'खिस्तपुराण' चरित्र आणि गोवा वैश्‍विकरणाचा शोध

अनुवादातूनही भाषेचे वाङ्मयीन सौंदर्य वाढीस लागत असते. अनुवाद हा सुद्धा स्वतंत्र कृती प्रमाणे सर्जनशील असू शकतो. कोंकणी भाषेत असे महत्त्वाचे अनुवाद सिद्ध अनुसर्जक सुरेश आमोणकर यांनी  केले आहेत.

धम्मपद, ज्ञानेश्‍वरी, जपुजी साहेब, झेन कथा, तिरुक्कुरळ, जुवांवनुसार खिस्ताचे शुभवर्तमान, जातक कथा, यांचे कोंकणी अनुवाद त्यांनी साकारले आहेत. धम्मपदाच्या कोंकणी अनुवादास साहित्य अकादमीने अनुवाद पुरस्कार देऊन गौरविलेही आहे.

या सर्व अनुवादांप्रमाणेच, गोमंतकाच्या भाषिक आणि एकुणच इतिहासात वगळता येणार नाही अशा फादर थॉमस स्टिफन्स लिखित 'ख्रिस्तपुराण'चा कोंकणी अनुवाद त्यांनी सिद्ध केला. सुमारे 11 हजार ओव्यांचा हा ग्रंथ आहे. या अनुवाद सर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर घडलेल्या सखोल अभ्यासातून साकारलेला ग्रंथ म्हणजे ‘गोंयचें संवसारिकीकरण’. गोव्याचे वैश्‍विकरण, गोव्याचे ग्लोबलायझेशन असाही त्याचा अर्थ व्हावा. मुळात ही खिस्तपुराणची प्रस्तावना. मात्र तिचा आवाका साकार झाली तेव्हा तिने एका ग्रंथाचे रूप घेतले. स्वत: ग्रंथकर्त्यानेही त्याला प्रस्तावना ग्रंथ म्हटले. असे असले तरी ‘प्रस्तावना ग्रंथा’ची मांडणी, रूप, रचना, त्यातील विषयाचा आवाका, आणि 181 पृष्ठांचा आकार त्याला स्वतंत्र ग्रंथाचे अस्तित्व बहाल करतो, असे म्हटले तर चूक ठरू नये. दुसरे म्हणजे, एखाद्या ग्रंथाच्या प्रस्तावनेने स्वतंत्र ग्रंथाचे रूप घ्यावे, हासुद्धा एक नवीनच आणि दुर्मीळ प्रकार ठरावा. 

सोळाव्या आणि सतराव्या शतकातल्या गोमंतकाच्या ऐतिहासिक, सामाजिक, समाजशास्त्रीय, धार्मिक, भाषिक स्थितीगती संदर्भांचे आलेखन करणारी प्रकरणे या ग्रंथात आहेत. ती माहितीची मांडणी करणारी, ऐतिहासिक तथ्यांची चर्चा-चिकित्सा करणारी अशी आहेत. त्यातून लेखक गोव्याच्या वैश्वीकरणाचा शोध घेतो.

ग्रंथातल्या एकूण 19 प्रकरणांमध्ये 9 प्रकरणे ख्रिस्तपुराण ग्रंथ, त्याची रचना, त्याची भाषा शैली, त्यातील शिकवण, ग्रंथकार म्हणजे थोडक्यात ग्रंथाचा संक्षिप्त पण सर्वांगाने वेध घेणारी आहेत. 

त्याशिवाय विषयाच्या अनुषंगाने 23 परिशिष्ट्ये जोडली आहेत.

अगदी ‘आरंभाचे निवेदन’पासून हा ग्रंथ आपली बौद्धिक आणि अभ्यासाच्या सखोलतेची मोहोर उमटवतो.

