स्वयंसिद्धांचे कर्तृत्वदर्शन

ज्येष्ठ पत्रकार संजीव वेरेंकार यांचे नाव हे कोंकणी कवि म्हणून जास्त परिचयाचे आहे. अलिकडच्या काळात गद्य लेखनही त्यांनी केले आहे. ललित निबंध, व्यक्तिचित्रणे, चरित्रपर, गतस्मृतिपर अशा प्रकारातले गद्य त्यांनी लिहिले आहे. आपल्या सोप्या, सरळ शैलीमुळे वाचकांत ते लोकप्रियही ठरले आहेत.

नुकतेच त्यांचे 221 पृष्ठांचे ‘प्रेरणा रूख’ हे कोंकणी पुस्तक प्रकाशित झाले आहे. ‘कर्तृत्व चित्रण’ असे उपशीर्षक लेखकाने पुस्तकाला दिले आहे. ‘गोमंतक मराठा समाज’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोव्यातील संख्येने अल्प पण विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा, प्रतिमेचा ठसा उमटविलेल्या समाजातील निवडक व्यक्तींवरील हे लेख आहेत. 

जातीय, सरंजामशाही आणि धार्मिक परंपरेने लादलेल्या प्रथा, चालिरिती आणि त्यातून वाट्याला आलेले शोषण, अवहेलना झुगारून स्वयंसिद्ध झालेल्या या समाजाचा इतिहास पाहता या ‘कर्तृत्व चित्रणा’स विशेष संदर्भ प्राप्त होतो. या पुस्तकाला डॉ.नंदकुमार कामत यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेच्या वाचनातून समाजाच्या संघर्षाविषयी, वाटचालीविषयी व कर्तृत्वाविषयी तसेच या पुस्तकाच्या महत्वाविषयी आकलन होण्यास मदत होते. असे असले तरी आवर्जुन नमुद करायचेे म्हणजे या सर्व व्यक्तींनी केलेले काम पाहिल्यानंतर ‘समाजा’शी त्यांचा संबंध बाजूला केला तरीही या व्यक्ती प्रेरणादायीच ठराव्या अशा आहेत.

गोमंतक मराठा समाजातील निवडक व्यक्तींचे गुणदर्शन व कर्तृत्व चित्रण हा लेखक वेरेंकार यांचा प्रमुख हेतू आहे. ते करताना ‘समाजा’च्या सामाजिक योगदानाचे प्रातिनिधिक दर्शन त्यांनी घडवले आहे. एखादा ‘समाज’ जिद्द, परिश्रमातून, शिक्षण, प्रागतिक विचार याद्वारे  प्रतिकूलतेवर मात करून स्वत:स कसे सिद्ध करू शकतो हे सांगण्याची लेखकाची दृष्टी दिसते. यातून गोमंतक मराठी समाजाबद्दल परिचयात्मक व ऐतिहासिक माहिती काही प्रमाणात आली आहे. स्वत: लेखक वेरेंकर या समाजातून येतात. राजाराम पैंगीणकर यांनी  चालिरितींची बंधने बाजूला करण्याची भूमिका घेऊन पैंगीण येथून हाक दिली (याबाबत सविस्तर माहिती त्यांच्यावरील लेखात आहे.) त्याला 2021 साली शंभर वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून पुस्तक प्रकाशित केल्याचे लेखकाने म्हटले आहे.

वेरेंकर यांनी एकूण 21 व्यक्तींची निवड केली आहे. गेल्या 100 ते 150 वर्षांच्या कालखंडातील या व्यक्ती आहेत. गोमंतक व गोमंतक मराठा समाज हा या सर्वांमधील समान धागा आहे. या समाजाला सन्मानाने जगण्यासाठी विशेष संघर्ष करावा लागला त्या मुक्तिपूर्व गोमंतक काळातील या व्यक्तींचे जन्म आहेत. त्यापैकी बहुतेक जन्माने गोमंतकीय आहेत. काही जन्माने गोमंतकीय नाहीत मात्र त्यांची घराणी गोव्याशी निगडित आहेत. काही घराणी बर्‍याच काळापूर्वी गोव्यातून स्थलांतरित झाली होती त्यातील पीढ्यांमधून या व्यक्ती आहेत. काही व्यक्ती या आर्थिकरित्या सुस्थिर अशा घरांत जन्मलेल्या आहेत. तर बहुतेकांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून स्वत:ला सिद्ध केले आहे. अनेकजण हे सामाजिक कार्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती आहेत. बहुतेकजणांचे कार्यक्षेत्र गोवा तर काहींचे गोव्याबाहेर. वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, कायदा, चित्रकला, उद्योग, राजकारण,जागतिक संस्था, नौदल, अशा क्षेत्रांशी या व्यक्ती संबंधित आहेत. पुस्तकात समाविष्ट व्यक्ती ‘निवडक’ असल्याचे लेखकाने म्हटले आहे. संगीत क्षेत्राशी संबंधित व्यक्ती यात समाविष्ट नाहीत. त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीने त्यांच्यावर लिहिणे उचित होईल असे लेखक वेरेंकार यांचे मत आहे. 

