प्रज्ञापथावरचा प्रतिभावंत

कॉम. नारायण देसाई यांच्या लेखनकार्याविषयी एक नोंद. 


काही माणसे आपल्या प्रश्‍नांची सोडवणूक परंपरांच्या दंडकांच्याआधारे, प्रस्थापित आदर्शांना प्रमाण मानून करतात तर काही बुद्धी, तर्क, चिकित्सा, विवेक यांच्याआधारे शोध घेतात, परंपरांचे अंधानुकरण नाकारून प्रस्थापिताच्या पुढे जाणारा मार्ग शोधतात. नारायण देसाई हे दुसर्‍या वाटेवरचे एक पांथस्थ होते.

पोर्तुगीज गोव्यात जन्मलेले मूळ पेडणे येथील देसाई गोव्यात, मुंबई व अखेरच्या दिवसांत पुण्यातून कार्यरत राहिले.

बा.द. सातोस्कर यांना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात -‘सर्वांचेच विचार कालग्रासित असतात. जी गोष्ट कालग्रासित होऊ शकत नाही ती म्हणजे आपली विचारशक्ती. म्हणून माझ्या साहित्य लेखनातला हेतू अमुक विचार देणे हा नसून विचारशक्ती वाढवणे हा आहे.’

देसाई यांनी हयातभर लोकांमध्ये ही विचारशक्ती, चिकित्सावृत्ती, आत्मभान रूजावे यासाठी कार्य केलेेले दिसते. त्यासाठी आपली लेखणी त्यांनी एखाद्या लढवय्याने तलवार वापरावी तशी वापरली.

आपल्या विद्वत्तेने व कर्तृत्वाने कॉम्रेड देसाई यांनी गोवा व गोव्याबाहेर अनेकांना प्रभावित केले. त्यांच्या निधनानंतर ‘लोकभूमी’ने प्रकाशित केलेल्या त्यांच्यावरील विशेषांकात विविध क्षेत्रातील व वयोगटातील आणि  गोवा तसेच महाराष्ट्रातील व्यक्तींच्या स्मृतीपर लेखांतून त्याची प्रचिती येते. ‘ज्ञानपीठ’प्राप्त साहित्यिक रवींद्र केळेकर यांनी आपले एक पुस्तक देसाई यांना अर्पण केले आहे. अर्पण पत्रिकेत केळेकर म्हणतात -  ‘पुस्तक तुमच्या हातांत दवरून फाट थापटून घेवंक आंवडेतालो’. यावरून देसाई यांच्याबद्दलच्या आदराची कल्पना यावी.

नारायण देसाई हे चिंतनशील लेखक होते तसेच ते एक ‘कॉमे्रड’ होते. नारायण देसाईंच्या जीवनाच्या घटनाक्रमांचा आढावा घेतल्यास एक शिक्षक, स्वातंत्र्य सैनिक, कम्युनिस्ट कार्यकर्ता - संघटक - नेता असा त्यांचा परिचय होतो. त्याचबरोबर त्यांची कारकिर्द उजळून दिसते ती एक स्वतंत्र विचारांचा विचारवंत लेखक म्हणून. मात्र त्यांचे लेखन हे त्यांच्या जीवनाचा ‘बायप्रोडक्ट’ दिसते हेही तितकेच खरे. कृतीशील जीवन जगता जगता व प्रज्ञापथावर विचारांची साधना करता करता त्यांनी आपल्या साहित्याची निर्मिती केलेली दिसते.

जीवनाच्या अगदी आरंभापासूनच त्यांना चिकित्सकपणा, चौकटीबाहेरच्या विचारांचे व पुरोगामीपणाचे आकर्षण दिसते. वयाच्या 19व्या वर्षी त्यांचा पहिला लेख ‘उ एराल्द’ दैनिकात सन 1939 साली पोर्तुगीज भाषेतून प्रकाशित झाला होता. गणपती स्वर्गात राहणारा देव नसून खरा योद्धा होता,  वेदकालीन एका गणाचा नायक होता आणि तिबेट स्वारी करून तो प्रदेश त्याने मुक्त केला असे विचार पं. सातवळेकरांनी मांडले होते, त्यांचा अनुवाद करून देसाईंनी तो लेख लिहिला होता. 

बा. द. सातोस्कर यांनी देसाई यांचा समावेश ‘गोमंतकीय मराठी साहित्याच्या आधुनिक शिल्पकारां’मध्ये केला आहे. 1960 साली लोणावळा येथे गोमंतकीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी देसाई यांची निवड झाली होती. पोर्तुगीजांच्या जाचामुळे गोवा मुक्तिपूर्व काळातील संमेलने गोव्याबाहेर होत असत. गोवा मुक्तीनंतर म्हापसा येथे 1965 साली झालेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात देसाई यांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले होते. वयाच्या 45व्या वर्षी त्यांना हा सन्मान लाभला होता. 

