वाचू आनंदे !




Books are the quitest and most constant of friends;
they are the most accessible and wisest of counselors,
and the most patient of teachers.
.............………

Do not (only) read to amuse yourself as children, or (only) like the ambitious, for the purpose of instruction.
Read in order to live.


जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

टीव्हीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या भरजरी आक्रमणाने व अतिक्रमणाने आपल्या चक्रव्यूहात लोकांना गुंतवून टाकले आहे.

तुम्ही स्वत: शोध घ्यायची, विचार करायची गरज नाही, तुमच्यासाठी काय चांगले ते आम्ही सांगू - असे ध्वनित करणार्‍या जागतिकीकरण, तथाकथित उदारीकरण, व्यापारीकरण, ग्राहकवादी वातावरणात पुस्तके आपले स्थान हरवू लागली आहेत.

नव्या पिढीतील पुष्कळ वाचन ‘ट्विटर’, एसएमएस, फेसबुकवरील पोस्ट व एकदमच काही गरज भासली तर गुगल सर्चपुरते मर्यादित होऊ लागले आहे. दीर्घ वाचन करण्याइतके स्थैर्य येत्या काळात नजर गमावेल का असे कधी कधी वाटू लागते.

मात्र चित्र एकाबाजूने असे असतानाच वाचनाचा गंभीरपणे विचार करणारी मंडळी आहे. वाचन संस्कृती टिकून राहावी व वाचन संस्कृती जीवन संस्कृतीचा भाग बनावी यासाठी प्रयत्नही होत आहेत.

वाचन संस्कृती हा माझ्या आवडीचा विषय. त्यानिमित्त वाचनासंबंधी मी लिहिलेल्या दोन लेखांतील काही भाग पोस्ट करीत आहे.

हा पोस्ट दोन भागांमध्ये आहे .

जपानमध्ये मुलांसाठीच्या ‘बंको’ वाचन चळवळीचा परिचय झाल्यानंतर मी अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून ‘बंको’ चळवळीसंबंधी लेख घडला. त्यातील भाग या पोस्टचा एक भाग आहे. शिवाय ‘साहित्य संगम’ या भारतातील गोवा राज्यात ग्रामीण भागातील संस्थेतर्फे वाचन संस्कृतीला पुरक अनेक उपक्रम राबवण्यात येतात. या संस्थेची माहिती देणारा लेखही मी लिहिला होता. या संस्थेच्या प्रमुख उपक्रमांची ओळख करून देणारी नोंद या पोस्ट चा दुसरा भाग आहे.

वाचक तसेच वाचन संस्कृती विस्तारण्याची ज्यांची मनापासून भावना आहे अशांना व इतर सर्वांना हा पोस्ट आवडेल व माहितीपूर्ण ठरेल, अशी आशा बाळगतो.

-----------------------------

‘बंको’ वाचन चळवळ

मुलांमध्ये वाचनाची रूची निर्माण करणारी एक आगळीवेगळी चळवळ म्हणजे जपानमधील ‘बंको’ बालवाचनालयांची चळवळ. बंकोने वाचक चळवळीत आपले एक खास असे स्थान निर्माण केले आहे. ‘बंको’ हा शब्द जपानी असून त्याचा अर्थ पुस्तकांचे गोदाम असा होतो. ही वाचनालये मुलांसाठी असतात व सरकारकडून मदत न घेता पूर्णपणे खासगी मालकीतून चालवली जातात.

जपानमध्ये सार्वजनिक वाचनालये उशिरा विस्तारली. त्यात पुन्हा दुसर्‍या महायुद्धाच्या काळात देशातील वाचनालयांचेही ङ्गार मोठे नुकसान झाले. त्यानंतर मात्र जपानने वाचनालयांचे जाळे विस्तारायला सुरुवात केली. पुढे मुलांसाठी म्हणून खास इंटरनॅशनल लायब्ररी ऑङ्ग चिल्ड्रन्स लिटरेचरची स्थापनाही केली. मात्र असे असले तरी सार्वजनिक वाचनालये विस्तारण्याच्या स्थित्यंतराच्या काळात बंको चळवळीने वाचन चळवळीला बरीच मदत केली आहे.

