समग्र विनोबा संचित


वाचनव्यवहाराची व्याप्ती मर्यादित राहिलेली नाही. वाचन म्हणजे केवळ मुद्रित मजकुराचे वाचन ही संकल्पना आता पुरेशी ठरणार नाही. मुद्रित मजकुराबरोबरच ई- मजकूरही विचारात घ्यावा लागेल. ‘किंडल’ सारखी केवळ ई-पुस्तके वाचण्याची उपकरणेही केव्हाच बाजारात आली आहेत.

या पार्श्‍वभूमीवर ‘विनोबा डॉट इन’ या संकेतस्थळाकडे लक्ष वेधावेसे वाटते.  

विनोबा भावे आणि त्यांच्यावरील तसेच त्यांच्या चळवळीसंबंधी साहित्याचा संग्रह या संकेतस्थळावर करण्यात आला आहे. वाचल्यावर वाटते की या संकलनातून विनोबांसंबंधी काहीच महत्त्वाचे सुटले नसावे. विनोबा भावे यांच्याविषयीचे हे समग्र आणि साक्षेपी, असे संकलन ठरावे.

विनोबा हे २० व्या शतकातले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. निष्ठावंत गांधीवादी म्हणून ते परिचित आहेतच. पण, भूदान- ग्रामदान क्रांतिकारक म्हणूनही ते सिद्ध आहेत. आपल्या जीवनात कृतिशील राहून विविध कार्यक्रम राबवतानाच विपुल असे लेखन त्यांनी सातत्याने केले. त्यांची व्याख्याने, प्रवचनेही आज अक्षर वाङ्मयाचा भाग बनली आहेत.

विनोबांवरही अनेकांनी लेखन केले आहे. त्या वाङ्मयाचे  संकलनही या संकेतस्थळात आढळते. विनोबा यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजे परंधाम प्रकाशन. विनोबा आणि विनोबांच्या विचारधारेशी संबंधित साहित्य प्रकाशनासाठी वाहून घेतलेली ही संस्था. विनोबांच्या साहित्याचे स्वामित्व अधिकारही  तिच्याकडे आहेत. हे संकेतस्थळ परंधाम प्रकाशनाने ‘होस्ट’ केल्याचे व त्याची निर्मिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने केल्याचे दिसते. त्यामुळे या संकेतस्थळाला अभ्यासाच्या दृष्टीनेही अधिकृतता व अस्सलपणा प्राप्त होतो.

या संकेतस्थळावर काय आहे?

१. संस्थेतस्थळ निर्मितीविषयीची व निर्माणकर्त्यांविषयी माहिती.

२. पुस्तकांच्या विभागात विनोबांची पुस्तके तसेच विनोबांवर लिहिलेली. त्यांच्या आणि गांधीवादी अनुयायांनी लिहिलेली पुस्तके दिसतात. परंधाम प्रकाशनाची पन्नासपेक्षा जास्त पुस्तके येथून डाऊनलोड करून संग्रही ठेवणे शक्य आहे.

३. विनोबांच्या जीवनाचा संक्षिप्त आलेख,

४. लेखांचा विभाग आहे. त्यात विनोबांनी लिहिलेल्या, त्यांच्यावर लिहिलेल्या तसेच ‘सर्वोदय’ विचारधारेवरील लेखांचे संकलन आहे.

५. पत्र-पत्रिकांच्या अंकांचा वेगळा विभाग आहे. यात ‘भूदान’, ‘भूदान-यज्ञ’, ‘भूदान-क्रांति’, ‘ग्रामराज’, ‘ग्रामसेवावृत्त’, ‘हरिजन सेवक’, ‘महाराष्ट्र धर्म’, ‘पिपल्स अ‍ॅक्शन’, ‘समयोग’, ‘सर्वोदय सेवक’, ‘विनोबा चिंतन’, ‘विनोबा वृत्त’, ‘विनोबा प्रवचन’ या  पत्र-पत्रिकांच्या दुर्मीळ अंकांचे तारीखवार संच आहेत.

६. मिडिया विभागात विनोबा भावे यांच्यावरील माहितीपटाचे व व्याख्यानांच्या व्हिडिओंचे संकलन आहे.
७. भूदान- ग्रामदान चळवळीविषयीच्या विभागात भूदान कायदे, चळवळीची माहिती, पुस्तके, लेख, कागदपत्रे यांचा समावेश आहे. भूदान ही विनोबांनी सुरू केलेली व स्वतंत्र भारतातील ऐतिहासिक अशी चळवळ ठरावी.

८. ‘गीता प्रवचन’ विभागात विविध भाषांमधील गीता प्रवचनांचा अनुवाद आहे. शिवाय इंग्रजी, जर्मनी, कोरियन, डॅनिश, जपानी, नेपाळी अनुवादही आहेत. ते डाऊनलोड करण्याची सोय आहे. बा. भ. बोरकरांनी केलेला कोकणी अनुवादही आहे. त्याला विनोबांची कोकणीतून प्रस्तावना आहे.

आणखी एक खासियत म्हणजे ‘फोटोबायोग्राफी’. विनोबा जीवन दर्शन त्यातून घडते. भूदान पदयात्रेलाही यात टिपले गेले आहे. गौतम बजाज यांचे हे छायाचित्रण. तेही डाऊनलोड करता येते.

नियोजनबद्ध व विचारपूर्वक असे हे संकलन. विनोबा तसेच भूदान- ग्रामदान चळवळ जाणून घेण्याबरोबरच विनोबा अभ्यासकांनाही साधने उपलब्ध करणारे ते ठरावे. आजच्या माहिती, ज्ञान यांच्या बदलत्या संकल्पनांच्या काळात अशा प्रकारच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देणारे व तत्संबंधी मार्गदर्शन देणारेही हे संकेतस्थळ ठरावे.


संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


Comments