तॉलस्तॉयची शाळा


लेव तॉलस्तॉय म्हटल्यानंतर आपणास आठवण येते ती ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ कादंबरीची व लगेच उभी राहते त्याची साहित्यिक प्रतिमा. पण तो तेवढ्यापुरता मर्यादित नव्हता. प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालेला लष्करी अधिकारी, आंधळ्या प्रथा-परंपरा, धार्मिक अंधश्रद्धा यांना आव्हान देणारा क्रुसेडर, 16 हजार एकर जमिनीचा मालक, गर्भश्रीमंतीत लोळत पडण्यासारखी परिस्थिती असताना गरिब, मजूरांसाठी कार्य करणारा कार्यकर्ता, नवीन संरचनेच्या वाटा शोधणारा चिंतक, अशीही त्यांची ओळख होती.

महात्मा गांधींनाही त्याला गुरुस्थानी मानावेसे वाटले ते उगीचच नव्हे.

तॉलस्तॉय फक्त विचारवंत नव्हता. तो एक कृतीशील विचारवंत होता. यातूनच त्याने केलेला प्रयोग होता त्याचा ‘शाळे’चा. ही शाळा त्याने आपल्या यास्नाया पोलियाना गावी अन्य काही साथींना सोबत घेऊन सुरू केली होती. त्यात गरीब कष्टकरी शेतमजुरांच्या मुलांना घडवण्याचे काम करायची त्याची योजना होती.

तॉलस्तॉयची शाळा सकाळी सुुरू होते. मुलांना शाळा सुरू होण्याची कल्पना यावी यासाठी शिक्षक तॉलस्तॉय स्वत: घंटा वाजवतो. पण त्याची तशी काही गरज भासत नाही. मुले आधीच शाळेत जाण्यासाठी सकाळची वाट पाहत थांबलेली असतात. त्यांच्याकडे दप्तर नाही, हातात पाटी नाही, गृहपाठाचे चेहर्‍यावर अजिबात टेन्शन नाही. (कारण गृहपाठ दिलाच जात नाही.) आपले निरागस बालपण आणि कालप्रमाणे आज काय नवीन शिकायला मिळणार याची जिज्ञासा फक्त घेऊन मुले शाळेत येतात. समजा शाळा सुरू असताना कंटाळा आला तर मध्येच उठून जाण्यासही ते मोकळे आहेत.

वर्गातले वातावरण खिडकीतून आत येणार्‍या हवेइतकेच मोकळे. विद्यार्थ्यांनी कसे बसावे, कुठे बसावे तत्सम गोष्टी गौण ठरतात. कुणी जमिनीवर  बसलाय, कोण खिडकीकडे उभा आहे, कोण उंबर्‍यावर बसलाय, कोण कोणाबरोबर बसलाय तर कोण एकांतात.

संदर्भास अनुरूप फोटो : इंटरनेटवरून


पहिला तास भाषेचा. इथे तॉलस्तॉय तीच भाषा शिकवतो जी मुलांच्या तोंडात घोळत आहे. विद्यार्थ्यांमागे व्याकरणाची कटकट नाही. कारण त्यांना व्याकरण आले नसते तर ती बोलू शकतात तशी बोलू शकली नसती व  त्यांचे बोलणे इतरांना समजलेही नसते. वर्गात प्रयत्न होतोय तो फक्त त्यांना येते ती भाषा स्वाभाविकपणे अधिक विकसित करण्याचा. बोलभाषेवर पकड होत जाईल तसा वर्ग निबंधाकडे वळणार आहे. कारण भाषा केवळ बोलून चालणार नाही. आपल्या भाषेत लिहिताही यायला हवे.  पण निबंधाचा विषय मुले स्वत:च ठरवतील. कारण हेतू लिहायला शिकवण्याबरोबरच मुलांची स्वाभाविक अभिव्यक्ती जागी करण्याचाही आहे.

आणखी एक पद्धत या शाळेत राबवली जाईल. तॉलस्तॉय प्रसंग सांगेल व मुलांनी दुसर्‍या दिवशी तो लिहून आणायचा आहे. यातून मुलांच्या आकलनास तर वाव मिळेल शिवाय त्यांच्या एकाग्रतेस, स्मरणशक्तीसही व्यायाम होईल. करता करता मुलांमध्ये चिकित्सकपणाही जागा होऊ लागला. समजा एखाद्याने प्रसंगवर्णन अघळ-पघळ लिहून आणले असेल तर मुलेच आता सांगू लागतात-तुझ्या अमुक अमुक गोष्टी अनावश्यक आहेत, हे शब्द गाळ, वाक्ये लहान हवीत- इत्यादी.

