अमर अपार्थिव


रमेश वेळुस्कार : एक मुद्रा. (फोटो : समीर झांट्ये, स्थळ : लखनऊ )
मृत्यू अटळ असतो. मरण टाळता येत नाही. हे शाश्वत सत्य जरी असले तरी एखादा माणूस पार्थिव रूपात आपल्यासमोर आता यापुढे दिसणार नाही हे सत्य पचवणं किती कठीण असतं. याचं एक कारण म्हणजे दोन पार्थिव रुपांत होणारा संवाद हे असावं.
कवि रमेश वेळुस्कर गेले हे  रविवारी रात्री(21 ऑक्टोबर 2018) फेसबूक चाळत असताना अचानक दिसले आणि एकदम स्तब्ध व्हायला झाले. अचानक एक पोकळी अनुभवली. एखादा जोडलेला धागा अचानक तूटून जावा तसा अनुभव झाला. याचे कारण रमेश वेळुस्कर यांच्याबरोबरचा होणारा संवाद हेच असावे. वेळुस्कर संवाद साधणारे साहित्यिक होते. ते अक्षरांशी जसा आत्मीयतेने संवाद साधायचे तसेच त्यांच्याशी परिचितांबरोबरही तितक्याच आत्मीयतेने संवाद साधायचे. दुसरे म्हणजे वेळुस्कर हे लिहिते लेखक होते. अगदी मृत्यूपर्यंत ते लिहित होते.
ते गेल्याचे कळल्यानंतर जाणीव झालेली त्यांची आठवण होती ती त्यांच्याशी झालेल्या चर्चांची आणि त्यांच्या नवनवीन प्रयोगशील लिहिण्याची.
प्रत्येक गोष्टीचा एका खास ढंगात शोध घेताना त्यांना अनुुभवणे हा त्यांच्याशी बोलतानातला विशेष असायचा. गोष्ट सुरू झाली की ती कुठून कुठे पोहोचेल कळायचे आणि सांगताही यायचे नाही. संवाद संपला की ज्यासाठी सुरुवात झाली ते कळायचेच किंवा गवसायचेेच असेही नाही, पण या बोलण्याच्या ‘यात्रे’चा आनंद मात्र छान असायचा, अपेक्षेपलिकडच्या अनेक गोष्टीचं गाठोडं त्यातून हाताला लागायचं अनेकदा.
कवितेने त्यांच्यावर विशेष प्रेम केले. त्यांनीही कवितेला सोबत करत पंचमहाभूतांच्या शाश्वत तत्त्वांचे उत्खनन करून एक अक्षर सृष्टी निर्माण केली. भौतिकातल्या अधिभौतिकाबद्दल त्यांचे नेहमी कुतूहल दिसायचे.
काखेला झोळी, अंगात सदरा परिधान केलेलेे दाढीवाले लोभस असे हे व्यक्तीमत्व बहुदा पायी चालत फिरताना दिसायचे. पणजीत यायचे असतील तर चहासाठी भेेट ठरलेली. मग चर्चा सुरू झाली की आपल्याच गोष्टी सांगण्यापेक्षा बरोबरच्याला विचार करण्यास, बोलण्यास प्रवृत्त करणारी विधाने. त्यातून गोष्टी फुलत जायच्या. संवाद ही सुद्धा किती सर्जनशील गोष्ट आहे हे त्यांच्याशी बोलताना जाणवायचे. त्यांचे बोलणे गद्य-पद्याच्या सीमारेषा ओलांडून एक वेगळीच भाषा व्हायचे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि काव्य यांत एक अद्वैत अनुभवता यायचे. माणसातल्या जगण्यातला स्पिरीच्युअल एलमेंट हा माझ्या आकर्षणाचा नेहमीच विषय राहिला. कदाचित त्यामुळेही आम्ही एकमेकांकडे ओढले गेलो असेल, संबंधांत सहजता येत गेली असेल.
त्यांच्या काव्य सादरीकरणाचीही आठवण येते. जाहीर कार्यक्रमात व खासगीत त्यांच्याकडून कविता ऐकता आल्या. कधी त्यांच्या किंवा बर्‍याचदा इतरांच्याही. एखाद्या कवितेत किती ऊर्जा असू शकते हे त्यांच्याकडून कविता ऐकताना जाणवायचे.
सोशल मिडियावरून आपले साहित्य प्रकाशित करणारे अखिल भारतात विरळा लेखक असावेत. वेळुस्कर यांच्या वयातले तर दुर्मीळच. वेळुस्करांनी हल्लीच्या दिवसांत, ‘मळब कळी’, ‘फांतोड फुला’ं हे ललित गद्द फेसबूकवरून लिहिले. पैकी ‘मळब कळी’ बिंब प्रकाशनाने मुद्रित पुस्तकरूपात आणले आहे. मध्यंतरी काही पुस्तकांचे अनुवादही त्यांनी फेसबूकवरून केले.
‘गजाली’ हा एक वेगळा फॉर्म बनवून त्यांनी कितीतरी कोंकणी कविता केल्या. ‘सुनापरान्त’मधून दर रविवारी रवीन्द्रनाथांच्या मूळ बंगालीतून ‘गीतांजली’च्या अनुवादाचे सदर त्यांनी चालवले. अनुवाद आणि टिपण असे त्याचे स्वरूप होते. वेळुस्कर हे बंगाली भाषा शिकले होते, हेही येथे नोंद करावेसे वाटते. ‘गजाली’ आणि ‘गीतांजली’ या दोन्ही कृती पुस्तक रूपात आल्यास त्या नक्कीच कोंकणी साहित्याला योगदान ठराव्यात.
