वाराणसी... अ सिटी ऍज ओल्ड ऍज टाइम!’ मी वाराणसी जंक्शनवर उतरून पर्यटन सुविधा केंद्रात माहितीच्या अपेक्षेने गेलो तेव्हा अशा शीर्षकाचा ‘गाईड मॅप’ तेथील व्यक्तीने माझ्या हाती दिला व हातांनीच खुणा करून काहीतरी सांगितले. यात सर्व माहिती मिळेल, असे त्या खाणाखुणांचे भाषांतर मी करून घेतले. व्यक्ती बोलू शकत नव्हती, त्याच्या तोंडात पान होते... बहुतेक बनारसी असावे!
उत्तर प्रदेश, बिहार राज्यांतील काही निवडक स्थळांना दिलेल्या भेटीच्या कार्यक्रमात वाराणसी हा एक पडाव होता. हजारो वर्षांची परंपरा सांगणार्या, केवळ हिमालयाच्या निर्जनतेत रमणार्या शिवाची ही आवडती नगरी असलेल्या आणि ज्या नगरीची पहाट कबिरांच्या दोह्यांपासून ते बिस्मिल्लांच्या शहनाईने मंगलमय बनली, त्या नगरीबद्दल बरेच कुतूहल मनात होते...
वाराणसी हा अस्सल भारतीय बॅ्रन्ड. वाराणसी म्हटल्यावर मनात उपस्थित होतात प्राचीनतेपर्यंत जाणारे धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ. वाराणसी अनेक दिग्गजांची कर्मभूमी- साधनाभूमी राहिली आहे. ब्रह्मसूत्र लिहिणार्या व्यासांचे संदर्भ वाराणसीपर्यंत येऊन पोचतात. हिंदी साहित्याला दर्जा प्राप्त करून देणारे अनेक चेहरे याच वाराणसीच्या भूमीने दिले. ही श्रृंखला हिंदी पत्रकारितेचा पाया घालणारे भारतेंदूं, ‘छायावादा’ला जोपासणारे जयशंकर प्रसाद ते साहित्याची एक आगळीवेगळी अभिरूची निर्माण करणार्या प्रेमचंदांपर्यंत जाते. आपल्या लेखणीचे सांप्रदायिक निर्माण करणारे कबीर, तुलसीदास या वाराणसीतून पुढे आले. शहनाईने विश्व काबिज करणारा बिस्मिल्लांचा सूर याच वाराणसीत घडला. ‘विश्वनाथा’पासून ते साधू-फकिरांपर्यंत आणि राजा महाराजांपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत- सार्यांना वाराणसीने आपलेसे केले. तथागत बुद्ध जेव्हा निर्वाणाचे संकेत देतात तेव्हा त्यांचा शिष्य आनंद त्यांना स्वत:ला विलीन करण्यासाठी जी स्थळे सुचवतो त्यात वाराणसीही येते. ही ख्रिस्त जन्माअगोदरची अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
रेल्वे स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर आलो तेव्हा मात्र वाराणसीबद्दल असलेल्या माझ्या भावनांना धक्काच बसला. अगदी टेकून चालणारी वाहने, रस्त्यांवर उठणारी धूळ, पॅसेंजर जमविण्यासाठीची आरडाओरड, कुणी गिर्हाईक मिळते का याची वाट पाहत बसलेले सायकल रिक्षावाले यांत मी प्राचीन भारतीय ‘रोमेंटिक’ कल्पना शोधत होतो. कधीकाळी ऋषिमुनींचे, धार्मिक वाटसरूंचे आश्रयस्थान असलेल्या वाराणसीत चांगले म्हणजे परवडणारे व स्वच्छ हॉटेल शोधण्यात माझा तासभर वेळ गेला.
वाराणसीत मी अनेक गोष्टी पाहिल्या. लहानपणापासून वाराणसी म्हणजे घाट आणि समोर वाहणारी गंगा नदी असे चित्र मनात होते. तेव्हा या घाटांवरून गंगा आणि गंगेतून घाट पाहण्याची उत्सुकता होती. मात्र खुद्द वाराणसीतल्या एक-दोघांना काहीशा उत्सुकतेने मी विचारले तेव्हा तेथे पाहायचे काय आहे, असा प्रतिप्रश्न त्यांनी मला केला.