भाषा लिहिता लिहिता निरीक्षणातून मुले शुद्धलेखन शिकली. ते वेगळे शिकविण्याची तॉलस्तॉयला गरज भासली नाही.

या शाळेतला एक विद्यार्थी आहे फेड्का. या मुलाला त्याने विषय दिला होता तेव्हा चार ओळींच्या वर तो लिहू शकला नव्हता. तॉलस्तॉयने एक दिवस त्याला सहज विचारले. तू गावाबाहेर कुठे फिरून आला आहेस का ? त्यावर, दोन वर्षांआधी वडलांबरोबर शहरात गेल्याचे या दहा वर्षांच्या मुलाने सांगितले. तॉलस्तॉय म्हणाला - उद्या येताना तुझ्या या प्रवासाबद्दल लिहून आण. दुसर्‍या दिवशी मुलाने लिहून आणलेले प्रवासवर्णन वाचून तॉलस्तॉय आनंदी झाला. त्याचे प्रवास वर्णन त्याने आपल्या शैक्षणिक प्रयोगांच्या प्रसारासाठी सुरू केलेल्या जर्नलमध्ये छापले सोबत अभिप्राय लिहिला - मुलांमधील कलाकार कसा असतो त्याचे हे उदाहरण आहे.

शाळेतला इतिहासाचा तासही आगळा वेगळा. फक्त आपल्या देशाविषयी देशभक्ती व इतर देशांविषयी द्वेष, असे शिक्षण येथेे नाही. इतिहास शिकून कोण शहाणा बनलाय ! ज्यांनी इतिहास घडवला त्यांना इतिहास किती माहित होता ! असा त्याचा प्रश्‍न आहे. तॉलस्तॉयच्या  वर्गात राजांच्या आणि युद्धांच्या इतिहासापेक्षा लोकांच्या आणि विचारांच्या इतिहासाला जास्त महत्त्व आहे. मुलांना इतिहास आवडतो तो ‘कलात्मक’ पद्धतीने शिकवल्यावर. इतिहासातील अद्भुतपणा मुलांना भावतो म्हणून त्याने एक पद्धत विकसित केली. ग्रीक, रोमन, जर्मन पुराणातील तसेच ‘जुन्या करारा’तील कथा तो मुलांना सांगू लागला. त्या ऐकताना मुलांमध्ये उत्कंठा तर जागी व्हायचीच शिवाय त्यातून ती ‘शहाणपण’ही शिकायची.

भुगोलाचा तासही वेगळ्या वाटेने जाणारा. नकाशे आणून त्यातून भूगोल गळी उतरवणे, भुगोलाच्या सिद्धांतांची घोकंपट्टी करून घेणे त्याला नामंजूर. मुळात मुलांना ज्यात रूची नाही, जे आत्मसात करण्याकडे त्यांचा कल नाही ते तो सरळ टाळतो. देश बघायचा मग नकाशातून का, थेट तिथेच जाऊन पाहायचा, असे म्हणत त्याने मुलांना प्रवासवर्णने सांगत भूगोल जीवंत करायला सुरूवात केली.

चित्रकलेचा तासही मजेत असतो. एखादी वस्तू समोर ठेऊन चित्र काढणे त्याच्यालेखी मागास कल्पना आहे. त्यातून ‘ओरिजिनॅलिटी’ हरवतेच वरून नक्कल करायची सवय जडते. त्यामुळे तुुम्हाला हवे त्या विषयाचे चित्र काढा, अशी त्याची सूचना आहे.

तॉलस्तॉयच्या शाळेतले विज्ञानाचे वर्गही प्रयोगांचे. गणितांचे ज्ञानही आहे. पण या दोन विषयांची जास्त चर्चा त्याच्या शिक्षणक्रमात दिसत नाही.

अशा या वातावरणात कधी कंटाळ्याचे ढग जमू लागले तर मग वर्ग लोकगीते गाऊ लागतात. ती म्हणता म्हणता आपली वाक्ये, शब्द, कडवी जोडून एक अनोखे सर्जनही घडवू लागतात. कधीकधी निसर्ग पाहायला सगळे रानावनातून भटकायला जातात तर कधी जनजीवन पाहण्यासाठी गावातल्या गल्ल्यांमधून फिरू लागतात.

