निमित्त : ‘मंटो’



चित्रपटाचे पोस्टर (इंटरनेटवरून )


एका लेखकाच्या जीवनावर कमर्शियल पद्धतीने चित्रपट बनवला जावा हे दुर्मीळ. अशी दुर्मीळ घटना हल्लीच घडली ती नंदिता दास यांच्या मंटो या सिनेमामुळे. मंटो ही फिल्म प्रदर्शित झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी पाहिली. अवघी काही डोकी थियेटरमध्ये उपस्थित होती. 

फिल्म एन्गेजिंग वाटली. प्रत्येक क्षणात गुंतवून ठेवणारी. फिल्मचे मध्यंतर झाले तेव्हा अस्वस्थ वाटले (अशा फिल्म्सना इंटरव्हल असूच नये मुळी, त्यात सगळी साखळी आणि परिणामच कुठल्या कुठे निघून जातो) आणि फिल्म पाहून बाहेर आल्यानंतर एखादी शास्त्रीय संगीताची मैफल ऐकून बाहेर आल्यासारखे वाटले. 

ही नोंद काही मंटो म्हणजे कोण, त्याचे साहित्य यांचा उहापोह करण्यासाठी लिहिलेली नाही. फिल्म पाहिल्यानंतर काहीतरी लिहावे असे वाटले, इमोशनल झाल्यानंतर अश्रु उचंबळून यावेत तसे शब्द आले, त्यांना वाट मोकळी करणेच इष्ट वाटले. म्हणजे हा या नोंदीचा स्कोप किंवा मर्यादा. आता फिल्म पाहिलेले व मंटोचे साहित्य वाचलेले त्याच्याविषयी आपली मते कायम ठेवण्यास मोकळे आहेत. तसे मंटो ही फिल्म न पाहिलेले, त्याचे साहित्य न वाचलेले, त्याच्याविषयी काहीच माहिती नसलेले असेही त्याच्याबद्दल मते ठेऊन असतीलच. असो.

आता फिल्मबद्दल.

वेगवेगळ्या पैलूंनी या फिल्मबद्दल कोण-कोण सांगू शकतो. हा एक पैलू असेही म्हणता येईल.

ही फिल्म म्हणजे एका गोष्टी लिहिणार्‍या लेखकाची गोष्ट आहे. तो नावलौकीकाला आला आहे. अशावेळी राजकीय परिस्थिती, तो राहतो त्या देशाला स्वातंत्र्य देते, मात्र त्याचबरोबर देशाची फाळणी करते. विभाजन केवळ भौगोलिक राहत नाही. माणसांचीही वाटणी होते. धर्मा - धर्मात लोक ठाकतात. मंटो त्याच्या धर्माचे लोक ज्याबाजून स्थलांतरित झाले आहेत त्या ठिकाणी अपरिहार्यपणे म्हणा हवे तर पण स्थलांतर करतो. तिथे त्याला तथाकथित ‘सभ्य चाली-रिती’ व नैतिकतेशी लढा द्यावा लागतो. स्वत:शी झगडणे आणि इतरांशी झगडणे यात मंटो खंगत खंगत जातो... (मंटोला ब्रिटिश भारतात व नंतर पाकिस्तानमध्ये अश्लीलतेच्या आरोपावरून कोर्ट खटल्याना सामोरे जावे लागले होते )

मंटो म्हणजे सदाअत हसन मंटो. मंटो सारख्या लेखकांना विरोध भलेही होवो. मात्र अशा लेखकांना वगळून त्या भाषेतील साहित्याचा इतिहास प्रामाणिकपणे सिद्ध करता येत नाही.

पण मंटो जगत जातो एखाद्या कादंबरीसारखा आणि विणत जातो गोष्टी-कथानके. आपल्या समकालाचा आवाज बनून आपल्या लिहिण्यातून व्यक्त होतो.  सभ्यपणाचे आवरण घालून वावरणारा आणि आपल्या सभ्यपणाच्या निकषांशी न जुळणारे सर्व काही दाबून ठेवण्याचा प्रयत्न करणारा वर्तमानाचा एक प्रवाह. ज्याला मंटो खुले आव्हान देतो. मंटो सारखे लेखक खरे तर हे आवरण काढत नाहीत. पण आवरणात असलेल्या गोष्टींचा फक्त शोध घेतात.  पण तरीही त्यांना अनेकांशाी सामना करावा लागतो. अदृश्यपणे, बेमालूमपणे माणूसपणाचे होणारे खून - erosion of human dignity  - टिपणारे त्यांचे पेन हेच अनेकांना एक हत्यार दिसू लागते. सत्य सांगण्याची त्यांची कलाच त्यांच्याबद्दलच्या असूयेचे कारण ठरते. पण यातूनच घडत जातात समकालाचे, वर्तमानाचे दस्तऐवज. 'मंटो ' ही एक संकल्पना होऊन जाते. मंटोच्या कथा या एका काळाचे दस्तऐवजच आहेत. त्याच्या कथा फॅक्ट आणि फिक्शनच्या रेषा धूसर करतात. अकृत्रिम लिहिणेही कलात्मक होऊ शकते हेही मंटो  वाचून समजू शकते. त्याचबरोबर अशा सिमारेषा ओलांडणारे आणि अकृत्रिम लेखन करणे सोपे नसते - कलात्मक व इतर पातळींवर हेही काहीसे कळू लागते. 

