एका ‘काव्याग्रहा’ची गोष्ट


काही गोष्टी कशा तुमच्यापर्यंत पोचतील सांगता येत नाही. ‘काव्याग्रह’ या कविताविषयक नियतकालिकाचे अंक आणि त्याचे संपादक विष्णू जोशी यांचा परिचय माझ्यापर्यंत असाच अचानकपणे पोचला. चांगले लिहिणार्‍यांइतकाच चांगले साहित्य लोकांपर्यंत पोचवणाराही साहित्यक्षेत्रातील महत्त्वाचा घटक असतो. चांगली नियतकालिके नेहमीच समकालीन साहित्याचा आरसा बनून वावरली आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक लेखक पुढे येऊ शकले. विष्णू जोशी व त्यांच्या ‘काव्याग्रह’ कवितेची संस्कृती लोकांत रुजविण्यासाठी धडपडणारे कवितेचे असेच एक समर्पित कार्यकर्ते आहेत. जोशी यांचा ‘काव्याग्रह’ कसल्या व्यावसायिक गरजेतून तयार झाला नाही, त्यामागे प्रेरणा आहे ती कवितेची मशाल पेटती ठेवण्यासाठीची व सर्वदूर पोचवण्याची. आणि या नियतकालिकाइतकीच वेगळी आहे ‘काव्याग्रहा’मागची कहाणी.
महाविद्यालयीन जीवनातच कवितेसाठी काही तरी करायचे असा विचार पक्का झाला होता. विष्णू जोशी यांच्या डोक्यात, मनात कवितेने ठाण मांडले होते. नियतकालिकाची संकल्पनाही त्यावेळीच आकार घेत होती. ‘काव्याग्रह’ हे नावही त्याच दरम्यानच्या काळात तयार झाले. तोपर्यंत जोशी बी.एड्.मध्ये प्रवेश घेते झाले होते व अभ्यासक्रम चालू होता.
पण खरा कलावंत हा निष्ठावंतही असतो. जोशी कलाविश्‍वात मंतरून गेले होते. शेवटी एक मोठा धाडसी निर्णय झाला. बी.एड्. शिक्षण अर्धवट सोडून देण्याचा व ‘काव्याग्रह’साठी वाहून घेण्याचा. सुरुवातीचे दिवस त्यांच्यासाठी ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असेच होते. लोक त्यांना मूर्खात काढू लागले. अनेकांनी पाठ फिरवली. नाहीतरी आपल्याकडे साहित्य हा फावल्या वेळेतील व्यवहार असे अनेकजण समजतात. घरचेसुद्धा रागावले होते. तो टोकाचा राग साधारही होता. एम.ए.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर बी.एड्. पूर्ण केले असते तर चांगली नोकरी मिळू शकली असती. पण सगळ्याच जणांना डोक्याने निर्णय घ्यायला जमत नाही. विष्णूही मनाच्या वाटेनेच गेले. ठाम राहून आपल्या वाटेने चालत राहिले....
बर्‍याच धडपडीअंती व मित्रांच्या मदतीने २०१० साली त्यांचा पहिला ‘काव्याग्रह’चा अंक प्रकाशित झाला. त्या अंकाचे चांगले स्वागत झाले. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पुन्हा बदलू लागली. या वाटेने आर्थिक स्थैर्य, मोठी कमाई नाही; मात्र तरीही ‘काव्याग्रह’ घेऊन पुढे जाण्याचे त्यांनी नक्की करून टाकले आहे. या कार्यात आता विष्णू यांचे मोठे बंधू विठ्ठल जोशी तसेच तेथील स्थानिक डॉ. वसंत घुनागे व त्यांच्या पत्नी डॉ. नीलिमा साथ द्यायला पुढे आल्या आहेत, शिवाय मित्रांचीही मोठी साथ आहेच.
अंक सुरू करायचा असे ठरवले तेव्हा पहिल्या अंकाच्या मांडणीसाठी सहा महिने लागले. चांगल्या मराठी कवितेचा शोध घेणे, ती लोकांपर्यंत पोचवणे, नव्या दमाच्या कवींच्या पाठीशी राहणे, त्यांचे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनपर लेखनातून उद्बोधन करणे असा त्यांचा उद्देश होता. आजही ‘काव्याग्रह’कडे स्वत:हून येणार्‍या साहित्यावर संपादक जोशी निर्भर राहत नाहीत. एखादा चांगला कवी लक्षात आला तर त्याचा शोध घेतला जातो, त्याचे साहित्य विनंती करून मागून छापले जाते. आलेल्या साहित्याचा कस तपासण्यासाठी जोशी व त्यांचे इतर मंडळ, रसिकमित्र यांच्यात चर्चा होते. अशा प्रकारे त्रैमासिकाचा अंक बांधला जातो.
‘काव्याग्रह’ सुरू झाल्यानंतर या कवींना पुस्तकरूपाने स्थान मिळायला हवे, असा विचार जोशी यांच्या मनात आला. त्यातून प्रकाशन व्यवसायात उतरायचे ठरले. आतापर्यंत त्यांनी ७ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांपैकी ३ कवितासंग्रह आहेत. या प्रकाशनांना सहा पुरस्कारही लाभले आहेत.
जोशी यांचे मत बनले की लोक कविता वाचत नाहीत, कारण चांगली कविता त्यांच्यापर्यंत पोचत नाही. वाचकांच्या मर्यादा जाणवतात. नियतकालिकात एखाद्या नव्या किंवा नावाजलेल्या कवीची कविता भावते. त्याच्या आणखी कविता वाचाव्याशा वाटतात. मात्र त्याच्या साहित्यासंबंधी आपल्याला माहिती नसते. यासाठी विष्णू जोशी यांनी मध्यंतरी एक उपक्रम राबवला- ‘साहित्य वितरण सेवा’ नावाचा. म्हणजे तुम्ही कवीचे केवळ नाव सांगा, त्याच्या पुस्तकांची माहिती दिली जाईल. इतकेच नव्हे तर तुम्हाला हवे असलेले त्याचे पुस्तकही घरपोच पाठवले जाईल. या उपक्रमास बर्‍यापैकी प्रतिसाद लाभला.
सध्या जोशी यांनी ‘काव्याग्रह’ अधिक सकस करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. विदर्भाबरोबरच महाराष्ट्रभराच्या नव्या कवींना यात सामावून घेणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. कवितेचा आवाज बुलंद करण्याचा, चांगल्या कवितेची अभिरूची निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. जोशी आता ३२ वर्षांचे आहेत. मी सहज म्हटले, ‘तुम्ही आज मागे वळून पाहता तेव्हा निर्णय योग्य वाटतो का?’ तेव्हा त्यांचं उत्तर होतं- ‘आजही मी निर्णयाशी ठाम आहे, संघर्ष जारी आहे आणि त्यातून आनंदही मिळत आहे.’
‘काव्याग्रह’चा अंक पाहिल्यावर या नियतकालिकामागील भूमिका लक्षात येते. अंकाचे अंतरंग कविताभिमुख आहेत. प्रस्थापितांपेक्षा नव्या कवींना स्थान, त्यांच्या नव्या काव्यसंग्रहांची परीक्षणे यातून दिसतात. असे असले तरी मान्यवर कवींच्या महत्त्वाच्या काव्यसंग्रहांवर समीक्षाही छापलेल्या आहेत. शिवाय कवितेसंबंधी मार्गदर्शनपर लेखही देण्यात आले आहेत. अंकातील प्रतिक्रियात्मक पत्रांवरून रसिकजनांत ‘काव्याग्रह’ तयार करीत असलेले आपले स्थान लक्षात येते. विशेष म्हणजे अंकात साहित्यासंबंधी नसलेल्या जाहिराती नाहीत. ज्या साहित्यासंबंधी जाहिराती आहेत त्यांपैकी बहुतेक कवितेशी संबंधित आहेत. ‘काव्याग्रह’वर वर्ष व अंक दर्शविणार्‍या ठिकाणी ‘अंक अमुक’ असे संबोधण्यापेक्षा ‘वृक्ष अमुक’ असे म्हणून प्रत्येक अंकाची ‘लागवड’ करण्याची अभिनव रीत त्यांनी सुरू केली आहे.
‘काव्याग्रह’च्या दिवाळी २०१३ अंकातील काही कवितांची-कवितेतील ओळींची उदाहरणे द्यावीशी वाटतात -