बुद्धीसाठीचे शिक्षण झाले. पण श्रमाच्या शिक्षणाचे काय. श्रमाचाही वर्ग आहे. यात झाडू मारणे, बाक पुसणे, माटात पाणी भरणे, बागेतल्या झाडांना पाणी देणे इत्यादी कामे  तॉलस्तॉय मुलांकडून फक्त करून घेणार नाही, तो स्वत: त्यांच्याबरोबर ही कामे करणार आहे.

या शाळेच्या फाटकाच्या आत दोन गोष्टींना प्रवेशबंदी आहे. एक - परीक्षा आणि दोन - शिस्त. शिस्त मुलांत मिसळली तर त्यांची तंद्री भंग पावेल. ज्या मोकळ्या व्यवस्थेत मुले नांदतात ती संपेल व शिस्त आपली ‘व्यवस्था’ मुलांवर लादेल. परीक्षा मुलांच्या आत्मविश्‍वासावरच घाला घालणारी. मुलांना घाबरट बनविण्यात या परीक्षेचा मोठा वाटा. आपली परीक्षा घेतली जात आहे असे मुलांना वाटूच नवये हा त्याचा नियम. मुलांना किती येते आणि काय येते हे परीक्षेत समजत नाही, समजते ते केवळ त्यांनी किती पाठांतर केले आहे, काय पाठांतर केले आहे इतकेच, हा तॉलस्तॉयचा निष्कर्ष होता.

‘दंड ऊर्फ शिक्षा’ याला तर या शाळेतून हद्दपारच करण्यात आले आहे. दंड म्हणजे सूडच. त्याला न्यायाचे तत्त्व मानणे तॉलस्तॉयला शक्यच नाही. आपल्या सहकारी शिक्षकांनाही त्याचे सक्त फर्मान होते. मुलांच्या झगड्यात न्याय करण्याच्या भानगडीत पडू नका.

एक दिवस शाळेत एक प्रसंग घडला होता. एक दिवस शाळेत वस्तू चोरली म्हणून दोन विद्यार्थ्यांच्या गळ्यात ‘चोर’ म्हणून पाट्या अडकवण्यात आल्या होत्या. ते पाहून इतर मुले मोठमोठ्याने हसत होती, टाळ्या पिटत होती, त्या दोन मुलांना ‘हूश’ घालत होती. तॉलस्तॉयला मुलांच्या चेहर्‍यावर एक दुष्ट आनंद दिसला. त्या दोघांना दंड देऊन इतर मुलांमध्ये हीन भाव जागविल्याचा पश्‍चाताप त्याला झाला.

तॉलस्तॉयला शाळा एक फुलबाग बनवायची होती. प्रत्येक फुलाला स्वत:ची ठेवण, वेगळा गंध, स्वतंत्र रूप, आणि वार्‍याला भिडण्याची शैलीही प्रत्येकाची निराळी. इथून बाहेर पडणार्‍या मुलांकडे फक्त दोन गोष्टी होत्या, एक पंख आणि दुसरे उडण्यासाठी उंच उंच आकाश. मुले येथे यायची ती आपल्याला जे पाहिजे ते शिकण्यासाठी. अशा मुलांकडूनच नव्या व मौलिक कामगिरीची अपेक्षा ठेवली जाऊ शकते.

आपल्या शिक्षण पद्धतीत मुले शाळेत जातात ती त्यांना शिकावेसे वाटते ते शिकण्यास नव्हे, कुणाला तरी पाहिजे ते शिकण्यासाठी. तथाकथित सुशीलपणा, संस्कारांच्या जोखडांखाली त्यांना वाढवता वाढवता त्यांना कुणासारखे तरी बनविण्याचा अट्टाहास. पण या सर्व धबडग्यात मुलांना स्वत:चे व्यक्तिमत्त्व गवसते का ?

रवींद्र केळेकरांचे ‘तॉलस्तॉय’ पुस्तक घेऊन बसलो होते. तिथेच शिक्षक तॉलस्तॉयशी गाठ पडली व त्याच्या वर्गात काही धडे गिरवता आले. आणि हो, स्वत: तॉलस्तॉयकडे कुठच्याही विद्यापीठाची पदवी वगैरे नव्हती. म्हणूनच तर त्याला असा वेगळा प्रयोग करायचे धाडस झाले नसेल ना ?


Comments