मंटो फिल्मबद्दल एकंदरित बोलावे तर हा सादत हसन मंटो याच्या 42 वर्षांच्या जीवनापैकी 4 ते 5 वर्षांचा घेतलेला हा वेध आहे. सिनेमातील घटनांनुसार साधारण 1947 ते 1951-52 पर्यंतचा काळ दिसतो. मंटोचे  आयुष्य 1912 ते 1955 असे होते. मंटोने पत्रकारिता केली, बॉलीवूड सिनेविश्‍वात काम केले. मात्र फिल्म ही मंटो लेखक म्हणून काय होता याचा अंदाज सिनेमातून येतो. कदाचित सिनेकर्त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एखाद्या लेखकाचा संघर्ष हा दृष्टीकोन ठेवायचा असावा म्हणून असे केले असावे. त्यादृष्टीने मंटो फिल्म ही वर्तमानासंबंधात एक statement  म्हणूनही पाहिली जाऊ शकते. प्रेक्षक मंटोबद्दल माहिती असलेला असेल असेही गृहित असावे कदाचित. पण थोडा विस्तार झाला असता तर ‘एकूण मंटो’चा अंदाज, निदान outline मिळाली असती. मंटोबद्दलचे कुतूहल त्यामुळे वाढू शकले असते. पण विस्ताराने depth  गमावली जाण्याचा धोका असतोच. मात्र मंटोबद्दल ब्लॅंक असणाऱ्याना फिल्म पाहिल्यानंतर त्याला वाचावे असे वाटावे.

मात्र त्याचे जगणेे आणि लिखणे हे कसे समरस होते हे मात्र ज्याप्रकारे सिनेकर्त्यांनी त्याचे जीवन व कथा गुंफल्या आहेत त्यातून दिसते.

मला नेहमीच एक प्रश्‍न पडायचा म्हणजे मुंबईवर जीव जडवणारा मंटो असा उठून पाकिस्तानात स्थलांतरित का झाला असावा. त्याबद्दल थोडेसे फिल्ममध्ये आले आहे, ते असे :
मंटो आपल्या पेनातून सक्तपणे व्यक्त होत असला तरी स्वभावाचा हळवा. लहान सहान गोष्टी मनाला लावून घेण्याची सवय. देशाच्या विभाजनानंतर एकूणच देशात स्थिती तणावजनक बनते. धर्म डोक्यात गेलेली माणसे एकमेकांसमोर ठाकतात. दरम्यान, मंटोची पत्नी व दोन लहान मुली या पाकिस्तान बनणार असलेल्या ठिकाणी नातेवाईकांकडे रवाना झालेल्या असतो. दंगली उग्र बनत जात असतात. (धार्मिक तणावाचे मंटोच्या कथानकातून येणारे चित्रण त्याच्या त्यावेळच्या स्थितीचा अंदाज देऊ शकते.) अशाच वेळी त्याचा मित्र अभिनेता शाम रागात बोलून जातो की एका धर्माच्या  लोकांना मारून टाकावे असे त्याला वाटत आहे. मंटो म्हणतो की तोही त्याच धर्माचा आहे, मग तो त्यालाही मारेल का. त्यावर मित्र तेही संभव असल्याचे बोलून जातो. त्यानंतर तात्काळ बॉम्बे म्हणजे मंटो इतके समीकरण मांडणारा तो शहर सोडून पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतो. कदाचित माणसामाणसांत धर्माने तयार केलेले हे तेढ किती खोलपर्यंत पोचले आहे याचा अंदाज त्याला आला असावा. पण नंतर मात्र या निर्णयाचा त्याला पश्‍चाताप झाला असावा असे दिसते. ज्याच्या बोलण्याने तो देश सोडतो तो अभिनेता श्याम लाहोरला आला असता तो त्याला भेटायला जातो असे फिल्म दाखवते. चित्रपटाचे विभागून दाखवलेले शीर्षकही बरेच काही सांगणारे वाटते. 


तो दारू पित असतोच पण अचानक दारू त्याला पिऊ लागते. हेही त्याचा शेवट नजदीक घेऊन येण्याचे एक प्रमुख कारण ठरते. एका दारुच्या गुत्त्यावर ‘मंटो’च्या तोंडचा संवाद असा आहे - माणूस हा दारू दु:ख विसरण्यासाठी पितो तसा आतला आवाज दाबण्यासाठीही पीत असतो. 