याशिवाय गोव्यातील वृत्तपत्रांतून गेली काही वर्षे नियमित ते कॉलम लिहित होते. हे इतके वेगवेगळ्या प्रकारचे लेखन सातत्याने करणारा दुसरा लेखक सध्या गोव्यात नसावा. अगदी मृत्यू येईपर्यंत ते लिहित होते. 
मागे मी बौद्ध स्थळांची यात्रा केली तेव्हा एक दिवस लखनऊला राहावे लागणार होते. वेळुस्करांना कळल्यावर ते रायबरेलीहून लखनऊला हजर. मी म्हटले तुम्ही इतकी तसदी का घेताय, तर म्हणाले 'तू इतक्या दूरवरून आलास. कोण जवळ कोण दूर. ' त्यांची अनेक विधाने कोड्यात टाकणारी. त्याला वरच्यावर उत्तरे देऊन सोडण्याची घाई करण्यापेक्षा. उत्तरे देणे अनेकदा मी टाळायचो. त्यांची विधाने विधाने आहेत की प्रश्‍न, प्रश्‍न हे प्रश्‍न आहेत की विधाने हेच गुंत्यात टाकणारे व्हायचे.
नंतर दिवसभर लखनऊचे ओझरते दर्शन घेतले. एका कविबरोबर फिरण्याचा तो माझ्या आयुष्यातील एक अनोखा दिवस होता. रमेश वेळुस्करांमुळे तो संभव झाला होता. मायावती ह्या मुख्यमंत्री असताना बनलेली उद्याने पाहायची उत्सुकता होती. पण तिथे भेट आधीच वेळुस्करांनी आखली होती. तिथे गेल्यावर वेळुस्कर म्हणाले - लक्ष्मीसमोर हत्ती असतात तेव्हा गजलक्ष्मी म्हणतात. येथे बाबासाहेबांसमोर हे हत्ती आहेत. याला काय म्हणता येईल. 
काही अंतरानंतर आणखी एक विधान - मार्बल आणि दुपार, काॅम्बिनेशन जाणवतय का तुला ?
मागे ‘झेन कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन व्हायचेे होते. त्यावेळी होणार असलेल्या चर्चेत त्यांनी कोंकणीतील मोठ्या लेखक व्यक्तिमत्वांसोबत बोलण्यासाठी बसण्याचे मलाही निमंत्रण दिले. माझ्यासाठी तो मोठा सुखद् धक्का होता आणि मोठा पुरस्कारसुद्धा. नंतर झेन कवितांवर मी वेगळ्या प्रकारे परीक्षण लिहिण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे परीक्षणाचे पारंपरिक कपडे न घातलेले परीक्षण आहे अशी फेसबूकवर कौतुकाची टिप्पणीही केली होती.
दुसर्याना प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणे, नव्या लेखकांचे वाचणे, सूचना करणे हा सुद्धा त्यांचा एक महत्त्वाचा स्वभाव होता. साहित्यासंबंधी अनेक चर्चा मी त्यांच्याशी केल्या आहेत. आणि त्यांनीही न कंटाळता सातत्याने त्यात भाग घेतला आहे. आज या सर्व गोष्टींचे कागदोपत्री दस्तऐवजीकरण नसेलही कदाचित पण एक लेखक म्हणून माझे काही छोटेसे व्यक्तिमत्व असेल तर त्यात ते नक्कीच विखरून असेल.
गेले काही दिवस त्यांच्याशी केवळ वॉट्सअ‍ॅपवर संवाद होता. माझे ‘बुद्धायन आणि इतर प्रवास’ हे पुस्तक पाठवल्यानंतर त्याची पोच आणि कौतुकाचा मॅसेज आवर्जुन आलेला. दोन सप्ताहांपूूर्वी त्यांचा साप्ताहिक कॉलम छापून आला नाही म्हणून फोन केेला होता, तो घरच्यांनी उचलला. त्यांना थकवा आला असल्याने ते फोन स्वीकारू शकत नाहीत म्हणून सांगण्यात आले. औषधोपचार सुरू असल्याचे व त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्याशी संवादाचा लवकरच योग येईल या अपेक्षेने होतो. नोव्हेंबर महिन्यात त्यांचा वाढदिवसही होता.
मात्र ध्यानीमनी नसताना त्यांनी ही अशी अचानक एक्झिट घेतली. कवि काय सर्जन करेल हे सांगता येत नाही.
जिथून सुरूवात केली मी तिथेच येउन पोहोचतो. पण मग मला अचानक गवसते ते हे - एखादा माणूस पार्थिव रूपात जरी नसला तरी अपार्थिव रुपात राहतोच. कवि आणि साहित्यिक तरी नक्कीच राहतो. एक अपार्थिव झाड बनून रमेश वेळुस्कर नेहमीच राहणार आहेत. स्मृती आणि अक्षरांंच्या घनदाट फांद्यांचे झाड बनून. नाहीतर अनेकदा ते सांगायचेच, ‘मरण बिरण काय नासता रे...’

