''नोबेल'' ऍलिस मुनरो

2013 सालचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार कॅनडाच्या कथालेखिका ऍलिस मुनरो यांना घोषित झाला. त्या अनुषंगाने त्यांच्या जीवनाचा, लेखनाचा आणि कथावैशिष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न

                                                                                                                                                                           फोटो:इंटरनेटवरून


‘मास्टर ऑफ मॉडर्न शॉर्ट स्टोरी’ असा गौरव करून कथालेखिका ऍलिस मुनरो यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आला. कॅनडाला साहित्याचा पहिला नोबेल मिळवून दिलेल्या या लेखिकेचा गौरव काहींनी ‘आमच्या (आंतोन) चेखव’  असाही केला. आज 82व्या वर्षात पदार्पण केलेल्या मुनरो यांनी ऐन विशीत कथालेखनाला प्रारंभ केला होता. कथा हा प्रकार हाताळताना त्यांनी 14 कथासंग्रह घडवले. गेली सुमारे सहा दशके कथालेखनाला वाहून घेतलेल्या या लेखिकेला याआधी  बुकर पारितोषिकही मिळाले आहे. गेल्यावर्षी 2012 साली आपल्या ‘डीअर लाइफ’ या काहीशा आत्मचरित्रपर कथासंग्रहाबरोबर त्यांनी लेखनातून निवृत्त होण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

मुनरो यांचा जीवनप्रवासही काहीसा त्यांच्या कथेसारखाच आहे- सरळ पण चढ-उतारांचा. मूळच्या ऍलीस ऍन लेडलॉ यांचा जन्म 1931 साली कॅनडातील ओन्तारिओ प्रांतात विंघम या नगरात झाला. त्यांचे वडील शेतकरी तर आई शाळेत शिक्षिका होती. विद्यापीठात एका शिष्यवृत्तीवर शिकत असताना त्यांनी 1950 साली आपली पहिली कथा ‘दि डायमेंशन ऑफ ए शॅडो’ लिहिली. त्याअगोदर काही वर्षे त्यांचे कथालेखन सुरू झाले होते. दरम्यान, शिक्षण घेतानाच्या काळात एका वाचनालयात कारकून म्हणून तसेच वेटर म्हणून त्यांनी काम केले.

1951 साली जेम्स मुनरो यांच्याशी ऍलिसचा विवाह झाला. त्यानंतर मध्यमवर्गीय व्यस्त जीवन जगतानाही कथालेखनात त्यांनी खंड पडू दिला नाही. यादरम्यान त्यांना तीन मुली झाल्या. पैकी एकीचे नंतर निधन झाले. नवर्यासोबत त्यांनी व्हिक्टोरिया येथे ‘मुनरोज् बुक्स’ नावाचे पुस्तकांचे दुकान सुरू केले होते. 1986 साली वयाच्या 37व्या वर्षी मुनरो यांचा पहिला कथासंग्रह ‘डांस ऑफ दि हॅपी शेड्स’ प्रकाशित झाला. कमी विक्री झालेल्या व फारसा कुणी न वाचलेल्या या (त्यांच्या पहिल्याच) कथासंग्रहाला त्यावर्षीचा कॅनडाचा गव्हर्नर जनरल पुरस्कार लाभला व मुुनरो सर्वप्रथम दृष्टिपथात आल्या.

1972 साली श्री. मुनरो आणि ऍलिस यांचा घटस्फोट झाला. त्याआधी एक वर्ष ‘लाइफ ऑफ गर्ल्स ऍण्ड वुमन’ या कथासंग्रहाने त्यांना बर्यापैकी प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यानंतर त्या वेस्टर्न ओंतारिओ विद्यापीठात ‘रायटर इन रेसिडंस’ कार्यक्रमाखाली रूजू झाल्या. 73 साली त्यांनी जेराल्ड फ्रेमलीन यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्या ओंतारिओतील कृषीसंपन्न क्लिटंन भागात राहत होत्या. वीस वर्षांपूर्वी विद्यापीठात ओझरती ओळख झालेल्या जेराल्ड यांच्याबद्दल ऍलिस नेहमी सांगायच्या. विद्यापीठात ऍलिसचे जेराल्ड यांच्यावर प्रेम होते, मात्र किमान ओळखीपेक्षा फार पुढे जाऊ शकले नाही. त्यानंतर मध्यंतरीच्या 20 वर्षांच्या काळात दोघांमध्ये काहीच संवाद नव्हता. त्यानंतर अचानक दोघांची गाठभेट झाली व ते विवाहबद्ध झाले. यंदाच त्यांच्या दुसर्या पतीचे निधन झाले.
नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर उत्कंठा म्हणून ऍलिस मुनरो पुस्तकांचा शोध घेतला तेव्हा वाचनालयात त्यांच्या चौथ्या 1974 साली प्रकाशित झालेल्या ‘समथिंग आय हॅब बीन मिनिंग टू टेल यू’ या कथासंग्रहाचा हिंदी अनुवाद ‘मै तुमसे कुछ कहना चाहती हूँ’ हाती लागला. हा अनुवाद 1993 सालचा आहे. यावरून मुनरो बर्याच पूर्वी भारतीय भाषांत आल्याचे लक्षात येते. या संग्रहातील मुनरोंच्या कथा फारच सुरुवातीच्या म्हणता येतील. असे असले तरी त्यांच्या कथावैशिष्ट्यांचे सूर यात टिपता येतात. या संग्रहातील 13 कथा या बहुतेक करून स्त्रीकेंद्रित आहेत. एकूण सगळ्या कथांची धाटणी एकसारखी दिसली तरी प्रत्येक कथा स्वत:चा असा निराळा चेहरा सांभाळून आहे.