गंगेच्या किनारी सुमारे ८४ घाट आहेत. आता घाट म्हणजे किनार्यावर पायर्यापायर्यांनी नदीपर्यंत घेऊन जाणारी वाट की नदीच्या किनार्यापासून सुरू होणारा परिवेष माहीत नाही. यांपैकी ‘असी’ घाटापासून सुरुवात केली तर चालत चालत इतर घाटांवरून जाता येते. गंगेत होडीत बसून हे घाट पाहणे हा एक औरच अनुभव असतो. विशेषत: ऊन ढळू लागते त्यावेळी. आणि घाट पाहताना होडीवाला तुम्हाला अनेक सुरस कथा सांगतो ज्या ऐकणेही एक खास अनुभव असतो. राजा हरिश्चंद्र घाटावर पोचल्यावर तो म्हणतो, येथे राजा हरिश्चंद्रला विकत घेण्यात आले होते व त्यानंतर तो प्रेते जाळण्याचे काम करायचा. पुढे एक वाडा दाखवून त्याने सांगितले की, हा वाडा चांडालचा असून गंगेकिनारी अंत्यसंस्कार केल्याबद्दल ‘रॉयल्टी’ येथे पोचवावी लागते. एक घाट खास ‘काशी नरेशा’चा होता. एका घाटावर अन्य कुठल्या तरी राणीचा वाडा होता. एक घाट तर एक्सक्लुझिव्ह राजांसाठीचा होता म्हणे आणि एक त्यांच्या उच्चपदस्थ अधिकार्यांचा होता. एका घाटाचे नाव प्रेमचंद होते. प्रेमचंद येथे बसून लेखन करायचे असे तो सांगू लागला. हे काहीसे पचनी पडते न पडते तोच पुढे असलेल्या डॉ. राजेंद्रप्रसाद घाटाविषयी हे एक डॉक्टर होते, त्यांच्या नावाने हा घाट असल्याचे सांगतो तेव्हा त्याच्या सुरस कथा उघड होतात. पण त्याचे तसे फारसे ऍकेडेमिक दु:ख करून घ्यायची ती वेळ नसते.
करता करता होडी मणिकर्णिका घाटापर्यंत येते. हा घाट म्हणजे महास्मशान. अंत्यसंस्कारांसाठी रांगेत असलेले शव आणि जराही उसंत न घेता अविरत जळणार्या चिता असा हा घाट सगळा मूड एका क्षणात पालटून टाकतो. मोक्षाच्या अपेक्षेने आणि आशेने संपूर्ण भारतभरातून मृतदेह येथे आणले जातात. इथला अग्नी म्हणे गेली हजारो वर्षे कधीच विझला नाही. होडीवाला सांगत होता, साधू, लहान मूल, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला येथे अग्नी दिला जात नाही- थेट गंगेत विसर्जन केले जाते. येथील अग्नीसंस्कार आणि त्यात गुंतलेली मुले यांचे चित्रण ‘चिल्ड्रन ऑफ पायर’ या सिनेमात पाहिले होते. त्याची आठवण झाली आणि हा घाट अधिकच मनाला झोंबला.
या घाटांबद्दल एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे, यांच्या नजाकतीचा एक महत्त्वाचा पैलू आहे त्या घाटाला पार्श्वभूमी देणार्या जीर्ण-जुन्या इमारती. कितीतरी वर्षांपासून त्या उभ्या आहेत. समजा त्या तिथून गेल्या आणि त्यांच्या जागी टोलेजंग आधुनिक स्थापत्त्यशास्त्राच्या इमारती आल्या तर तेव्हाही हे घाट असेच मनाला भावतील का....? माहीत नाही...
