दक्षिणेतील बौद्ध ज्ञानपीठ

मी निघालो होतो हैदराबादपासून (Hyderabad) सुमारे १५० कि. मी. अंतरावरील एका ठिकाणी, या देशातील एकेकाळच्या वैभवशाली परंपरेच्या अवशेषांचे दर्शन घेण्याची उत्सूकता घेऊन.

‘नागार्जुनकोंड’चा परिचय सर्वप्रथम मला अपघातानेच झाला. देशातील बौद्धस्थळांचा (Buddhist sites) शोध घेता घेता एके दिवशी नागार्जुनकोंडबाबत समजले. बौद्ध विचारांच्या संपर्कात आलेले असे हे एक दक्षिण भारतातील ठिकाण. शिवाय बौद्ध धर्मातील एक थोर आचार्य नागार्जुन यांची कर्मभूमीही. कृष्णा नदीकाठचा तो बहुतेक पुरातन परिसर आज नागार्जुनसागर धरणाखाली (Nagarjunsagar Dam) गेला आहे. धरण बांधताना धरणार्‍या मधोमध एका बेटावर आगळेवेगळे संग्रहालय उभारून या अवशेषांचे जतन करण्यात आले, ते आज पाहायला मिळते.

या भागाला पूर्वी विजयपूरी म्हणून ओळखत. आजचे नागार्जुनकोंड म्हणजे नागार्जुन टेकडी हे नाव बौद्ध विचारवंत व तत्त्वज्ञ आचार्य नागार्जुन (Acharya Nagarjun) यांच्यावरून आले आहे. आचार्य नागार्जुन यांच्याविषयी जास्त माहिती आज उपलब्ध नाही. मात्र एका धारणेनुसार ते दक्षिण भारतातील होते व सातवाहन राजाचे सल्लागार होते. तथागत बुद्धांनंतरचे एक मोठे बौद्ध विचारवंत म्हणून ते गणले जातात. एका संदर्भानुसार महायान पंथातील मध्यमिका विचारधारा निर्माण करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. नालंदा विद्यापीठाचेही ते काही काळ प्रमुख होते असे सांगितले जाते. दक्षिणेत असताना आज नागार्जुनकोंड म्हणून नाव ठेवलेल्या त्याकाळच्या श्रीपर्वत परिसरात त्यांचा रहिवास होता, असे मानले जाते. मूळ बौद्धशाखेची चिकित्सा वाढत जाऊन ज्या उपशाखा तयार झाल्या त्यापैकी महायान पंथाला भक्कम तात्त्वीक बैठक देण्याचे काम नागार्जुन यांनी याच परिसरात राहून केले असे मानतात. वैशाली येथील बौद्ध महासभेवेळी मूळ पंथापासून महासंघिकांच्या वेगळे होण्यानंतरच्या काळात या परिसराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आचार्य नागार्जुन यांचे मोठे विद्यापीठ या भागात होते व त्यात देशातीलच नव्हे तर देशाबाहेरचे विद्वान केवळ धर्मच नव्हे तर इतर विज्ञानादी शास्त्रांचे शिक्षण घेण्यासाठी येत. सुमारे १७०० वर्षांपूर्वी हा भाग धर्म अभ्यासकांचे प्रतिष्ठित पीठ म्हणून कार्यरत होता. विशेषत: बौद्ध विचारमंथनाचे देशातील एक मध्यवर्ती केंद्र म्हणून हा भाग प्रसिद्धीस पावला होता. या ठिकाणी उत्खननावेळी सापडलेले स्तूप, विहार, चैत्यगृहे (chaityas, stupas, viharas) याची साक्ष देतात. या सर्वांत महाचैत्य एक महत्त्वाचे बांधकाम आहे.

