पुस्तकांच्या गावी जावे, एक तरी पुस्तक अनुभवावे

भिलार येथे ‘पुस्तकांचे गांव’ साकारले आहे (व हा भारतातला अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे) हे ऐकल्यावर ही संकल्पना अनुभवण्याची  उत्सुकता होती. या उत्सुकतेपोटी गोव्यातून सुमारे 800 कि.मी. (जाते येते) अंतराचा प्रवास नुकताच केला. 

या उपक्रमाबाबत माहिती शेअर करावी या हेतूने ही नोंद करीत आहे. अर्थात ही माहिती 'सर्व माहिती' नव्हे. इथे जर काही मते वगैरे आढळली तर ती माझी वैयक्तिक आहेत.

‘शासनाचा पुढाकार आणि गावकर्‍यांचा सहभाग’ असा हा उपक्रम आहे. वाचन चळवळ वाढावी,  वाचनाची आवड पूर्ण व्हावी, मराठी भाषेतील नवे - जुने लेखक .. यांच्या फुललेल्या बहारदार विश्‍वात ‘वाचन आनंद’ घ्वावा यासाठी हा प्रकल्प आहे, असे या प्रकल्पाबाबतचे छापिल पत्रक वाचताना कळते. हा प्रकल्प महाराष्ट्र्र शासनाकडून सुरु करण्यात आला आहे.  

साताराहून वाई मार्गे महाबळेश्‍वरला जाणार्‍या रस्त्यावर भोसे या जंक्शनपासून सुमारे एक किलोमीटर आत हा गाव आहे. सर्वांच्या परिचयाच्या पांचगणीपासून पाच किलोमीटर.  

पुस्तकांचे गाव म्हणजे काय असा मनात प्रश्‍न होता. त्याचे मला तिथे गेल्यावर सापडलेले उत्तर असे - तिथे जायचे. पुस्तकांच्या गावात जे विभाग पाडले आहेत, त्यात आपला जो विषय आवडता आहे किंवा ज्या विषयावर आपल्याला वाचायला आवडते तो विषय निवडायचा. मग त्या विषयावर पुस्तके ठेवली आहेत त्या ठिकाणी जायचे व वाचत बसायचे.

प्रत्येक ठिकाणी एक विषय/प्रकार याप्रमाणे 25 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विषय करून मराठी पुस्तके मांडली आहेत. हॉटेल-रिसॉर्ट, मंदिरे आणि घरांना या मांडणीसाठी निवडले आहे. प्रकल्पासाठी 25 जागांवर लावलेल्या प्रमाणपत्रानुसार प्रत्येकाकडून स्वेच्छेने प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजे गावकर्‍यांनी जागा उपलब्ध करायची आणि तेथे संबंधित साधनसुविधा म्हणजे पुस्तके, कपाट, पुस्तकांचा स्टँड वगैरे सरकारचे, अशी व्यवस्था, असे समजले.

पुस्तकांच्या गावात कार्यालयीन वगैरे वेळ नाही. आपल्याला कुणाच्या घरी जावेसे वाटले तर आपण जे वेळेचे तारतम्य बाळगून जाऊ ते बाळगून जावे इतकीच अपेक्षा आहे, असे एकाने मी  वेळेबाबत विचारल्यावर सांगितले. मला ते पटले.

कथा, कविता, कादंबरी, ललित गद्य, इतिहास, विज्ञान, क्रीडा, शिवाय बालसाहित्य, संतसाहित्य, स्त्रीसाहित्य, पर्यावरण, लोकसाहित्य, चरित्रे-आत्मचरित्रे अशी विभागणी आहे, त्याचबरोबर नियतकालिके, शिवाजी महाराज व शिवकालीन इतिहास, महाराष्ट्र प्रदेश-भाषा-संस्कृती या विभागांनीही त्यांच्या नावांवरून लक्ष वेधले. या सर्व विभागांबरोबरच काही ठिकाणी मराठी लेखकांची माहिती देणार्‍या फलकांची प्रदर्शने ठेवली आहेत.

यापैकी बहुतेक विभागांच्या धावत्या असतील पण भेटी घेतल्या. 