वैश्‍विकरणाची संकल्पना विसाव्या शतकात ठळकपणे समोर आली असली तरी ही प्रक्रिया खूप आधीपासून सुरू होती हेही लेखकाला दाखवायचे आहे. त्यादृष्टीनेही हे ‘ग्रंथ’लेखन नावीन्यपूर्ण ठरावे. या वैश्‍विकरण प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून ग्रंथलेखक गोव्याच्या 16व्या शतकापासूनच्या इतिहासाकडे पाहतो व तथ्यांचा चिकित्सक वेध घेतो. येणार्‍या राजकीय व सांस्कृतिक आव्हानांना सज्ज राहण्यासाठी ऐतिहासिक तथ्यांची चिकित्सा होणे गरजेचे असल्याचे लेखकाचे मत आहे. त्यातूनच खिस्तपुराण ग्रंथाच्या अनुवादकामाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकविध वेध लेखकाने घेतला आहे, ज्याची परिणती या ग्रंथात झाली.

पोर्तुगीजांना (किंवा म्हणूयात युरोपियनांना) हिन्दुस्थानच्या वाटा शोधून काढण्याची गरज का भासली येथून सुरेश आमोणकर हे तथ्यांचे उत्खनन आरंभ करतात. त्यानंतर 15 व्या 16व्या शतकातील युरोपातली धार्मिक परिस्थिती आणि त्याचा गोव्यावर परिणाम यांचा वेध घेतात. हिंदुस्थानातल्या पोर्तुगीज वसाहती, त्यांचा आरंभ-शेवट, ख्रिस्ती धर्माचे हिंदुस्थानात आगमन यांचा वेध घेतात. 

पुढे- अल्बुकर्कचे गोव्यात आगमन, 16व्या, 17व्या शतकातली परिस्थिती याचा प्रदीर्घ धांडोळा येतो. हिंदु-ख्रिस्ती संस्कृतींची गाठभेट व त्यातून उद्भवलेला धार्मिक-सामाजिक संघर्ष याची चिकित्सा करतात. धर्मसमीक्षण न्यायसभा ऊर्फ ‘इन्क्विझिशन’ची स्थापना, धर्मांतराचे टप्पे, त्याविषयीची धोरणेे, याची तथ्ये, चर्चाही केली आहे.

फादर थॉमस स्टिफन्सचा चरित्रपट उलगडणारे स्वतंत्र प्रकरणही ग्रंथात येते.

परिशिष्टांमध्ये, ख्रिस्तपुराण, थॉमस स्टिफन्स  व विषयाशी संबंधित दस्तऐवज आहेत. त्यात थॉमस स्टिफन्स यांची पत्रे, खिस्तपुराणवरील तत्कालीन अभिप्राय, खिस्तपुराणच्या विविध आवृत्तीतील उतारे, याचबरोबर कृष्णदासशामा यांच्या श्रीकृष्णचरित्रकथेतील उतारा, इन्क्विझिशन आज्ञापत्र यांचा समावेश आहे.

ग्रंथाला प्रकरणनिहाय संदर्भसूची, नामसूची, विषय सूची, स्थळ सूची जोडली आहे. शिवाय डॉ. सु. म. तडकोडकर यांचे ख्रिस्तपुराण संदर्भात अभ्यासपूर्ण टिपण आहे. तसेच खिस्तपुराणातील सासष्टीतील कोंकणी शब्द आणि बोली व युरोपीय पाद्रींनी वापरलेल्या लिप्यंतराच्या पद्धती असे प्रा. से. मा. बॉर्जिस यांचे दोन लेख आहे.

खिस्तपुराण ग्रंथाचे चरित्र समजून घ्यायचेे असलेल्यांना तसेच 16व्या 17व्या शतकातील गोव्याची ‘आऊटलाइन’ जाणून घ्यायची असेल त्यांना हा ग्रंथ उपयुक्त ठरावा. हा ग्रंथ वाचल्यानंतर मूळ ग्रंथाचे वाचन अधिक सुजाण व आकलनयुक्त ठरावे.

                                                 

गोंयचें संवसारिकीकरण
लेखक : सुरेश आमोणकर
प्रकाशक : कला संस्कृती संचालनालय, पणजी-गोवा.

Comments