करत राहिलो आहे.
माझी सही मी देवनागरी लिपीतून करायला सुरूवात केली साधारण वयाच्या 15व्या वर्षांपासून असेल, त्यावेळी गांधीजीच मनात होते.
सेवाग्राम अनुभवल्यानंतर वाटले की आधुनिकीकरणाच्या नावाखाली चालू झालेल्या धुमाकुळाचा सामना करण्यासाठी -आश्रम -हे उत्तर होऊ शकेल का?
सेवाग्राम आश्रमात बापू कुटीत लेखक |
Comments
Post a Comment