पुस्तकाचे मुखपृष्ठ |
कविता मला पूर्णपणे कळते असा माझा दावा नाही आणि झेन कवितांचे पूर्ण आकलन मला झाले आहे असा माझा अट्टहासही नाही., ‘झेन कवितां’च्या वाचनातून एका टप्प्यावर आलेली ही प्रतिक्रिया आहे. त्यात स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न, काही प्रतिक्रिया व काही प्रश्नांचा समावेश आहे.
व्यक्तीला प्रथमदर्शनी एखादी गोष्ट भावणे म्हणजे त्या गोष्टीत काहीतरी वेगळेपणा असायला हवा, असं एक माझं मत आहे. त्यादृष्टीने सांगायचे तर हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या सुमारे दोन वर्षे भरतील इतक्या दिवसांपूर्वी 'बिम्ब ' या कोंकणी मासिकात या झेन कविता सर्वप्रथम वाचल्या होत्या. आणि त्या वाचल्यावर एक वेगळी कविता वाचत असल्याचे वाटले होते. त्यावर एख छोटी प्रतिक्रियाही दिली होती.
झेन ही बौद्ध धमाची एक शैली. झेन हे ध्यानाचे अपभ्रंश रूप. भारत ते जपान व्हाया चीन असा प्रवास ‘झेन’ने केला आहे. या ध्यान कविता आणि म्हणून झेन कविता असेही कवी नमूद करतो.
‘झेन’ एक संकल्पना असे कविला अभिप्रेत असावे असे वाटते. त्यामुळे झेन म्हणजे काय याची किमान मूलभूत माहिती वाचकाला असावी लागेल. त्यामुळे ‘झेन वाचक’ या ‘झेन कवितां’चा खरा वाचक होऊ शकेल असेे आपण म्हणू शकतो. किंवा मग या कविता वाचून झेन म्हणजे काय याचा ढोबळ आडाखा बांधावा लागेल.
संग्रहात कवीने या कवितांचा उगम, त्या येतानाची अवस्था, प्रेरणेची अवस्था आपल्या मनोगतात मांडली आहे. त्यामुळे लेखकाने त्याला गवसलेल्या ‘झेन’चा स्कोप/पट नमूद केला आहे. तो स्कोप समजून घेऊन ही कविता वाचण्याचाही एक मार्ग असू शकतो.
किंवा मग, ‘कवितांना लेबलं कशाला’ असा सोपा मार्ग पत्करून इतर कवितांसारखीच ही कविता वाचून काहीतरी प्रतिक्रियाही असू शकते. अर्थांत शेवटचा हा मार्ग या लेखकाने स्वीकारलेला नाही.
या संग्रहात कविच्या झेन अवस्थेवर एक कविता येते-
झिनी झिनी झॅन
दोळ्यांत झडटा
पावशी शॅन
सळसळ पानां खेळ
वारियाचें
झॅन भिरभिर
झॅन
आणि झेनचा आवाठ स्पष्ट करणारी, अशीही एक कविता आहे -
तुजेकडें
उलयलोंच ना आजून
तुज्या मौनाक स्पर्श करूंक रावतां....
‘माझ्या कविता झेन कविता आहेत’, हे सांगण्याचे धाडस या कविने दाखवले आहे. त्याचबरोबर ‘झेन कविता’ कोणत्याही भारतीय भाषांत लिहिल्या गेलेल्या नाहीत, असे जाहीर विधानही या कविचे आहे. अर्थात ते चर्चा/चिकित्सेचा विषय आहे. पण जर हे विधान खरे मानले गेलेे तर भारतीय परंपरेचा वारसा सांगणारी ‘झेन’ शैली पुन्हा भारतात कोकणीतून येते आहे, असा एक उत्स्फूर्त निष्कर्ष काढता येईल.
आपल्या आयुष्यात झेन प्रसंग घडलेले आहेत, असा साक्षात्कार या कविला अनुवादित झेन वाङ्मयातून झाला आहे. त्यानंतर त्याने आपल्या जीवनातील ‘झेन’ प्रसंग शोधून त्यांना शब्दरूप दिले आणि या कविता साकार झाल्या, असे कवि आपल्या निवेदनात सांगतो. म्हणजे या आधीच्या दीर्घ काव्य प्रवासात या कविकडूनझेन कविता लिहूनही झाल्या असू शकतील, असेही वाटते.