घारीने उंचावरून काहीतरी टिपावे तशा मुनरो जीवनातील एखादा (सुरुवातीला साधा भासणारा) टप्पा गाठतात आणि तेथून सुरू होतो कथेचा प्रवास. मुनरो यांच्या कथेचा बाज तसा साधा आहे. पण हा साधेपणा त्यांच्या रियाजातून तयार झाला आहे म्हणून वैशिष्ट्यपूर्णही आहे. ही कथा साध्या वळणाची असली तरी सरळ नाही, एखाद्या लहान रस्त्यावरून गाडी वळणे घेत घेत पुढे जावी तशी ती जाते.

कथानक जसजसे विस्तारत जाते व संदर्भ जुळत जातात, अशा वेळी कधीकधी एक संदिग्धता अचानक उभी ठाकते जी अभिरूचिसंपन्न वाचकाला कथेचा फेरआढावा घेण्यास विवश करते. कधीकधी ते सूत्र सापडते तर कधीकधी ते शोधता शोधता कथा संपते आणि नंतर काहीवेळ मनात चिंतन चालू राहते.

साहित्य हे दुसर्याकडून ऐकण्यापेक्षा स्वत: वाचल्यास अधिक चांगल्या तर्हेने त्याचे रसग्रहण करता येते. मुनरो यांच्या कथा या अशा प्रकारच्या आहेत, त्या वाचकाशी वैयक्तिक नाते प्रस्थापित करतात.

कथाकथन आणि वर्णन हे मुनरो यांच्या कथेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कथा विशिष्ट तर्हेने व्यक्त होतात व वाचकाला भुरळ घालतात. एखाद्या सुहृदाला वा जवळच्या कुणाला तरी दूर सरोवरावर वा एकांतातील बागेत न्यावे आणि स्मृतीचे पट उलगडावेत तशा आत्मीयतेने मुनरो कथा कथन करतात.

मुनरो यांची वर्णनशैली त्यांच्या कथेला आणखी उंची प्राप्त करून देते, त्यामुळे कथेला एक जीवंतपणाही प्राप्त होतो. एखादा पोशाख, रस्ता, वातावरण, व्यक्तीचे हावभाव, मन:स्थिती, परिस्थिती याबाबत सांगताना त्या अधिकाधिक सविस्तर होण्याचा प्रयत्न करतात. पण असे करताना कथासूत्राचा तोल ढळणार नाही याकडेही लक्ष देतात.

मुनरो आपल्या कथांतून व्यक्तीच्या ‘मानसशास्त्रीय’ मितींचा शोध घेतात. यामुळे आपोआपच या कथा तरल आणि भावनाप्रधान बनत जातात. नैराश्य, उदासी, किशोरावस्था, प्रेम, पहिलं प्रेम, विवाहबाह्य प्रेम, स्त्री-पुरुष संबंध आणि त्यातील संघर्ष, एकूण जीवनातील परिस्थिती या पार्श्‍वभूमीवर या कथा घडतात. या कथांमधील पात्रे ही बहुधा एका विशिष्ट परिस्थितीत सापडलेली आहेत. कधीकाळी त्यांच्यात उत्कटता होती, ज्यांपैकी काहींकडे ती थोड्या प्रमाणात शिल्लक आहे तर काहींकडे संपुष्टात आलेली आहे.