पुस्तकांच्या गावात फिरता फिरता ‘परिवर्तन चळवळ’ हा फलक पाहिला आणि थांबलो. या विभागात काय पुस्तके असू शकतील ही उत्सुकता वाढली. नंतर पाहिले महाराष्ट्रातील समाजसुधारणांचा व समाजसुधारकांचा इतिहास यावरील पुस्तके येथे ठेवलेली आहेत. वैचारिक वाङ्मयातील माझ्या आवडीमुळे असेल बराच वेळ बसून पुस्तके पाहिली. नव्या सुधारांच्या आणि प्रज्ञावादी वाटा दाखवणार्‍या सुधारकांची एक मोठी फळीच महाराष्ट्रात निर्माण झालेली होती. एकूण देशाच्या उत्थानासाठी त्यांचे योगदान आहे. अशांचे वाङ्मय येथे मांडून ठेवले आहे. यात बाबासाहेब आंबेडकर, आगरकर, र. धो. कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, शाहू महाराज, विनोबा आदींनी निर्माण केलेले वाङ्मय व त्यांच्यासंबंधीचे वाङ्मय अशी पुस्तके होती. शिवाय भारताचे संविधान (मराठी प्रत) या ‘परिवर्तन’ विभागात ठेवलेले आहे, त्यानेही लक्ष वेधले. त्याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले यांची चरित्रे.


 परिवर्तन म्हणजे नेमके काय असा प्रश्‍न होतोच. शोधता शोधता या विभागात एक पुस्तक सापडले-‘परिवर्तन विचार : चिंतन आणि चिकित्सा’. लोकवाङ्मय गृहाने ते प्रकाशित केले आहे. वसंत पळशीकर यांनी लिहिलेल्या निवडक लेखांचा हा संग्रह आहे. गांधी, फुले-आंबेडकर यांचे विचार, मार्क्सवाद, समाजवाद यांचा वेध घेणारी लेखनाची मांडणी पुस्तक चाळताना लक्षात आली.

विषयाशी संबंधित अनेक पुस्तके होती. परिवर्तन आणि सुधारणांची गोष्ट सांगता सांगता नवी वाट शोधण्याची प्रेरणा देणारा असा हा विभाग वाटला. कधीतरी निवांत येऊन ही सगळी पुस्तके वाचायला हवीत असे वाटले. ते कधी जमतय बघू. पण तूर्त कितीतरी मोठमोठ्या विचारवंत्याच्या सानिध्याचे समाधान लाभले. 

एकदा गावात पोचला की चालत सर्व ठिकाणी फिरणे शक्य आहे. स्वत:चे वाहन असेल तर सोयीचे होऊ शकते. (बाकी येथे ऑटो वगैरे प्रकार दिसला नाही.) दीड ते दोन-अडीच कि. मी. अंतराच्या पट्ट्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हा पुस्तक रहिवास आहेत. या सर्व ठिकांणांकडे घेऊन जायला रस्त्याच्या बाजूला वाटाडे फलक उभे आहेत. शिवाय ‘कृषीकांचन’ नावाच्या इमारतीत प्रकल्पाचे कार्यालय आहे. तेथून अधिक माहिती मिळू शकते. महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे चालवला जातो. या संस्थेची प्रकाशनेही या कार्यालयात सवलतीत उपलब्ध आहे. 

ज्या विषयावरची/प्रकारातली पुस्तके वाचायची आहेत त्या विषयाच्या/प्रकाराच्या ठिकाणी जाऊन हवे ते पुस्तक कपाटातून घेऊन कितीही वेळ वाचत बसू शकता, असे सांगण्यात आले. काही ठिकाणी राहण्याची सोय माफक मोबदल्यात होऊ शकते. शिवाय घरगुती, आत्मीयतेचे, चवदार जेवण उपलब्ध होऊ शकते. आणि याला थंड हवेशीर, मस्त व्ह्यू पॉइंट्स आणि स्ट्रॉबेरीच्या मळ्यांची पार्श्‍वभूमी. प्रस्तुत लेखक याच गावात एका घरात निवासाला राहिला होता. 

प्रत्येक ठिकाणी वाचण्याची बर्‍यापैकी व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी व्हरांड्यात, गॅलरीत, खुल्या जागेत छत्रीखाली बसर्‍याची सोय आहे. 

mind developes on the subject it dwells असे कुठेतरी वाचले होते. पुस्तकाच्या गावात फिरताना मेंदूत अनेक कल्पना - विचार येत होते. अर्थात या माझ्या वैयक्तिक कल्पना - विचार आहेत. 