कविचे निवेदन वाचत असताना एक सिद्धांतवजा वाक्य भेटले -‘ दरेक गजाल वेगळी आसता देखून दरेक गजाल सगळी आसता.’ अर्थात प्रत्येक गोष्ट ही वेगळी असते म्हणून प्रत्येक गोष्ट सगळी (पूर्ण) असते. इथे वेगळीचा अर्थ ‘युनिक’ असाही घेता येईल. आता हेच सिद्धांत वजा वाक्य प्रमाण मानून हे पुस्तक वाचण्याचा/समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून या कविता झेन कविता आहेत, किंवा या कवितांतून जे हाती लागेल ते झेन आहे, किंवा लेखकाचे हे झेन अनुभव आहेत, किंवा या कविता समजून घ्यायचा प्रयत्न केला तर काहीतरी झेन हाताला लागेल, आणि ‘लास्ट बट नॉट द लीस्ट’ झेन प्रत्येकाला अनुभवता येण्यासारखी गोष्ट आहे असे अनेक गृहीतक वजा उत्स्फूर्त निष्कर्ष निघाले.
सगळ्यात आधी मला कवितेत भावतो तो त्यातील साधेपणा. गोष्टी जशा आहेत तशाच कोणताही रंजित-अतिरंजितपणा न करता शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे. सच्चेपणाकडे जाण्यासाठी असा साधेपणाचाच रस्ता हवा. किंवा साधेपणातूनच सच्चेपणापर्यंत जाता येऊ शकते. आणि सत्य आहे ते सुंदर असते असा तर भारतीय परंपरेचा एक सिद्धांतच आहे. या काव्यमय झेन दृष्टांताचे विषय हे बहुतेक करून निसर्गातील सर्वसाधारण क्रिया आहेत पण ज्याकडे आपले लक्ष सहसा जात नाही वा या गोष्टीकडे लक्ष द्यावेसे आपणास वाटत नाही. कदाचित , गोष्टी गृहित धरण्याची आपल्याला सवय लागून गेली आहे, हे त्यामागील कारण असू शकेल. कवि निसर्गाच्या पातळीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आणि या निसर्गाच्या सान्निध्यात तादात्म्य पावताना त्याला समांतरपणे चाललेल्या अनेक गोष्टींचे दर्शन घडते. हे दर्शन तो तो विस्मयाने घेतो या विस्मयातूनच तो जागृतीची जाणीव घेतोे.
माणूस आणि निसर्ग यांना एका पातळीवर कवि पाहतोय. आणि त्यामुळेच त्याला हे दृष्टांत मिळत आहेत. म्हणजे माणूस आणि निसर्ग वेगळा नाही हे प्रत्येक कृतीवेळी आपण लक्षात ठेवले पाहिजे, असा एक संदेश ही कविता वारंवार देते, शिवाय प्रत्येक गोष्टीकडे ‘यूनिक’ समजून आपण बघू लागलो तर त्यातील सुप्त नवल आपल्यापुढे उलगडल्याशिवाय राहणार नाही, असेही जाणवले. या कवितांत एक आध्यात्म आहे आणि हे आध्यात्म जाणीवेचे आहे. जाणीवेतून जागृतीकडे जाणारे हे आध्यात्म आहे, असा एक निष्कर्षही काढावासा वाटला.
संग्रहातील प्रत्येक झेन कविता ही सुटी आहे. प्रत्येक कविता ही कविची जणू त्याच्या अनुभवांविषयीची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. ही कविता भाषेच्या कुठल्याही अलंकारादी कसरती न करता सरळ उमटते पण तरीही ती एक प्रत्यय उभा करते, हा प्रत्यय सुद्धा एक स्वतंत्र झेन म्हणूयात का ? अनेक अनुभव भाषेत व्यक्त होतीलच असे नाहीत, पण ते असतात. ही संवेदनेची भाषा व्यक्तीसापेक्ष असते. या कवितांच्या अर्थानाही एक स्पेस रिता आहे, त्यातही अनेक अदृश्य अर्थ सामावले असू शकतात, वाचकाला ते सापडू शकतात, प्रत्येक वाचकाला ते वेगळे सापडू शकतात, वेगवेगळ्यावेळी वेगवेगळे सापडू शकतात, हे सुद्धा दुसरे झेन म्हणूयात का ? माझा वैयक्तिक अनुभव असा होता की अनेेक कविता वाचून संपतात तिथे एक चित्रमय, नादमय कविता आपल्याआपण गुुणगुणायला लागते, हे सुद्धा एक झेन म्हणता येईल का?