या पुस्तकातील संजीव  वेरेकार यांच्या लेखनाचे तीन पैलू दिसतात. 

एक म्हणजे संबंधित व्यक्तींवरील लेखन. हे चरित्र लेखन नव्हे. या व्यक्तींनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य व त्यांना करावा लागलेला संघर्ष असे त्यांच्यावरील लेखनाचे सर्वसाधारण स्वरूप दिसते. आटोपशीरपणे व नेमकेपणाने हे कर्तृत्व चित्रण वेरेंकर यांनी केले आहे. पुस्तकात काहीं लेख हे माहिती व वर्णन यादृष्टीने सविस्तरपणे आले आहेत. तर काही अवघ्या पानांत आटोपते झाले आहेत. संदर्भाच्या उपलब्धतेमुळे कदाचित तसेच घडले असावे. लेखकाने निवडलेल्या व्यक्तींपैकी अनेकांबद्दलची माहिती अशाप्रकारे एकत्रितपणे पहिल्यांदाच समोर येत असावी, निदान कोंकणी भाषेत. गोमंतक मराठा समाजाविषयी गोमंतकात मराठीतून लेखन झाले आहे. असे असले तरी या पुस्तकातील माहिती ही उपलब्ध लेखनाला नक्कीच पुरवणी ठरावी. 

दुसरे म्हणजे या व्यक्तींविषयी सांगतानाच संजीव वेरेंकार यांनी गोमंतक मराठा समाजाची जडण घडण, तत्कालीन सामाजिक तसेच ‘समाजा’ची विविध कालीन स्तिती-गती, समाज संघटनातील समाजधुरिणांनी अनुभवलेले टप्पे टोणपे यावरही भाष्य केले आहे. ते ‘समाजा’विषयी आकलन वाढवणारे, संदर्भ देणारे व  अधिक जाणून घेण्यासाठी दिशादर्शक आहे.

तिसरे म्हणजे लेखक काही ठिकाणी स्वत:विषयीही व्यक्त झाला आहे. या समाजाचा एक घटक म्हणून त्याने काही ठिकाणी विधाने केलेली दिसतात. त्यामुळे आत्मपर असा सूर काही ठिकाणी निर्माण झाला आहेत. अर्थात त्या त्या ठिकाणी विषयाच्या अनुषंगाने लेखक व्यक्त झाला आहे.

आज गोमंतक मराठा समाज म्हणून ओळखला जाणारा समाज हे विविध घटकांचे एक संघटन आहे. एक संघटन म्हणून समाजाच्या जडण घडणविषय एक टिपण पुस्तकात  आवश्यक होते. समाजाविषयी माहिती नसलेल्या वाचकांसाठी या कर्तृत्व चित्रणाचे महत्व स्पष्ट होण्यासाठी असे टिपण उपयुक्त ठरले असते. अर्थात त्याची कमतरता काहीशी डॉ. कामत यांच्या प्रस्तावनेने तसेच वेरेंकर यांनी ठिकठिकाणी केलेले भाष्य यांनी भरून काढली आहे.

पुस्तकातील प्रकरणांची धरती ‘स्फूट लेख’ प्रकारातील आहे. असे असले तरी संजीव वेरेकर यांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी कष्ट घेतले आहेत हे पुस्तक वाचताना लक्षात आल्याशिवाय राहत नाही. विविध संदर्भ तपासून व हयात व्यक्तींशी तसेच त्यांच्या संबंधितांशी चर्चा करून  तथ्यांची आणि माहितीची जमवाजमव केली आहे. पुस्तकाच्या शेवटी निवडक संदर्भ स्रोतांची यादीही जोडली आहे. 

गोवा विषयक अभ्यासकाला संदर्भ पुरवणारे हे पुस्तक आहे. 


Comments