एका पुस्तकाच्या अनुषंगाने गांधी स्मरण

आज गांधी स्मृतीदिन. किंवा म्हणूया गांधी स्मरणासाठीचा एक औचित्यपूर्ण दिवस. 31 जानेवारी 1948 पासून गांधी शरीराने दिसणे बंद झाले. पण तोपर्यंत गांधींनी आपल्या जीवनसाधनेतून स्वत:ला एका विचारात तबदील करून घेतले होते. गांधींचे लेखन हा त्यांच्या जगण्याचे व आचरणाचे परावर्तन होते. 


हे येथे सांगण्याचे कारण म्हणजे आजच्या दिवसाचे औचित्य म्हणून गांधींच्या आठवणी सगळीकडे काढल्या जातील. तर त्या अनुषंगाने काहीतरी नोंद करावी आणि ती एका पुस्तकाच्या संदर्भात करावी, या उद्देशाने हा प्रयत्न आहे. 

जुन्या वस्तू अडगडीत टाकल्या जातात किंव निकालात काढल्या जातात. मला असेच एक पुस्तक आढळले होते. पुस्तक जुने जर्जर झाल्याने कुणीतरी रद्दीत काढले असावे.  

गांधींचे या पुस्तकात आलेेले विचार हे आज अन्य प्रकाशनांद्वारेही उपलब्ध असतीलच यात काहीच शंका नाही. पण हे पुस्तक महत्त्वाचे ठरते ते त्याने धारण केलेल्या संदर्भांमुुळे. इथे या पुस्तकातील मजकूराचा उहापोह करण्याचा इरादा नाही. पण पुस्तकाच्या संदर्भात प्रथमदर्शनी दिसणार्‍या काही गोष्टी व त्यातून सापडणारे संदर्भ याची नोंद करायची आहे.

‘टू दि विमेन’ असे शीर्षक असलेले हे पुस्तक ‘गांधी सीसीज’ म्हणून या प्रकाशकाने काढलेल्या खंडांपैकी दुसरा खंड आहे. यात सन 1926 ते सन 1940 पर्यंत महात्मा गांधींनी विविध नियतकालिकांमध्ये स्त्रियांसाठी व स्त्रियांबद्दल केलेल्या लेखनाचे संकलन आाहे. पुठ्ठा बांधणीतले व कापडी वेष्टन असलेले हे पुस्तक आहे. त्याला दीर्घ व सविस्तर अशी निर्देश सूची जोडलेली आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती सन 1941 साली प्रकाशित झालेली दिसते. खुद्द महात्मा गांधींच्या हस्ताक्षरातील चार ओळींचा ‘नोट’ पुस्तकात छापला आहे. प्रकाशनाला अनुमती आणि आशिर्वाद दर्शवणारा असे त्याचे स्वरूप आहे. यात गांधी हे वाचकांना प्रकाशकाचे, संकलनासाठी व छपाईसाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल कौतुक करण्याचे फक्त आवाहन करताना दिसतात. प्रकाशक जे पुस्तकाचे संपादकही आहेत त्यांनी आपले मनोगत लिहिताना एक महत्त्वाचे विधान केलेले आहे. तो म्हणतो गांधी केवळ स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे म्हणत नाहीत तर ‘सायलंट लिडर ऑफ मेन’ म्हणतात. शिवाय हे पुस्तक त्यांनी आपल्या बहिणीला स्त्री म्हणून आपले अधिकार जपल्याबद्दल अर्पण केले आहे.

आता या पुस्तकाच्या काही संदर्भांबद्दल -

- 1. हे पुस्तक आनंद हिंगोरानी यांनी ‘कराची’ येथून संपादित व प्रकाशित केल्याचे पुस्तकात नमूद आहे. आणि त्याची छपाई ही जे.के.शर्मा यांनी ‘अलाहाबाद’ येथून केली आहे. 

- 2. हे पुस्तक भारतीय स्वातंत्र्यापूर्वी प्रकाशित झालेले आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती ही ‘2 ऑक्टोबर 1941 (गांधी जयंती)’ रोजी निघाल्याची नोंद आहे. त्याचे पुनर्मुद्रण ‘13 एप्रिल 1943 (जालियावाला बाग दिवस) रोजी व पुन्हा पुनर्मुद्रण ‘12 मार्च 1946 (दांडी यात्रा दिन) रोजी झाले आहे. येथे कंसात दाखवलेले दिवस जसे मूळ पुस्तकात दाखवले आहेत तसेच लिहिले आहेत. 