मुलांचे हक्काचे पुस्तकांचे ठिकाण

संक्षिप्तपणे नमूद करायचे तर बंको म्हणजे मुलांचे हक्काचे पुस्तकांचे ठिकाण. पुस्तकांची एखादी खोली, कोपरा वा ङ्गक्त एखादे कपाट. कुणाच्या तरी घरी, एखाद्या इमारतीच्या स्टेअरकेसदरम्यान, एखाद्या सभागृहाच्या कोपर्‍यात, अगदी बसमध्ये अशी बंको विकसित झाली आहेत. एखादी गृहिणी आपल्या घराच्या काही भागात असे वाचनालय सुरू करते. तेथील काही गृहनिर्माण वसाहतींमध्ये महिलांनी एकत्र येऊन वर्गणी काढून सहकारी तत्त्वावर बंको सुरू केली आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना जास्तीत जास्त पुस्तकांचा लाभ होईल. बंको वाचनालयांचे साधारण दोन प्रकार आढळतात. एक कतई बंको जी कुणीतरी आपल्या घरात चालवतात. दुसरा प्रकार चिक्की बंको म्हणजे सामूहिक पद्धतीची अनेकांनी एकत्र येऊन सुरू केलेली वाचनालये.

येथे मुले येतात, स्वत: आपणास हवी ती पुस्तके निवडतात, वाचतात व परत ठेवतात. काही बंकोमधून पुस्तके घरी न्यायलाही दिली जातात. ही बंको आठवड्यातून एखादा दिवस, दोन दिवस किंवा महिन्यातील ठरावीक दिवस त्यांच्या मालकांना ङ्गावेल तशी खुली असतात.




गृहिणींचा विशेष सहभाग
बंकोचा विकास करण्यात बालवाड्‌मयाचे लेखक व गृहिणींचा विशेष वाटा आहे. या गृहिणी मध्यमवर्गीय असतात. अनेक गृहिणींनी आपल्या घरातील ठरावीक जागा पुस्तकांसाठी दिलेली असते. तेथे मुलांना आठवड्यातून एखादा दिवस निमंत्रित केले जाते व त्यांना पुस्तके वाचायला दिली जातात वा घरी न्यायला दिली जातात. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी समाजातून दिसणारी धडपड व पुस्तकांपर्यंत मुलांना थेट संपर्क ही बंकोची खास बात म्हणता येईल.

‘बंको’ची परंपरा
बंको वाचनालयांची संकल्पना ‘खास जपानी’ मानली जाते. सर्वात जुन्या बंको वाचनालयाचा माग १९०६ सालापर्यंत काढता येतो. बाल साहित्याचे लेखक कसुई ताकेनुकी यांनी हे वाचनालय आपल्या तोक्योमधील घरी सुरू केले होते व त्यात मोठ्या संख्येने बालसाहित्य उपलब्ध करण्यात आले होते. येथे आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे, जपानमधील बालवाङ्‌मयाचा विकास किती जुना आहे ते. दरम्यान, दुसर्‍या महायुद्धापर्यंतच्या काळात अशाचप्रकारे काही नामांकित लेखकांनी विशेषत: बालवाङ्‌मयाच्या लेखकांनीच आपल्या घरी अशी वाचनालये सुरू केलेली दिसतात.

