निस्पृह - निरागस आत्मकथन


‘नाही मी एकला’ हे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रांसिस डिब्रिटो यांचे आत्मकथन. एकूण चौदा प्रकरणांच्या या पुस्तकात फा. डिब्रिटो एक व्यक्ती, धर्मगुरू, कार्यकर्ते, लेखक अशा रूपांत दिसतात. आपल्या आत्मकथनाला त्यांनी ‘तपासणी व उलटतपासणी’ म्हटले आहे.
डिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरीही भारतीय परंपरेचा त्यांच्या जडणघडण व व्यक्तीमत्त्वावरील प्रभाव त्यांनी खुलेपणाने व्यक्त/स्वीकार केला आहे.  ‘घंटानाद म्हणजे आदिनादाचा, ओम्काराचा हुंकारच जणू!’ असे ते म्हणतात. तुकारामांचे उद्गार ठिकठिकाणी ते उपयोगात आणतात. पुण्यातील जंगली महाराज मंदिरात व वरळीच्या हनुमान मंदिरात त्यांची प्रवचनेही झाली आहेेत.

दिब्रिटो यांचा जन्म व बालपण वसईच्या सुंदर वातावरणात गेले. वसईच्या आपल्या जन्माची कथा सांगताना फादरनी तेथील भाषा, लोकवेद, हिंदू-ख्रिस्ती सद्भाव याच्या मिलाफाचे सुरेख दर्शन घडविले आहे. पुढे त्यांनी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला व धर्मशिक्षणाकडे वळले. धर्मशिक्षणावेळी काही काळ रोम येथे राहण्याची संधी लाभली. अभ्यासाचे क्षितीज आणखी विस्तारले. जगभरातल्या सहाध्यायींशी संबंध आला. तेथे पोप जॉन पॉल दुसरे आणि मदर तेरेसांचा अल्पसा सहवास लाभला ज्याने त्यांना श्रेयस अशा अनुभूती दिल्या. पुणे येथील वास्तव्यासंबंधीही त्यांच्या मनात विशेष जागा आहे असे दिसते. येथे त्यांचा अनेक सांस्कृतिक - साहित्यिक उपक्रमाशी व्यक्तींशी संबंध आला. ज्याने त्यांचे व्यक्तीमत्व वर्धीष्णू केले. धर्मगुरू म्हणून वावरताना वेळोवेळी त्यांनी भूमिका घेतल्या. कधी त्या धार्मिक सुधारांसाठी होत्या तर कधी सभोवताल्या परिस्थितीच्या सुधारासाठी. यावेळी त्यांना कटू-थरारक अनुुभवांचा सामना-मुकाबला करावा लागला. जगताना अक्षरांशी नाते जुळत गेले व त्यांच्या प्रतिभेला धुमारे फुटत गेले. प्रबोधनाचे कार्य करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘सुवार्ता’ मासिकाच्या संपादकपद त्यांनी दोन तपे सांभाळले. मासिकातून एकाबाजूनेे सभोवताल्या घटनांविषयी अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्या तसेच विविध परिसंवादांतून समन्वयासाठी प्रयत्न केले. ते सामाजिक चळवळींत ओढले गेले व ती जबाबदारी धैर्याने पेलत त्यांनी तगड्या विरोधी शक्तींशी झुंज दिली. 

‘सुवार्ता-विचाराची पालखी’, ‘माझी शब्द संवाद यात्रा’ व ‘सुबोध बायबल - सेतुबंधनाचा प्रयोग’ या प्रकरणांत फा. दिब्रिटो यांच्या वाङ्मयीन व्यक्तीमत्त्वाचा व कार्याचा परिचय वाचकाला होतो. फा. दिब्रिटो यांची लेखन संपदा 14 पुस्तकांत सामावली आहे. ‘माझी शब्द संवाद यात्रा’ प्रकरणात त्यांनी आपल्या लेखनामागच्या प्रेरणा व भूमिकांचा मागोवा घेतला आहे.  ‘सेतुबंधनाचा प्रयोग’मध्ये बायबलच्या त्यांनी केलेल्या अनुवादासंबंधी यात्रेचे विवरण आले आहे. या अनुवादाला केंद्रीय साहित्य अकादमीचा अनुुवादासाठीचा पुरस्कार लाभला होता. लेखक म्हणून निसर्गाबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा दिसतो, त्यांच्या बहुतेक चळवळीही पर्यावरणाशीच निगडित दिसतात.

आपल्या फजितीचे प्रसंग खेळकरपणे सांगतानाच आपल्या तरुणपणातील/जीवनातील नाजूक प्रसंगांच्या, घालमेलीच्या आठवणीही त्यांनी धीटपणे व्यक्त केल्या आहेत. सेमिनारीत शिक्षण घेतेवेळी एक तरूण मुलीशी त्यांचा परिचय झाला व ती त्यांना पत्रे लिहू लागली. त्यांच्या मनातही वादळ निर्माण झाले. मात्र त्यांनी त्याला पूर्णविराम दिला. लहानपणी आईला चुकून दिली गेलेली शिवी व त्याविषयीचा पश्‍चाताप, एकदा आईलाच कन्फेशन बॉक्स मध्ये सामोरे व्हायचा प्रसंग, लहानपणी कॉपी करून मिळालेले चांगले मार्क मात्र नंतर त्याविषयीची खंत व ‘कन्फेशन’ असे प्रसंग पुस्तकात आहेत. 

आत्मकथनाची भाषा संयत व शांतरसाने व्यापलेली आहे. साधे आणि सहज तरीही ‘ग्रेसफूल’ असे लिहिणे कठीण असते मात्र फा. डिब्रिटो यांची अशा लिहिण्यावर पकड किती पक्की आहे त्याची प्रचिती अगदी ‘ना तरी मी मातीचे मडके’ या मनोगतातच येते. ते तरलतेने लेखन करतात. मात्र कल्पनाविलासात रमत नाहीत. भावनावश होत नाहीत. मोकळेपणाने व्यक्त होतात पण संयमितपणा आणि तटस्थपणा कुठेही ढळू देत नाहीत. ज्यांचा त्यांना विरोध करावा लागला त्यांच्याविषयी कुठेही कटू भाव व्यक्त होत नाहीत. आपल्या फजितीचे प्रसंग आनी झालेल्या चुकांची कबूलीही ते देतात. ज्यामुळे आत्मकथनास निर्मळ-निरागसता प्राप्त होते.

धर्मगुरू हा नियमांनी बद्ध असतो. या नियमांची जपणूक त्याला आयुष्यभर करायची असते.  असे असले तरी तो एक माणूस असतो. इतर माणसांसारखी संवेदनांची वादळे त्याला चुकत नाहीत. दिब्रिटो यांनाही अशा भावनिक, आकर्षणांच्या वादळांना सामोरे जावे लागले. संसार, एकटेपणा, स्त्रीआकर्षण आदि प्रश्‍नांनी त्यांनाही घेरले. मात्र त्यांनी ते न टाळता त्याची चिकित्सा केली आहे. याबाबत चर्चाही पुस्तकात आली आहे.