- 3. पुस्तकाच्या प्रकाशकांनी पहिल्या आवृत्तीचे पहिल्यांदा दोन वर्षांनी व त्यांनंतर आणखी तीन वर्षांनी असे दोनदा पुनर्मुद्रण केले आहे. या दोन्ही पुनमुद्रणांवेळी प्रकाशकाच्या विधानांकडे लक्ष वेधावे असे वाटते. दुसर्‍या पुनमुर्दणणावेळच्या प्रास्ताविकात एक वाक्य आहे ते असे -   "It is gratifying to learn that in many a case it formed a most suitable wedding present to the girls from their parents, relatives or friends.'


तिसर्‍या पुनमुद्रणावेळच्या प्रास्ताविकात प्रकाशक म्हणतो -  "I regret that it has not been possible for me to meet adequately the increasing demand for this book and that it may be some time yet before I am able to bring out a revised and enlarged edition o f the same.'

या सर्व बाबींकडे पाहिल्यावर जे काही थेट निष्कर्ष निघतात ते म्हणजे - 
- गांधींचा व त्यांच्या विचारांचा संपूर्ण भारतीय उपखंडात असलेला प्रभाव व लोकप्रियता व त्यांचे विचार जाणून घेण्याची जिज्ञासा. ज्यामुळेच कोणतरी गांधींचे विचार संकलित करून ते खंडांमध्ये छापण्यासाठी श्रमांची व पैशांची गुंतवणूक करतो आहे. प्रकाशक व्यक्ती कराची (जे आज पाकिस्तानात आहे) येथील आहे व अलाहाबाद येथून (जे आज भारतात आहे) छपाई करून घेतलीे आहे. 

- ‘गांधी जयंती’ हा स्वातंत्र्यापूर्वीही एक महत्त्वाचा दिवस म्हणून मानला जात असावा. याचमुळे पहिच्या आवृत्तीसाठी प्रकाशकाने हा दिवस निवडला आहे असे दिसते. शिवाय तो केवळ तारीख टाकून थांबलेला नाही तर तेथे कंसात त्याने ‘गांधी जयंती’ असा उल्लेखही केला आहे. त्याबरोबर दुसरी आवृत्ती व तिसरी आवृत्ती पाहिली तर लक्षात येते ते म्हणजे ‘जालियावाला बाग दिवस’ ‘दांडी मार्च दिवस’ हे ब्रिटीश सत्ता असतानाही जनतेकडून राष्ट्रीय दिन म्हणून  वा म्हणूया खास दिवस म्हणून साजरे केले जात असावेत असे या पुनर्मुद्रण प्रकाशनासाठी निवडलेले दिवस व त्यासंबंधीचा कंसातील उल्लेख सांगतो.

- प्रकाशकाने प्रास्ताविकांत केलेली विधानेही महत्त्वाची वाटतात. अर्थात व्यावसायिक क्लृप्ती म्हणूनही ती केली असल्याची शक्यता आहे. पण कदाचित तसे नसावे कारण लवकरच या पुस्तकाची सुधारित आणि विस्तारित आवृत्ती निघणार असल्याचे ते वाचकांना सांगत आहे. 

थोडक्यात काय तर भारतीय स्वातंत्र्यापर्यंत मोहनदास करमचंद गांधी ही व्यक्ती भारतीय उपखंडात महत्त्वाची व दखलपात्र व्यक्ती कशी होती याची प्रत्यक्ष साक्ष जणू हे प्रकाशन देते. तर अशा या अस्सल साधनाच्या अनुषंगाने एका अस्सल व्यक्तीला अभिवादन.

- पुरक संदर्भ : आनंद हिंगोरानी हे स्वत: गांधींचे अनुयायी होते. बर्‍याच लहान वयात ते गांधींच्या प्रभावात आले. काही काळ ते साबरमती आश्रमातही राहिले. ‘गांधी सीरीज’ खाली त्यांनी केलेले गांधी साहित्य संकलन महत्त्वाचे कार्य, गांधींशी संबंधित एका नियतककालिकाशी ते जोडलेले होते असे काही तुटक संदर्भ इंटरनेटवर शोधताना सापडले. अर्थात याविषयी मीही अधिक माहिती शोधत आहे. आपणास काही माहिती झाल्यास येथे कॉमेंट करावी. आता ते गांधी समर्थक असले तरी ‘गांधी सीरीज’ हे प्रकाशन त्यांनी वैयक्तिकरित्या केलेले आहे असे दिसते.

(टीप : या पुस्तकात आलेले संदर्भ येथे खाली टाकली आहेत त्या छायाचित्रातून पाहता येतील.)




Comments