‘भाषिक संघर्षाचे समाजशास्त्र’ : एक आढावा


Man is half himself. other half is his expression असे म्हटले जातेे.
माणसाच्या जीवनात अभिव्यक्तिला महत्त्वाचे स्थान आहे. आणि भाषा हे अभिव्यक्तिचे एक महत्त्वाचे माध्यम आहे.

या भाषा कशा बनतात ? कशा मरण पावतात  ? भाषा व बोली यांच्यात काय फरक आहे ? एखादी ‘बोली’ जर ‘भाषा’ बनणार म्हणू लागली तर ती बनू शकते काय ? तिला बनू द्यायचे काय ? अशा भाषेच्या जडणघडणीविषयीच्या आणि अस्तित्वाविषयीच्या प्रश्‍नांचा मागोवा रवींद्र केळेकर यांनी ‘भाषिक संघर्षाचे समाजशास्त्र’ या पुस्तकात घेतला आहे. त्याच्या या शोधाला केंद्रवर्ती  गोव्यातील कोंकणी -मराठी संघर्ष आहे. त्यामुळे गोव्याच्या संदर्भात या पुस्तकाची चर्चा आवश्यक वाटली. त्यादृष्टीने पुष्टकातील काही मुद्यांचा आढावा घेतला आहे.

पुस्तकातील चार विभाग व परिशिष्टांमधून भाषेची जडण घडण, भारतातील भाषिक नियोजनाचा प्रयत्न, इंग्रजीची चाललेली (अनाठायी) गुलामी, कोंकणी-मराठी संघर्ष व तो टाळण्यासाठी झालेले परंतु फसलेले प्रयत्न असे अनेक विषय येतात.

भाषा व बोली
भाषेतून बोली येत नसतात. बोलींचा एक परिवार असतो, त्यातली कुठली तरी एक बोली ‘भाषा’ म्हणून पुढे येते. राजकीय अनुकूलता, लोकांची अस्मिता आणि निश्‍चय या गोष्टींवर भाषा बोलीस्वरूप राहावी की भाषा म्हणून पुढे यावी हे अवलंबून असते. या अनुषंगाने केळेकर खडी बोलीच्या पोटभाषा असूनही ‘हिंदी’ व ‘ऊर्दू’ या भाषा म्हणून मान्यता कशा पावल्या व ‘रामचरितमानस’कार तुलसीदास यांची अवधी व ‘सूरसागर’ रचेता सूरदास यांची ब्रज या आंतरिक क्षमतेच्या दृष्टीने समृद्ध असतानाही कशा मागे पडल्या याचा उहापोह ते करतात.

भारतीय भाषांचा विकास
इतिहासकाळात डोकावत नेग्रिटोपासून आर्यांपर्यंत व त्यानंतरच्या काळात वेगवेगळ्या वंशाचे भारतात येऊन स्थायिक झालेल्या लोकांचा धावता आढावा घेत त्यांचा भारतीय भाषांच्या विकासाला कसा हातभार लागलेला आहे याबाबत सांगतात व निष्कर्ष नोंदवतात की -
हा देश मुळापासूनच बहुभाषिक होता व बहुभाषिक राहणार आहे. बहुभाषिकत्त्व हा या देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. मागील तीन हजार वर्षांपासून या सर्व भाषा एकमेकांवर प्रभाव घालून जगत आहेत. या बहुभाषिकत्त्वातच शांतता नांदवण्याचे सामर्थ्य आहे.

शिक्षणाची भाषा
‘आंतरराष्ट्रीय’ होण्याच्या हव्यासापोटी आपण कशाप्रकारे इंग्रजीची गुलामगिरी करून स्वत:चा सांस्कृतिक र्‍हास करून घेत आहोत याचे विवेचनही केळेकर करतात.
आपले नेते स्वतंत्र राष्ट्राचे नेते राहिले नाहीत. ते अमेरिका इंग्लंडच्या सांस्कृतिक वसाहतीचे नेते बनले आहेत अशी खंत व्यक्त करून ही वसाहत ‘इंग्रजीने’ कशाप्रकारे घडविली आहे त्याची चर्चाही त्यांनी केली आहे.
इंग्रजी शिकण्यास त्यांचा विरोध नाही. मात्र इंग्रजीतून शिकण्यास त्यांचा आक्षेप आहे. ते म्हणतात - ‘नवीन भारत निर्माण करणं हा आपला उद्देश असेल तर मौलिक विचार करणार्‍यांचा एक वर्ग आपल्याला लागेल. तो इंग्रजीच्या मार्फत निर्माण होणे शक्य नाही..हे परकी माध्यम कधीच आपल्याला मौलिक विचार करायला शिकवणार नाही. हे माध्यम फार तर नकलाकार-इमिटेटर्स निर्माण करू शकेल, अन् नकलाकार कधीच राष्ट्र उभारणीचे काम करू शकत नाहीत...’

