योग होता गोवा लिटररी अॅण्ड आर्ट फेस्टिव्हल 2013मध्ये संदेश प्रभुदेसाय यांच्या तीन भाषांतील (कोंकणी, मराठी, इंग्रजी) तीन पुस्तकांच्या प्रकाशनाचा व प्रकाशनाला जोडूनच कवी गुलजार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ‘जोडती जुबाने जुडती जुबाने’ या चर्चासत्राचा.
चर्चासत्रादरम्यान भारतातील विविध भागांतील प्रतिनिधींनी बहुभाषिकत्व व त्यामुळे त्यांना झालेले लाभ याविषयी मते/निरीक्षणे मांडली. चर्चासत्रात गुलजार यांच्यासमवेत काश्मीरच्या नीरजा मट्टू, आसामच्या अध्यापिका व लेखिका अरुपा पटांगिया कलतिया, सिंगापूरचे कईस मूनी सिंग व गोव्यातील संदेश प्रभूदेसाई, दत्ता नायक, विश्राम गुप्ते सहभागी झाले होते. चर्चासत्रातून व्यक्त झालेले मुद्दे चर्चेला प्रोत्साहन करणारे वाटले.
गोव्याच्या ज्या काही बाबी राष्ट्रीय पातळीवर अभिमानाने मिरवता येतील, त्यापैकी एक म्हणजे येथील बहुभाषिकत्व ही एक. पोर्तुगीज राजवटीतून मुक्त होऊन जी पीढी आली तिला इंग्रजी, मराठी, कोंकणी, हिंदी व त्याबरोबर फ्रेंच, पोर्तुगीज अशा भाषा अवगत होत्या. त्यानंतरच्या पीढीलाही तीन - चार भाषा कळत होत्या. नव्या पीढीचा विचार करता हे बहुभाषिकत्व गोवा गमावत असल्याचे दिसत आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. पण भाषांपासून वाढत चाललेला दुरावा व इतर भाषांबाबतचा द्वेष व आकस ही त्यापैकी दोन कारणे असू शकतात. ‘सोप्या’ इंग्रजीचे प्रेम व केवळ या एकाच भाषेतून सर्व काही साधता येईल हा अभिनिवेष बळावत चाललेला आहे. त्याचबरोबर इतर भाषांकडे पाहण्याची नकारात्मक दृष्टी हे सुद्धा त्यामागील एक कारण आहे. यातून भाषिक अहंकार निर्माण होताना दिसतात.
बहुतेक नवी पीढी एका इंग्रजीचा थोडाफार अपवाद सोडल्यास इतर भाषांतून विशेषत: हिंदी, कोंकणी, मराठीतून वाचनाबाबत निरुत्साही दिसते. या भाषांचा शुद्ध वापर करून दहा - वीस वाक्ये त्यांना नीट बोलता येत नाहीत. काहींची स्थिती तर अशी असते की ज्यावेळी ते बोलतात तेव्हा कुठुनतरी त्यांना आणून या भाषा शिकवल्या जात आहेत असल्याचा भास व्हावा. शालेय स्तरावर प्रादेशिक भाषा शिकवण्याबद्दलही उत्साह दिसून येत नाही.
हे सर्व का घडत असावे ?
आसाम येथील अध्यापक श्रीमती अरुपा यांच्या मते भाषेशी संबंधित वर्चस्वाच्या धारणांमुळे भाषिक प्रश्न निर्माण होतात. विश्राम गुप्ते यांचे मत होते की भाषिक राजकारणामुळे व त्यातून उद्भवलेल्या कुरघोडींमुळे बहुभाषिकत्व धोक्यात येत चालले आहे. एकच भाषिक ओळख असावी असा ‘फॅनेटिक’ आग्रह तयार झाला आहे. माणसाला अनेक ओळखी असतात हे नाकारले जात आहे. या वर्चस्वच्या गंडामुळे सर्व भाषांकडे समानतेने पाहण्याची दृष्टी राहिलेली नाही. इंग्रजीतून संभाषणाचा सुकाळ त्यातूनच उद्भवलेला आहे. अनेकदा ‘स्लँग’सुद्धा म्हणता येणार नाही अशा इंग्रजी बोलणार्यांकडून कोंकणी-मराठी आदि प्रादेशिक भाषा बोलणार्यांना गौण समजले जाते, कमी लेखले जाते. बाजारात स्थानिक विक्रेता असला तरी ग्राहक त्याच्याकडे हिंदीतून संवाद साधताना दिसतो. बहुभाषिकता नाकारून केवळ इंग्रजीमय होण्याच्या हट्टाग्रहातून एक कृत्रिम ओळख निर्माण करण्याचा खटाटोप सुरू झाला आहे.
