समुद्रसंबंधी मंथनीय चित्रप्रदर्शन

‘इन्व्हेजन ऑफ सी’ हे समुद्रातल्या प्लास्टिक प्रदूषणावरचे छायाचित्रांचे प्रदर्शन गोव्यात सुरू झाले आहे व ते 23 जानेवारी2022पर्यंत आल्तिनो पणजी,गोवा येथील सुनापरान्त आर्ट सेंटरमध्ये चालणार आहे. विशेष म्हणजे भारतात हे प्रदर्शन पहिल्यांदाच होत आहे. एक आगळावेगळा कलाविष्कार म्हणून ही छायाचित्रे पाहण्यासारखी आहेत, त्याचबरोबरर पृथ्वीबद्दल एक सहवेदना जागवण्याचे काम ही छायाचित्रे करतात.

ज्यांच्या फोटोग्राफीचे हे प्र्र्रदर्शन आहे त्या युरोपस्थित मॅन्डी बार्कर ( Mandy Barker ) यांनी आपल्या जीवनातली अनेक वर्षे जगभरातला समुद्रातला प्लास्टिक कचरा गोळा करण्यात खर्चली आहेत. या कचर्‍याच्या फोटोग्राफीतून समुद्रातील प्लास्टिक कचर्‍याच्या प्रदुषणाकडे जगाचे लक्ष वेधण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. 

अशाच समुद्रातल्या प्लास्टिक कचर्‍याची कलात्मक रचना-मांडणी करून केलेल्या फोटोग्राफीतून हे प्रदर्शन साकारले आहे. काळ्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या या प्लास्टिकच्या मांडणीमुळे खोल समुद्रात जणू तरंगणार्‍या या वस्तू असाव्यात तसा फील या चित्रांना प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर प्लास्टिकच्या गुडूप अंधार्‍या अवकाशात असल्याचा आभास तद्रूप झालेल्या बघणार्‍याला आल्याशिवाय राहत नाही.

दूरून ही छायाचित्रे चट्कन लक्ष वेधून घेतात ती त्यांच्या आकर्षक आकार, रंगसंगतीच्या दिसण्यामुळे. पण बघणारा जवळ जावून कुतूहलाने पाहू लागतो तेव्हा लक्षात येते प्लास्टिकच्या समुद्रातल्या अतिक्रमणाचे भीषण वास्तव. प्लास्टिकच्या समुद्रावर वाढत चाललेल्या विळख्याची करूण कथा या छायाचित्रातली एकेक चीजवस्तू सांगते. बघणार्‍याची अंतर्दुष्टी जागवणे त्याला दृष्टांत देणे हे श्रेष्ठ कलाकृतीचेे काम असते. ही चित्रे त्यादृष्टीने श्रेष्ठ वाटतात. माणूस आणि पृथ्वी यांच्यातील संबंधाला ही छायाचित्रे प्रश्‍न करतात. ‘सौंदर्यशास्त्रीय भीषण’ अशा या छायाचित्रकृती म्हणाव्या का ? कोणाही संवेदनशील माणसाला गदगदवून सोडल्याशिवाय ही छायाचित्रे राहणार नाहीत.

या फोटोंतून दिसते तो बहुतेक प्लास्टिक कचरा हा उपभोगतावादातून निर्माण झालेल्या प्लास्टिकने घडलेला आहे. सिंगल यूज प्लास्टिक, खेळणी, शोभेच्या वस्तू, प्रोसेस्ड अन्नपदार्थांची पॅकिंग्स याचा भरणा त्यात जास्त दिसतो. त्याशिवाय रोजच्या वापरातल्या वस्तू ब्रश वगैरे, मासे मारण्याची जाळी व इतर उपकरणे इत्यादी. समुद्रात फेकलेले जगभरातील फूटबॉल्स जमा करून बेकर यांनी ‘पॅनल्टी’ असे मार्मिक शीर्षक देऊन फोटो काढलेले पहायला मिळतात. 

प्रदर्शनात हंडरसन बेटावरच्या प्लास्टिक कचर्‍याची फोटोग्राफी आहे. जे एक निर्मनुष्य बेट आहे व त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जाही तेथील वैशिष्ट्यामुळे युनेस्कोकडून लाभला आहे. या बेटावर समुद्रातून वेगवेगळ्याठिकाणचा प्लास्टिक कचरा वाहत येत आहे. बार्कर यांनी कचर्‍याची ओळख पटवली त्यातून एकूण 25 देशांतून हा कचरा वाहत आल्याचे निष्पन्न झाले. या कचर्‍यातून पर्यावरणीय हानी व विद्रुपीकरण झाले आहे. कचर्‍याशी काहीही संबंध नसलेल्या बेटावर  हे अतिक्रमण आहे. निष्पाप परिसंस्थेच्या वेदनांचे हुंकार त्यातून ऐकू येतात.

मॅन्डी बार्कर 
प्रदर्शनस्थळी छायाचित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने प्रदर्शित केलेली फिल्म ‘ट्रॅप्ड बाय प्लास्टिक’ पाहिली. यात फोटोग्राफर बार्कर यांनी ‘हर्मिट क्रॅब’ या समुद्री प्रजातीविषयी एक किस्सा सांगितला आहे. त्यात सुमारे पाचशे ‘हर्मिट क्रॅब’ दिशाभूल होऊन कचरा म्हणून फेकलेल्या एका कंटेनरमधे बंदिस्त होऊन मृत्यू पावलेले आढळूून आल्याचे म्हटले आहे. सहज म्हणून बेजबाबदारपणे हाताळल्या जाणार्‍या प्लास्टिक कचर्‍याच्या भयानक परिणामाची एक क्वचित कल्पना या उदाहरणावरून यावी. 

मागे वादळ झाले तेव्हा खवळलेल्या समुद्राने गोव्याच्या किनार्‍यावर आणून टाकले त्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा होता अशी बातमी वाचल्याचे आठवले. प्लास्टिक कचर्‍याच्या पाश्‍वभूमीवर गोव्याबद्दल स्थिती जाणून बघावी या कुतूहलापोटी इंटरनेट सर्च करून पाहिला तर एक न्यूज रिपोर्ट दिसला. हिंदुस्थान टाइम्स या अग्रगण्या राष्ट्रीय इंग्रजी दैनिकात तो छापला गेला आहे. कोचीस्थित सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ज्या अहवालावरून ही बातमी केली आहे त्यानुसार गोव्यात समुद्रकिनार्‍यावर सरासरी प्रत्येक मीटरमागे 25 ग्रॅम प्लास्टिक आढळले होते. 

प्लास्टिक कचर्‍याच्या प्रदूषणाचे संकट हे समुद्राइतकेच गहिरे व विशाल बनत चालले आहे याचे भान हे छायाचित्रप्रदर्शन देते. 

बार्कर म्हणतात -"Art alone cannot change the world. But by bringing attention to marine Plastic pollution in this way, it is hoped my work will help inform, and raise awareness about the overconsumption of plastic and the wider issue of climate change, and in doing so encourage a wider audience to want to do something about it"

आमेन !


(ही पोस्ट माझ्या (sameer zantye) फेसबूक वॉलवर 12 डिसेंबर 2022 रोजी लिहिली होती.)


Comments