‘लोक मुलांना ज्ञान संपादन करण्यासाठी शिक्षण देत नसतात. नोकरी मिळावी म्हणून  शाळेत शिक्षण घ्यायला पाठवतात. मुलांना ‘येते’ त्या भाषेतून शिक्षणाची संधी मुलांना मिळत नाही, ‘येत नाही’ त्या भाषेमार्फत त्यांना शिकावे लागते.’

हे टाळण्यासाठी दोन उपाय ते सूचवतात -
1. ‘मातृभाषा’ हा शब्द बाजूला करून ‘परिसर भाषा’ हा शब्द वापरावा. मुले ज्या भाषेतून एकमेकांशी बोलतात, भांडतात, शिव्या देतात ती भाषा शिक्षणाची भाषा म्हणून वापरावी.
2. इंग्रजीचे प्रसाशनातून उच्चाटन करावे व प्रशासन पूर्णपणे स्थानिक भाषांतून चालवावे. (असे केल्याने इंग्रजीचा प्रभाव कमी होईल असे त्यांना वाटते.)

अशा प्रकारे भाषिक प्रादेशिकत्त्व जपूनही राष्ट्रीय एकात्मता टिकवता येते ती योग्य भाषिक नियोजनाने, असे नमूद करून, अशा प्रकारच्या नियोजनाच्या आपल्या देशात झालेल्या प्रयोगांचा आढावा त्यांनी घेतला आहे. तो घेताना राष्ट्रभाषेचा प्रश्‍न, दक्षिणेत हिंदीचा प्रसार, उर्दूचे भवितव्य अशा मुद्द्यांची चर्चा करण्यात आली आाहे.

कोंकणी -मराठी संबंध
कोकणीचा संघर्ष, त्यामागची वैचारिक बैठक, त्याचे ध्येय, गोव्याचा मराठीशी संबंध तसेच कोकणी-मराठी सहयोग यासंबंधीही केळेकरांनी मुद्दे मांडले आहेत.

कोंकणी : भाषा की बोली ?
भाषाशास्त्रीय संकल्पनांचा आधार घेत त्यांनी कोंकणी ही मराठीची बोली नसून एक स्वतंत्र भाषा आहे, असे सांगून पुढील निरीक्षणे मांडली आहेत -
* कोकणीची ध्वनी प्रकृती आणि मराठीची ध्वनी प्रकृती एक नाही.
* दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे कोंकणीचे  मूळ शब्दभांडा आणि मराठीचे शब्दभांडार एक नाही.
* कोंकणीची व्याकरणिक घडण व मराठीची व्याकरणिक घडण यात फरक आहे.
*कोंकणीच्या म्हणी, तिचे वाक्यप्रचार याही क्षेत्रात ती मराठीहून भिन्न आहे.
* मराठी व गुजराती या भाषा एकमेकींच्या जितक्या जवळच्या किंवा दूरच्या आहेत तितक्याच कोंकणी आणि मराठी या भाषा एकमेकींच्या जवळ व दूर आहेत.

मराठी : सांस्कृतिक भाषा
मराठी ही गोव्याची सांस्कृतिक भाषा होती ते त्यांनी नाकारलेले नाही. पण ती गोव्याची मातृभाषा म्हणून त्यांना मान्य नाही. विकासाची क्षमता असून जेव्हा एखादी भाषा प्रतिकूल परिस्थितीमुळे आपला विकास साधू शकत नाही तेव्हा ती भाषा बोलणारा समाज जवळच्या एखाद्या समृद्ध भाषेची सांस्कृतिक भाषा (कल्चरल लँग्वेज) म्हणून निवड करतो.गोमंतकीयांची मराठीची निवड ही अशीच असावी असे त्यांना सांगायचे आहे.