अनेकदा वाटते की पुस्तकांचा एखादा मॉल किंवा सुपर मार्केट असावे. ‘पुस्तकांच्या गावात’ आल्यावर त्याची पुन्हा आठवण झाली. 

मदुराईला भव्य मीनाक्षी मंदिरात गेलो होतो तेव्हा मंदिरात वेगवेगळ्या दिशांच्या दरवाजांकडे भाविकांची वाहतून विनामूल्य करणार्‍या बॅटरीवरच्या रीक्षा सतत प्रदशिक्षा घालताना पाहिल्या होत्या. प्रस्तूत लेखक एका ठिकाणी जाताना सामान ठेऊन चुकून दुसर्‍या दरवाजातून बाहेर आल्याने या रीक्षेमुळे सोय झाली होती. या गावातही (वाचकांच्या सोयीसाठी ) एक दोन अशा ऑटो असाव्यात असे वाटले. 


पुस्तकांचे कलेक्शन हा प्रकल्पाचा प्राण. येथील कलेक्शन हे नेहमी ताजे आणि अद्ययावत आणि त्याचबरोबर आटोपशीर राहायला हवे. त्यामुळे निदान प्रत्येक विभागातल्या काही टक्के संग्रहाची छाननी नियमित काळाने झाली पाहिजे. म्हणजे दरवर्षी एखाद्याने येथे येऊन आठवडाभराच्या वेळेचे गुंतवणूक करावी असे ठरवले तर त्याला दरवेळी काहीतरी नवीन घेऊन जाता यायला हवे. अर्थात ही झाली वैयक्तित मते-टिप्पण्या. येत्या काळात यापेक्षाही अधिक  चांगले येथे होऊ शकते.

हा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्यापासून बर्‍यापैकी आकार घेत आहे असे दिसते. कविता अभिवाचन, साहित्यिक परिसंवाद असे कार्यक्रम येथे होत आहेत. असाच एक ‘कवितेचे गाणे होताना’ हा डॉ. सलील कुलकर्णी यांचा कार्यक्रम प्रस्तूत लेखकाला ऐकता-पाहता आला.

पण हे पुस्तकांचे गाव वेळेच्या मर्यादेमुळे (दोन दिवस) पाहता आले तसे अनुभवता आले नाही. ‘एक तरी पुस्तक अनुभवावे’ अशा उद्दिष्टाने येथे आल्यास येथील भेट सार्थ करता येईल आणि साजरीही करता येईल, असे वाटले.




भिलार  येथे फोटो घेतले होते त्यातले काही येथे देत आहे -




वाटाडे 



वाचनासाठी "सेटिंग "  - १ 




वाचनासाठी  'सेटिंग" - २ 



वाचनासाठी "सेटिंग " - ३



"परिवर्तनाची "  भिंत 


"लोकसाहित्याचा "  परिसर 







मांडणी - १
मांडणी -२

मांडणी - ३


लेखकांच्या गाठीभेटी (साहित्यिक प्रदर्शनातून )
लेखकांच्या गाठीभेटी  (साहित्यिक प्रदर्शनातून )

एक ग्राफिटी 


परिशिष्ट : प्रकल्पातील विभाग

1. बालसाहित्य (दोन ठिकाणी)
2. कादंबरी
3. महाराष्ट्र प्रदेश,भाषा व संस्कृती
4. विज्ञान
5. नियतकालिके व साहित्यिक प्रदर्शनी
6. इतिहास
7. क्रीडा व विविध लोकप्रिय
8. दिवाळी अंक
9. चरित्रे व आत्मचरित्रे
10. वर्तमानपत्रे व साप्ताहिके
11. छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास
12. परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास
13. कथा
14. स्त्री साहित्य
15. लोकसाहित्य
16. ललित गद्य व वैचारिक
17. भाषिक व साहित्यिक खेळ व साहित्यिक प्रदर्शनी
18. विनोदी
19. विविध लोकप्रिय व पुरस्कार विजेते
20.विविध कलांविषयक
21. निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण
22. संत साहित्य
23. साहित्यिक प्रदर्शन
24. कविता









Comments

Post a Comment