दुसर्‍या महायुद्धानंतर मात्र बंकोचे जाळे आणखी विस्तारले व तळागाळापर्यंत रुजले. या काळात कतई बंको म्हणजे घरांतील खासगी वाचनालयांचीच वाढ जास्त दिसून येते. पुढे बंको चळवळीचा प्रभाव इतका वाढला की, तेथील बालसाहित्याला स्वत:ला समर्पित केलेल्या (आता दिवंगत) एक प्रख्यात लेखिका मोमोको इशई या खास अमेरिका व युरोपच्या दौर्‍यावर गेल्या व तेथील बालसाहित्य व बालसाहित्य प्रकाशनाचे अवलोकन केले. नंतर जपानमध्ये आपल्या घरी ‘कतसुरा बंको’ची स्थापना केली. मुलांना घरगुती वातावरण व स्वत:ला हवी तशी पुस्तके हाताळण्याची मुभा मिळाली तर त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण होत जाते हे त्यांचे निरीक्षण होते. पण अशी बंको वाचनालये एकहाती चालवणे हे एक कसबच. त्यातील कसरतीही त्यांना दिसून आल्या. या सर्व अनुभवांवर त्यांनी एक पुस्तकही प्रकाशित केले.

हे पुस्तक काही गाजले नाही, मात्र मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी काहीतरी करण्यास इच्छुक असलेल्या अन्य गृहिणींचे लक्ष या पुस्तकाने वेधले व बंको वाचनालयांच्या संकल्पनेबाबत त्यातून मार्गदर्शन मिळाले. दरम्यान, इशई २००८ मध्ये वारल्यानंतर आता त्यांनी सुरू केलेले बंको वाचनालय टोक्यो चिल्ड्रन लायब्ररीच्या निरीक्षणाखाली चालते. ते महिन्यातून एक दिवस खुले असते.

नागरिकांची मुलांसाठी वाचन चळवळ
बंको वाचनालये ही पूर्णपणे नागरिकांनी मुलांसाठी चालवलेली वाचन चळवळ आहे. याची मालकी ही पालक, गृहिणी यांच्याकडे असते. त्यांचे स्वरूप हे पूर्णपणे खासगी असते. बंकोवर सरकारी नियंत्रण नसल्याने पुस्तकांची निवड वगैरेचे धोरण प्रत्येक बंको स्वत: ठरवते. यामुळे प्रत्येक बंकोचे स्वरूप व रचना खास व वैशिष्ट्यपूर्ण बनते. या बंकोमधील वातावरण पूर्णपणे घरगुती असल्याने व तेथे ‘शालेय’पणाचा लवलेशही नसल्याने मुले अधिक तल्लीन होतात असे आढळून आले आहे. शिवाय शिकणारी मुले आहेत अशा ठिकाणीच एखाद्या घरी व सभागृहात बंको चालतात. त्यामुळे आपल्याच परिसरात परिचित मुलांसोबत मुलेही जाणे पसंत करतात. आवडीने तेथे जाणे पसंत करतात. अशाप्रकारे अभ्यासासाठी नव्हे तर आनंदासाठी साहित्याचे वाचन करण्याची जागा बंको उपलब्ध करते. बंकोमुळे मुलांमध्ये एकमेकांत मिसळण्याची संधीही प्राप्त होते.

‘बंको’चे स्वरूप

बंकोमधील पुस्तकांची संख्या निरनिराळी असते. १०० पुस्तकांच्या बंकोपासून हजारपेक्षा जास्त पुस्तकांची बंको आढळतात. पुस्तकांची संख्या वाचनालयाच्या मालकांवर अवलंबून असते. काही बंको वाचनालयांनी स्थानिक सार्वजनिक वाचनालयाशी संधान बांधून काही पुस्तके ठरावीक कालावधीसाठी कर्ज पद्धतीने आणायलाही सुरुवात केली आहे.

बंकोमधील सेवा या साधारण सार्वजनिक वाचनालयांप्रमाणेच असतात. म्हणजे पुस्तकांचे वाचन, पुस्तकांची देवघेव इत्यादी. शिवाय पुस्तकांचे मोठ्याने वाचन करणे, पुस्तकांविषयी बोलणे असे उपक्रमही घेतले जातात. मात्र बहुतेक बंकोमधून प्रसिद्धीस पावलेला उपक्रम म्हणजे कथाकथनाचा उपक्रम. अनेक बंकोमधून कथाकथनाचे कार्यक्रम सातत्याने होतात.