ते म्हणतात - धार्मिक छळामुळे जे गोमंतकीय गोवा सोडून बाहेर गेले अन् कर्नाटक, केरळसारख्या प्रदेशात स्थायिक झाले त्यांनी आपल्याबरोबर मराठी सांस्कृतिक परंपरा नेली होती. त्यांनी ती एक दोन पीढ्यांपर्यंत चालवली. परंतु गोव्याप्रमाणे त्यांची महाराष्ट्राशी  भौगोलिक  जवळीक व सलगता राहिली नाही व मराठी त्यांच्या जीवनातून गळून पडली. परिणामी त्यांनी त्या त्या प्रदेशातील भाषा आपली सांस्कृतिक भाषा म्हणून स्वीकारली. त्यामुळे कोंकणी समाज वेगवेगळ्या राजकीय प्रदेशातच नव्हे तर वेगवेगळ्या सांस्कृतिक जगातही विभागला गेला.

असे असले तरीही त्यांची मूळ भाषा वेगळीच (कोंकणी) होत व त्यांनी ती जपली होती. 1589 वर्षी कोचिन परिसरात कोंकणीतून लिहिलेले ‘व्यंकटेश कल्याण’ खंंडकाव्य तसेच फादर थॉमस स्टीफन्सनी लिहिलेले ‘दौत्रिन ख्रिस्ता’ ही उदाहरणे ते देतात.

थॉमस स्टीफन्सनी ‘ख्रिस्तपुराण’ जरी  मराठीत लिहिले तरी शुद्ध मराठी गोव्यात समजत नसल्याने स्थानिक भाषेतील शब्द त्यात ‘मिसरीत’ केल्याचे सांगितले आहे याकडे केळेकर लक्ष वेधतात. अजूनही शिकल्यावाचून येथे कोणाला मराठी येत नाही व शिकल्यावर लिहिता वाचता आले तरी सरावावाचून कोणाला मराठीतून बोलता येत नाही असे ते नमूद करतात.

कोंकणी हीच भाषा विखुरलेल्या कोंकणी समाजाला एकत्र आणू शकते. गोव्यातील हिंदू व ख्रिस्तींमध्ये संवाद घडवू शकते असा त्यांचा विश्‍वास आहे.

कोंकणी-मराठी सहयोग
गोव्याच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ गाजणारा एक विषय म्हणजे भाषाप्रश्‍न. गोव्याची राजभाषा मराठी की कोंकणी किंवा गोव्याची राजभाषा कोंकणी होऊ शकत नाही, असा हा वाद.  शेवटी राजभाषा म्हणून कोंकणीस मान्यता लाभली.

रवींद्र केळेकर या पुस्तकात कोंकणी-मराठी सहयोगाचा विचार मांडतात. हा सहयोग का होत नाही या अनुषंगाने सहयोगासाठी झालेेल्या (पण फसलेल्या, रखडलेल्या व अयशस्वी ठरलेल्या) प्रयत्नांची चर्चा त्यांनी केली असून संबंधित संदर्भ मांडले आहेत.

1954 मध्ये मुंबईत स्वत:ला ‘मराठी भाषिक’ मानणार्‍या गोमंतकीयांचे एक अधिवेशन झाले. त्याच्या अध्यक्षपदावरून काकासाहेब कालेलकरांनी एक आवाहन केले होते. ‘ज्याला गोव्याचे हित करायचे असेल त्यांनी मराठी आणि कोंकणी दोन्ही भाषांची एकत्र सेवा करण्याची दीक्षा घेतली पाहिजे.’
मात्र पुढे कोंकणीबाबतचा कडवटपणा अधिक वाढत गेला.

केळेकर म्हणतात - त्यावेळपासून एक नवीन ‘मानदंड’ सुरू झाला. तो म्हणजे गोव्याच्या लेखकाने मराठीची सेवा केली म्हणून भागत नाही, त्याने कोंकणीला विरोध केला पाहिजे, नाहीतर तो मराठीद्वेष्टा ठरतो.
आयुष्याची पाच सहा दशके मराठीची सेवा करणार्‍या बा. भ. बोरकरांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद व ज्ञानपीठ देण्यास विरोध झाल्याचा दाखला देऊन केळेकर सूचना करतात की, मराठीत आपण लिहिले, मराठीलाच आपण वाहून घेतले, म्हणून मराठी साहित्यिकांचे जग आपल्याला मान्यता देईल या भ्रमात राहू नये.
हिंदीने आपल्या परिसरातील स्वतंत्र भाषांना आपल्या पोटभाषा मानले व त्यातील साहित्य हिंदी साहित्यात समाविष्ट करून घेतले. या उलट मराठीने कोंकणी साहित्य दुसर्‍या भाषेतले मानले. आपल्या बोलीचे साहित्य मानले नाही अशी टिप्पणी केळेकर करतात.