रात्रीचा गंगा आरतीचा सोहळा विशेष असतो. तासभर या आरतीत दिवे, धूप, कापूर यांची गंगेला ओवाळणी होते. आरती करणार्यांचे हात एका विशिष्ट लयीत फिरतात, ज्यामुळे या आरतीला एक अनोखे वलय प्राप्त होते. तासभर चाललेल्या या गंगा आरतीत मारलेली बुडी भावनेच्या एका प्रांतात घेऊन जाते.
नदीत होडीत बसून समोर ही आरती पाहताना मणिकर्णिका घाटावरच्या अग्नीची आणि या अग्नीची सांगड घालत होतो. गंगेला ओवाळणारा, पावित्र्याने उजळून टाकणारा हा अग्नी अनेक शव तितक्याच समर्पणाने विलीन करून घेत असतो.
एरवी मला नदी-समुद्र यांचे नावीन्य असण्याचे कारण नाही. पण तरीही घाटावर बसून गंगा नदीकडे पाहताना एक वेगळेपणा जाणवतो. कदाचित पिढ्यान्पिढ्या भारतीय जीन्समध्ये उतरलेल्या गंगेच्या आकर्षणाचा आणि गंगेला असलेला हिमालयापासूनचा वारसा, याचा तो परिणाम असावा. या नदीत काहीतरी जादू आहे असे वाटते. इतर नद्यांतही असे काहीतरी खास असावे, पण आपण कदाचित एका विशिष्ट श्रद्धेने आणि पारंपरिकतेच्या चौकटीतून गंगेकडे पाहतो म्हणून जरा जास्त जवळीक वाटत असण्याची शक्यता आहे.
असी घाटावर एक छान बूक स्टॉल होता. फक्त बूक स्टॉल म्हणता येणार नाही. भारतीय शास्त्रीय संगीताच्या सीडीज तसेच बर्यापैकी पोस्टर्सचे कलेक्शनही त्याच्याकडे होते. त्याच्या स्टॉलला असलेली मोठी खिडकी आणि त्याच्यातून स्पष्ट दिसणारी गंगा नदी... स्टॉलमध्ये त्याने लावलेल्या सीडीतून निघणार्या हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीच्या स्वरलहरींमुळे गंगेचा प्रवाह सांगीतिक भासत होता. तिथली हवाही जणू बासरीच्या लयीनेच वाहत आहे असे वाटत होते. माझ्या लक्षात राहील ती वाराणसीची ही गंगा... सांगीतिक वलयात बूक स्टॉलच्या खिडकीतून पाहिलेली...
आणखी एक गंगेची प्रतिमा माझ्यात नेहमीच घर करून राहील. गंगेच्या किनार्यावर या देशातल्या विविध राज्यांचे, भाषांचे, जातींचे लोक एकत्र जमतात. एकमेकांसोबत बसतात. अशावेळी या सर्वांना एकत्र गुंथण्याचा गंगा जणू धागा बनून जाते. भारतातीलच नव्हे, इतर देशांतील लोकांनाही या परंपरेच्या धाग्यात थोडा वेळ का होईना स्वत:ला बांधून घ्यावेसे वाटते. हे विदेशी वाराणसीच्या घाटांबद्दल आणि गंगेबद्दल वेडे होऊन फिरताना दिसतात. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून, डोळ्यांत कसले तरी कुतूहल घेऊन फिरताना दिसतात. आपल्या डोळ्यांत, कॅमेर्यांमध्ये हे सर्व कुतूहल ते साठवून घेत असतात.
वाराणसी म्हटल्यानंतर आठवते ते बनारस हिंदू विद्यापीठ. मदन मोहन मालवीय यांनी वाराणसीची ज्ञानाची परंपरा पुढे नेण्यासाठी उभारलेले. विद्यापीठ परिसरात बराचवेळ हिंडलो. विविध ज्ञानशाखांचे १२७ विभाग याठिकाणी आहेत. आशियातील एक मोठे ‘रेसिडेंशिअल’ विद्यापीठ म्हणून ‘बीएचयू’ ओळखले जाते. येथील अनेक जुन्या इमारती ऐतिहासिक वातावरणात घेऊन जातात. उंच भरभक्कम अशा भिंती, मोठमोठे दरवाजे-खिडक्या असे वैशिष्ट्यपूर्ण वास्तुवैभव इथल्या इमारतींचे आहे. विद्यापीठ परिसरात पाहण्यासारखे आहे ते भारत कलाभवन. कलाभवनची इमारतही कलेला साजेशी, सुंदर आणि विशाल आहे. दिवसभर हे कलाभवन सर्वांना खुले राहते.