त्याच्यावर एका कथेमुुळे अश्‍लीलतेचा खटला चालतो त्यावेळी कोर्टासमोर आपल्या जबानीत तो म्हणतो -

“सवाल यह है की... जो चीज जैसी है, उसे वैसेही पेश क्यूँ ना किया जाए ? मै तो बस अपनी कहानियों को आयिना समझता हूँ, जिसमें समाज अपने आप को देख सके ।’’

एकदा मित्रांच्या गोतावळ्यात वादविवाद सुरू असताना तो म्हणतो - 
“अगर मेरे अफसानों को बर्दाश्त नहीं कर सकते, इसका मतलब है जमाना ही नाकाबिले बर्दाश्त है।’’

सांप्रदायिक दंगलींच्या पार्श्‍वभूमीवर एका संमेलनात त्याचे बोलणे लक्ष वेधून घेते -
“सब पिछे देख रहें है, लेकीन आज का कातिल लहू से, लोहे से तारीख लिखता जा रहा है ।... मैं  आर्टिस्ट हूं , ओंझे घाव और भद्दे जख्म मैं बर्दाश्त नहीं  कर सकता '' 

चित्रपटात मंटो एकदा तीन आपल्या तीन लघुत्तम कथा वाचून दाखवताना दिसते. या तीन कथा येथे अनुवादित करण्याचा प्रयत्न करतोय :

1. तक्रार

काय मित्रा, काळाबाजाराच्या दरात दिलेस
पण इतके रद्दी पेट्रोल दिलेस
एक दुकानही जळू नाही शकले.


2. आरामाची गरज

‘मेला नाही- पहा, अजून जीवंत आहे’
‘असू देत यार - मी एकदम थकलोय’


3. सॉरी

सुरी पोट फाडत 
बेंबीच्या खाली पोचली.
विजार सुटून पडली.
सुरी चालवणाऱ्याच्या तोंडातून 
अचानक क्षमायाचनेच्या स्वरात शब्द आले -
‘च-च-च-च, मिश्टेक !’


ही नोंद लिहिता लिहिता लक्षात आले की काही वर्षांपूर्वी आकार पटेल यांनी अनुवादित आणि संपादित केलेल्या why I write and other essays या मंटोच्या निबंधस्वरूप लेखन संकलनातील लिहिण्याबद्दलच्या निबंधाची मी नोंद करून ठेवली होती. त्यातील निवडक भाग खाली देत आहे. स्वत: मंटोने त्यात आपल्या कथालेखनाबद्दल म्हटले आहे - 

“...मी माझ्या खोलीत सोफ्यावर कागदांचा गठ्ठा घेऊन बसतो आणि माझे पेन लिहिते करतो. माझ्या मुली यावेळी त्याच खोलीत खेळत असतात. त्यांच्याशीही गप्पा सुरू असतात. कधी कधी त्यांची भांडणेही सोडवतो. इतक्यात कोणीतरी अतिथी येतो. तेव्हा त्याचा पाहुणचार करण्यासाठी मी यजमान होतो. गप्पा-टप्पा होतात. पण हे सगळे सुरू असतानाच, माझे लिहिणेही सुरूच असते...’’

“...मी प्रयत्न करतो गोष्टी लिहिण्याचा. बैठक मारतो. एका मागोमाग एक सिगरेट पेटवत राहतो. पण काहीच येत नाही.
मी थकतो आणि पडून राहतो निपचित, एखाद्या काम करून शीणलेल्या स्त्रिसारखा, न लिहिलेल्या गोष्टींच्या थकव्यामुळे पार कोलमडून. मग मी उठतो आणि इतर कामांकडे लक्ष वळवतो. चिमण्यांना दाणे घालतो, मुलींसोबत खेळत बसतो. त्यांच्या घरभर विखुरलेल्या इवल्या इवल्या चपला शोधतो, जमवून एकत्र ठेवतो.
माझ्या खिशात पडलेली गोष्ट मात्र कशीच डोक्यापर्यंत येत नाही. ...’’ 

“...आणि ज्यावेळी मी सगळ्या कल्पनांकडून पराजित होऊन पडलेला असतो त्यावेळी माझी पत्नी, जी आमचे सर्व खर्च चालवते, ती मला दाटावते :
आता कृपया विचार करणे बंद करा आणि लिहिणे सुरू करा.
मग मी फाऊंटन पेन उचलतो आणि सहज काही ओळी बिरकवतो. माझा मेंदू अजून रिकामीच असतो - पण माझा खिसा भरलेला.
आणि बघता बघता जादू झाल्यागत एक परिपूर्ण गोष्ट अवतरते.
हे पाहता, मी लेखकापेक्षा खिसेकापू आहे, असे दिसते. जो स्वत:चा खिसा कापून जे हाती येईल ते तुम्हाला देतो....’’

सदाहत हसन मंटो (विकिपेडियावरून )






Comments