प्रतिभावंतांच्या गावात

रेल्वे प्रवासात अनेक मल्ल्याळी व्यक्ती भेटल्या होत्या. मी कोवलम्चा उल्लेख केल्यावर ‘यू आर फ्रॉम गोवा. डोन्ट वेस्ट यूवर टाइम ऑन बिचिस’ असा सल्ला त्यांनी मला दिला होता. आणखी एकाने ‘इफ यू आर गोयिंग देन डोन्ट फॉर्गेट टू हेव्ह आयुर्वेदिक मसाज’ अशी सूचनाही केली होती.

पण मला या गावाची ओढ लागली होती ती एका वेगळ्याच कारणामुळे. अय्यपिळ्ळा आशान व त्याचा भाऊ या दोन प्रसिद्ध लोककविंचा हा गाव. सर्जनाला प्रेरणा दिलेल्या त्या वातावरणाशी मला समरस व्हायची इच्छा होती. हे दोन कवी कोवलम्च्या ज्या वास्तूत राहत होते ती केरळ पुरातत्व खात्यातर्फे सांभाळण्यात आली आहे, असे मला समजले तेव्हा त्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होण्याची इच्छा अधिकच तीव्र झाली होती. दुपारच्या वेळेस पद्मनाभस्वामी मंदिराकडच्या थांब्यावर बस पकडली आणि शेवटचा स्टॉप कोवलम् गाठायचे ठरविले.

या बसेसबद्दल एक आवर्जुन सांगितले पाहिजे. बसेस एका ओळीत थांबल्या होत्या व तेथील स्टॉपवर लावलेल्या वेळेत जराही बदल न होता सुटत होत्या. बसमध्ये बसलो होतो तेव्हा तेथील अनेक कॉलेजचे तरुण तेथे थांबले होते. काहींच्या सोबत त्यांच्या मैत्रीणीही होत्या. विशेष म्हणजे या तरुणांनी लुंग्या नेसलेल्या. आपल्या प्रांतातील वेश परिधान करणे या युवकांना लाजीरवाणे वाटत नाही हे कौतुकाचे म्हटले पाहिजे.

बसमध्ये तशी गर्दी नव्हती. दुपारची वेळ म्हणून असेल कदाचित. एक तरुण सीटवर एकटा बसलेला. मी त्याच्याजवळ जाऊन बसलो. त्याच्याकडे कोवळमबाबत विचारले तेव्हा त्याला आश्‍चर्यही झाले आणि आनंदही. येथे लोक फक्त किनारा बघायलाच येतात. कविंविषयी त्यांना काही माहिती नाही अशी त्याची नाराजी होती. तो कोवलम्लाच निघालेला. तेथे एक त्याचे दुकान होते. मी गोव्यातून तिथे चाललोय तो किनारा पाहण्यासाठी नव्हे तर कविंबाबत जाणून घेण्यासाठी हे ऐकून त्याला फार आनंद झाल्याचा दिसला. स्मारक लाईट हाउसकडे असल्याचे सांगून त्याने मला गावात जाऊन चौकशी करायला सांगितले व कोणीही सांगेल अशी पुस्तीही जोडली. आशान बंधूंना कविप्रतिभा कशी प्रसन्न झाली याबाबत त्याच्याकडून एक रोचक कथा बस चलता चलता ऐकायला मिळाली. असे म्हणतात अय्यपिळ्ळा व त्याचा भाऊ दोघे त्यांच्या वाडवडलांच्या केळीच्या बागा सांभाळण्यासाठी कोवलम् किनार्याजवळ राहायचे. एक दिवस अय्यपिळ्ळा याला स्वप्न पडले व तो चालत सुटला. चालता चालता वाटेत त्याला एक गृहस्थ भेटले. तो त्यांच्या मागे चालत गेला. काही वेळाने नदी आली. नदीवर पुल नव्हता. त्या महापुरुषाने एका पानावरून नदी पार केली व तेच पान अय्यपिळ्ळाला परत पाठवले, ज्यावरून अय्यपिळ्ळाही पाण्यावरून एका पानाच्या सहाय्याने पलिकडे गेला. तिथून दोघेही पद्मनाभ स्वामींच्या मंदिरातील लक्षदीप महोत्सवात सहभागी झाले. परतीच्या प्रवासात पूर्वीप्रमाणेच पानावरून दोघांनी नदी पार केली. त्यानंतर त्या महापुरुषाने त्याला तीन केळी खायला दिली आणि अदृश्य झाला. असे म्हणतात तो अश्‍वत्थामा होता. अय्यपिळ्ळाने केळी खाल्ली तोच जणू त्याला सरस्वतीचा साक्षात्कार झाला. तो काव्यगायन करीत नाचू लागला. इतक्यात त्याच्या भावाला अय्यानापिळ्ळा याला जाग आली. त्याने बंधूकडे अचानक प्राप्त झालेल्या या दिव्य कलेबाबत विचारणा केली, त्यावर अय्यपिळ्ळाने घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर त्याचा भाऊही त्याठिकाणी धावत गेला. तिथे केळ्याच्या साली होत्या. त्या त्याने खाल्ल्या. तेव्हा त्यालाही कविप्रतिभा प्राप्त झाली म्हणे. नंतर दोघेही रामकथा (पाट्टू) गात नाचू लागले.