भारत कला भवनमध्ये अनेक गोष्टी पाहिल्या. त्यात बहुतेक आहेत पेंटींग्स, ज्यांवर जास्त नावे विदेशी होती. भारतीय निसर्गाची, संस्कृतीची रंग-कुंचल्यातून त्यांनी केलेली आराधना येथे पाहायला मिळते.
यापैकी एक गॅलरी आहे ती ऍलिस बोनर यांची. श्रीमती बोनर या स्वीस आर्टिस्ट, मात्र भारतीय कलांमध्ये त्यांना विशेष रुची होती. १९३६ ते १९७८ या काळात बोनर वाराणसीत गंगेच्या किनारी एका जुन्या घरात राहत होत्या. तेथे राहून भारतीय विषय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी चित्रकला व शिल्पकलेची साधना केली. शिवाय भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती, संस्कृत भाषा यांचेही अध्ययन त्यांनी केले. या गॅलरीत त्यांची अनेक चित्रे-शिल्पे आहेत. पण पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे एखादे चित्र तयार करण्यापूर्वीची तयारी म्हणून काढलेली स्केचेस येथे ठेवली आहेत.
नाण्यांची गॅलरी हेदेखील एक वैशिष्ट्य आहे. भारताशी ग्रीकांचा व्यापारी संबंध सांगणारी परदेशी नाणी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी जारी केलेली नाणी येथे आहेत. गुप्त काळातल्या नाण्यांचा दिमाख खुलून दिसतो. शिवाय अकबरने जारी केलेले राम आणि सीता यांच्या प्रतिमा कोरलेले नाणे लक्ष वेधून घेते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश काळात बंड पुकारून भारताबाहेर निसटल्यानंतर भारतीय सरकार स्थापन केले होते. त्यावेळी त्यांनी जारी केलेल्या चलनी नोटाही येथे आहेत.
तामीळ-संस्कृत ताडपत्रांवरील हस्तलिखिते, प्रख्यात हिंदी लेखक प्रेमचंद यांच्या गोदान कादंबरीचे हस्तलिखित, बनारसच्या हिंदूंना त्रास देऊ नये म्हणून औरंगजेबाने जारी केलेला आदेश अशा अन्य गोष्टी भारत भवनमध्ये पाहता आल्या.
बनारसमध्ये दोन वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे पाहिली. एक तुलसी मानस मंदिर आणि दुसरे भारतमाता मंदिर.
गोस्वामी तुलसीदास यांचे तुलसी रामायण ही भारतीय साहित्यातील एक अद्वितीय अशी कलाकृती. त्यातील भावरस वाचकाला, श्रोत्याला एका अनोख्या जगात घेऊन जातो. अशा या साहित्यकृतीचे हे मंदिर. मंदिरात दोन मजलेभर संपूर्ण तुलसी रामायण मार्बलवर कोरले आहे. एखाद्या लेखकाच्या साहित्यकृतीचे मंदिर ही साहित्यासाठी, लेखकांसाठी नक्कीच एक अभिमानास्पद गोष्ट.
भारतमाता मंदिरही असेच वैशिष्ट्यपूर्ण. आत कुठलीही मूर्ती नाही. आहे तो भारताचा नकाशा. शिव प्रसाद गुप्त यांनी काशी विद्यापीठ जे आज महात्मा गांधी काशी विद्यापीठ म्हणून ओळखले जाते, ते स्थापन केले तेेव्हा या मंदिराची स्थापना केली होती. मंदिर १९१८ सालचे आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान-बांगलादेश सगळे एकत्र असलेले पाहायला मिळतात. देशातील नद्या, पर्वत यांची नावेही या मार्बलच्या नकाशावर आहेत. जाती-भाषा-धर्म अशा सर्व भेदांच्या पुढे जात सर्वांनी एका मंदिरात एकत्र यावे असा उद्देश या मंदिराच्या स्थापनेमागे होता.