मराठीत त्यांनी विपूल साहित्य निर्मिती केली आहे. कोंकणी भाषेतही त्यानी लेखन केले आहे. त्यांच्या लेनिनवरच्या ‘लेनिन : जीण, चिंतन, कर्तृत्व’ या कोंकणी ग्रंथाला कला अकादमीने साहित्य पुरस्कार देऊन गौरविले आहे. कोंकणी लेखनाशी त्यांचा संबंध त्याहीपर्वीचा दिसतो. सन  1955 साली गोमन्तक प्रेस, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या शणै गोंयबाब लिखित ‘अल्बुकेर्कान गोंय कशें जिखलें’ या पुस्तकाला त्यांनी एक अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिलेली दिसते. त्यावेळी त्यांचे वय 35 वर्षे होते. त्यांच्या पुस्तकांचे हिंदी, इंग्रजीत, गुजराथीत अनुवादही झालेले दिसतात.

संपादन क्षेत्रातही त्यांची भरीव कामगिरी दिसून त्यांनी मुंबईत अन्य सहकार्‍यांबरोबर गोवा मुक्तीपूर्व काळात ‘साळीक’ व ‘युगदीप’ नियतकालिकांचे संपादन केले. याशिवाय मुक्तीनंतर ‘लोकसंग्राम’, ‘आमचे श्रम’ , ‘आमचे राज्य’, ‘लोकभारत’, ‘लोकभूमी’ अशी नियतकालिके त्यांनी चालविली. एक रोमी लिपीतील नियतकालिकही ते चालवित असा संदर्भ कुठेतरी आढळल्याचे आठवते.

नारायण देसाई यांचे पहिले पुस्तक हे 40च्या दशकात तर अखेरचे 2005 साली निघाले. म्हणजे पाच दशकांहून अधिक काळ आणि त्यांचे निधन 2007 साली झाले त्याच्या दोन वर्षे अगोदरपर्यंत लेखक म्हणून ते कार्यरत होते.

40च्या दशकात ब्रिटीश भारतात मुंबईत प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘क्रांतिवीर’ आणि ‘कंगाल भारत’ या नाटकांवर बंदी आणली गेली व प्रती जप्त करण्यात आल्या होत्या. यापैकी एक नाटक आंतरजातीय प्रेमसंबंधांवर तर एक सुभाषचंद्र बोस यांच्यावर होते.

नाटक, चरित्र, निबंध, प्रबंध, लेख असे लेखन त्यांनी केले. त्यांचे लेखन ललित किंवा रंजनपर नाही. त्याला प्रबोधनाचे आणि जागृतीचे अंग आहे. त्यांचा पिंड हा वैचारिक लेखकाचा. आणि त्यांच्या जीवन मिशनास ते अनुसरूनच होते. चिंतनाची सखोलता, अभ्यासाची व्यापकता, मूलगामीपणा, व्यासंग त्यांचे साहित्य वाचताना लक्षात येते. मार्क्सवादी दृष्टीकोन आणि भारतीय परंपरेची चिकित्सा ही त्यांच्या लेखनाची दोन ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांचा सखोल अभ्यास त्यांच्या लेखनातील आणखी एक विशेष. 

त्यांच्या लेखनाच्या आषयाची कल्पना पुस्तकांच्या नावांवरूनही यावी. काही नावे अशी - ‘समाजक्रांतिच्या प्रकाशरेखा’, ‘लेनिन आणि आपण’, ‘एकविसावे शतक आणि स्वामी विवेकानंद’, ‘इश्‍वर नव्हे मीच खरा’, ‘मार्क्सवाद - लेनिनवादाची मूलतत्वे’ इ.

16 डिसेंबर 1920 रोजी जन्मलेल्या देसाई यांचे जन्मशताब्दीचे वर्ष यंदा सुुरू होत असताना श्री. देसाई यांचा वैचारिक पिंड लक्षात घेता त्यांच्या विचारांची थोडीशी चर्चा औचित्यपूर्ण ठरावी. यासाठी प्रतिनिधिक स्वरूपात त्यांची दोन पुस्तके येथे विचारात घेतली आहेत.

त्यांच्या लेखन कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातले एक पुस्तक म्हणजे ‘शास्त्रीय तत्वज्ञान’. 1962 साली प्रकाशित हे पुस्तक त्यांच्या व्यक्तीमत्वाचा व वाङ्मयीन - जीवन मिशनाचा ‘मेनिफेस्टोच’ म्हणता येईल. पुढे लिहिलेल्या पुस्तकांतील चर्चेचा मूळ स्वरही ‘शास्त्रीय तत्वज्ञानात’ आढळून येतो. 