मी अगदी फॉर्ममध्ये आलेलो. मात्र बसमधून गावात उतरलो तेव्हा वेगळाच अनुभव आला. कन्डक्टरपासून ते तेथे बसस्टॉपवरील अनेकांना मी जेव्हा या स्मारकाबद्दल विचारले तेव्हा त्यांना याबद्दल काहीच माहित नसल्याचे ऐकून मी थोडा निराश झालो. त्यांना लाईट हाउस किनारा तेवढा माहित होता. ते लाईट हाउसच माझ्यासाठी आशेचा स्तंभ बनले होते. लोकांना विचारीत विचारीत मी चालू लागलो. अनेकांना इंग्रजी येत नव्हती व मला मल्ल्याळम. एक मात्र होते, त्यांना मला मनापासून मदत करायची इच्छा होती. काहीजणांनी तर इतरांना विचारून माझी समस्या सोडवायचा प्रयत्न केला. एकाला जाताना मी रस्ता विचारला होता. नंतर येताना तो साद देत कुठूनतरी धावत आला व मला ते स्थान मिळाले की नाही त्याबद्दल आस्थेने चौकशी केली.

कोवलम् म्हणजे माडांच्या बनात वसलेला गाव. हा किनारा तीन भागांत विभागलेला आहे. ‘लाईट हाउस बीच’ त्यापैकी एक इतके आतापर्यंत मला समजले होते. मी किनार्यावरून चालत होतो. पर्यटनासाठी म्हणून विळखा घातलेल्या शॅक्सच्या मागून हिरवा गाव डोकावून पाहत होता. त्यामागे डोंगर.. आणि समोर दुसर्याबाजूने किनार्याला उत्कटतेने बिलगणारा दर्या.... लाटा... किनार्यावर ठेवलेल्या होड्या येथील मच्छीमार समाजाबद्दल जाणीव करून देत होत्या. शुभ्र रेती तुडवत मी जात होतो. दुपारची वेळ होती आणि उष्णतेने अंग करपत चालल्याचा आभास होत होता. काही ठिकाणी अवती भवती विदेशी पर्यटक उघडे पडून सूर्यस्नानाचा आस्वाद घेत होते. जणू त्यांना आत्ताच सूर्याचा शोध लागला असावा. शेवटी लाईट हाउस बीचवर मी पोचलो. दूर डोंगरावर दीपस्तंभ दिसत होता. चालता चालता पाहिले तो समोर एक शुभ्र लुंगी परिधान केलेला, सुती शर्ट घातलेला वयस्क गृहस्थ माडाच्या सावलीत मलयाळम मनोरमा वाचत बसला होता. मी पुढ्यात जाऊन अशान.... इतकाच उच्चार केला. तो उठला, प्रथम पेपर दुमडुन हातात घेतला मग मला म्हणाला चला... तो पुढे चालत होता आणि मी मागे. शॅक्स ओलांडून आम्ही मागे पोचलेलो. जसजसा आम्ही आत आत चाललेलो तसतसा कल्पवृक्षांच्या सावलीत वसलेला गाव आपले सौंदर्य अधिकाधिक खुलवीत प्रकट होताना दिसत होता. चिंचोळ्या गल्लीच्या दोन्ही बाजूंनी घरे होती. ज्या घरात पडवीत लोक बसलेले ते काही ना काही उद्योग करत होते. कपड्यांची शिलाई करण्यापासून ते माशांचे जाळे नीट करण्यापर्यंत. काही वेळ चालल्यानंतर तो थांबला व डाव्याबाजूला एका वास्तूकडे बोट दाखवून थांबला. (आणि कदाचित ‘हेच ते’ असे म्हणाला असावा).