****
- रमेश वेळुस्कर यांच्या ‘झेन कविता’चे परीक्षण करणारी नोंद या ब्लॉगवर लिहिली होती. ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

- त्यांच्याविषयी अधिक माहितीसाठी विकिपिडीया पाहता येईल. त्यासाठी येथे क्लिक करा


रमेश वेळुस्कर यांचे साहित्य
कविता-
मोरपाखां (1979)
माती (1983)
आंगणी नाचता मोर मोरया (1988)
सावुलगोरी (1989)
हिरण्यगर्भ (1993)
तनरजोती (1999)
घुरू घुरू वारो (2005)
दर्या (2008)
झेन कविता (2014)


बालसाहित्य -
चूचू (2005)
भूकू भूकू भिशू (1980)
कुंडेकुस्कूर (2007)
चाचा नेहरू भुरग्यांचे भेटेक


कादंबरी -
मोनी व्यथा (1976)


ललित गद्य -
मळब कळी (2017)


लेखसंग्रह -
सृजनाच्या अंतरंगांत (2016)


हिंदी कविता -
समुद्र मुद्रिका 


अनुवाद -
अंधेर नगरी (2008)
मूळ हिंदी : भारतेंदु

पांडुरंग पांडुरंग (2014)
संत तुकारामाच्या निवडक अभंगांचा अनुवाद


(याव्यतिरिक्त आणखी पुस्तके असू शकतात. जेवढी शीर्षके निदर्शनास आली तेवढी दिली आहेत.)