संग्रहातील कवितांना नावे दिलेली नाहीत. तीन ओळींपासून ते २१ ओळींपर्यंत एकूण १०६ कविता संग्रहात आहेत. एका ओळीची शब्द संख्या तीन पेक्षा जास्त नाही. एका तीन ओळींच्या कवितेत तर पहिल्या दोन ओळींत प्रत्येकी एक शब्द आहे.
फुलान
सांगलें
अशेंच फूल ....
अशाचप्रकारे शब्दांची विशिष्ठ मांडणी करून कवीने साधलेला परिणामही नजरेत भरतो. उदा. -
सवण्यांची
फांतोड चिंव चिंव
कानार पडटांच
रात
पि
घ
ळूं
क
लागता....
कवी आपल्या अनुभवांना उत्स्फूर्तपणे व्यक्त करताना कधी कधी खोल चिंतनात उतरतानाही दिसतो. उदा.÷-
म्हजें स्मीत
खरेंच म्हजें
काय तुजें ?
....
मळबान म्हटलें,
सांग, हांव व्यक्त
काय अव्यक्त...?
.....
पिशें
दोळ्यांक पिशें
आकाराचें
आनी मनाक
निराकाराचें
अनेक कवितांतून वर्णने प्रत्ययकारी झाली आहेत. ती कवीच्या उत्स्फूर्त अनुभवांना वाचणार्याच्या चित्तावर प्रतिबिंबिंत करतात - ‘जुई जुुई पावलांनी नाचपी उटंगाराच्यो अटंग धारो’
‘वार्यार पिंपळाच्या पानांचे कथ्थक’
‘मळब आंगार झेलपी घोण’
‘पाणयांत वणखल्लो चंद्र’
‘मळबाच्या केंद्रबिंदूंत उडून वचपी पक्षी’
‘धारांच्या कंवळ्या पावलांची, न्हंयच्या पाणयार चित्रलिपी’
‘आपल्या कर्कश आवाचान गंभीर मोनेळ चिरीत वचपी कावळो’
‘लाल फुलांचो गुलाल उधळून मोगाळ उबाळांची धुळवड मनोवपी गुलमोहर’
स्थीर होऊन निसर्गाशी एकरूप होऊन केवळ निरीक्षणातून दृष्टी किती समृद्ध होते आणि माणूस जागृतपणे विचार करू लागला तर जाणीवेतून आत्मशोधाचा एक मार्ग कसा सापडू शकतो याचा विश्वास कवितांतून मिळतो. इथे मग झेन जणू जीवन किंवा एकूण जीवसृष्टी, परिसंस्था, पर्यावरण समजून घेण्याचा एक आध्यात्मिक मार्ग बनून जातो. म्हणजे आध्यात्मिक, धार्मिक नव्हे. हे अध्यात्म जाणिवेतून जागृतीकडे नेणारे आहे.
कवी रमेश वेळुस्कर : इंटरनेट फोटो |
या संग्रहातील काही कविता -
पावस म्हजेर शिंवरता
ती मळबाची
मनस्वी भाक
मळबाच्या स्पर्शाची
अनंत तांक
........................................
पिशें
दोळ्यांक पिशें
आकाराचें
आनी मनाक
निराकाराचें
............................................
मिठाची कण जाल्यार
दर्यायेदें जांव येता
आनी मागीर
चान्न्याच्या
उजवाडान न्हांव येता
............................................
मळबान म्हटलें,
सांग, हांव व्यक्त
काय अव्यक्त...?
..........................................
संयभोंवतणचो
गंभीर मोनेळ
कावळो
आपल्या कर्कश
आवाजाचे कातरीन
चिरीत गेलो
.......................................
सवण्यांची
फांतोड चिंव चिंव
कानार पडटांच
रात
पि
घ
ळूं
क
लागता....
.....................................
लाल फुलांचो
गुलाल उधळून
धुळवड
मनयली
गुलमोहोरान
मोगाळ
उबाळांची...
...................................
कितल्यो
कला
कितल्यो
अदा
ल्हार
आमच्या नदरांर
जालां
फिदा
फिदा फिदा
.................................
गम्मत
मेघांनी केली
आनी पान
पान पान रानाचें
वाजयत गेलें झांज
..................................
चक्क पारदर्शी
नदरस्पर्शी
थेंब
टींब
एक मळब
माळून आयलें
Comments
Post a Comment