गोव्यात मराठीचे स्थान हे कोंकणीच्या विकासासाठी हातभार लावू शकणारी सहायक भाषा म्हणून असून मराठीवाद्यांच्या ‘आक्रस्थाळेपणामुळे’ ही जागा देखील ते गमावून बसतील अशी भीती केळेकर व्यक्त करतात.

कोंकणी - मराठी सहयोग : केळेकरांच्या सूचना
केळेकरांना गोव्यात मराठी-कोंकणी सहयोग हवा आहे. इतकेच नव्हे तर जी मराठी हिंदूंमध्ये प्रचलित आहे तशी ख्रिस्ती समाजातही झालेली त्यांना हवी आहे. या सहयोगासाठी मराठीने आपला ‘हेकेखोर’पणा सोडून ‘समंजसपणाची भूमिका’ घ्यायला हवी असे ते सांगतात.
हा सहयोग घडून येण्यासाठी पाच सत्यांचा स्वीकार उभय पक्षांकडून झाला पाहिजे असे ते म्हणतात -
* गोव्याचा समाज एकभाषिक आहे हे उभय पक्षांनी मान्य केले पाहिजे. दुसरे म्हणजे, बेळगावमध्ये जसे कन्नड भाषिक अन् मराठी भाषिक असे दोन समाज आहेत तसे गोव्यात कोंकणी भाषिक अन् मराठी भाषिक असे दोन समाज नाहीत.
* या एकभाषिक समाजामध्ये काही लोकांचा मराठीशी संबंध नाही. उदा. ख्रिस्ती बांधवांचा. तेव्हा ‘गोव्याची भाषा’ म्हटल्यावर उभय समाजांना एकत्र आणणार्‍या अन् एकत्र ठेवणार्‍या एका समान भाषेचाच उल्लेख झाला पाहिजे. अशी समान भाषा कोंकणी आहे हे दोन्ही पक्षांनी मान्य केले पाहिजे.
* कोंकणी ही केवळ ख्रिस्ती समाजाची भाषा नाही. ती जशी त्या समाजाची भाषा आहे तशी ती मराठी शारदेची सेवा करीत आलेल्या कवी बा. भ. बोरकर अन् कथाकार लक्ष्मणराव सरदेसाई यांची भाषा आहे, अन् रवींद्र केळेकर, पुंडलिक नायक यांच्यासारख्या मराठी परंपरेत वाढलेल्या कोंकणी लेखकांचीही भाषा आहे, हे देखील स्वीकारण्यात यावे.
*कोंकणी ही जशी कवी बोरकरांची किंवा केळेकरांची जन्मभाषा आहे तशी ती आपली भाषा मराठी आहे असे म्हणणार्‍या बा. द. सातोस्कर, प्रभाकर आंगले, भगवंत नायक आणि रमाकांत खलप यांची देखील भाषा आहे. कोंकणी जेवढी केळेकरांची आहे तेवढीच खलपांची आहे व मराठी परंपरा जेवढी खलपांची आहे तेवढी केळेकरांची आहे.
*कोंकणी इतर विकसित भाषांइतकी आज जरी विकसित नसली तरी ती एक विकसनशील भाषा आहे आणि आज ती झपाट्याने विकसित होत राहिलेली आहे ही वस्तुस्थिती मान्य करून तिला बोली म्हणणे सोडून दिले पाहिजे व तिच्या विकासाला हातभार लावणे सर्व गोमंतकीयांचे कर्तव्य आहे हे बिनशर्त मान्य केले पाहिजे.
रवींद्र केळेकर हे एक सर्जनशील विचारवंत आहेत. मुक्तिनंतर गोव्याच्या अस्तित्वाचा आणि कोंकणी भाषेेचा प्रश्‍न जेव्हा निर्माण झाला त्या त्या वेळेस त्यांनी आपली मते आग्रहाने मांडण्याचे काम आत्मीयतेने व पोटतिडकीने केले.

‘भाषिक संघर्षाचे समाजशास्त्र’ हे पुस्तक ‘राजहंस वितरण-गोवा’ यांनी प्रकाशित केले असून त्याचे संपादन मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या रीडर डॉ. अरुणा दुभाषी यांनी केले आहे.




Comments