जीवन फुकुशिमेचे वैभव
फिनिक्सची एकाकी धडपड
मेंदूवर फुग्याच्या आकाराची सूज
एखादी आशेची तिरीप चमकल्यास
झोंबून पडतात सारेच
शोषणासाठी.
ओल्या लाकडांच्या धुरात गुदमरावे
तसा गुदमरतो जीव

- गजानन शिले
--------

मोबाईलच्या कोंबडा रिंगटोनने 
जागे होणारे गाव
पार डुंबून गेलंय
केबल, डिश टिव्हीच्या फ्रिक्वींसीमध्ये
गाव करते रवंथ
गत पिढ्यांचा इतिहास
आताशा, गावाला जडलाय रोग
जमीन एन.ए. करून घेण्याचा,
फ्लॉट पाडून विकण्याचा, 
पोल्ट्री फॉर्म, धाबा टाकण्याचा.
आता, गाव कुठल्याही एका पक्षात नाही
हरेक पक्ष सुखाने नांदतो हर घरात
फक्त गावाच्या विकासासाठी
गावाच्या इंस्टंट प्रगतीसाठी- 

- अशोक रा. इंगळे
.....................................
एका कालखंडाच्या कवितेतून व्यक्त होणार्‍या नव्या जाणिवांचे दस्तावेजीकरण करण्याचे बहुमोल काम ‘काव्याग्रह’ करत आहे. विदर्भ व महाराष्ट्राच्या मातीतली नवीन कविता लोकांपर्यंत पोचवत आहे. एखाद्या उद्यानात झाडे बहरतात, विस्तारतात, मोठी होतात... त्यामागे माळ्याचे कष्ट असतात. कवितेचे उद्यान मोठे होण्यासाठी जोशींसारखे कार्यकर्ते वावरत असतात. अशा या कवितेच्या कार्यकर्त्याला शुभेच्छा.

(‘काव्याग्रह’ त्रैमासिक विदर्भातील वाशिम येथून प्रकाशित होते.)

Comments