पुस्तकात त्यांनी भारतीय आध्यात्म परंपरेवर मार्क्सवादी दृष्टीकोनातून क्ष-किरण टाकले आहे. इश्‍वर (सं)कल्पना व आध्यात्मिक अवडंबरात गुरफटून गेल्याने मानवजातीचा विकास खुंटला व तो गतीहीन झाला. या अवडंबराच्या सहाय्याने किंबहुना ते पद्धतशीररित्या माजवून धर्मसत्ता व राजसत्तेने शोषित वर्ग घडवला असा त्यांच्या एकूण विवेचनाचा सूर दिसतो. स्वत:वर लादून घेतलेल्या या बंधनांतून माणसाला मुक्त करणे, हे भौतिक जगच सत्य असून त्यात सर्वश्रेष्ठ निर्मितीशील मानव आहे याचे आत्मभान जागवणे व सर्वांना अग्रेसर करणे याचा ध्यास जणू त्यांच्या लेखणीने घेतलेला दिसतो. 

नारायण देसाई यांचे क्रांतिकारी स्वरूपाचे विचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावेच त्याचबरोबर त्यांची विचार करण्याची, खंडण-मंडण-विश्‍लेषण-संश्‍लेषण-निष्कर्षाची पद्धत थोडक्यात त्यांचे ‘लेखन विशेष’ समजून घेण्यासाठीही हे  पुस्तक महत्त्वाचे ठरावे. 

नारायण देसाई हे भारतीय आध्यात्म परंपरेचे केवळ मंथनच करीत नाहीत तर आपले क्रांतिकारी नवीन विचार ठामपणे मांडतात. उदाहणार्थ ‘कर्म’सिद्धांताविषयीचे त्यांचे मत. 

ते म्हणतात - ‘कर्म जर मी करणार आणि मी ते करावयालाच हवे तर त्या कर्मफालाची आसक्ती धरणेही स्वाभाविक नाही काय ? फळ जर सहजासहजी मिळत नसेल तर तशी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हे आपले कर्तव्य ठरते. कर्म जसे करावयालाच हवे तसेच कर्माचे रास्त फळही त्याला मिळावयालाच हवे. तो त्याचा उचित कर्मसिद्ध हक्क आहेे...कर्म तर कराच, परंतु प्रत्येक कर्माचे रास्त फळ मिळावे म्हणून न्यायनिर्माण, शोषणनिवारण व समाजक्रांती वगैरे जी जी काय सामूदायिक कर्मे आहेत तीही करा’

अर्थात त्यांचे हे विचार वैयक्तिक स्वार्थकेंद्रिततेला प्रोत्साहन देण्यासाठी नसून व्यापक शोषणमुक्तीच्या दृष्टीकोनातून आले आहेत हे वेगळे सांगायला नको.

जीवनाच्या अखेरच्या काळापर्यंत ते कार्यरत दिसतात. त्यांचे शेवटचे पुस्तक ‘बुद्ध आपुला सांगाती’ हे वर्ष 2005 मध्ये प्रकाशित झाले. त्यांच्या मृत्यूच्या दोन वर्षे अगोदर.

त्यांना प्रेरित असलेल्या ‘शास्त्रीय तत्वज्ञाना’चा भारतीय आदर्श पुरुष म्हणून ते बुद्धांकडे पाहत असावेत असे दिसते. या पुस्तकातील दोन दीर्घ वैचारिक निरुपणांतून नारायण देसाई बुद्धांच्या मानव उत्थानासाठीच्या मूल्यांचे अन्वेषण करताना व रोजच्या व्यवहाराशी त्याची सांगड घालताना दिसतात. असे असले तरी बुद्धमताची चिकित्सा करूनच ते बुद्धांचा स्वीकार करतात. बुद्धाची मानव उत्थानासाठीची तत्वे व त्यांत भरडले गेलेले कर्मकांडांचे अवडंबर यांचा उहापोह व वर्गीकरण करायला ते विसरत नाहीत. 

बुद्धांचा धम्म त्यांना तीन गोष्टींसाठी भावतो - एक : त्याला असलेले मूल्य-शिक्षणाचे अंग, दोन : स्वदेशातील समाज सुधारणांचे अंग, आणि तीन : मानव-समाजाने ‘जैसे थे’ परिस्थितीच्या दलदलीतून हत्तीच्या बळाने पुढचे पाऊल टाकण्याचे अंग.

Comments