केवळ इंग्रजीकडे वाढत चाललेला ओढा हा नवी पीढी भावनिकदृष्ट्या अशक्त बनवेल असे मत श्रीमत अरुपा यांनी मांडले. भाषा हे नवनिर्मितीचे माध्यम आहे तिला आपल्या दुराग्रहाचे माध्यम बनवू नये, असेही त्या म्हणाल्या. त्यांच्या मतांतून ध्वनित होत होते, ते म्हणजे, इंग्रजीचाही द्वेष नको पण ज्या मातीत आपण वाढतो तेथे अभिव्यक्त होताना इंग्रजी आपल्याला पुरेपुर साथ देऊ शकत नाही. आसाममध्ये शंकरदेव यांनी वाड्मयीन भाषेत मैथिली, ऊर्दु, बंगाली, हिंदी, संस्कृतचा प्रभाव असल्याचे काही उदाहरणे देऊन अरुपा यांनी सांगितले.
काश्मिरी भाषेत पुढे काही भवितव्य नाही अशी भावना बनल्याने काश्मिरात या भाषेबाबत दुरावा वाढत आहे व अनेक घरांमधूनही ती बोलणे बंद झाले आहे, असे श्रीमत मट्टू यांनी नमूद केले.
भाषिक सामंजस्य निर्माण करणे व बहुभाषिकत्व वाढीस लावणे यासाठी काय करता येईल ?
दत्ता नायक यांनी याबाबत काही मुद्दे मांडले. त्यांनी पुडुचेरी येथील अरविंद आश्रमातील शाळेचे उदाहरण दिले. या शाळेत मुलांना पाच भाषा शिकवल्या जातात. स्थानिक तामीळ, संस्कृत, इंग्रजी, हिंदी व फ्रेंच. बहुभाषिकत्वास पोषक वातावरणाचा लाभ सर्व भाषांना आदान प्रदान करण्यासाठी व विकसित होण्यासाठी होऊ शकतो, असे ते म्हणाले. आपल्या कोंकणी लेखनात संस्कृत, मराठी व इतर भारतीय भाषांचे ज्ञान उपयोग ठरल्याचे त्यांनी सांगितले.‘शतपावली’ या मराठी शब्दावरून आपण ‘फांतोड पावली’ हा कोंकणी शब्द तयार केल्याचे उदाहरण त्यांनी दिले.
आपल्या शिक्षण व्यवस्थेत इंग्रजी भाषा वगळता इतर भाषांबाबत निरुत्साही वातारवरण दिसते. अनेक शाळांत भाषा शिकवणारे शिक्षण स्वत: ‘भाषे’चे विद्यार्थीच नसतात. खरे म्हणजे शालेय स्तरावर भाषेबाबत प्रेम व अभिरुची निर्माण व्हायला हवी. मुळात भाषा ही केवळ भाषा नसते. ते संस्कृतीचे अभिन्न अंग असते. ती एक ओळख असते.
चर्चासत्राच्या निमित्ताने क्रिस मुनी सिंग यांना ऐकण्याची संधी मिळाली. मुळ ऑस्ट्रेलियन व सध्या सिंगापुरमध्ये स्थायिक या व्यक्तीने शीख पंथ स्वीकारला आहे. त्यानंतर केवल गुरुमुखी लिपीतून ‘गुरुग्रंथसाहेब’ वाचता यावा म्हणून पंजाबी भाषा व गुरुमुखी लिपी शिकून घेतली.
आपण अनेकदा पाहतो की ‘ही माझी भाषा आहे, मला तुमच्या भाषेची गरज नाही’ अशी वृत्ती दिसून येते. भाषावादांतून अनेकदा भाषिक दुरावे निर्माण होतात. कधी कधी वाटते की जर उत्तर भारतात एखादी दाक्षिणात्य भाषा व दक्षिण भारतात उत्तर भारतीय भाषा शिकण्याची अनिवार्यता केली गेली तर देशातील भाषिक अभिनिवेश व त्यातून निर्माण झालेले दुरावे कमी करण्यास बर्यापैकी मदत होऊ शकेल.
भाषा हे सशक्त अभिव्यक्तीचे व दुसर्यास जाणून घेण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे. आपण आपले भाषिक ज्ञान वाढवणे सोडाच, असलेले बहुभाषिकत्व करमी करून एकमेकांपासून दुरावतो आहोत व आपली अभिव्यक्ती अशक्त करून घेत आहोत. भाषा हे माध्यम एकमेकांच्या जवळ येण्यासाठी वापरले जावे, एकमेकांपासून दूर जाण्यासाठी नव्हे. त्यासाठी भाषा-भाषांत दुरावा आणि द्वेष निर्माण करणार्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्या लागतील.
चर्चासत्राप्रसंगी गुलजार यांनी एक काव्यपंक्ती म्हटली - ‘एक दुसरे को जानने के लिए, आओ जुबानें बाँटे’. विचार करण्यासारखी त्यांची सूचना होती.
(नवप्रभा :18डिसेंबर13)
Comments
Post a Comment