वाराणसीच्या रस्त्यांवरून फिरताना अनेक चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता आला. लिठ्ठी चोखा, रबडी, मलई लस्सी इत्यादी. लिठ्ठी म्हणजे भारतीय परंपरेतील पाव म्हणता येतील. मैदा आणि आत बेसन भरलेले हे गोळे चुलीवर ‘बेक’ केले जातात. मातीच्या कुल्हडमधील स्वादिष्ट रबडी खातानाचा अनुभवही खास असतो. रबडी जिभेवर विरघळत पोटात जाते तेव्हा त्याच्या चवीचा आनंद काही और असते. चहाच्या टपर्या असतात, तशा येथे लस्सी आणि दुधाच्या टपर्या बघितल्या, ज्यांवर लोक दुपारी लस्सीसाठी आणि तिन्हीसांजेला दूध पिण्यासाठी उपस्थिती लावतात.
वाराणसी एक शहर असूनसुद्धा हॉटेलवर जेवण बरेच स्वस्त वाटले. पाच रुपयात फेकून द्यायच्या मातीच्या कुल्हडमधील चहाचे अर्थशास्त्र आश्चर्यकारक आहे.
वाराणसीत खाणार्याच्या गरजांनुसार ‘प्लेट’ नको असेल, तर एखादा नगही मिळू शकतो. म्हणजे हॉटेलवाले तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ‘सर्व्ह’ करतात, त्यांच्या गरजेनुसार नव्हे.
वाराणसीत अनेक अचंबित करणार्या गोष्टीही पाहिल्या. काही ‘ठेल्यांवर’ (आपल्या भाषेत गाड्यांवर) भजी तागडीत मोजून विकली जाताना पाहिली. वाहने एकमेकांना ठोकणे-टेकवणे हासुद्धा एक सर्वसामान्य प्रकार. गाड्या एकमेकांना घसटून जातील हे जणू ठरलेले. बहुतेक वाहनांनी अवतीभवती गार्ड लावून घेतलेले दिसतात. एका ट्रॅफिक जॅममध्ये सायकल रिक्षावाला हळू चालवत होता म्हणून मोटरसायकलवाल्याने मागून त्याला मोटरसायकल टेकवून ढकलत काही अंतरावर नेली. हे करताना आपल्या वाहनाचे नुकसान होईल, याची त्याला तमा नव्हती. असेच डिव्हायडरवर मध्येच रिक्षा परतली जात असताना मागून येऊन एकाने ‘ढो’ करून एक लाथ मागून हाणली.
बनारसला जाऊन काशी विश्वनाथाचे मंदिर न पाहणे कसं होऊ शकतं. बाबा विश्वनाथांची काशीवर माया आणि तितकीच येथील लोकांची काशी विश्वनाथावर माया. मंदिरात उत्सुकतेपोटीच मी गेलो. मंदिराच्या तुम्ही जवळ जाता तेव्हा हे मंदिर आहे की लष्करी छावणी असे वाटायला लागते. मंदिराच्या वाटेवर पावलापावलांवर सशस्त्र जवान तैनात केलेले आहेत. मंदिर जवळ येऊ लागते तशी ही गस्त अधिक गडद होत जाते.
मंदिराच्या रस्त्यावर उंच लोखंडी विभाजक उभारले आहेत. विभाजनाच्या पलीकडे आहे मशीद- औरंगजेबाने उभारलेली, ज्यामुळे हे स्थळ विवादास्पद आहे. मशिदीतून मंदिराकडे आणि मंदिरातून मशिदीकडे पहारा देत हे सर्व भारतीय लष्कराचे सैनिक उभे असतात. इथपर्यंत ठीक आहे. पण खुद्द विश्वनाथाच्या पिंडीभोवती आणि पिंडी आहे त्या खोलीभोवती सुरक्षारक्षक आहेत. आपल्या एका त्रिशूलाने समस्त ब्रह्मांड तोलून धरणार्या विश्वनाथाच्या रक्षणासाठी एके रायफल्स हा विरोधाभास वाटला. शिवाय देवळात मोबाईल-कॅमेरा सोडाच, खिशाचे पेनसुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव वर्ज्य होते.