येथील अवशेष सर्वप्रथम १९२६ साली जगासमोर आले. त्यानंतर या परिसरात अभ्यासकांनी आपापल्या परिने काम केले. स्वातंत्र्यानंतर जेव्हा कृष्णा नदीकिनारी धरण बांधण्याचा प्रस्ताव नक्की झाला तेव्हा १९५४ ते ६० अशी सहा वर्षे मोठ्या प्रमाणावर येथे उत्खननाचे काम हाती घेण्यात आले. यावेळी २४ चौ. कि. मी परिसरात एक हजारो वर्षांच्या परंपरेची साखळी उभी राहिली. अश्मयुग ते मध्ययुगीन इतिहासापर्यंत त्याचा आवाका होता. यांपैकीच काही महत्त्वाची ‘स्ट्रक्चर्स’ नंतर या धरणाच्या विस्तारात निर्माण झालेल्या मानवनिर्मित सरोवरात असलेल्या बेटावर रचण्यात आली. ही रचना मूळ अवशेष वापरून व मूळ ढाच्याचा विचार करून केली आहे. इजिप्तमध्ये अस्वान धरण प्रकल्प उभारताना तेथे केलेल्या व्यवस्थेच्या धर्तीवर ही रचना आहे.

इजिप्तमध्ये नाईल नदीच्या किनारी पूर रोखण्यासाठी तसेच जलसिंचनाच्या उद्देशाने ओस्वान धरण बांधण्याचा निर्णय झाला तेव्हा मानवनिर्मित सरोवरामुळे प्राचीन अवशेष धोक्यात येत होते. त्यावेळी ते सरोवराकिनारी हलविण्यात आले होते तर काही धरणासाठी मदत करणार्‍या देशांतही नेण्यात आले होते.

माझी बस धरणाकडच्या स्टॉपवर थांबली होती. मला तेथून रिक्षा करून लॉंचच्या धक्क्यापर्यंत जायचे होते. तिथून लॉंचद्वारे संग्रहालयापर्यंत जायचे होते. रिक्षेत विचारपूस करताना मला एकाने कुठून आलात व कशासाठी अशी विचारणा केली. मी गोव्याहून आलोय संग्रहालय पाहण्यासाठी, हे माझे उत्तर ऐकल्यावर तो खुद्कन हसला. ‘फक्त संग्रहालय पाहण्यासाठी ?’ असा त्याचा प्रश्‍न होता. मी फेरीच्या पॉइंटपर्यंत पोचलो. पण इतक्यात जाणे शक्य नव्हते. कारण धरणाच्या पाण्यात ‘करंट्‌स’ तीव्र असल्याने लॉंच बंद ठेवण्यात येणार होती. अशा परिस्थितीत लॉंच पाण्यात उतरवणेे धोकादायक होते. मला बहुदा संध्याकाळपर्यंत थांबावे लागणार होते.

माझ्याकडे आता सकाळचा पूर्ण वेळ होता. पण निराश व्हायचे कारण नव्हते. तिथून ४ कि. मी. अंतरावरील आलापू या गावातही पाहण्यासारखे बरेच काही होते, अशी माहिती मला मिळाली. मी आलापू गाव गाठला. तेथे दोन भव्य विहार, समोर महाकाय स्तूप अशी रचना आहे, ती पाहता आली. प्रत्येक विहारात बाजूला खोल्या व मध्यभागी मोठा मंडप. एक आश्‍चर्याची गोष्ट पाहिली. बौद्ध विचारधारेत एक पंथ मूर्तीपूजक तर त्याआधीचा मूर्ती न पूजणारा. मात्र येथे एकाबाजूने स्तूप व समोर बौद्ध मूर्ती अशी रचना होती. बाजूलाच हिरिती देवीचे मंदिरही आहे.

या विहारांच्या समोर रस्त्यापलिकडे त्याकाळातले ऍम्पी थिएटर आहे. तत्कालीन कलाविष्कार, अभिरूची व ललितसाधनेचे ते प्रतीक ठरावे. ते पाहिल्यावर जुन्या काळातील कला अकादमीतील कृष्णकक्ष आठवला. त्याच्या मागे टेकडीवर एक छोटासा विहार आहे. तिथून कृष्णेच्या पात्राचे विलोभनीय दर्शन मनाला एका वेगळ्याच उंचीवर नेते. शिवाय चौशी बाजूंनी बिलगणारा वारा आल्हादिक अनुभव देतो. आकाशाची निळी छटा आणि त्याचे पाण्यातील प्रतिबिंब एकरूप होताना दिसते. हे सर्व पाहिल्यावर दुपारी पुन्हा लॉंचच्या धक्क्यापर्यंत पोचलो.