अशा या वाचनालयांतील कर्मचारी हे स्वयंसेवक असतात जे स्वखुषीने मदत म्हणून अशा उपक्रमांत भाग घेत असतात. यातील बहुतेक स्वयंसेवक या गृहिणी असतात. त्यांच्याकडे ग्रंथपालपदासाठी आवश्यक प्रशिक्षण नसते, उत्साह व मुलांच्या वाचनासाठी काहीतरी करण्याची तळमळ ही त्यांच्या यशस्वीतेमागची प्रेरणा असते.

-----------






साहित्य संगमचे उपक्रम

वाचन संस्कृतीला पुरक असे उपक्रम राबविण्यासाठी १९९०पासून गोव्यात पेडणे तालुक्यातील मांद्रे गावात मांद्रे साहित्य संगम ही संस्था कार्यरत आहे. साहित्यविषयक चर्चा घडवून आणणे, ग्रामीण भागातील लेखकांना तसेच चोखंदळ वाचकांना व्यासपीठ मिळवून देणे असा उद्देश मांद्रे साहित्य संगमच्या स्थापनेमागे होता.

संस्थेतर्फे दर महिन्याला एक कार्यक्रम आयोजित केला जातो. हा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम असतो. एखाद्या लेककाच्या घरी जाऊन त्याच्या साहित्यावर चर्चात्मक कार्यक्रम करणे, वा एखाद्या सदस्याच्या घरी साहित्यकृतीचे वाचन-चर्चा असे कार्यक्रमाचे स्वरूप असते. पुस्तक चर्चेबरोबरच वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद, व्याख्याने तसेच निमंत्रित मान्यवरांसोबत संवाद असेही आयोजन असते.

संस्थेने ‘पुस्तक भेट योजना’ नावाची एक अनोखी योजना राबवली होती. त्यावेळी २४ सदस्य होते. प्रत्येक जण महिन्याला ५० रुपये वर्गणी काढायचा त्यातून १४०० रु. जमा होत. मग लॉटरी पद्धतीने दोन सदस्यांच्या नावाची निवड व्हायची. त्यांच्याकडे प्रत्येकी रु. ७०० दिले जायचे. या सदस्यांनी मग त्या पैशांतून आपल्याला आवडणारी पुस्तके विकत घ्यायची. अशाप्रकारे रु. ७०० चे दोन संच प्रत्येक महिन्याला जमा होऊ लागले. वर्षभर ही योजना राबवल्यानंतर २४ संच (म्हणजे प्रत्येक सदस्याच्या मालकीचा एक) जमले. या संचांचे सदस्यांमध्ये वाचनासाठी आदानप्रदान करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे वाचनाची नाते दृढ व्हावे म्हणून संस्थेने शाळांमध्ये वाङ्‌मय मंडळे स्थापन करण्याचा एक अभिनव उपक्रमही राबवला होता. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ११ शाळांमध्ये अशी मंडळे कार्यरत करण्यात आली.

विशेष म्हणजे असा हा वाचनाचा यज्ञ चालू ठेवणार्‍या या संस्थेची कुठलीही फॉर्मल कार्यकारिणी नाही, सदस्यता शुल्क नाही, सदस्यत्व फॉर्म नाही, रितसर घटना नाही. कामाचे समन्वय होण्याच्या दृष्टीने अध्यक्ष व कार्यवाह अशी दोन पदे ठेवली आहे. असे असूनही संस्थेचा मासिक कार्यक्रम कधीच अडला नाही. कुठला उपक्रम संस्थेने करायचा ठरवला व झाला नाही, असे झाले नाही.
---------------------------------------------------------










Comments