तिथून बाहेर पडल्यानंतर मागे बॉम्बस्फोट झाले त्या संकटमोचन हनुमान मंदिराकडे जायचे होते. आरती आटोपून मी बाहेर पडलो. एका सायकल रिक्षावाल्याने मला कुठे जायचेय का म्हणून विचारले. सायकल रिक्षा वगैरे प्रकार मी टाळतो. अशाप्रकारे माणसाने दुसर्याचे ओझे घेऊन जाणे वगैरे मनाला पटत नाही. पण यावेळी गत्यंतर नव्हते. इतर साधनेही दिसत नव्हती व मला जायचे होते ती जागाही दूर होती. रात्रही सुरू झाली होती. त्याने ३० रु. सांगितले. आपल्या इथे मोटरसायकलवरून किलोमीटरभर अंतरासाठी घेतले जाणारे ३० रु. माझ्या लक्षात होते. मी तेवढेच अंतर मनात आखले होतेे, मात्र सायकल सुरू झाली ती २-३ किलोमीटर धावतच होती. जोर लावून पॅडल मारणारे त्याचे पाय पाहून मला कसेसेच वाटत होते. मला मंदिराकडे त्याने सोडले तेव्हा खिशात घातलेल्या माझ्या हाताला ५० रुपयांची नोट लागली. ती मी त्याच्या हातावर ठेवली. तो उरलेले पैसे देत होता, मी नको म्हटले तेव्हा त्याच्या चेहर्यावर फार काहीतरी मिळवल्याचा आनंद दिसला. नंतर मी मंदिरात गेलो खरा पण माझ्या डोळ्यांसमोर सायकल लवकर पोचवण्यासाठी पॅडल मारणारे त्याचे पाय दिसत होते.
मंदिरातून बाहेर पडल्यावर शेअरिंग रिक्षा पकडून मला मी राहत होतो त्याठिकाणी पोचायचे होते. गंगेची लय आणि आरतीचे निनाद आता पुसट होऊ लागले होते. रस्त्यांवर धावणारी वाहने, त्यांनी उडवलेली धूळ नाकावर हल्ला करून थेट फुफ्फुसापर्यंत जाणारी. हॉर्नचे कर्कश आवाज कानठळ्या बसवीत होते.... आणि मी त्यात शोधत होतो एकेकाळच्या भारतीय उपखंडातील ‘अथेन्स’ आणि ‘जेरुसलेम’चे संदर्भ.
ता. क. हा लेख लिहून झाला आणि दशाश्वमेध घाटावरील दोन प्रसंग सांगायचे राहून गेल्याचे लक्षात आले. पहिला म्हणजे- एका टपरीवर मी चहा पीत होतो, तेवढ्यात तेथे अचानक एक वानरराज अवतरला. टपरीवरच्या चहावाल्याने थोडा वेळ मला थांबण्याची विनंती केली. तो समोरच्या बेकरीवर गेला. मस्कापाव विकत घेऊन तो त्याने वानरराजाच्या हातावर ठेवला. नंतर मला हसत म्हणाला- ‘इनका भी खयाल रखना पडला है, रोज आया करते है|’
दुसरा प्रसंग म्हणजे मला भगव्या वस्त्रातील (बैरागी, साधू तत्सम) दोघांचा फोटा घ्यावासा वाटला. ते दोघे चहा पीत बसले होते. मी तो घेतलाही. तेव्हा शांत चित्ताने बसलेल्या त्या दोघांपैकी एकाने म्हटले- ‘फोटो ले लिया, अब कम से कम चाय का तो पैसा दीजिए| आप फोटो भी मुफ्त मै खिंचना चाहते है|’
Comments
Post a Comment