धरण बांधायचा निर्णय झाला तेव्हा अवशेष काढून ते मध्यवर्ती असलेल्या बेटावर रचून ठेवण्यात आले आहेत, त्याचे नाव नागार्जुन कोंड. तिथे धरणातून लॉंचने सुमारे ४५ मिनीटे प्रवास करून जायचे होते. खरे म्हणजे तेथे आलेल्या अनेक पर्यटकांना या संग्रहालयाविषयी माहितीच नव्हती, असे लक्षात आले. त्यांना लॉंचमधून प्रवास करण्यात रस होता. काहीजणांना तेथून नजीक असलेल्या छोट्याशा धबधब्याचे तिन्हीसांजेचे रूप पाहायचे होते व तोपर्यंत त्यांना थांबायचे होते. एक सरदारजींचे कुटुंब होते. त्यांची तिकीटवाल्याशी हुज्जत चालू होती. मुळात ही लॉंचसेवा संग्रहालयासाठीच असते. तेव्हा संग्रहालयाच्या तिकिटासह तुम्हांला लॉंचचे पैसे भरावे लागतात. पण सरदारजींचे म्हणणे होते की त्यांना ङ्गक्त लॉंचप्रवास करायचा आहे, ते संग्रहालयात जाणारच नाहीत. तर मग दोन्ही गोष्टींसाठीचे पैसे का भरावेत. असो. शेवटी त्यांना नियमानुसारच पैसे भरावे लागलेच. दरम्यान, येथे आणखी एकाचा परिचय झाला. तो सांगत होता, काही वर्षांपूर्वी तो गोव्यात आलेला. गोव्यातील पायलट व ङ्गेणी हा त्याच्यासाठी कुतूहलाचा विषय. तो म्हणाला तुमच्या गोव्यात या दोन्ही गोष्टी सामान्यांना परवडणार्‍या बाकी गोवा ङ्गक्त पर्यटकांसाठीच कसा दिसतो.

आम्ही सुमारे तासभराच्या प्रवासानंतर टेकडीपर्यंत पोचणार होतो. त्याआधी डुलत चाललेल्या लॉंचमधून अथांग अशा धरणाचे विहंगम दर्शन होत होते. वाटेत आजूबाजूला डोंगरांच्या सुरेख कडा दिसत होत्या. पाण्याच्या सहवासामुळे त्यांना एक आगळी झळा लाभली होती. अचानक आठवण झाली. एकेकाळी कृष्णेच्या किनारी वसलेल्या थोर संस्कृतीच्या जमिनीवरूनच आम्ही जात होतो. किती झपाट्याने घडत असतात
बदल !!

आम्ही टेकडीवर पोचलो. तेथील संग्रहालय हे दोन प्रकारे विभागले आहे. बेटावर उभारलेल्या वस्तूसंग्रहालय इमारतीत अश्मयूगातील वस्तू, बुद्धांचा भव्य पुतळा यांचे दर्शन मिळते. तर बाहेरच्या खुल्या जागेत तत्कालीन रहिवास, जीवनमान यांचा परिचय घडविणार्‍या स्तूप, दङ्गनविधी आदि दर्शवणार्‍या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. आधी संग्रहालय पाहायचे व नंतर जमेल तेवढे परिसरातील प्रतिकृतींचे दर्शन घ्यायचे असा कार्यक्रम होता.

संग्रहालयात अनेक वस्तू मांडून ठेवल्या आहेत, पैकी माझे लक्ष दोन गोष्टींनी वेधून घेतले.
त्यांपैकी पहिली म्हणजे आदिमानवाची अवजारे. ती अश्मयुगातील असल्याचे सांगितले जाते. आदिमानवांनी ज्याप्रकारचे दगड निवडले व त्यांना ज्याप्रकारे आकार दिला ते पाहिल्यावर सौंदर्यांचे माणसातील विकसन किती आदिम आहे ते कळते. शिवाय त्यांचे दर्शन घेताना आदिम काळाशी नजरानजर झाल्याची एक अनुभूतीही मनाला लाभते.