त्यांच्या कथा माणूस समजून घेऊ पाहणार्या आहेत. माणूस कसा वागतो यापेक्षा तो मुळात कसा आहे आणि तो तसा का आहे यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न या कथांतून दिसतो. या कथांना एक भावस्थिती आहे आणि गती आहे. कथा सांगता सांगता मूड बेमालूमपणे बदलण्याचे कसब मुनरो यांच्या शैलीत आहे. आणखी म्हणजे, या कथा वाचकाला आपल्या सोयीने नव्हे तर लेखिकेने कथांना प्राप्त करून दिलेल्या गतीनेच वाचाव्या लागतात.
आज संपूर्ण जगात लौकिक प्राप्त केलेल्या या कथा मुळात प्रादेशिक वळणाच्या आहेत. या कथांमधील नेपथ्य हे मुनरो यांच्या अवतीभवतीच्या (बहुतेक करून ओन्तारियो) भागातील आहे. तेथील रीतीरिवाज, शिष्टाचार या कथांमध्ये विखुरले आहेत.

या कथांत मुनरो अधूनमधून काही विधानेे करतात जी या कथांना कधी गंभीर तर कधी वैचारिक बाज प्रदान करतात. उदा -

- कुणालाच माहीत नव्हते मी काय गमावले होते.
- त्याचे भाव फोटोप्रमाणे कठोर आणि कोमलतामिश्रित होते.
- हे खरे म्हटले जाऊ शकत नाही की प्रेमात पडण्यापासून वाचता येऊ शकत नाही. कारण प्रेमात पडण्याचा निर्णय घेतला जातो. पण हे खरे आहे की प्रेमात पडण्याचा निर्णय नक्की कधी झाला ते जाणणे फार कठीण असते.
- मी नजर उचलल्याशिवाय, कुणाला नाराज केल्याविना पाहू शकत होते.

1968 सालचा पहिला ‘डांस ऑफ हॅपी शेड्स’ व 2012 सालचा ‘डीअर लाइफ’ कथासंग्रह मिळून मुनरो यांचे आतापर्यंत 14 कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांपैकी ‘लाइव्ज ऑफ गर्ल्स ऍण्ड वूमन’ आणि ‘बेगर मेड’ या संग्रहातील कथा या एकमेकांशी संबंधित असून त्यामुळे हे संग्रह कादंबरीस्वरूप बनले आहेत. 1980च्या दशकापासून सातत्याने दर तीन ते चार वर्षांनी मुनरो यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला दिसतो.

मुनरो यांनी जीवनभर लेखनात सातत्य राहावे यासाठी धडपड चालू ठेवली होती. त्यांनी बहुधा कथा या प्रकारातच लेखन केले. ते करताना कथा हा प्रकार समृद्ध करण्यासाठी त्यांच्याकडून हातभार लागला. त्या एकदा म्हणाल्या होत्या की, कादंबरी लिहावी असे वाटते. पण लिहायला बसते तेव्हा त्यातून वेगळेच काहीतरी निर्माण होते. वेळेचा अभाव हेसुद्धा कथा प्रकार जास्त हाताळण्याचे कारण असल्याचे त्यांनी म्हटले होते. काहीतरी होईल आणि लेखन थांबेल अशी धाकधूक मनाला सतवायची व त्यातून झपाटल्यागत लेखन करता आले, असे त्या म्हणतात.

कधीकधी कामाच्या ताणामुळे हृदयविकाराचा झटका येईल असे त्यांना वाटायचे. पण आपण टाइपरायटरवर बसलेली असायचे व लहान मुलगी खेळत खेळत जवळ यायची तेव्हा एका हाताने तिला सावरूनही लेखन पूर्ण केले, असे त्या सांगतात.

कथा डोक्यात तयार होते, पण कागदावर यायला लागते तेव्हा अमुकच धाटणी ती घेईल हे ठरवून सांगता येत नाही, असे त्या कथालेखनाबद्दल सांगतात. आपल्या कथेवर नंतर त्या बरेच दिवस काम करतात. कधीकधी महिनोंमहिनेसुद्धा. पण त्यानंतर एक दिवसाचीही उसंत घेणे ऍलिस यांना मान्य नाही. ‘मी लगेच दुसर्या कथेवर काम सुरू करते’ असे त्या सांगतात. लेखन थांबण्याची भीती त्यामागे नाही तर लेखनास प्रवृत्त करणारा आनंद जो आहे तो गमवावा लागण्याचे भय त्यामागे असते. लेखन ही मुनरो यांची सवय आहे. रोज सकाळी किमान दोन तास त्या लेखन करतात. ‘माझा प्रत्येक दिवसाचा लेखनाचा कोटा असतो, तो पूर्ण केला नाही तर मला चैन पडत नाही. अगदी कितीही महत्त्वाचा कार्यक्रम असला तरी मी ठरवल्यानुसार लेखन होईल याकडे लक्ष देते,’ असे हल्लीच ‘पॅरिस रिव्ह्यू’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे.


(हा लेख एका स्थानिक वृत्तपत्रासाठी लिहिला होता. )

Comments