तिथे एक वृद्ध महिला साफसफाई करत होती. तिची गरीबी तिला पाहिल्यावरच लक्षात येत होती. तिला त्याने मल्ल्याळममध्ये काहीतरी सांगितले. त्या वृद्धेच्या चेहर्यावर अचानक आनंद पसरला. तिने लगबगीने स्मारकाची गेट माझ्यासाठी खुली केली. सुंदर घराची प्रतिकृती वाटावी तशी केवळ एका खोलीची वास्तू समोर होती. बाहेर लहानशी पडवी अणि समोर छोटासा दीपस्तंभ. बाजूला छोटीशी बाग. समस्या ही होती की मला खूप काही जाणून घ्यायचे होते. मात्र तेथील लोकांना मल्ल्याळम सोडून इतर भाषा येत नसल्याचे माझ्या लक्षात आले. ती मला काहीतरी सांगत होती पण मला भाषेची र्हिदम सोडून काहीच कळत नव्हते. मी काहीतरी जाणू इच्छितो... पण कळत नाहीये हे बहुदा तिच्या लक्षात आले असावे तेव्हा ती लवकर गेली आणि एका व्यक्तीला घेऊन आली. लुंगी नेसलेला तो गृहस्थ तिने हाक दिल्यावर शर्ट घालत घालतच तिथे पोचला. त्याला काही इंग्रजी व काही हिंदी शब्द समजत होते. पण तरीही तो नेमके काय सांगतोय ते मला कळत नव्हते. बर्याच वेळाने तो फक्त एकच वाक्य पूर्ण बोलला जे मला कळले - ‘उसने हमारे लिए रामायण लिखा’ ते ऐकले आणि त्या थोर प्रतिभावंतापुढे मी नतमस्तक झालो. म्हणजे आमच्या मनात वाल्मिकींबद्दल जितका आदर आहे तितकाच आदर या दोघांबद्दल तेथील लोकांच्या मनात आहे. ही वास्तू नेमके काय याबद्दल मात्र एकवाक्यता आढळत नाही. काहीजणांच्या मते तो कविंच्या घराचा शिल्लक राहिलेला भाग आहे. तर काहींच्या मते ते नंतर ज्या मंदिरात राहत ते हे मंदिर आहे.

या ठिकाणी दुर्गेची पूजा होते. काही वेळ थांबून मी परत फिरू लागलो तेव्हा काही पैसे काढून त्या वृद्धेला मदत म्हणून दिले. तिथे एक दानपेटी होती. त्याच्यात तुम्ही स्वखुषीने पैसे टाकायचे. त्याच्यातून येणार्या पैशांतून दिवा पेटवला जातो, असे तिने बोलावलेल्या व्यक्तीने सांगितले होते. मी माझ्या ऐपतीनुसार त्यात थोडे दान टाकले व परतीची वाट धरली. काही वेळाने सहज मागे पाहिले तेव्हा दिसले की तिनेही आपल्या हातातील पैसे त्या पेटीत टाकले होते. मनात एक वेगळेच समाधान वाटले कारण दुसर्या दिवशी जळणारा दिव्याचा प्रकाश हा नम्र साधकाच्या श्रद्धेबरोबरच एका प्रामाणिक समर्पित भक्तीचा प्रकाश देणार होता. किती थोर होते ते कवी. लोकांना रामायणाची कथा ऐकवता ऐकवता लोकांना किती थोर बनवून गेले. कोवलम्च्या परतीच्या वाटेवर तेथील उत्कट वारा, लयकारी लाटा, वाकून पाहणारे माड यांचा काव्यमय अर्थ मला उमजू लागला होता. मला मल्ल्याळम शिकावेसे वाटत होते.... केवळ रामकथा पाट्टू समजून घेण्यासाठी. श्रीमंतांच्या कपाटात स्थान मिळविण्याचे भाग्य अनेक लेखकांना लाभत असेल मात्र जनसामान्यांच्या श्रीमंत ह्रदयात विराजमान होण्याचे भाग्य फार थोड्यांचेच असते!


(टीप : रामकथा हा लोकसाहित्याच्या परंपरेतील पाट्टू साहित्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ समजला जातो. भाषेच्या स्वरूपावरून मल्ल्याळम साहित्याचे पाट्टू व मणिप्रवालम असे दोन भेद सांगितले जातात. द्रविड अक्षरे व ध्वनी यांचा प्रयोग करून लिहिले जाणारे व कोणता तरी वृत्तविशेष सांगणारे, अनुप्रासात्मक गीत अशी पाट्टूची लक्षणे सांगितली जातात. रामकथापाट्टूत सुमारे २५ हजार ओळींमध्ये उत्तरकांड वगळता रामकथा सांगितली आहे. आशान यांनी वाल्मिकीच्या आधारे स्वत:च्या रामायणाची रचना केली आहे.)


Comments