एक पुस्तक प्रकरण

 "when you want something, all the universe conspires in helping you to achieve it."  हे ‘अलकेमिस्ट’ पुस्तकातील एक विधान ही नोंद लिहिताना आठवलं. आज जागतिक पुस्तक दिन. तर त्या निमित्ताने ही नोंद लिहावीशी वाटली. ‘वाचक मनापासून पुस्तक शोधतो तेव्हा पुस्तकंही वाचक शोधत येतात’ असे गृहितक  मला या अनुभवावरून गुंफावेसे वाटते. ही बर्‍याच वर्षांपूर्वी सुरूवात झालेली गोष्ट आहे. एके ठिकाणी एका फोटोबायोग्राफीशी गाठ पडली. ती महात्मा गांधींची होती. आता महात्मा गांधींच्या छायाचित्रांचे संग्रह अनेक असतील. पण यांत गांधींच्या खासगी जीवनाचे झालेले चित्रण खूप भावले होते. विशेषत: समुद्रकिनार्‍यावरती खूर्चित बसलेले गांधी आणि सायकल चालवत जाणारे गांधी अशी दोन छायाचित्रे या मोठ्या आकाराच्या तीनशे पानी पुस्तकातील शेकडो छायाचित्रांतून सगळ्यात जास्त भावली  होती. शिवाय मीठाच्या सत्याग्रहावेळी मीठ मुठीत उचलणारी सत्तेला आव्हान देणारी गांधींची शांत निर्भय मुद्रा, किंवा लंडन भेटीतील सुटातील साहेबांच्या गराड्यात आपल्या नेहमीच्या वेषभूषेतील सहपणे वावरणारे गांधी, वयाच्या 78व्या वर्षी पहाटे 4 वाजता उठून कामात गुंतलेले गांधी, गांधींचे निर्मळ हास्य, (कदाचित ते सांगत त्या आपल्या आातल्या आवाजाशी संवाद साधणारे)धीरगंभीर आत्ममग्न गांधी असे फोटो पाहताना त्यात कितीतरी वेळ रमून गेलो. गांधींच्या जवळ नेणारा असा तो अनुभव होता. गांधींविषयी जाणणार्‍या आणि फोटोग्राफीची आस्था असणार्‍या कोणालाही ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट’ ठरणारे ते पुस्तक ठरावे. तर असे हे पुस्तक मी फक्त पाहिले व होते तेथे ठेवून दिले. मात्र काही दिवसांनी हे पुस्तक संग्रहात असायला हवे असे तीव्रतेने वाटू लागले. पण ते पुस्तक इम्पोर्टेड एडिशन होते व त्यावेळी अ‍ॅमेझॉन वगैरे भारतात जास्त चलनात नव्हते. यात अनेक वर्षे गेली. हे पुस्तकही विस्मरणात गेले. पुढे मुंबईत फ्लोरा फाऊंटन येथे जुन्या पुस्तकांचे ढीग चाळताना अचानक हे पुस्तक दिसले. मात्र तो विक्रेता ज्या किमतीला द्यायला तयार झाला होता त्यापेक्षा माझ्याकडे पाचशे रूपये कमी होते. मला हे पुस्तक पुन्हा हुकले. पुढे आणखी वर्षे गेली. पुस्तक पुन्हा विस्मरणात गेले. अलीकडे काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात फोटोबायोग्राफीसंबंधी लेखात या पुस्तकाचा संदर्भ आला आणि हे पुस्तक मला पुन्हा दिसले व पुस्तक संग्रही मिळविण्यासाठी मी पुन्हा कामाला लागलो. शेवटी अगदी अलिकडे एका जुन्या पुस्तकविक्रेत्याकडून काही हजार रूपयांना मी ते खरेदी केले. अर्थात सध्या या पुस्तकाच्या हार्डबाऊंड एडिशनची किंमत रूपये 10 हजार आहे असे कळले. त्यापेक्षा कमी किमतीत मला पुस्तक मिळाले. हे पुस्तक इतके खास बनले आहे त्याचे कारण त्यामागील खास मेहनत हे आहे. गांधींच्या एका चाहत्याने, पीटर रूहे यांनी अत्यंत आत्मीयतेने नियोजन करून हे पुस्तक घडवले आहे. सुमारे वीस वर्षे त्यांनी  गांधीं विषयीच्या व्हिज्यूअल मटेरियलचे संग्रहण आणि संवर्धन करण्यात खर्च केली आहेत. या पुस्तकातील फोटो हे न्यूज एजन्सीज, खासगी संग्रह यातून त्यांनी मिळविले आहेत. यात एक खास संग्रहातून फोटो येतात ते म्हणजे गांधींचे नातू कनू गांधी यांच्या संग्रहातून. कनू गांधी हे गांधींच्या वैयक्तिक स्फाफचा भाग होते शिवाय त्यांच्या आश्रमनिवासांवेळीही सोबत होते. कनू गांधी हे एक फोटोग्राफर म्हणूनही स्वतंत्रपणे ओळखले जातात. कनू गांधी यांनी गांधींच्या शेवटच्या दहा वर्षांतील अनेक क्षण टिपले होते. गांधींनी आपली फोटोग्राफी कतताना कनू गांधी यांना तीन शर्थी ठेवल्या होते. एक म्हणजे कधीही फ्लॅश वापरायचा नाही, कधीही पोझ द्यायला सांगायचे नाही आणि त्यांच्या फोटोग्राफीकरिता आश्रमातून पैसे मागायचे नाहीत. तर असे हे गांधींच्या जवळ नेणारे, “आमार जीवन आमार बानी” या गांधींच्या जीवनशैलीला अचूक पकडणारे असे हे पुस्तक. काही पुस्तके ही मनोरंजन करतात, काही संदर्भ देतात आणि काही पुस्तके प्रेरणा देतात. हे पुस्तक प्रेरणा देणार्‍या पुस्तकांपैकी आहे. सगळ्यांना पुस्तक दिनाच्या शुभेच्छा. 

(छायाचित्रे केवळ माहितीसाठी देत आहे. ती copyright सुरक्षित असू शकतात)

२३/एप्रिल/२०२३






Comments