दुसरी अशीच गोष्ट म्हणजे येथील एका स्तुपात आढळलेले मानवी अवशेष. हे खुद्द बुद्धाचे मानले जातात. हे अवशेष आज खुल्या जागेत नाहीत. ते अतिसुरक्षित अशा ठिकाणी बंद आहेत. पण त्यांचे छायाचित्र संग्रहालयात स्तुपाच्या प्रतिकृतीबाहेर लावले आहे. असे म्हणतात बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांचे अवशेष सहा राजांनी विभागून नंतर ते देशभर ठिकठिकाणी गेले. त्यापैकीच काही नागार्जुनकोंड परिसरात पाठविले होते, असे समजले. विचार करा ख्रिस्त जन्माअगोदर या भारताच्या भूमीवर वावरलेल्या संपूर्ण विश्‍वावर आपल्या विचारांची छाप टाकलेल्या एका थोर व्यक्तीमत्त्वाचे अवशेष. नुसता विचार केला तरी अंगावर रोमांच उभे राहतात !

वस्तूसंग्रहालय एकूण पाच गॅलरींमध्ये विभागलेले आहे. यात पहिली गॅलरी त्यावेळच्या इश्‍वाकु राजाच्या काळातील कलासक्तपणाचे दर्शन घडवते. शिवाय येथे सापडलेल्या अवशेषांच्या आधारे मानवाच्या येथील हजारो वर्षांच्या विकसनाची कहाणी सांगणारी साखळीही रचण्यात आली आहे. तिसर्‍या गॅलरीत या संपूर्ण परिसरात उत्खननाअंती आढळून आलेल्या १२० बांधकामांच्या छोट्या प्रतिकृती बनवून प्रदर्शित केल्या आहेत. ही सर्व बांधकामे पाहिल्यावर त्यावेळच्या समृद्ध परिसराचे चित्र मनात उभे व्हायला वेळ लागत नाही.

संग्रहालयाच्या इमारतीबाहेरचा संपूर्ण परिसर वेळेेअभावी पाहणे शक्य नव्हते. मात्र बरेचसे पाहिले. आचार्य नागार्जुन यांच्या काळातील स्तुपांच्या प्रतिकृती. तत्कालीन संस्कृतीचा परिचय देणार्‍या विविध ठिकाणांच्या प्रतिकृती, त्याकाळातील दङ्गनविधीची कल्पना देणारा देखावा इत्यादी. खरे म्हणजे पूूर्ण परिसर पाहायची इच्छा होती. पण परतण्याची वेळ आली होती कारण लॉंचच्या शेवटच्या ट्रीपची वेळ झाली होती.

एका गोष्टीचे मात्र काहीसे वाईट वाटले. तेथे छोटी वाहने होती. काही विदेशी पर्यटक आल्यावर त्यांना लगेच ती उपलब्ध करून देण्यात आली. आमच्यापैकी काहींनी त्याबाबत विचारल्यावर ती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. आमची पैसे अदा करण्याची तयारी होती तरी नाहीच !

तिन्हीसांज सुरू झाली होती व पाहिलेल्या सर्व गोष्टींची मन जुळवाजुळव करीत होते. भारताची भूमी किती थोर आहे. किती मोठी अध्ययनाची, संस्कृतीची परंपरा या देशाच्या कानाकोपर्‍यात सामावलेली आहे. पाहिलेले अवशेष केवळ अवशेष राहिले नव्हते. त्यातून सजीव प्रेरणा जाणवत होत्या. मला सुरुवातीला वाटले होते दक्षिणेत बौद्ध प्रभाव ‘नागार्जुनसागर’पुरताच मर्यादित आहे. पण तसे नव्हते. विजयवाडा वगैरे परिसरातही तथागतांच्या मार्गावरून चाललेल्यांच्या पाऊलखुणांचा माग घेण्यासारखा आहे. पण यावेळी तरी ते शक्य नव्हते. लॉंच पुन्हा पॉइंटपर्यंत आली. मला पुन्हा हैदराबादला पोचायचे होते.

Comments